‘सारस’ हा पक्षी कधीकाळी संपूर्ण राज्यातूनच नामशेष होण्याची वेळ आली होती. गोंदिया जिल्हा हा या पक्ष्यासाठी शेवटची आशा होती, पण याही जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या इतकी रोडावली होती की, महाराष्ट्रातून हा पक्षी कायमचा नाहीसा होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. २००४-०५ च्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात अवघे काही सारस आढळत होते. त्या वेळी काही संवेदनशील व्यक्तींनी हा पक्षी शोधण्यापासून त्याच्या घरट्यांचे संरक्षण करण्यापर्यंतची मोहीम हाती घेतली. पुढे त्याच प्रयत्नांना संस्थात्मक रूप मिळाले आणि २०१२ मध्ये ‘सस्टेनिंग एन्व्हायर्नमेंट अँड वाइल्डलाईफ असेंब्लेज’ अर्थात ‘सेवा’ ही संस्था उभी राहिली. आज गोंदिया जिल्ह्यातील सारसांची संख्या ३५ च्या घरात पोहोचली आहे.

चारपासून ३५ पर्यंतचा हा प्रवास केवळ संख्येत झालेली वाढ नाही. तर तो स्थानिकांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. मात्र, ही वाटचाल ज्या बळावर झाली, तेच बळ आता कमी पडू लागले आहे. ‘सेवा’चे काम थांबले, तर महाराष्ट्रातील सारस संवर्धनाची उरलीसुरली आशाही धोक्यात येऊ शकते. राज्यातून हा पक्षी कायमचा नामशेष होऊ शकतो. त्यामुळे त्याचे अस्तित्त्व राज्यात टिकवून ठेवण्यासाठी ‘सेवा’च्या या कार्याला आता समाजाच्या मदतीची गरज आहे.

गोंदिया आणि लगतच्या भागातील सुमारे ५५ ते ६० गावे आज सारसांचा अधिवास आहेत. वैनगंगा नदी आणि त्यालगतचा परिसर, तलाव, पाणथळ जागा आणि भातशेती या भागाशी सारसांचे नाते जोडलेले आहे. एक सारस जोडी अनेक गावे फिरते. त्यामुळे सारसांचे संवर्धन केवळ जंगलात करता येत नाही; त्यासाठी गाव, शेतकरी आणि शेतीच्या बांधापर्यंत पोहोचावे लागते. सारस हा मुळात जंगलात राहणारा पक्षी नाही. अधिवास नष्ट होत गेल्याने त्याने भातशेतांचा आधार घेतला आणि शेतांमध्येच घरटी बांधण्यास सुरुवात केली. साहजिकच शेतकर्‍यांचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे काही ठिकाणी त्यांची घरटी नष्ट केली जात. अंडी पळवली जात आणि शिकारीचाही धोका होता. याच ठिकाणी ‘सेवा’ने संवर्धनाची खरी लढाई सुरू केली. संस्थेचे कार्यकर्ते वर्षभर सारसांचा अधिवास शोधतात, जोड्या ओळखतात, घरट्यांची नोंद करतात आणि त्यांना असलेले धोके शोधून काढतात. गावातील पोलीसपाटील, सरपंच, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. यासाठी गावागावांतून ‘सारस मित्र’ तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात भातशेतात घरटे सापडले की त्याची माहिती घेण्यापासून ते शेतकर्‍याला शासनाकडून मोबदला मिळवून देण्यापर्यंतची प्रक्रिया ‘सेवा’चे कार्यकर्ते करतात. सारसाच्या घरट्याचे संरक्षण करणार्‍या शेतकर्‍याला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे सुरूवातीला एका घरट्यामागे १० हजार रुपये मिळायला लागले. आज ते वाढून २५ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. ‘सेवा’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा बदल झाला आहे.

शेतकर्‍यांमध्ये सारसामुळे होणारे नुकसान सहन करण्याची मानसिकता निर्माण करणे सोपे नव्हते. सुरुवातीच्या काळात संस्थेचे कार्यकर्ते स्वत:च्या खिशातून पैसे देऊन शेतकर्‍यांना मदत करीत. हळूहळू त्यांच्याबरोबरच्या संवादातून शेतकर्‍यांची मानसिकता बदलत गेली. सारसाचे घरटे आपल्या शेतात असणे हे आता अनेक शेतकर्‍यांना अभिमानाचे वाटू लागले आहे. याच सहभागातून ‘सारस फ्रेंडली राईस’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला. त्याअंतर्गत सारसाच्या घरट्यांचे संरक्षण करणार्‍या शेतकर्‍यांचा गट तयार करण्यात आला. सुमारे ८० एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने धानाची शेती केली जात आहे. सेंद्रिय खत तयार करण्यापासून ते तयार तांदूळ चांगल्या दराने विकण्यापर्यंत ‘सेवा’ शेतकर्‍यांना मदत करते. यामुळे एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य होत आहेत. शेतीतील रासायनिक फवारणी कमी होण्याबरोबरच सारसांचा विषबाधेमुळे होणारा मृत्यू रोखण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि सुरक्षित अन्नाचा मार्गही खुला होत आहे.

सारसाच्या संवर्धनाचे काम करताना ‘सेवा’ने त्याच्या अधिवासाशी जोडलेल्या इतर प्रजातींकडेही लक्ष दिले. २०१५ पासून ग्रामसभांच्या सल्ल्याने पाणथळ जागांमधील तण काढणे, स्थानिक माशांच्या प्रजाती वाढविणे आणि अधिवास सुधारणे यासाठी विविध उपाय करण्यात आले. विशेष म्हणजे व्याघ्रसंवर्धनातही या संस्थेची भूमिका अतिशय मोलाची आहे. गवताळ प्रदेशाच्या पुनर्संचयितीकरणाच्या प्रयत्नांतून काळवीट, लांडगे आणि गवताळ अधिवासावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांना पुन्हा आधार मिळाला. माळरानाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे काम आहे. मात्र, एकीकडे माळरान तयार करण्याचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे वृक्षलागवडीच्या मोहिमांमुळे असे गवताळ अधिवास नष्ट होत आहेत, हा विरोधाभासही या कामाच्या निमित्ताने पुढे आला. ‘सेवा’ने आपले कार्य गोंदिया जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवले नाही. लगतच्या भंडारा जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बालाघाटमध्येही सारस संवर्धनाचे काम त्यांनी सुरू केले. त्यामुळे या भागातील सारसांची संख्या वाढण्यास मदत झाली आणि त्यांची ये-जा गोंदिया परिसरातही वाढली. विविध जिल्हे आणि दोन राज्यांमध्ये समन्वय साधणार्‍या या कामातून संस्थेच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट होते.

खरं तर सारस हा पक्ष्यांमध्ये सर्वाधिक वजनाचा म्हणजेच सहा ते आठ किलो वजनाचा, साडेतीन ते साडेपाच फूट उंचीचा आणि आठ फुटांचे पंख असलेला पक्षी. याच सारसांच्या अस्तित्वापुढे आज अनेक धोके आहेत. वीजवाहक तारांना धडकून होणारे मृत्यू, कीटकनाशकांचा वापराचा त्यांच्या जीविताला असलेला धोका, विषारी गवत खाल्ले जाणे, मोकाट कुत्र्यांचे हल्ले, अधिवासाचा र्‍हास, घरट्यांना असलेला धोका आणि अंडी चोरी यांचा त्यात समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही या प्रश्नाची दखल घेतली आहे. ‘सेवा’च्या अहवालाची दखल घेत न्यायालयाने सारस संवर्धनासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सारस संवर्धन समित्या स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र, न्यायालयीन दखल आणि शासकीय यंत्रणा यांच्याइतकेच प्रत्यक्ष गावपातळीवर वर्षभर काम करणारे हातही महत्त्वाचे आहेत. ते हात म्हणजे ‘सेवा’चे कार्यकर्ते आणि त्यांचे स्वयंसेवक. सावन बाहेकर यांनी ‘सेवा’ ही संस्था जन्माला घातली, पण संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी चेतन जेसानी, अभिजीत परिहार, कन्हैय्या उदापुरे, शशांक लाडेकर यासारखे असंख्य हात समोर आले.

तुमची मदत ही एका पक्ष्यापुरती मदत नाही

वर्षभर सारसांच्या अधिवासाची पाहणी करणे, घरटी शोधणे, गणना करणे, शेतकर्‍यांशी संपर्क ठेवणे, ‘सारस मित्र’ तयार करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे, गावांमध्ये संवर्धनाची चळवळ उभी करणे. या प्रत्येक कामासाठी मनुष्यबळ आणि निधी लागतो. एवढेच नाही तर आता संस्थेने अधिवास व्यवस्थापन, तलावाचा जीर्णोद्धार ही कामेही हाती घेतली आहेत. आजवर संस्थेतील अनेकांनी हे काम स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून पुढे नेले. मात्र, आता ती क्षमता संपत चालली आहे. संस्थेकडे निधीचा नियमित स्रोत नाही. कामाची गरज वाढत असताना साधनांची कमतरता आहे. एका सारसाचे घरटे वाचविणे म्हणजे एका पक्ष्याचे आयुष्य वाचविणे. पण त्याचबरोबर त्या घरट्याभोवतीचा पाणथळ अधिवास, शेतकरी, शेतीतील जैवविविधता आणि संपूर्ण परिसंस्था वाचविण्याचा तो प्रयत्न असतो. गोंदियातील सारस हा महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा वारसा आहे. चारवरून ३५ पर्यंत पोहोचलेली ही संख्या पुन्हा शून्याकडे जाऊ नये, यासाठी संस्थेला पाठबळाची गरज आहे. ‘सेवा’ला दिलेली देणगी थेट क्षेत्रातील संवर्धनाच्या कामाला बळ देईल. अगदी छोट्या योगदानातूनही एखादे घरटे वाचू शकते, एखादा शेतकरी संवर्धनाच्या प्रवाहात राहू शकतो आणि एखाद्या सारसाच्या पिल्लाला सुरक्षित आकाश मिळू शकते.

संस्थेपर्यंत कसे जाल?

गोंदिया शहरातील रामनगर मार्गावरील कालीमाता मंदिराजवळ ‘सालासार एन्क्लेव्ह’ येथे तळमजल्यावर ‘सेवा’ संस्थेचे कार्यालय आहे. ‘सेवा’ गोंदिया SEWA या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक, नागपूर शाखा

चालू खाते क्रमांक : ०३७१००१०७४०५

आयएफएससी : सीओएसबी०००००३७

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय: लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय: संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय: संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय: संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय: संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय: संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००