मी जेव्हा नाटक लिहायला सुरुवात केली. त्यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि तो सांस्कृतिकदृष्टय़ा खूप सशक्त असा काळ होता. चित्रपटांमध्ये सत्यजित रे, बिमल रॉय, गुरुदत्त यासारखे लोक होते. त्याच काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना झाली होती. सत्यदेव दुबेंनी मुंबईमध्ये हिंदी नाटकांसाठी चळवळ सुरू केली होती.
त्या काळात म्हणजे १९६० ते साधारण १९८२ पर्यंत नाटकांशिवाय मनोरंजनाचे दुसरे साधनच नव्हते. मुख्य म्हणजे त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे नाटकाला चांगला प्रेक्षक होता. आम्ही सगळे एका अर्थानं  नशीबवान आहोत, की आम्ही सगळे एकाच काळात काम करत होतो.
दुबे आणि अरविंद देशपांडे यांना विनोद दोशी यांनी वालचंद टेरेसमध्ये दिलेल्या जागेमुळे आमच्यासाठी हक्काची जागा मिळाली होती. त्यावेळी नाटकासाठी पैसा उपलब्ध होत होता, सकारात्मक वातावरण होते आणि आमच्यात कोणतीही स्पर्धा नव्हती, या सगळ्याचा खूप फायदा झाला. एकदा दुबेंना भेटायला वालचंद टेरेसला गेलो होतो, तिथे तेंडुलकरही होते. आम्ही दोघे तिथेच झोपलो. सकाळी उठलो तेव्हा तेंडुलकर गेले होते आणि शेजारी बादल सरकार झोपले होते.
असा सगळा माहोल होता. एकमेकाच्या साथीशिवाय आम्हाला तरणोपाय नाही याची सगळ्यांनाच जाणीव होती. त्यावेळी आम्ही एकमेकांची नाटके आपापल्या भाषेत भाषांतरित केली. एका नाटकाच्या शुभारंभाच्या वेळी मोहन राकेश हसत हसत म्हणाले की, ‘‘भारतीय नाटकाचे भविष्य आमच्या हातात आहे.’’ तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश यांच्यापेक्षा मी दहा वर्षांनी लहान होतो, त्याचाही मला फायदा झाला. त्यांना जे जे मिळालं ते पुढे जाऊन माझ्यापर्यंत आलं. म्हणजे पुरस्कार वगैरे.
आम्ही सगळे चांगले मित्र होतो. खरं तर माझ्या आधी तेंडुलकरांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं. त्यांना ते का मिळाले नाही, ते निश्चितपणे सांगता येणार नाही. मी असतो तर त्यांनाच  पहिल्यांदा ज्ञानपीठ दिलं असतं.

‘तुघलक’ची जन्मकथा
मी जेव्हा ऐतिहासिक नाटक लिहायला सुरुवात केली, तेव्हा ऐतिहासिक नाटकाचा एक प्रचलित ढाचा होता. मी मोहेंजोदडोपासून इतिहास अभ्यासायला सुरुवात केली. पुढे मौर्य वगैरे करत मी तुघलकापाशी आलो. तुघलकाची ओळख एक ‘वेडा’ राजा म्हणून होती. तुघलकाला वेडा म्हटलं जात होतं आणि त्यानेच मला आकर्षित केलं. मला वेगळं ऐतिहासिक नाटक लिहायचं होतं, ज्यात आजच्या काळाचं प्रतििबब दिसेल. ऐतिहासिक व्यक्तींकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यांची मानसिकता, त्यामुळे घडलेले नाटय़ उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता.  ‘तुघलक’ हे नेहरूंच्या काळातील सामाजिक स्थिती आणि त्यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करणारे नाटक असल्याची चर्चा झाली. त्यावेळची परिस्थिती नाटकात परावर्तित झालेली असू शकते, पण मी मुळात राजकीय भाष्य करण्याच्या उद्देशाने ‘तुघलक’ लिहिलं नव्हतं. मिथकांमधून दिसून येणाऱ्या मानसिकतेने मला नेहमीच आकर्षित केले आहे.

.. ऑन टोस्ट
बंगलोर शहराबद्दल मी ‘बेंदकाळु ऑन टोस्ट’ लिहिलं. आम्ही बंगलोरमध्ये राहणारे सारे कन्नड लेखक, मुळात ग्रामीण भागातून आलेलो आहोत. मराठीत जे ‘ग्रामीण साहित्य’ असं काहीतरी वेगळं आहे, तसं कन्नडमध्ये नाहीच- अख्खं कन्नड साहित्य हेच ग्रामीण साहित्य. शहरी साहित्य कन्नडमध्ये आत्ता येऊ घातलंय.. दुसरीकडे या शहराशी नाळच न जुळलेले, केवळ आर्थिक संबंधानं बंगलोरवासी झालेले लोक इथं वाढताहेत. या शहराच्या नावाबद्दल एक कथाच अशी आहे की, एक राजा विपन्नावस्थेत इथं आला. त्याला खायलादेखील काही मिळालं नव्हतं. एका म्हातारीनं त्याला उकडलेले दाणे दिले- त्याला कन्नडमध्ये बेंदाकाळु म्हणतात, किंवा इंग्रजीत बेक्ड बीन्स. तर, हे बेंदाकाळुचं गाव म्हणून बेंदाकाळु+ऊरु पुढे बंगळुरू झालं, अशी कथा. या कथेचा नाटकाच्या कथानकाशी नाही पण नावाशी संबंध आहे. नाटकाचं कथानक १५ पात्रांमधून एकेक करून उलगडतं, पण ही सारी बंगळुरूमध्ये आर्थिक कारणांनी असलेली पात्रं. नाटकाच्या नावातली ‘बेंदाकाळु ऑन टोस्ट’ ही सरमिसळ, ही ‘बेक्ड बीन्स ऑन टोस्ट’ खाणाऱ्या या शहराची बदलती संस्कृती.  मराठी नाटक मात्र पुणे शहराबद्दलच मी लिहिलंय, असं काहीजणांना वाटतं! हे श्रेय अर्थातच मोहितचं (टाकळकर) आहे. एका शहराबद्दलचं नाटक, दुसऱ्या शहरात गेलं तरी ते तिथलं वाटतं, याचा अर्थ ही समस्या दोन्ही शहरांची आहे.  ..अर्थात, मघाशी मी म्हणालोच की मी काही समस्याप्रधान वगैरे नाटकं लिहिणारा नाही. मी माणसांबद्दल लिहितो. आणखी लिहावं, आणखी वेगळय़ा प्रकारे लिहावं, असं वाटतं तोवर लिहीतच राहीन नवंनवं.