सतीश कामत

सिंधुदुर्गातील कणकवलीत ‘स्वस्तिक फाऊंडेशन’ने साडेपाच वर्षांपूर्वी ‘दिविजा वृद्धाश्रम’ सुरू केला आणि त्याची गरज अधोरेखित करणारा प्रतिसाद अल्पावधीतच मिळाला. निराधार वृद्धांना नव्या उमेदीने जगण्यासाठी पोषक वातावरण तिथे आहे. समाजापासून तुटलेल्या आजी-आजोबांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखकर व्हावी, यासाठी संस्थाचालकांचे प्रयत्न सुरू आहेत.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

गेल्या काही वर्षांत देशातील नागरिकांचं आयुर्मान वाढलं आहे, ही एका दृष्टीने समाधानाची बाब असली तरी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, कौटुंबिक आधार तुटलेल्या एकाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी ती अटळ, असह्य शिक्षाच असते. त्यातच वयोमानानुसार येणारे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्मृतिभ्रंश यांसारखे आजार जडले किंवा काही जिवावरचं दुखणं उद्भवलं तर या हालअपेष्टांमध्ये भर पडते. अशा परिस्थितीत त्यांना प्रत्यक्ष व्यावहारिक आणि भावनिक आधाराची गरज तीव्रतेने भासते. ती भागवण्यासाठी काही संस्था निर्माणही झाल्या आहेत. पण, गरजेच्या तुलनेत त्यांची संख्या व क्षमता अपुरी पडत आहे. शिवाय, त्यातही काही ठिकाणी सेवाभावापेक्षा व्यावसायिकता जास्त अनुभवाला येते. सिंधुदुर्गातील कणकवलीमधल्या ‘स्वस्तिक फाऊंडेशन’ या संस्थेचा ‘दिविजा वृद्धाश्रम’ मात्र याला अपवाद आहे. त्यामुळेच येथील सदस्यांची संख्या अल्पावधीत ४२ वर गेली असून, प्रतीक्षा यादी तयार करावी लागली आहे.

सामाजिक कार्याची आवड असलेल्या दीपिका रांबाडे, संदेश शेटय़े, अविनाश फाटक इत्यादींनी एकत्र येत सहा-सात वर्षांपूर्वी ‘स्वस्तिक फाऊंडेशन’ची स्थापना केली. यापैकी रांबाडे आणि शेटय़े यांनी मुंबईत नोकरी करतानाच ‘एमएसडब्ल्यू’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या अभ्यासक्रमात दोघांनीही ‘वृद्धाश्रम’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. अर्थात पहिला प्रश्न होता, तो कुठे सुरू करायचा? रांबाडे यांचा जन्म, शिक्षण, नोकरी सगळं मुंबईत झालेलं, पण शेटय़े मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये असलेल्या कोळशी या गावचे. तिथे त्यांची नाळ जोडलेली होती. स्वाभाविकपणे या परिसरात काम करणं सोपं जाईल, असं संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वाटलं. त्या दृष्टीने जागेचा शोध सुरू झाला असता कोळशीपासून जेमतेम चार किलोमीटर अंतरावर असलेल्या असलदे गावात सुमारे एक एकर जागा उपलब्ध झाली. त्यानंतर जेमतेम वर्षभरात या ठिकाणी ‘दिविजा वृद्धाश्रमा’ची वास्तू उभी राहिली. या नावालाही एक वेदनेची किनार आहे. संदेश शेटय़े यांच्या एकुलत्या भाचीचं हे नाव. दुर्दैवाने तिचं अपघाती निधन झालं. तिच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी वृद्धाश्रमाला तिचं नाव देण्यात आलं.

अशा प्रकारे सुमारे पाच वर्षांपूर्वी, २५ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचा ‘दिविजा वृद्धाश्रम’ आकाराला आला. सध्या इथे २३ महिला व १९ पुरुष, असे एकूण ४२ वृद्ध पूर्णपणे विनाशुल्क राहात आहेत. यापैकी सर्वात कमी वयाचे सुमारे ६०-६२ वर्षांचे आहेत, तर दोघांनी वयाची नव्वदी पार केली आहे. अर्थात हे सर्वजण इथे केवळ दिवसभर आराम करत नाहीत, तर त्यांच्यापैकी चांगली तब्येत असलेले आणि पूर्वायुष्यात विविध प्रकारच्या गाडय़ा हाताळण्याचा अनुभव असलेले सतेज रणखांबे चक्क संस्थेचे वाहनचालक म्हणून काम करतात. मूळचे डोंबिवलीचे वामन जोशीकाका दररोज सकाळच्या सत्रात सर्व आश्रमवासीयांना योग आणि सहज झेपतील, असे व्यायामप्रकार शिकवतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले सुरेश भाट विविध धार्मिक ग्रंथांचं निरूपण करतात. पुरुषांच्या मानाने महिला जास्त थकलेल्या, विश्रांतीची गरज भासणाऱ्या आहेत. काही जणींना स्मृतिभ्रंश विकार जडलेला आहे. पण, दोन महिला स्वयंपाकघरात चपात्याही करतात, तर मांजरेकर आजोबा भाज्या चिरायला मदत करतात. याशिवाय, आश्रमाच्या परसबागेत काही वेलवर्गीय फळभाज्या, पालेभाज्या, हळद, तसेच झाड तुळस, बेल, गवती चहा, अडुळसा इत्यादी आयुर्वेदिक झाडांची लागवड व जोपासना केली जाते. या उत्पादनांचा त्यांच्याच दैनंदिन आहारामध्ये समावेश केला जातो. इथे तयार होणारी अस्सल गावठी हळद तर मुंबईत विकली जाते. वर्षभरात आषाढी एकादशी, मंगळागौर, दिवाळी, देशाचा स्वातंत्र्य दिन इत्यादी सर्व प्रकारचे सण आणि उत्सव, सदस्यांचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे केले जातात. त्यामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जा भरुन राहिल्याचं जाणवतं.

संस्थेच्या अध्यक्ष दीपिका रांबाडे आणि सचिव संदेश शेटय़े यांनी याबाबतची भूमिका विशद करताना सांगितलं की, वृद्धाश्रम या शब्दाच्या उच्चारातच एका निराशामय जीवनाची छटा असते. पण तो शब्द शासकीय संदर्भासाठी आहे, असं आम्ही मानतो. आमच्या इथे जीवनाची ‘सेकंड इिनग’ हा शब्द वापरून त्या पद्धतीने, नव्या उमेदीने जगण्यासाठी उद्युक्त केलं जातं. आपण शालेय जीवनात मित्र-मैत्रिणी, समवयस्करांबरोबर खेळतो, बागडतो व वेगवेगळय़ा पद्धतीने कळत-नकळत जीवनाच्या मोठय़ा टप्प्यावर येऊन पोहोचतो. पण ते सखे-सोबती, मित्र-मैत्रिणीमुळे हा प्रवास जीवनात अखेपर्यंत लक्षात राहतो. त्याच पद्धतीने जीवनाचा हाही टप्पा आपण जणू समवयस्क मित्र-मैत्रिणींबरोबर घालवत आहोत, अशा भावनेने जगता आलं तर ते नक्कीच सुखदायी होऊ शकतं. म्हणून अशा उपेक्षित, निराधार, अपंग व गरजू वृद्धांसाठी इथं आवश्यक सर्व प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदाने जावं, म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो.

अर्थात हे वातावरण निर्माण करताना भरपूर कष्ट पडले आहेत. वृद्धाश्रम सुरू झाल्यावर प्रथम मुंबईचे एक वयस्कर, फुप्फुसांचा विकार असलेले गृहस्थ इथे राहायला आले. पण, त्यापाठोपाठ आलेल्या एका सुमारे ५८ वर्षे वयाच्या बाईंनी जणू सर्वाना हादरवून सोडलं.  मानसिक दुभंगलेपणाचा विकार जडलेल्या या बाईंची नखं खूपच वाढलेली होती. अंगावरच्या कपडय़ांचं भान सोडाच, नैसर्गिक विधींचीही जाणीव नव्हती. तिला इथे आणलं तेव्हा मदतनीस भांबावून गेले. तिला चांगल्या दर्जाच्या मानसोपचारांची गरज आहे, हे लक्षात आल्यामुळे रांबाडेंनी रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. पण तिथे प्रवेश देण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने असमर्थता दर्शवली. तेव्हा रांबाडेंनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिथे मात्र त्यांची फिर्याद ऐकून घेतली गेली आणि एका मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास त्या बाईंना मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे सुमारे चार महिने काढल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने टुमणं लावलं. मग रांबाडे त्यांना ‘दिविजा’मध्ये घेऊन आल्या. तिची सर्व प्रकारची शुश्रूषा केली. आता त्या बाई हाकेला प्रतिसाद देतात. एखादं छोटंसं काम सांगितलं तर करू शकतात.

करोनाकाळाने तर संस्थाचालकांच्या जिद्दीची जणू सत्त्वपरीक्षाच पाहिली. टाळेबंदी आणि आर्थिक ताणामुळे आश्रमवासीयांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला. पण, शेटय़े यांच्या कोळशी गावातले किराणा मालाचे दुकानदार पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. लागेल तितकं वाणसामान त्यांनी उधारीवर दिलं. त्यामुळे ते दिवस निभावले, असं शेटय़े कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, एकाही सदस्याला करोनाची बाधा झाली नाही.  शेटय़ेंना मात्र त्याही संकटाचा सामना करावा लागला.

या वृद्धांसाठी आखून दिलेल्या दिनचर्येनुसार स्वयंचलित गजर होत राहतात आणि त्यानुसार एकत्र येऊन प्रार्थना, व्यायाम-योग, न्याहारी, जेवण, मनोरंजन,विश्रांती या सर्व गोष्टी दिवसभरात घडत असतात. सर्वत्र उत्तम स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, हे या आश्रमाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. याशिवाय, पौराणिक कथाकथन, जुन्या गाण्याच्या भेंडय़ा इत्यादी उपक्रमांद्वारे सदस्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. या उपक्रमाला पूरक ‘संजीवनी आरोग्य’ या उपक्रमाद्वारे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात. अजून आपल्याकडे लोकांच्या फार पचनी न पडलेल्या अवयवदान व देहदान या दोन विषयांचा प्रचार केला जातो. या कार्यक्रमांतर्गत मृत्यूपूर्वी व मृत्यूपश्चात कशा प्रकारे अवयवदान किंवा देहदान करायचं असतं याचं वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं.

भावी विस्तार योजना

उत्तम नियोजन आणि व्यक्तिगत लक्ष देण्याच्या कार्यपद्धतीमुळे सध्याची इमारत अपुरी पडू लागली आहे. शेजारीच आणखी एक इमारत बांधण्याचं संस्थेच्या विश्वस्तांचं नियोजन आहे. त्यासाठी जमीन आहे. पण, इमारत बांधकाम आणि आनुषंगिक सुविधांसाठी निधीची गरज आहे. पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प साकारला तर सुमारे शंभर वृद्धाची सोय तिथे होऊ शकेल. समाजापासून तुटलेल्या या आजी-आजोबांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखाची व्हावी म्हणून समाजातून असंख्य उदार हात पुढे सरसावणं गरजेचं आहे.