केशव उपाध्ये

पं. दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे केवळ एक संस्थापकच होते असे नाही, तर प्रतिकूल स्थितीत पक्ष वाढवणारे संघटक, साध्या राहणीचा आदर्श घालून देणारे तत्त्वचिंतक, अन्य पक्षांशी आघाडी करणारे संकल्पक, कार्यकर्त्यांना खुलेपणाने बोलण्याची संधी देऊन दुसरी फळी भक्कम करणारे नेते आणि तत्कालीन सरकारला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देणारे द्रष्टेही होते. शनिवारी (२५ सप्टेंबर) साजरी झालेल्या त्यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण…

Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
narendra modi
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा! पंतप्रधान मोदींचा आरोप; काँग्रसचे प्रत्युत्तर
kangana ranaut supriya srinate row bjp mulls legal action on tweet against kangana zws
Elections 2024: कंगनाविरोधातील विधानाने वाद; भाजपची आक्रमक भूमिका; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी आरोप फेटाळले
congress on arvind kejriwal arrest
“जे पेराल तेच उगवेल”; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर पंजाब काँग्रेसची प्रतिक्रिया

भारतीय जनता पार्टी हा सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणातला प्रबळ पक्ष बनला आहे. लोकसभेत ३००च्या वर जागा, अनेक राज्यांत सत्ता, सर्वाधिक सदस्य असलेला जगातील एकमेव राजकीय पक्ष अशी भाजपची गेल्या काही वर्षातील चढती भाजणी आपण पहिली आहे. हे चित्र एका रात्रीत तयार झालेले नाही. १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाल्यापासून ते २०१४ पर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासाचे हे फलित आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा जनसंघाच्या स्थापनेनंतर वर्षा-दीड वर्षातच संशयास्पद मृत्यू झाल्यावर जनसंघाच्या उभारणीची सारी जबाबदारी दीनदयाळजींवर येऊन पडली. तो काळ मोठा कठीण होता. स्वातंत्र्य संग्रामामुळे काँग्रेस, गांधी, नेहरू यांच्या भोवती तयार झालेले वलय, महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वाट्याला आलेली बदनामी व बंदी या पार्श्वभूमीवर जनसंघाला राष्ट्रीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण करावयाचे होते. त्या काळात काँग्रेस विरोधात कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारधारांचे पक्ष हळूहळू आपला पाया विस्तारत होते. जनसंघाला काँग्रेस बरोबरच कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारधारांच्या पक्षांशीही लढायचे होते. दुहेरी आघाडीवर लढताना अन्य पक्षांपेक्षा आपल्या विचारधारेचे महत्व सामान्य माणसाला पटवून द्यायचे होते. हे शिवधनुष्य दीनदयाळजींनी समर्थरीत्या पेलले. सामान्य माणसाला आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेला राजकीय कार्यक्रम संघटनेला द्यायचा होता. आपण सत्तेसाठी नव्हे, तर विशिष्ट तत्वांसाठी राजकारणात आहोत हे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवायचे होते.  त्याचबरोबर पक्षात नवीन नेतृत्वाची बीजे रोवायची होती. ही सर्व आव्हाने  दीनदयाळजींनी यशस्वीरीत्या पेलली.

१९५० आणि ६० च्या दशकात प्रबळ असलेले राष्ट्रीय पक्ष आज कोणत्या स्थितीत आहेत हे पहिले तर दीनदयाळजींच्या परिश्रमाचे मोल ध्यानात येऊ शकते. देशात आणि अनेक राज्यांत वर्षानुवर्षे सत्ता भोगलेला काँग्रेस पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढतो आहे. समाजवादी विचारधारांच्या पक्षाचे नामोनिशाणही राष्ट्रीय स्तरावर दिसत नाही. कम्युनिस्टांचे अस्तित्त्व केरळ सारख्या छोट्या राज्यापुरती मर्यादित राहिले आहे. ५० च्या दशकात कमालीची राजकीय अवहेलना वाट्याला आलेला जनसंघ मात्र, गेल्या ६०-७० वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या रूपाने  देशाची सत्ता स्वबळावर दोनदा काबीज करण्याएवढा बलशाली झाला आहे. दीनदयाळजींनी जनसंघाची वर्षानुवर्षे केलेली वैचारिक मशागत आणि संघटनात्मक बांधणीला भाजपाच्या यशाचे सारे श्रेय जाते. १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाला फक्त तीनच जागा मिळाल्या होत्या. जनसंघाला पहिल्या निवडणुकीत फक्त ३.१ टक्के मते मिळाली होती. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाची लोकसभेतील संख्या एकानेच वाढली; मात्र मतांमध्ये २.८७ टक्के एवढी वाढ होऊन ती ५.९३ वर गेली. १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत जनसंघाच्या मतांची टक्केवारी झाली ६.४४ आणि जागा झाल्या होत्या १४. पुढे १९६७ च्या निवडणुकीत जनसंघाच्या जागा झाल्या ३५ आणि मतांची टक्केवारी गेली ९.४१ टक्क्यांवर. १९६८ मध्ये दीनदयाळजींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तोपर्यंत जनसंघ हा राष्ट्रीय राजकारणातील दखल घेण्याजोगा पक्ष बनला होता.

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी लोकसभेत विविध पक्षांची आघाडी स्थापन करीत काँग्रेस विरोधातील आघाडीच्या राजकारणाचा प्रारंभ केला होता. दीनदयाळजींनी हा पाया आणखी विस्तारण्यासाठी योगदान दिले. १९६७ मध्ये काँग्रेस विरोधातील ‘संविद’च्या प्रयोगाला दीनदयाळजींनी पाठिंबा दिला. जनसंघाला ठोस वैचारिक आधार देतानाच अटलबिहारी वाजपेयी, बलराज मधोक, यज्ञदत्त शर्मा अशी नेतृत्वाची दुसरी फळी तयार करण्याचे काम दीनदयाळजींनी मोठ्या सक्षमतेने केले. अटलजी प्रभृतींनी संसदीय आघाडी सांभाळायची आणि दीनदयाळजींनी तळागाळापर्यंत संघटनात्मक बांधणी भक्कम करावयाची या सूत्राने जनसंघ कार्यरत राहिला.  वेगवेगळया मुद्द्यांवर केलेल्या आंदोलनांमुळे राष्ट्रीय राजकारणात जनसंघाची वेगळी ओळख तयार होऊ लागली. १९५४ मध्ये झालेल्या गोवा मुक्ती आंदोलनात जनसंघाने पूर्णशक्तीनिशी सहभाग घेतला. १९५८ मध्ये त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पाकिस्तानशी करार करूत पश्चिम बंगालमधील बेरुबाडी क्षेत्रातील भूभाग तत्कालीन पूर्व पाकिस्तानला सुपूर्द केला. या निर्णयाविरोधात संसदेला घेराव घालण्याचे आवाहन जनसंघाने केले होते. १९५९ मध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीविरोधात जनसंघाने राष्ट्रव्यापी निदर्शने केली. १९५८ मध्ये वाढत्या महागाईविरोधात देशभर आंदोलन आले. १९५९ मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर झालेले देशव्यापी आंदोलन लक्षणीय होते. १९६५ मधील कच्छ कराराविरोधात केलेले आंदोलन ऐतिहासिक ठरले. जनसंघाचे वैचारिक शिल्पकार म्हणून योगदान देताना दीनदयाळजींनी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पंडित नेहरू आणि तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर चढवलेले प्रखर हल्ले हे जनसंघाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास कारणीभूत ठरले.

१९६२ साली चीनने केलेल्या आक्रमणानंतर पंडित नेहरूंच्या नेतृत्वाभोवती तयार झालेले वलय हळूहळू विरू लागले. चीनच्या आक्रमणाचा भारतीय जनतेला जबरदस्त मानसिक धक्का बसला. दीनदयाळजी चीनच्या आक्रमणाआधी अनेक वर्षापासून नेहरू सरकारला चीन पासून सावध राहण्याचे इशारे देत होते. चीनच्या आक्रमणानंतर भारतीय जनमानस हडबडून गेले. दीनदयाळजींच्या द्रष्टेपणाची ओळख साऱ्या देशाला झाली.

संघटना बांधणीसाठी दीनदयाळजींनी पराकोटीची बांधिलकी दाखवली. देशभर प्रवास करताना ते रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाने प्रवास करत असत. एक्स्प्रेसने प्रवास करण्याऐवजी पॅसेंजरचा पर्याय ते निवडत असत. यामागचा दीनदयाळजींचा विचार स्तिमित करणारा होता. तिसऱ्या वर्गातून प्रवास करताना अधिकाधिक लोक भेटतात या कारणाने जनसंघासारख्या राष्ट्रीय पक्षाचा हा तत्त्वचिंतक नेता रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाने प्रवास करत असे. जनसंघाचे अध्यक्ष झाल्यावर पक्षाने त्यांना पहिल्या वर्गातून प्रवास करण्यास सांगितले. दीनदयाळजींच्या परिश्रमाचा, साधेपणाचा आदर्श जनसंघाच्या कार्यकर्त्यांपुढे आपसूक निर्माण झाला.

जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात वेगवेगळ्या राष्ट्रीय विषयांवर खुलेपणाने चर्चा होत असे. पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना आपले म्हणणे मुक्तपणे मांडण्याची संधी दिली जात असे. जनसंघाच्या १९६७ मध्ये कालिकत येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेची पाठराखण करावी, चीनला पाठिंबा देणाऱ्या सोव्हिएत रशियाची साथ सोडावी असे मत एका कार्यकत्र्याने मांडले होते. त्या वेळी दीनदयाळजींनी अमेरिका व रशिया यांच्यापासून समान अंतर राखणे हे तत्त्व अधोरेखित केले.

जनसंघाच्या संघटनात्मक उभारणीचे शिवधनुष्य समर्थपणे पेलणारा हा द्रष्टा चिंतक अकाली काळाच्या पडद्याआड गेला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रमाणे दीनदयाळजींच्या मृत्यूचे गूढ अजून उकललेले नाही.    

लेखक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ता आहेत. ईमेल : Keshavupadhye@gmail.com

(