चतु:सूत्र : ऊर्जेची आणीबाणी… स्वयंपाकघरात!

एलपीजी किंवा नैसर्गिक वायू किंवा वीज जेव्हा योग्य रचना असलेल्या शेगड्यांमध्ये योग्य पद्धतीने आणि सातत्याने वापरले जातात तेव्हाच स्वयंपाकघरातील हवा शुद्ध राहते.

पर्यावरण-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्याय : प्रियदर्शिनी कर्वे

धुलाई यंत्रांसाठी हल्ली फ्लॅटच्या रचनेतच जागा असते, तशी सौरचूल/ बायोगॅससाठी का असू नये? गॅस/विजेवरील साधने हे स्वयंपाकघरातल्या ऊर्जाशिडीचे टोक नसून एक पायरी आहे. पुढली पायरी ही जग अधिक सुरक्षित करणाऱ्या इंधनांची…

जगभरात सर्व क्षेत्रांमध्ये खनिज ऊर्जास्राोतांचा वापर  कमी करून नूतनक्षम ऊर्जास्राोतांकडे जाण्याची धडपड चालू आहे. पण एका क्षेत्रात मात्र खनिज ऊर्जास्राोतांचा वापर वाढणे हे विकासाचे लक्षण मानले जाते. हे आहे स्वयंपाकासाठीच्या ऊर्जेचे क्षेत्र.

भारतात पक्क्या घरांमध्ये राहाणारी कुटुंबे स्वयंपाकासाठी एकच एक ऊर्जासाधन क्वचितच वापरतात. उदा. शहरी सुखवस्तू घरांमध्ये एलपीजी किंवा पीएनजीच्या जोडीला विजेवर चालणारी साधने आणि शेगड्याही असतात. याच घरांमध्ये काही दशकांपूर्वी गॅसच्या शेगडीला जोडीदार म्हणून केरोसीनची शेगडी वापरली जात असे आणि त्याहीपूर्वी लाकूड व कोळसा या इंधनांवर चालणाऱ्या वेगवेगळ्या चुली व शेगड्या वापरल्या जात होत्या. ग्रामीण घरांमध्ये लाकूडफाटा, शेतातला काडीकचरा, शेणाच्या गोवऱ्या ही पारंपरिक जैवभार इंधने व त्यांवर चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या पारंपरिक चुली पूर्वीही होत्या आणि आजही आहेत. मधल्या काळात त्यांच्या जोडीला केरोसीनच्या शेगड्या येऊन गेल्या आणि आता गॅसच्या शेगड्या आल्या आहेत. क्वचित कुठे कुठे बायोगॅस संयंत्रे किंवा निर्धूर चुली व शेगड्याही पाहायला मिळतात, तर अलीकडे विजेवर चालणाऱ्या आधुनिक शेगड्याही बऱ्याच ठिकाणी दिसू लागल्या आहेत. पण हे सर्व पर्याय येऊनही ग्रामीण भागात पारंपरिक चूल बंद झालेली नाही.

सर्वसाधारणत: स्वयंपाकघरातून जैवभार इंधने व पारंपरिक चुलींचे पूर्ण उच्चाटन होऊन गॅसची शेगडी व विजेवर चालणारी उपकरणे कायमस्वरूपी प्रस्थापित झाली की स्वयंपाकघरातील ऊर्जाशिडीचा कळस गाठला गेला, असे समजले जाते. गृहांतर्गत धुरामुळे महिला व बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांना आळा घालण्यासाठी या संक्रमणाची आवश्यकता आहेच. जैवभार इंधनांवर चालणाऱ्या पारंपरिक चुलींच्या तुलनेत गॅस व विजेच्या शेगड्यांचा वापर स्वयंपाकघरातील प्रदूषण निश्चितच कमी करतो. पण देशातील सर्व स्वयंपाकघरांमध्ये एलपीजी व विजेच्या शेगड्या पोहोचल्या की स्वयंपाकाच्या ऊर्जा क्षेत्रात आणखी करण्यासारखे काही राहणार नाही, ही भारतातील धोरणकर्त्यांची सध्याची भूमिका अदूरदर्शीपणाची आहे.

एलपीजी किंवा नैसर्गिक वायू किंवा वीज जेव्हा योग्य रचना असलेल्या शेगड्यांमध्ये योग्य पद्धतीने आणि सातत्याने वापरले जातात तेव्हाच स्वयंपाकघरातील हवा शुद्ध राहते. या शेगड्यांची निगराणी राखणे, त्यांचा योग्य वापर इत्यादींचे प्रशिक्षण विशेषत: प्रथम वापर करणाऱ्यांना द्यायला हवे, तसे घडत नाही. एलपीजी आणि वीज पोहोचली आहे अशा कोट्यवधी घरांमध्ये पारंपरिक चूलही अजून पेटतेच आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील धूर हटलेला नाही आणि आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतच आहेत. यामागे आर्थिक ते सांस्कृतिक अशी अनेक कारणे आहेत. शिवाय खनिज तेलाच्या उत्खननापासून ते एलपीजीचा सिलेंडर किंवा नळकोंडाळ्यातून नैसर्गिक वायू आपल्या स्वयंपाकघरात येण्याच्या प्रक्रियेत अनेक टप्प्यांवर स्थानिक प्रदूषण होतच असते आणि त्याचाही कुठे ना कुठे आरोग्यावर परिणाम होतच असतो.

हा लेख लिहीत असताना सर्वत्र खनिज कोळशाच्या पुरवठ्यांतील अडचणींमुळे येऊ घातलेल्या वीजटंचाईच्या बातम्या आहेत. दरम्यान, पेट्रोलियम इंधनांच्या दरांचा आलेख चढतोच आहे आणि पेट्रोलपाठोपाठ डिझेलच्या दरानेही शंभरी गाठली आहे. एलपीजीच्या किमतीतही सातत्याने वाढ होते आहेच. जागतिक पातळीवर सध्या नैसर्गिक वायूचीही टंचाई निर्माण झाली असल्याने पीएनजीच्या किमतीही वाढू लागल्या आहेत.

खनिज इंधनांच्या वापरातून अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड वातावरणात जमा होतो आहे, यातून जागतिक तापमानवाढीचे संकट उभे राहिले आहे. जागतिक तापमानवाढीला या दशकभरात आळा घातला नाही तर अब्जावधी लोकांचे जीव धोक्यात येतील, अशा आणीबाणीच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. त्यामुळे खनिज इंधने व दगडी कोळशाचा वापर नियोजनबद्धरीत्या कमी करावा लागेल. नाही तर आज महासाथीमुळे तात्पुरती मंदी येऊन ऊर्जेची मागणी कमी झाल्याने जे घडले आहे, तसे वातावरणीय संकटांच्या आघाताने दीर्घकालीन आर्थिक मंदी येऊन आपोआपच खनिज इंधनांचा वापर कमी होईल!

पेट्रोलियम इंधने व नैसर्गिक वायू मिळवताना सहउत्पादन म्हणून एलपीजी तयार होतो. इतर ऊर्जा क्षेत्रांमध्ये पेट्रोलियम इंधनांची मागणी कमी झाली तर घरगुती वापरासाठी एलपीजीच्या पुरवठा व किमतीवर काय परिणाम होईल? सध्या पेट्रोलियम उत्पादक कच्च्या तेलाला तुलनेने स्वच्छ पर्याय म्हणून नैसर्गिक वायूचे घोडे पुढे रेटत आहेत. व्यावसायिक गरजांसाठी नैसर्गिक वायूची मागणी वाढली तर घरगुती स्वयंपाकासाठी इंधनाच्या पुरवठ्यावर काय परिणाम होईल? आज खनिज कोळशाच्या पुरवठ्यातील चढउतारांमुळे विजेची उपलब्धताही अनिश्चित झाली आहे. वीजनिर्मितीसाठी इतर खनिज इंधने, अणुऊर्जा, नूतनक्षम ऊर्जास्राोत इ. पर्यायांमध्ये वाढ होत असली तरी कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याइतकी पर्यायी वीजनिर्मिती क्षमता विकसित झालेली नाही व फार झपाट्याने होणारही नाही.

खनिज कोळशाच्या पुरवठ्यातील व्यत्ययाचे एक कारण आहे, कोळसा खाणींच्या क्षेत्रात अनपेक्षितरीत्या पडलेला अतिरिक्त पाऊस. हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे. अचानक व अतिरिक्त पाऊस आता दरवर्षीच पडेल. त्यामुळे कदाचित वीजपुरवठ्यात व्यत्यय येतच राहील आणि विजेचा खर्चही वाढेल. तेव्हा स्वयंपाकासाठी विजेवर अवलंबून राहणे कितपत व्यवहार्य ठरेल? पुरवठा व किमतीतील चढउतारांमुळे नव्याने एलपीजी व विजेकडे वळलेल्या स्वयंपाकघरांमध्ये पारंपरिक चुलींचे आणि धुराचे पुनरागमन होण्याचा धोका मोठा आहे.

खनिज इंधनांवर व विजेवर आधारित ऊर्जासाधनांचा वापर हा स्वयंपाकाच्या ऊर्जाशिडीचा कळस नाही तर एक पायरी आहे. शहरी सुखवस्तू वर्ग बराच काळ या पायरीवर स्थिरावला. आता पुढे जायला हवे. ग्रामीण घरांतील पारंपरिक चुलींना नूतनक्षम ऊर्जेवर आधारित पर्याय देण्याच्या दृष्टीने दीर्घकाळ प्रयास चालू आहे. पण बहुसंख्य ग्रामीण कुटुंबांना शहरी जीवनशैलीची आस आहे; आणि त्यात काही वावगे नाही. मात्र एलपीजीअभावी गॅसची शेगडी किंवा विजेअभावी इंडक्शन शेगडी पडून राहिली तरी आधुनिक साधने घरात असण्यावरच लोक खूश आहेत. स्वयंपाकासाठी पारंपरिक चूल घरात आहेच! झाला धूर तर झाला, महिलांच्या आरोग्याची कोण चिंता करतो? अनुदाने व दानांच्या जोरावर स्थानिक व नूतनक्षम ऊर्जास्राोतांवर आधारित स्वयंपाकसाधनांचे वाटप होते, वापर होत नाही. यामागे काही रास्त तर काही गैरसमजांतून आलेली कारणे आहेत. पण अनुदाने आणि दाने देणाऱ्यांनाही वाटपाच्या आकड्यांतच रस आहे. मात्र वीज व खनिज इंधनांच्या पुरवठ्यातील चढउतार पाहता शहरी संपन्न कुटुंबांच्या स्वयंपाकघरांसाठीच अशा तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे! स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा बंद पडला आणि वीजही गेली, तर लाकूडफाटा कुठून तरी विकत आणता येईल, पण तीन दगड मांडून चूल पेटवण्याचे कौशल्य कोणाकडे आहे?

शहरी स्वयंपाकघरांसाठी कोणते पर्याय असू शकतात? परिसरातील जैवकचऱ्यापासून इंधननिर्मिती (बायोगॅस, नूतनक्षम कोळसा, इंधनविटा, इंधनगोळ्या) व शहरी जीवनशैलीशी सुसंगत शेगड्यांमध्ये त्या इंधनांचा वापर हा बहुपेडी पर्याय आहे. याद्वारे जैवकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटेल, या इंधनांची स्थानिक पातळीवर निर्मिती व पुरवठा करण्याचा नवा हरित व्यवसाय उभा राहील, आणि स्वयंपाकासाठी शून्यकर्ब व प्रदूषणरहित ऊर्जासेवा मिळेल. शक्य आहे तिथे सौरचुलींचा वापरही होऊ शकतो. छतावर सौरविद्युत फलकांद्वारे वीजनिर्मिती व त्या विजेतून स्वयंपाकासहित सर्वच घरगुती ऊर्जासेवा मिळवणे, हाही पर्याय काही ठिकाणी सोयीस्कर ठरेल. एलपीजी किंवा पीएनजी व बायोगॅस एकाच शेगडीत सारख्याच सहजतेने कसे वापरता येतील, सौरविजेप्रमाणेच सौरउष्णतेची साठवणूक कशी करता येईल, इ. प्रश्नांची व्यवहार्य उत्तरे शोधणेही गरजेचे आहे.

स्वयंपाकघरातील या ऊर्जासंक्रमणासाठी घरांच्या रचनांमध्येही बदल व्हायला हवे. गृहरचनाकारांनी बदल केल्याने घरगुती धुलाई यंत्रे वापरणे सहजसाध्य झाले, तसेच हे आहे. स्वयंपाकघराच्या बाहेरच ऊन येईल असा सज्जा असेल तर घरगुती ओल्या कचऱ्यावर चालणारे बायोगॅस संयंत्र किंवा सौरकुकर वापरणे सोपे होईल. व्यक्तिगत आणि सार्वजनिक सौरविद्युत निर्मिती व साठवणुकीसाठी अनुकूल अशी बहुमजली इमारतीची रचना करणेही शक्य आहे.

शहरी सुखवस्तू स्वयंपाकघरांसाठी अनुरूप अशा पर्यावरणपूरक स्वयंपाक साधनांच्या संशोधक व व्यावसायिकांची संख्या अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. ही परिस्थिती बदलायला हवी, कारण शहरी स्वयंपाकघरांमध्ये ऊर्जेची आणीबाणी निर्माण होण्याचे दिवस दूर नाहीत.

लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘समुचित एन्व्हायरो-टेक’च्या संस्थापक आहेत.

 ईमेल : pkarve@samuchit.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Energy emergency in the kitchen solar panel for biogas gas electric appliancesf akp