संजय वाघमारे sanjay999.waghmare@gmail.com

निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक पिकांच्या उत्पादनातील आणि भावातील अनिश्चितता यातून मार्ग काढण्यासाठी प्रयोगशील शेतकरी नवनव्या पिकांच्या शोधात असतात. आता या प्रयोगातूनच पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यात जिरेनियमच्या लागवडीकडे अनेक शेतकरी वळले आहेत.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधन उद्योगाच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे. केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (लखनौ) यांच्या अहवालानुसार देशांतर्गत सौंदर्य प्रसाधन उद्योगाची सुगंधी तेलाची गरज सुमारे २५० टनांची आहे. त्यापैकी अवघे दहा टन तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे भविष्यात जिरेनियम तेलाची मागणी वाढती राहणार आहे.

जिरेनियमच्या लागवडीतून एका वर्षांला एकरी अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. पाच एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली तर प्रति महिना सरासरी एक लाख रुपये निव्वळ नफा उत्पादकाला मिळू शकतो. जुन्नर तालुक्यातील चास नरोडी येथील रहिवासी व सध्या निगडी (पुणे) येथे व्यवसायानिमित्त स्थिरावलेल्या कैलास बर्वे यांनी नगर- पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या म्हसे बुद्रुक येथे १० एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली आहे. एकूण चाळीस एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड करण्याचे बर्वे यांचे नियोजन आहे. त्यासाठी त्यांनी २ कोटी लिटरचे शेततळे उभारले आहे. साडेसात लाख रुपये खर्च करून तेल निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे.

बर्वे यांनी पूर्ण अभ्यास करून, शास्त्रोक्त पद्धतीने जिरेनियमची लागवड केली आहे. ‘मल्चिंग पेपर’चा वापर करून सव्वा फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली आहे. ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. सुरुवातीला रोपवाटीकेतून रोपे आणण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील लागवडीसाठी मात्र बर्वे यांनी स्वत: रोपे तयार केली. जिरेनियमच्या लागवडीनंतर पहिल्या वर्षीच्या पहिल्या छाटणीच्यावेळी कांडय़ांपासून रोपे तयार करण्यात आली.

पहिली छाटणी करताना घेतलेल्या कांडय़ांपासून तयार करण्यात आलेल्या रोपांच्या लागवडीतून तेलाचा चांगला उतारा मिळत असल्याचा बर्वे यांचा अनुभव आहे. नगर जिल्ह्यात पारनेर, दैठणे गुंजाळ, सुपे, काष्टी (श्रीगोंदे) येथेही जिरेनियमची लागवड झाली आहे. दैठणे गुंजाळ येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजी लावंड आणि त्यांच्या मित्रांनी प्रत्येकी एक एकर अशी एकूण १० एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली आहे. त्यांनीही जिरेनियमपासून तेल काढण्यासाठी छोटेखानी प्रकल्पांची उभारणी केली आहे. पारनेरमध्ये रामदास भोसले यांनी पाच एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली आहे.

जिरेनियम ही वेगवेगळ्या हवामानात वाढणारी बहुवार्षिक, झुडुपवर्गीय सुगंधी वनस्पती आहे. हलक्या ते मध्यम जमिनीत या वनस्पतीची लागवड करण्यात येते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत जिरेनियमची वाढ चांगली होते. त्याचबरोबर तेलाचा उताराही चांगला मिळतो हा जिरेनियम उत्पादकांचा अनुभव आहे.

जिरेनियमची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी जमिनीत एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत (कंपोस्ट खत) टाकणे फायदेशीर ठरते. तसेच प्रती एकर ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २६ किलो पोटॅश म्युरेट, १५ किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि १० किलो झिंक सल्फेट खतांची मात्रा द्यावी. जिरेनियमचे आयुष्य तीन वर्षांचे आहे. त्यामुळे दरवर्षी वरीलप्रमाणे खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.

जिरेनियमची लागवड साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर करण्यात येते. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत जिरेनियम लागवडीसाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत बुरशी व करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

जिरेनियमची सरी पध्दतीने लागवड करावी. दोन सऱ्यांमधील अंतर तीन फूट असावे तर रोपांमधील अंतर सव्वा फूट असावे. जिरेनियमच्या क्षेत्रात तणनाशकाचा वापर टाळावा. तणांच्या नियंत्रणासाठी ‘मल्चिंग पेपर’चा वापर करावा. सऱ्यांमध्ये वाढलेले तण खुरपणी करून काढावे.

लागवडीनंतर प्रत्येकी १२ दिवसांनी प्रती एकर ८ किलो अमोनिअम सल्फेट, १२:६१:० चार किलो व पोटॅशियम ुमेट २०० ग्रॅम ठिबक सिंचनाद्वारे प्रवाही पद्धतीने द्यावे. जिरेनियम वाढीसाठी मर्यादित पाणी आवश्यक असल्याने ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. तेलाचा उताराही चांगला मिळतो.

लागवडीनंतर चार महिन्यांनी जिरेनियमची चांगली वाढ होते. त्यावेळी झाडाची पहिली छाटणी करावी. त्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांनी छाटणी करावी. या छाटणीतून मिळणाऱ्या पानांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. वर्षांतील चार छाटण्यांमधून प्रती एकर साधारण ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सध्या जिरेनियमसाठी सहा हजार रुपये प्रती टन असा भाव मिळतो आहे.

लागवड कमी असल्याने जिरेनियम उत्पादकांनी स्वत: तेल प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पामध्ये ऊर्ध्वपतन पध्दतीने जिरेनियमच्या पानांपासून तेल काढण्यात येते. एक टन जिरेनियमच्या पानांपासून सुमारे १००० ते १२०० मिलीमीटर सुगंधी तेल मिळते. प्राथमिक अवस्थेतील या तेलाचा वापर प्रामुख्याने अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, सुवासिक साबण तयार करण्यासाठी होतो. सौदर्य प्रसाधन कंपन्या १२ हजार ५०० रुपये प्रती किलो (१ हजार २२० मिलिमीटर) दराने हे तेल खरेदी करतात. जिरेनियमची पाच एकर क्षेत्रावर लागवड केल्यास खर्च वजा जाता महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.तेल काढल्यानंतर उरलेल्या पानांच्या चोथ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते,अथवा चोथ्याचा वापर उदबत्ती तयार करण्यासाठी देखील होतो.

व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घ्यावे

गेल्या दीड वर्षांपासून जिरेनियम लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. जिरेनियमची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक या पिकांचा तांत्रिक अभ्यास करावा. पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. माती परीक्षण, आपल्या परिसरातील हवामान, पावसाचे प्रमाण याचा अभ्यास करावा. शुध्द रोपांची निवड, खतांच्या योग्य प्रमाणातील मात्रा, योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पारंपरिक निष्काळजीपणा टाळून व्यावसायिक पध्दतीने उत्पादन घेतल्यास जिरेनियमपासून चांगले उत्पन्न मिळू शकते. तेलाला बाजारपेठ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. एक, दोन खरेदीदारांवर अवलंबून राहू नये. वेगळे पर्याय शोधावेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ते शक्य आहे.

– डॉ.विक्रम जांभळे,

प्रभारी अधिकारी,औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

जिरेनियम हे कमीत कमी जोखमीचे पीक आहे. जनावरे विशेषत: हरीण, रानडुक्कर, शेळ्या, मेंढय़ा, मोर या पिकाकडे फिरकत नाहीत. नैसर्गिक आपत्तीत जिरेनियमचे फारसे नुकसान होत नाही. शाश्वत भाव मिळतो. काळजीपूर्वक उत्पन्न घेतल्यास जिरेनियमपासून चांगला फायदा होतो.

– कैलास बर्वे, जिरेनियम उत्पादक, म्हसे बुद्रुक.