मराठीत ‘पुढच्यास ठेस आणि मागचा शहाणा’ अशी म्हण आहे. मात्र आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांच्या घटना बघितल्या, तर पुण्यातील परिस्थिती ‘पुढच्यास ठेस आणि मागच्यालाही ठेच’ अशी असल्याचे सहजच स्पष्ट होते. गेल्या एका वर्षांत पुणे शहरात आर्थिक फसवणुकीचे तब्बल ७५० आणि आर्थिक अपहाराच्या प्रकरणांचे ६५ गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले आहेत.
‘समृद्ध जीवन’ हे गुंतवणुकीच्या फसवणुकीचे पुण्यातील ठळक उदाहरण. या प्रकरणात ‘समृद्ध जीवन’सह महेश मोतेवार आणि आणखी तीन जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेने घेतलेल्या गुंतवणूक प्रकरणी ‘सेबी’ (रोखे व प्रतिभूती विनिमय मंडळ) कडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीने मोतेवार यांच्या कंपनीला ३१ ऑक्टोबर २०१३ मध्ये एक नोटीस बजावली होती. त्यानुसार कंपनीला गुंतवणूक घेण्यावर र्निबध घालण्यात आले होते. ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’च्या माध्यमातून समृद्ध जीवन कंपनी नागरिकांकडून आर्थिक गुंतवणूक व ठेवी घेत होती. अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीच्या परवानगीची गरज असते. मात्र, कंपनीने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. सेबीने गुंतवणूक घेण्यास र्निबध घातल्यानंतरही कंपनीने गुंतवणुकी घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीकडून कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान कंपनीचे लेखापरीक्षण व हिशोबाच्या फायली ताब्यात घेतल्या होत्या. त्या वेळी आदेशाचे उल्लंघन करून कंपनीने नागरिकांकडून गुंतवणूक सुरूच ठेवल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत उघड झाले. त्यामुळे सेबीने स्वत:हून याप्रकरणी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.