द्राक्ष वाणाची ‘बाग’!

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील निवडक द्राक्ष बागायतदारांसाठी युरोप दौरा आयोजित केला होता.

(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर

परंपरागत शेती करतानाच या विषयात रोज घडणाऱ्या नवनव्या संशोधनाची दखल शेतक ऱ्यांना घ्यावी लागते. दुसरीकडे शेती करता करताच स्वत: संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करण्याचे कामही काही शेतकरी करत असतात. सोलापुरातील द्राक्ष उत्पादक असलेल्या काळे कुटुंबीयांनी हीच परंपरा निर्माण करत द्राक्षाची नवनवी वाणे विकसित केली आहेत.

प्रगतशील अशा पश्चिम महाराष्ट्रात असूनही सदैव दुष्काळाचा शाप असलेल्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडे उजनी धरणाचे पाणी काही भागात का होईना, शेतकऱ्यांच्या शेतात मिळू लागले आहे. पाण्याचा अभाव असलेल्या सांगोला, मंगळवेढा यांसारख्या भागांत जिद्दी, कष्टाळू शेतकऱ्यांनी निसर्गापुढे हार न मानता, दुष्काळाचे रोजचे तेच ते रडगाणे बाजूला ठेवून मोठ्या कष्टाने कमी पाण्यात शेतीचे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यामुळे बागायती शेतीचे प्रमाण वाढत चालले असून यात डाळिंब, चिक्कू, पेरू, द्राक्षे, बोर, पपई, सीताफळ, केळी व इतर फळशेती बहरत आहे. विशेषत: ही फळपिके परदेशात निर्यातही होत असून या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याने स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आपली ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतच आता येथील द्राक्ष उत्पादकांनी तयार केलेल्या नव्या वाणाची भर पडली आहे.

सोलापूर-बार्शी रस्त्यावर सोलापूरपासून अवघ्या काही अंतरावर उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज या गावाने तर द्राक्ष उत्पादनात देश-परदेशात दबदबा निर्माण केला आहे. दिवंगत नानासाहेब सोनाजी काळे व त्र्यंबक तात्या दबडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याचे श्रेय दिले जाते. पारंपरिक शेतीचा विचार बाजूला ठेवून शेतीमध्ये सुधारणा करीत, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी पाण्यात केलेली शेती वा नवनवीन वाणांची निर्मिती. यात काळे व दबडे कुटुंबीयांनी दिलेल्या योगदानाची दखल केवळ देशानेच नव्हे तर जगाने घ्यावी, अशी आहे. अलीकडेच काळे कुटुंबीयांनी आपल्या नावलौकिकात भर टाकत, उत्पादित केलेल्या ‘किंगबेरी’ या नव्या द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा नान्नज येथील द्राक्ष बागेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

सोलापूर जिल्हा नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील प्रगत असलेल्या पश्चिाम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा असला तरी नेहमी अवर्षणग्रस्त म्हणूनच सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. अशा या दुष्काळग्रस्त त्यातही उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरात माळरानावर द्राक्षबागा फुलवून नुसते बागा फुलवल्या नाहीत तर नवनवीन प्रयोग करीत नव्या द्राक्षांच्या वाणांची निर्मिती करण्याचे भगीरथ यशस्वी प्रयत्न काळे यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व म्हणजेच १९३९ साली जन्म झालेले नानासाहेब यांचे शिक्षण त्यावेळच्या मॅट्रीकपर्यंत झालेले. परंतु एखाद्या संशोधकासारखे ते शेतात काम करीत. पपई, कलिंगड यांची लागवड करून त्यांनी काळ्या मातीतून सोन्याचेच उत्पादन केले. त्यानंतर त्यांनी १९५८ साली प्रथमच पारंपरिक बिया असलेल्या द्राक्ष वाणांची बाग फुलवली. पुढे १९६४ साली बारामती येथून द्राक्ष बागायतदार आण्णासाहेब शेंबेकर यांच्याकडून काळे आणि दबडे या जोडीने द्राक्ष वाण आणून ‘थॉमसन सिडलेस’ हे वाण विकसित केले. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच द्राक्षाची लागवड करण्याचा मानही नानासाहेबांनी मिळवला. शेतीला सर्वस्व मानून त्यांनी द्राक्ष लागवडीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. थॉमसन सिडलेस या द्राक्ष वाणामध्ये नैसर्गिक बदल घडून एक लांब मणी असणारी व दिसायला आकर्षक आणि खाण्यास वेगळी चविष्ट असलेले द्राक्ष वाण विकसित करून त्याला ‘सोनाका सिडलेस’ असे नामकरण केले. ‘सोनाका’मधून त्यांनी सोलापूर, आजोबाचे नाव, नान्नजचे नाव आणि आडनाव यातील अद्याक्षरे घेऊन एक नाममुद्रा निर्माण केली. हीच सोनाका सिडलेस द्राक्षे पुढे जगाच्या बाजारपेठेत भाव खाऊ  लागली.

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील निवडक द्राक्ष बागायतदारांसाठी युरोप दौरा आयोजित केला होता. त्या दौऱ्यात एका वेगळ्याच द्राक्षाने त्यांचे मन मोहून टाकले. त्याकडे काळे हे आकर्षित झाले. त्याचवेळी ते युरोपातील त्या मनमोहक द्राक्षाच्या काही काड्या घेऊन आले आणि त्याचे लहान मुलासारखे संगोपन केले. त्यातूनच रंगीत द्राक्ष वाण विकसित झाले. युरोप दौऱ्याला जाताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेले मार्गदर्शन मनाला भावल्याने त्या वाणाला शरद पवार यांचेच नाव दिले. त्या रंगीत द्राक्ष वाणाला ‘शरद पर्पल सिडलेस’ असे नामकरण ४ फेब्रुवारी १९९० रोजी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते केले. अर्थातच हे द्राक्ष लोकप्रिय होण्यास विलंब लागला नाही. त्यातून मोठी अर्थप्राप्ती होऊ  लागली. या नवीन वाणाचा लाभ अन्य द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनाही होण्यास मदत झाली. काळे यांच्या या नव्या द्राक्ष वाणाची दखल घेत,१८ ऑगस्ट १९९० रोजी वसंतराव नाईक प्रतिष्ठानने पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. वडिलांचे शेतीतील कष्ट आणि शेतीवरील निष्ठा आणि प्रेम पाहून चिरंजीव दत्तात्रेय आणि सारंग यांनीही शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. कारण शेतीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. दत्तात्रेय काळे यांनी वडिलांसोबत शेतात लक्ष दिले आणि वडिलांच्या पाऊ लवाटेने शेतात प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिले वाण २००४ मध्ये उत्पादित केले. ते ‘सरिता पर्पल सिडलेस’ या नावाने प्रसिध्द झाले. त्यानंतर ‘नानासाहेब पर्पल सिडलेस’ हे वाण २००८ मध्ये विकसित केले. पुढे २०१६ साली ‘सोनाका सिडलेस’मधून ‘दनाका सिडलेस’ हे आणखी एक वेगळे वाण विकसित केले. शेतात नवनीन प्रयोग करताना, सर्वच आलबेल आहे असे नव्हते. वडिलाप्रमाणेच दत्तात्रेय काळे यांना निसर्गाची अवकृपाही सहन करावी लागली. नेहमी दुष्काळी ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई कायमचीच. त्यात बागा जगवायच्या म्हणून त्यांनी शेतापासून जवळपास ११ किलोमीटर असलेल्या हिप्परगा तलावातून मोठा खर्च करीत पाण्यासाठी पापपलाइन करून घेतली. द्राक्ष बागाच सर्वस्व होत्या. त्या जगवण्यासाठी प्रसंगी टँकरच्या माध्यमातून पाणी द्यावे लागले. त्यातही प्रयोग करीत कमी पाण्यात बागा जगवण्यासाठी आणि जमिनीत ओल राहावी म्हणून त्यांनी विविध क्लृप्त्या वापरल्या. त्या यशस्वीही झाल्या. नवनवीन प्रयोग करण्याची धडपड आणि खवैयांना नवनवीन चवीचे, आकाराचे द्राक्ष देण्याची धडपड दत्तात्रय काळे यांनी पुढेही सुरूच ठेवली. नवनवीन संशोधन करण्याची गोडी लावलेल्या द्राक्षाने काळे यांना वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणाची दृष्टीच दिली. द्राक्ष बागेतील प्रत्येक घडावर प्रयोग करून त्यांनी आपली निरीक्षणदृष्टी सिध्द केली. प्रत्येक नव्या वाणामध्ये वेगळी वैशिष्ट्ये होती. नवे वाण उत्पादन एवढेच शेतकऱ्याचे काम नाही तर त्या उत्पादनाचे बाजारपेठीय तंत्रज्ञानही व्यवस्थित झाले पाहिजे. काळाची गरज ओळखून योग्य आणि आकर्षक पॅकिंग करून चांगली बाजारपेठ आपल्या उत्पादनाला मिळाली पाहिजे. देशातील असो की परदेशातील ग्राहकांपर्यंत आपल्या कष्टाचे हे फळ पोहोचले पाहिजे याचाही ध्यास घेत दत्तात्रय काळे यांनी देशासह परदेशात जाऊन विविध द्राक्ष वाणांची पाहणी आणि अभ्यास केला. देशातील द्राक्ष बागायत क्षेत्रातील एकूण ६० टक्के द्राक्षांचे वाण हे सोलापूरच्या नान्नज येथील काळे परिवाराने निर्माण केलेल्या सोनाका, शरद सिडलेस या द्राक्ष वाणातूनच निर्माण झाले ही बाब सोलापूरकरांच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे. यातूनच अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन वाण उत्पादित करण्याची प्रेरणा घेऊन द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवत अनेक वाण निर्माण केले. याचे सर्व श्रेय नानासाहेब काळे कुटुंबीयांना आहे. द्राक्षाचे सलग तीन स्वामित्व (पेटंट) घेऊन नव्याने विकसित केलेल्या ‘किंग बेरी’द्वारे चौथे स्वामित्व मिळविण्यासाठी दत्तात्रेय काळे हे लवकरच यशस्वी होतील, अशी अपेक्षा आहे, अशा प्रकारे द्राक्षांच्या नवनव्या वाणांसाठी एका पाठोपाठ एक स्वामित्व घेणारे कृषिभूषण काळे हे देशातील एकमेव शेतकरी ठरले आहेत. प्रयोगशील,संशोधनवृत्तीची परंपरा कायम ठेवत काळे यांनी यंदाच्या दशकातील पहिल्याच वर्षात नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असे नवे वाण उत्पादित केले आहे. नियमित द्राक्षापेक्षा आकाराने, वजनाने मोठा असलेला आणि शेतकऱ्यांना सधन करणाऱ्या नव्या ‘किंग बेरी’ या द्राक्ष वाणाची निर्मिती केली आहे.

कृषी संशोधनाची परंपरा

नानासाहेब आणि सरिता काळे यांच्या पोटी जन्म घेतलेले दत्तात्रय काळे यांचे प्राथमिक शिक्षण गावात- नान्नजमध्ये तर पुढील शिक्षण पुण्यात झाले. अभ्यासापेक्षा शेतीची आवड असूनही शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लेखी कमी महत्त्वाचे नव्हते. उच्च शिक्षण पूर्ण करून शेतीलाच आपले सर्वस्व म्हणून स्वीकारले आणि त्यातच नवनवीन प्रयोग करीत शेती कामाला सुरुवात केली. वडील नानासाहेबांच्या कष्टातून, मेहनतीमधून बरेच शिकून संशोधनवृत्ती जोपासली आणि अनेक द्राक्षांचे नवनवीन वाण निर्माण केले. १९९० मध्ये शरद सिडलेस, २००३ साली सरिता सिडलेसची निर्मिती केली. २००५ च्या सुमारास महाराष्ट्र शासनाने दत्तात्रेय काळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तर दादासाहेब शेंबेकर चॅरिटेबल ट्रस्टने (बारामती) शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविले. त्याचवेळी इंटरनॅशनल सिपोझिअम ऑफ ग्रेप अ‍ॅन्ड वाईन (बारामती) यांच्याकडून काळे यांच्या नवीन रंगीत द्राक्ष वाणास प्रथम व द्वितीय असे दोन्ही पुरस्कार मिळाले. अशाप्रकारे विविध संस्थांकडून पुरस्काररूपाने सन्मानित होत असताना हुरळून न जाता काळे यांनी आपले व्रत सुरूच ठेवले. २००८ मध्ये त्यांनी ‘नानासाहेब पर्पल सिडलेस’ या द्राक्ष वाणाची निर्मिती करून वडील नानासाहेब काळे यांना आदरांजली वाहिली. २०१५ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान संस्था (नवी दिल्ली) यांच्याकडून कृषी संशोधन व विस्तार कार्याबद्दल देशपातळीवर संशोधक शेतकरी म्हणून चषक व प्रमाणपत्र देऊन काळे यांचा गौरव झाला.अलीकडे २०१७-१८ साली काळे यांनी पुन्हा ‘दनाका’ या द्राक्ष वाणाची निर्मिती व प्रसार केला. तर २०१८-१९ मध्ये ‘सरिता पर्पल सिडलेस’ व ‘नानासाहेब पर्पल सिडलेस’ या दोन वाणाला केंद्र शासनाकडून स्वामित्व प्राप्त झाले. त्याचवर्षी पुन्हा २०१९ मध्ये ‘दनाका’ या वाणालाही स्वामित्व प्राप्त झाले. द्राक्ष बागांमधील त्यांचे संशोधन आणि विकासदृष्टी पाहून नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनकडून दखल घेण्यात आली आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काळे यांचा इनोव्हेटिव्ह पुरस्काराने गौरव करण्यात आला. द्राक्षाचे तीन पेटंट घेणारे आणि चौथ्या पेटंट मिळण्याच्या मार्गावर असलेले कृषिभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे हे देशातील एकमेव शेतकरी आहेत.

नवीन किंग बेरी द्राक्ष वाणाचे लोकार्पण करताना शरद पवार यांनी दत्तात्रेय काळे यांच्या शेतीप्रेमाचा, निष्ठेचा आणि नवनवीन प्रयोगांचा मुक्तकंठाने गौरव केला. नानासाहेब काळे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र दत्तात्रेय काळे यांनी शेतीमध्ये आधुनिकता आणली आहे. शेतीमध्ये बदल,नावीन्य, दर्जा, जमिनीचा पोत सुधारणे आणि कमी पाण्यात उत्तम आणि फायदेशीर शेती कशी करावी, याचा वस्तुपाठ काळे कुटुंबीयांनी घालून दिला आहे. किंबहुना नान्नज हे आधुनिक द्राक्ष शेतीचे केंद्र बनले आहे. नव्या पिढीतील शेतकऱ्यांना काळे कुटुंबीयांपासून निश्चिातपणे प्रेरणा घेता येईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी काळे कुटुंबीयांचा यथोचित गौरव केला आहे.

राज्यात सांगली, नाशिकच्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन होते. आजमितील या जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्षांची लागवड केली जाते. त्यातून सुमारे दहा हजार टनापेक्षा जास्त द्राक्षांची युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात होते. केंद्र सरकारने अलीकडेच द्राक्षांच्या निर्यातीवरील अनुदान देणे बंद केले आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. दुसरीकडे गेल्या वर्षभरात करोना भयसंकटामुळे द्राक्षांची निर्यात घटली असून बाजारपेठांमध्ये द्राक्षांचे दरही कमी झाले आहेत. तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळेही द्राक्षबागांचा खर्च वाढला आहे. परंतु तरीही अशा एक ना अनेक अडचणींना तोंड देत सोलापूरचा बहाद्दर शेतकरी नेटाने द्राक्षशेतीत पाय रोवून उभा आहे. अर्थातच नान्नजचे काळे कुटुंबीय हे त्यासाठी मैलाचा दगड ठरले आहेत, हे निश्चिात !

किंग बेरी बद्दल…

* ‘किंग बेरी’ या नव्या वाणाची पाने अतिशय मऊ  असल्यामुळे ‘सायटोकायनीन’ची निर्मिती चांगली होते. त्यामुळे फळधारणा उत्तम होते.

* झाडावरील प्रत्येक खाडीला हमखास २ ते ३ घड लागतात.

* पानांचा आकार मोठा व पानांचा रंग फिकट हिरवा.

* काडीपासून घडाचा देठ लांब, दोन पाकळ्यांतील अंतर जास्त असल्यामुळे ‘थिनिंग’चा खर्च कमी येतो.

* घडांचा दांडा लुसलशीत असल्यामुळे संजीवकांना प्रतिसाद चांगला मिळतो.

* नैसर्गिक लांबी व फुगवण असल्यामुळे संजीवकांचा वापर कमी. त्यामुळे कोणतीही विकृती निर्माण होत नाही. त्यातून द्राक्षाची गोडी, चव आणि रंग नैसर्गिक मिळतो.

* घडातील द्राक्षमणी एकसारख्या आकाराचे आहेत. मण्यांची लांबी ४५ ते ५० मिलीमीटरपर्यंत व जाडी २४ ते २५ मिलीमीटरपर्यंत होते. तसेच खाण्यास चविष्ट..

* भारतीय बाजारपेठ व परदेशी निर्यातीसाठी इतर रंगीत द्राक्ष वाणांपेक्षा २५ ते ३० टक्के ज्यास्त दर मागील वर्षी मिळाला आहे.

* एकरी १२ ते १५ टन उत्पन्न देणारे हे पहिलेच रंगीत वाण.

aejajhusain.mujawar@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Garden of grape varieties abn