कोणत्या अंगभूत सुखासाठी मुली डान्स बारमध्ये नाचतात?

राजीव साने यांचा ‘प्रणयातील दारिद्रय़ आणि निषिद्धतांचे पावित्र्य’ हा लेख (रविवार विशेष, २१ जुलै) म्हणजे ‘रती-वैविध्याच्या’ उदात्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहे.

राजीव साने यांचा ‘प्रणयातील दारिद्रय़ आणि निषिद्धतांचे पावित्र्य’ हा लेख (रविवार विशेष, २१ जुलै) म्हणजे ‘रती-वैविध्याच्या’ उदात्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. कामजीवनातील नैतिकता आणि अभिरुचीचे सैद्धान्तीकरण करून ‘परिपक्वता’ न आलेल्या समाजाला नवा दिशा-बोध दिल्याचा आव त्यांनी आणला आहे. विशेषत: ज्या डान्स बारबंदीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भात तो लिहिला आहे, त्या प्रश्नाचे ‘सुलभीकरण’ साने यांनी करून टाकले आहे.
त्यांच्या अनेक विधानांचा प्रतिवाद करता येईल.  डान्स बार हा विषय कोंडमाराग्रस्त पुरुष आणि रोजगारवंचित स्त्रिया यांच्याशी संबंधित आहे, हे विधान इतकेच पुरेसे नाही. साने यांच्याप्रमाणे कोंडमाराग्रस्त पुरुष, पैशाविना अशा ठिकाणी जाऊ शकेल का? ज्या तेलगीमुळे डान्स बारला प्रसिद्धी मिळाली त्याचा सामाजिक, वैचारिक दर्जा काय? रोजगारवंचित स्त्रिया असे म्हणताना त्यांचा सामाजिक, आर्थिक, जातीचा स्तर कोणता याचाही समाजशास्त्रीय अभ्यास केला पाहिजे, तर हा प्रश्न किती व्यापक आहे हे जाणवेल.  ‘विक्रय हा दास्यापेक्षा जास्त मुक्तिदायी’ या विधानावर विश्वास ठेवायचा म्हटला तरी मुक्तीची खात्री देण्याची जबाबदारी कोणाची? देहविक्रयातून मुक्तीऐवजी, दास्यातून शोषण व अधिक शोषणाकडे नेणाऱ्या परिस्थितीची चिंता कोणी करायची? दास्यातून मुक्तीइतकेच सन्मानाने जगणे महत्त्वाचे नाही का?  ‘रती’वैविध्य हा शब्दही पुरुषशाहीचे समर्थन करणारा व ‘स्त्री’वाचक शब्द समस्त स्त्रियांचा अपमान करणारा आहे. सेक्शुअल व्हेरिएशनला लैंगिक वैविध्य हा शब्द त्यांना सुचला नाही, की त्यांनी विचारपूर्वक ही शब्दयोजना केली आहे?
 डान्स बारच्या विषयात बघेगिरीवाला पुरुष आणि दाखवेगिरीवाली स्त्री यांच्यात कोणती परस्परपूरकता दिसते? कोणत्या अंगभूत सुखासाठी महाराष्ट्राच्या नव्हे भारतातल्या खेडय़ांतल्या, गरीब, शोषित, अनेकदा दलित समाजातल्या मुली यात येतात? दाखवेगिरीचा मोबदला घेता घेता त्यांना बदल्यात काय काय गमवावे लागते?
 साने यांनी स्वत:च्या मतांचे सैद्धान्तीकरण व उदात्तीकरण करताना परिस्थितीमुळे या व्यवसायात ढकललेल्या मुलींना त्या ‘बाय चॉइस’ येत असताना असे गृहीत धरणे जितके अ-संवेदनशील आहे तितकेच नैतिकतेने जगणाऱ्या समाजाचा ‘उदात्ततेने चळणारे’ अशी संभावना करणे हासुद्धा बहुजनांचा अधिक्षेप आहे.

काय नसíगक, काय
अनसíगक हे ठरविणे सोपे नाही
‘प्रणयातील दारिद्रय़..’ हा लेख आवडला. ना.सी. फडके यांच्या प्रणय-रम्य आणि प्रणय-संपृक्त कादंबऱ्यांत हे दारिद्रय़ अधिक ठळकपणे दिसून येते. याउलट ‘डॉ. झिवागो’सारख्या कादंबऱ्यांत फडके-टाइप प्रणय-रम्यता नसूनही प्रणयातील (फडके-टाइप) ‘दारिद्रय़’ असत नाही. प्रणयाच्या प्रांतातही ‘दारिद्रय़-रेषे’ची व त्या खाली जगणाऱ्या दुर्दैवी जीवांची कल्पना करणे अशक्य नाही. कामजीवनातील नतिकता आणि अभिरुची या विषयीचे प्रश्न वेगळे आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा व्यवस्थित मांडल्याबद्दल धन्यवाद.
कामविषयक अभिरुचीस्वातंत्र्य फक्त पुरुषांना व नतिक बंधन हे केवळ स्त्रियांना अशी वाटणी पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये झालेली असते. मनुष्य हा स्खलनशील प्राणी आहे (पुरुष म्हणजे पोचा आलेले अ‍ॅल्युमिनियमचे भांडे, जितकी स्खलने अधिक तितके पोचे अधिक) ही व्याख्या सोयीस्करपणे केवळ पुरुषांनाच लागू केली जाते. या उलट नीतिमत्तेला तडे जायला एकटी स्त्री (स्त्री म्हणजे काचेचे भांडे; एकदा तडकले की फुटले) पुरेशी असते असे मानले जाते. पण या सरधोपट मांडणीपलीकडे जाण्याची गरज आहे.
कामजीवनातील  अभिरुचीस्वातंत्र्याच्या प्रश्नाची चर्चा करणे म्हणजे स्वैराचाराचा पुरस्कार करणे असे नाही. समिलगी आकर्षणाचा प्रश्न हा नतिकतेचा नसून अभिरुचीविषयक प्रश्न आहे, हे या संदर्भात आक्रमकपणे विसरले/नाकारले जाते. कामजीवनातील अभिरुची बदलू शकते हे मोकळेपणे मान्य केल्यास सध्याच्या कुटुंब-पद्धतीमधील पतीला परस्त्रीविषयक व पत्नीला परपुरुषविषयक आकर्षण वाटण्याच्या तसेच पतीला पत्नीऐवजी ‘त्याचे’ व पत्नीला पतीऐवजी ‘तिचे’ आकर्षण वाटण्याच्या घटना कदाचित अधिक समजूतदारपणे हाताळता येऊ शकतील. माणसाचे शरीर व त्या शरीराच्या गरजा हा अजूनही बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. त्यामुळे काय नसíगक व काय अनसíगक हे ठरविणे तितके सोपे नाही. कामजीवनातील अभिरुचीविषयक स्वातंत्र्य उपभोगण्याचा तसेच ते न उपभोगण्याचा हक्कही प्रत्येकाला समान प्रमाणात उपलब्ध असतोच. त्यामुळे ते स्वातंत्र्य उपभोगणारे हे स्वैराचारी व न उपभोगणारे म्हणजे नीतीचे पालनकत्रे असे म्हणण्याची गरज नाही. कामजीवनातील अभिरुचीविषयक स्वातंत्र्य स्वीकारणाऱ्या व नाकारण्याला ‘चांगले-वाईट’ असे नतिक मूल्य चिकटविण्याचीही  गरज नाही.
 शरद देशपांडे, सिमला

बनेलपणा, खोटारडेपणाची उत्तम चिरफाड !
डान्स बारसंबंधी राज्यभरात सध्या मतमतांतराचा धुराळा उडालेला आहे. नैतिकतेच्या बुरख्याआडून प्रश्न भावनिकही केला जात आहे. त्यामुळे खरा प्रश्न बाजूला पडलेला आहे.
साने यांचा ‘प्रणयातील दारिद्रय़..’ हा लेख केवळ डान्स बार या विषयासाठीच नव्हे, तर आपला अस्सल बनेलपणा व खोटारडेपणाची चिरफाड करणारा आहे. असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा कसलीही भीडभाड न ठेवता सत्य मांडणे आवश्यक असते. कधी-कधी खूप उथळ अशी चर्चा होते ज्यात संसार उद्ध्वस्त होतील, स्त्रियांचे रोजगार बुडतील, ते युवक भ्रष्ट होतील, असे अनेक शेरे ऐकायला मिळतात. त्यात तथ्यही असू शकते. मात्र त्यावर योग्य असा उपाय सुचवला जात नाही. सुचवला तरी त्याची कार्यवाही होईलच याची खात्री नसते. वापरा आणि फेकून द्या, कुणाचेही गळे चिरा, कितीही लूटमार करा, असे विचार जेव्हा प्रबळ होतात तेव्हा राष्ट्राची अधोगती ठरलेलीच असते. आम्हाला सुख हवे आहे, ही जी मानसिकता बनलेली आहे त्याला आलेली ही विषारी फळे आहेत. साने यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तसल्या प्रश्नात गुंतवून राज्याला लुटणारे दरोडेखोर सुखाने राज्य करीत आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचे काम ‘लोकसत्ता’ करीत आहे.
सायमन मार्टिन, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: For what pleasure girls dance in bars

ताज्या बातम्या