गुढीपाडव्याच्या पंचांग वाचनात यंदाचा मान्सून फारसा समाधानकारक नसला तरी खरीप पिकांना पोषक ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाच्या नऊपैकी पाच नक्षत्रांचे वाहन पर्जन्यसूचक असून अन्य चार नक्षत्रे मात्र बेभरवशाची आहेत. खरिपासाठी महत्त्वाचे असलेल्या मृग नक्षत्राचे वाहन बेडूक असून यंदा पावसाचा मुक्काम माळ्याच्या घरी असल्याने हिरवळ दिसेल, मात्र, धान्य उत्पादन यथातथाच राहील, असे भाकीत पंचांगातून वर्तवण्यात आले आहे.
दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी गावोगावच्या पारकट्ट्यावर सामूहिक पंचांगवाचन करण्याची प्रथा आहे. गेल्या आठवड्यातच गावच्या भटजीकडून गावच्या पाटलांच्या मान्यतेने पंचांगवाचन करण्यात आले. पंचांगातील अंदाज शेतकर्यांना पुढील हंगामात कोणते पीक घ्यावे, पेरणी कधी साधेल, त्या दृष्टीने बियाणे, खते, औतकाम करण्यासाठी दिशा मिळू शकते, अशी धारणा, समज ग्रामीण भागात आहेत.
यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अपेक्षेप्रमाणे पडणार नसल्याचा कयास मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केला आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन तर करावे लागेलच, पण शेती पिकांचेही योग्य नियोजन करण्याची गरज आहे. आता हे कोण किती गांभीर्याने घेते हाही प्रश्नच आहे. कारण शेतीचे गणित बहुतेकवेळा चुकतेच. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी अवकाळीचे थैमान यामुळे बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे.
सुगी संपली की वेध लागतात ते गावच्या जत्रेचे. चैत्र महिन्यात गावोगावच्या जत्रा सुरू असतात. ग्रामदेवतेच्या जत्रेत होणारी देवाची भाकणूक ही जशी शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब तशीच गुढीपाडव्याला गावच्या चावडीवर, पारकट्ट्यावर होणारे सामुदायिक पंचांगवाचनही आगामी हंगामाची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना आजही ग्रामीण भागात दृढ आहे.
यंदाच्या हंगामात पाऊसकाळ कसा असणार, खरिपाचा पेरा कोणत्या नक्षत्रावर होणार, पीक किती आणि कोणते साधेल याची माहिती पारकट्ट्यावरच्या चर्चेत मिळते. भारतीय हवामान विभागाकडूनही येत्या हंगामातील पाऊस पाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो, याकडेही लक्ष असतेच, पण पारंपरिक अनुमानही बर्याचवेळा उपयुक्त ठरत असतात.
सध्या वळवाचा पाऊस राज्यात सर्वच भागात कमी अधिक सुरू झाला असून हवामान खात्याबरोबरच वेगवेगळ्या भाकितानुसार यंदा पाऊसकाळ बेभरवशाचा असल्याचे संकेत मिळत आहेत. पंचांगवाचनातूनही यावर्षी पावसाचा लहरीपणा दिसेल असे सांगितले असून काही ठिकाणी ओल्या तर काही ठिकाणी कोरड्या दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हंगामात महत्त्वाच्या मानल्या जाणार्या मृग नक्षत्राचे वाहन बेडूक, आर्द्रा नक्षत्राचे वाहन गाढव आहे. ही दोन्ही चिन्हे पर्जन्यसूचक मानली जातात. यामुळे यंदा ‘मिरगाचा पेरा मोत्याचा तुरा’ ही पारंपरिक म्हण साधण्याची सुचिन्हेे दिसत आहेत.
निसर्ग पावसाचे, हवामान बदलाचे संकेत देत असतो. आंबा जास्त बहरला असता तर दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, तर चिंच अधिक असल्यास पावसाची स्थिती चांगली असल्याचे संकेत मिळतात असा समज आहे. यामुळेच खेड्यात आजही आंबा म्हणजे दुष्काळ आणि चिंच म्हणजे सुकाळ असे मानले जाते. तर मुंग्यांचे वारूळ कसे निर्माण झाले आहे, यावर पावसाचे भाकीत निश्चित केले जाते. मुंग्यांच्या वारुळाचे शिखर टोकदार असेल तर पाऊस चांगला, सपाट, एका बाजूला झुकलेले असेल तर कमी पर्जन्यवृष्टीचे द्योेतक मानले जाते.
पंचांगात २७ नक्षत्रे असली तरी शेतीच्या दृष्टीने यापैकी ९ नक्षत्रेच महत्त्वाची मानली जातात. २५ मे दरम्यान, सुरू होणार्या रोहिणी नक्षत्राने शेतीतील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करता येतील. यावर्षी ८ जून रोजी मृग नक्षत्र सुरू होत आहे. मृग आणि आर्द्रा ही दोन नक्षत्रे खरीप हंगामातील पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
कारण या नक्षत्रामध्ये जर योग्य प्रमाणात पाऊस झाला तर खरिपाची पेरणी चांगली साधते. पीक चांगले येते, आणि उत्पन्नही मिळते. मात्र, जर या हंगामाने दगा दिला तर पेरणी मागास होऊन पीक रोगाच्या कचाट्यात सापडण्याचा अथवा काढणीला आलेले पीक परतीच्या मान्सूनच्या तडाख्यात सापडून नासाडी होण्याचा धोका असतो. यामुळेच ‘मिरगाचा पेरा आणि मोत्याचा तुरा’ ही म्हण शेती व्यवसायात रूढ आहे.
यंदाच्या हंगामात पाच नक्षत्रांचे वाहन पर्जन्यसूचक आहे. यामध्ये नक्षत्र आणि वाहन असे मृग-बेडूक, आर्द्रा- गाढव, आश्लेषा म्हणजेच आसळका- हत्ती, पूर्वा- गाढव, उत्तरा- बेडूक अशी ही पर्जन्यसूचक नक्षत्रे आहेत. जर पावसाचा धोका दर्शवणारी नक्षत्रे अशी पुनर्वसू- घोडा, पुष्य- उंदीर, मघा- मोर आणि हस्त- उंदीर अशी ही चार नक्षत्रे यंदाच्या हंगामातील पावसाबाबत बेभरवशाची आहेत.
हवामान बदलामुळे पावसाचा नेमका अंदाज पंचांगवाचनातून समोर येत नसला तरी हवामान विभागाकडून सांगितल्या जाणार्या पूर्व अनुमानानुसार पाऊसकाळ मध्यमस्वरूपाचा असेल, असे गृहीत धरून यंदाच्या खरिपाची तयारी करायला हवी. काही भागात वळवाने दमदार हजेरी लावली असल्याने पेरणीपूर्व मशागतींना सध्या वेग आला आहे, तर काही ठिकाणी नांगरटीच्या रानातील ढेकळे विरघळण्याइतपही पाऊस नसल्याने अद्याप वळीव पावसाची प्रतीक्षा आहे.
पेरणीपूर्व मशागती जूनच्या पहिल्या आठवड्यातही होऊ शकतात. ‘मढं ठेवावं झाकून, रान पेरावं घातीनं.’ ही ग्रामीण भागातील म्हण आजच्या काळातही चपखल बसणारी आहे. मात्र, यासाठी पूर्वनियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तयारी कशी करावी, कोणती दक्षता घ्यावी यावरच सालबिजमी साध्य होऊ शकेल.
राज्यात वळवाचा पाऊस सुरू झाला असून गतवर्षीच्या अवर्षण स्थितीमुळे यावर्षी सर्वांनाच तीव्र उष्म्याला सामोरे जावे लागत आहे. बंगालच्या उपसागरावरून येणार्या वार्याबरोबर दख्खनच्या पठारावर निर्माण झालेली उष्णता पश्चिमेकडील अरबी समुद्राकडे वाहत असून यामुळेच तीव्र उष्मा जाणवत आहे. या उष्मा वार्यामुळेच अरबी समुद्रात तयार झालेले बाष्पयुक्त ढग पाऊस घेऊन येणार असल्याने सध्याची वाढलेली उष्णता ही चांगल्या पाऊसमानाचे निदर्शकच म्हणावे लागेल.
हवामान तज्ज्ञ व विविध माध्यमांतून यावर्षाच्या पावसाच्या वाटचालीचे अंदाज वर्तविले जात आहेत. काहीसे आशादायक चित्र यंदाच्या खरीप हंगामाचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नक्कीच शेतकर्यांनी उभारी घेऊन खरिपासाठी पूर्वमशागत करून पेरणीसाठी रान तयार करणे सुरू करणे आवश्यक ठरते.
अक्षयतृतीयेला रानात नव्याने आलेली पालवी काढण्याचे काम सुरू करण्यात येते. तसा वेळही आता मिळाला असून पश्चिमेकडील वार्यापासून येणारा मान्सून सुरू होण्यापूर्वी रान तयार होणे आवश्यक आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप पिकाचा अंदाज पाहता हळद, मका, तूर, उडीद या पिकांखालील क्षेत्र वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्वच पिकांचा बाजारात यंदा दरही चांगला आहे.
सोयाबीन क्षेत्र घटेल असे प्राथमिक अंदाजावरून दिसून येत आहे. खरीप ज्वारी, मूग या पिकांसाठी देखील बाजार सकारात्मक आहे.
बाजरी, भुईमूग या पिकांमध्ये फारशी वाढ अथवा घट होईल अशी परिस्थिती नाही. भरडधान्य पिकांच्या आहारातील महत्त्वाबाबत जागरूकता आल्याने नाचणी, वरी, राजगिरा व इतर मिलेट यांचीही मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार, तिची खोली, पाणी धरण्याची क्षमता, सेंद्रिय कर्बचे आरोग्य विचारात घेऊन पिंकाची निवड करावी.
शासनाच्या कृषी विभागाकडून पीक उत्पादन वाढीसाठी प्रात्यक्षिके, सुधारित व संकरित वाणांचे बियाणे वितरण, बीजोत्पादनासाठी बियाणे वितरण याचा लाभ घेता येऊ शकेल. सूक्ष्म मूलद्रव्ये, पीक संरक्षणासाठी कीटकनाशके, बीजप्रकिया साहित्य इ. बाबींचे कृषी विभागाकडून अनुदानावर वितरण केले जाते. त्यामुळे आपण आपली वैयक्तिक व गटाने मागणी नोंदवून पाठपुरावा सुरू केल्यास आपणास वेळेते बियाणे मिळू शकते. ज्या शेतकर्यांकडे स्वत:चे बियाणे असेल त्या शेतकर्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून व बीजप्रकिया अगोदर करून बियाणे पेरणीसाठी तयार ठेवावे.
digambarshinde64@gmail.com
