नीलेश पवार

पारंपरिक शेतीला प्रयोगशीलतेची जोड देत शेतीपूरक मत्स्य व्यवसायातून नंदुरबारच्या शहाद्यातील संगीता पाटील या वर्षांकाठी लाखोंची उलाढाल करीत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मत्स्यबीज केंद्रासोबत मत्स्यखाद्याचा प्रकल्पही कार्यान्वित केल्याने परिसराची वाटचाल शेतीपूरक मत्स्य व्यवसायाकडे होताना दिसून येत आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

जिद्दीला मेहनतीची जोड दिली, तर एक महिला काय करून दाखवू शकते याची प्रचिती शहादा तालुक्यातील नांदरखेडय़ाच्या संगीता पाटील यांनी करून दिली आहे. तापी नदीलगत असणाऱ्या या परिसरात मत्स्य शेती जास्त जोमाने होऊ  शकते, हे लक्षात घेत त्यांनी आपल्या शेतात मत्स्य शेतीचा मार्गदर्शक प्रकल्प राबवून यशस्वी केला.

पाटील यांची नांदरखेडा परिसरात वडिलोपार्जित जमीन आहे. तिथे ऊ र्जा फार्म हाउसची स्थापना केली. आज त्यांच्या सात एकर क्षेत्रात तब्बल १५ शेततळी आहेत. चार वर्षांंपूर्वी पाटील यांनी हा व्यवसाय करण्याचे निश्चित केले. तेव्हा केवळ तीनच शेततळी होती. शेततळ्यांची वाढती संख्या त्यांच्या यशाची प्रचिती देत आहे.

सध्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या संगीता यांना प्रगतिशील शेतकरी वडील मोतीलाल फकीरा पाटील यांच्याकडून शेतीचे ज्ञान मिळाले. वडिलांचा वारसा त्या पुढे नेत आहेत. आजही त्या १५ दिवस पुणे आणि १५ दिवस नंदुरबारमध्ये राहून हा संपूर्ण व्यवसाय नावारूपास आणत आहे. शेतात तळे करून त्यात कुठल्याही प्रकाराचे पॉलीथीन न टाकता खुल्या तलावातून मत्स्य शेतीचा हा प्रयोग आहे.

सुरुवातीला गुजरात राज्यातून एक कोटी मत्स्यबीज आणून शेततळ्यातून उत्पन्न मिळत असे. मात्र यात अर्ध्याहून अधिकचे मत्स्य बीज जगत नसल्याने होणारा नफा देखील सुरुवातीला तुटपुंजाच होता. यावर मात करण्यासाठी त्यांनी शेतीतज्ज्ञ आणि मत्स्य अधिकाऱ्यांच्या सल्लय़ाने आपल्याच शेतात ‘हॅचरीज’ म्हणजे मत्स्य बीज उत्पादनाचा प्रकल्प उभारला. या केंद्रातून निघणारे मत्स्यबीज परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून परिसरात मत्स्य शेतीचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मत्स्य खाद्य देखील अतिशय महाग असल्याने ते स्थानिक शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य खाद्यची शेती करून ते तयार करण्याचा प्रकल्पही आकारास आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

शेत तळ्यातील माशांना शहादा तालुक्यातील बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने प्रती किलो ९० ते ९२ रुपये प्रमाणे त्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. एका शेततळ्यातून मिळणारे मासे विकून वर्षांकाठी तीन ते चार लाखांची उलाढाल होते. एकप्रकारे सर्व तळय़ांमधून होणारी उलाढाल साठ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या प्रवासात अनेकदा निसर्गाच्या लहरी पणाचे फटके सोसावे लागले. मात्र हिंमत न हरता चार कामगारांच्या मदतीने पाटील यांनी हा मत्स्य व्यवसाय वृद्धिंगत केला जात आहे.

अर्ध्या एकरमधील तलावात चार ते पाच हजार मासे टाकले जातात. त्यांच्या संगोपनाद्वारे उत्पादन घेतले जाते. साधारणत एका माशाचे ९०० ग्राम ते एक किलो वजन झाल्यानंतर तो ९० रुपये घाऊ क दराने व्यापाऱ्यास विक्री केला जातो. त्यामुळे सरासरी एका तळ्यातून एक हंगामात साडेतीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतातील १५ तलावातून वर्षांकाठी जवळपास साठ लाखांची उलाढाल होते.

माशांची निवड करताना स्थानिक मागणी विचारात घेतली गेली. नंदुरबार भागात रऊ , कटला, मुरगल, सायप्रिनस (कोंबडा मासा) या माशांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे या प्रजातीच्या माशांची शेती केली जाते. मत्स्य शेतीत चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक तलावातील पाण्याची नियमित तपासणी केली जाते. पाण्यातील ‘पीएच’ राखून ठेवण्याबरोबर माशांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना दोन वेळा उच्च प्रतीचे आणि दर्जेदार खाद्य वेळनिहाय दिले जाते. यामुळे माशांना कुठलाही आजार होत नाही. माशांच्या वाढीसाठी कुठल्याही वेगळया प्रक्रियेचा अवलंब केला जात नाही. केवळ खाद्य पदार्थांवर लक्ष केंद्रित करून नैसर्गिक पद्धतीने वाढ झालेल्या या माशांची चवही लज्जतदार असल्याने त्याला मागणी अधिक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कृषी आणि मत्स्य विभागाला एखादा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवायचा असला अथवा नव्या मत्स्यबीजाबाबत काही चाचण्या घ्यायच्या असल्यास ते संगीताताईच्या शेतात आवर्जून तो प्रयोग राबवतात. यशस्वी झालेल्या प्रयोगांचा उपयोग परिसरात मत्स्य शेती वाढून शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्या सांगतात. आपल्या वडिलोपार्जित जमिनीत एका महिलेच्या पुढाकारातून सरू असलेली मत्स्यशेतीची ही गगनभरारी इतरांना प्रेरणा देत आहे. अनेक शेतकरी आणि महिला त्यांचा हा प्रकल्प पाहण्यासाठी आवर्जून येतात. तापी नदीच्या तीरावर वसलेल्या नांदरखेडय़ाच्या संगीता संजयकुमार पाटील यांचा हा प्रयोग शेतीला पूरक उद्योगाची दिशा दाखवत आहे.