गुजरात.. नरेंद्र मोदींचे गुजरात. निरनिराळ्या कारणांनी चर्चेत असलेले. कधी ते दंगलींचे असते, तर कधी मोदीकृत विकासाच्या चर्चेचे.. एका पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने अलीकडेच अहमदाबादला गेलेल्या एका तरुण महिला पत्रकाराला तिथे जाणवलेल्याबदलाचे टिपण..

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकताच गुजरात दौरा झाला. कार्यक्रमाव्यतिरिक्तचे उद्योग म्हणून माध्यम, कला, जाहिराती, प्रशासन, न्यायव्यवस्था अशा विविध क्षेत्रांतील गुजराती लोकांना.. खरे तर स्त्रियांना भेटायचे ठरवले होते. महिला दिनाची काही ‘स्टोरी’ मिळेल असा सुप्त हेतू होताच, पण विषयाला थोडे वेगळे वळण लागले. इतिहासात गुजरातची मोठी नोंद व्हायला कारण ठरलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या गोध्रा हत्याकांडाला बरोबर पंधरा वर्षे झाल्याची आठवण दिली वृत्तपत्रांनी. त्यात गुजरातपासून सुरू झालेला भारतीय जनता पक्षाचा विजयरथ आता महाराष्ट्रातील तळागाळात, खेडय़ापाडय़ात पोचल्याची बातमीही नेमकी त्याच दिवशी मिळाली.  यामुळे विषयाला हे वळण मिळणे सहाजिकच होते.

अहमदाबादमध्ये पहिलीच भेट झाली मल्लिका साराभाईंशी. प्रख्यात नृत्यांगना आणि त्यापेक्षाही जास्त चळवळीतील कार्यकर्ती म्हणून यांचा परिचय जास्त समयोचित होईल. गुजराती मातीत रुजलेली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेली ही कलाकार कलेतून समाजभानही देते. खरे तर मल्लिका यांच्या नृत्यांमधून, नृत्यरचनांमधून नुसते समाजभान नव्हे, तर झोपलेल्या सुस्त समाजाला खडबडून जागे करण्याची ताकद असते. ‘सध्याचा जमाना विचित्र आहे. कलाकार आणि पत्रकारांनी या काळात नुसतं मनोरंजन करून चालणार नाही. ते परवडणारंच नाही.’ मल्लिका ठामपणे सांगतात. कलाकारांबरोबर जगभरातील पत्रकारांनाही आवाहन करतात – निर्भीडपणे सत्याची दुसरी बाजू सांगण्याचे. ‘वी कॅननॉट अफोर्ड टू बी पोस्ट ट्रथ.’त्या बजावतात. मल्लिका यांच्या या धारदार वक्तव्याला अनेक पदर असतात. त्यांच्याशी हा संवाद झाल्याबरोबर व्यासपीठावर त्यांच्याच ‘दर्पणा’चा नृत्याविष्कार सुरू होतो – ‘कलर्स ऑफ माय हार्ट’ –  केवळ मुलगी असल्याने नाकारण्यात आलेले अनेक क्षण नृत्यांतून उलगडत जातात. परंपरेच्या नावाखाली समानता नाकारणाऱ्यांविरोधातले आघात पदन्यासातून उमटत जातात. टोकाची विचारसरणी असणाऱ्यांविरोधातला अनाहत नाद त्यातून जाणवत राहतो.

त्याच संध्याकाळी अगदी वेगळ्या वातावरणात भेट होते काही स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी. व्यवसाय बंधू-भगिनी या अर्थाने आम्ही सगळे ‘समानधर्मीय’. त्यातील एक-दोन सरकारी माध्यमांमधील उच्चपदस्थ. ‘महापालिकांमध्ये भाजपला चांगलं यश आलंय म्हणे तुमच्याकडे.. कमाल आहे नाही?’ ते विचारतात आणि त्या  विषयाला अनुलक्षून मल्लिका सांगत होत्या तोच आशय वेगवेगळ्या शब्दांत, वेगळ्या संदर्भात व्यक्त होत राहतो – ‘जमाना बदललाय खूप. स्वतंत्रपणे विचार करण्याची ताकद कधी होती, हेच विसरून चाललोय आम्ही. जे सांगितलं ते करायचं. दबाव म्हणायचं का याला माहिती नाही, पण सगळं विचित्र झालंय हे खरं.’ असे व्यक्त होणारा तो एक जण सरकारी माध्यमात काम असणारा. याविषयी बोला ना तुम्ही आणखी थोडं खुलेपणाने, असं म्हणताच उत्तर येते- ‘काय बोलायचं खुलेपणानं? आणि कुणी बोलायचं? सारं काही आलबेल आहे. फक्त यालाच आलबेल म्हणायची सक्ती आहे, झालं!’.. मल्लिकांनी दिलेली सत्योत्तर जाणीव पुन्हा एकदा शिरशिरून गेली. ‘वी कॅननॉट अ‍ॅफोर्ड टू बी पोस्ट ट्रथ’ असे आधी ऐकलेलेच वाक्य फेकले, तेव्हा समोरून केवळ सुस्कारा ऐकू आला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्योत्स्ना याज्ञिक यांची भेट ठरली होती. ज्योत्स्नाबेन हे अहमदाबादमध्ये गाजलेले नाव. सत्र न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आणि आता निवृत्त झाल्यावर विधिशाखेच्या प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या.. स्वतचे लॉ स्कूलही चालवणाऱ्या. मोदींच्या अधिपत्याखालील गुजरातमध्ये एका महिला मंत्र्याला जन्मठेप सुनावणारी ही महिला. गुजरात दंगलींतील हे सर्वात गाजलेले प्रकरण.

ज्योत्स्नाबेनचे घर अहमदाबादच्या मध्यवर्ती भागात. तसा हा शांत आणि उच्चभ्रू परिसर. मुंबईच्या मलबार हिल भागाची आठवण करून देणारा. ज्योत्स्नाबेन राहतात ती सोसायटी मोठी. सोसायटीच्या नावाची पाटी तशी पुसट झालेली, पण पहिल्या इमारतीच्या बाहेरच छोटेखानी पोलिस छावणी दिसते आणि आपण बरोबर पत्त्यावर आल्याची खात्री पटते. झेड दर्जाची सुरक्षा म्हणजे काय याचा प्रत्यय त्या छावणीकडे बघताक्षणी येतो. कुणाकडे, काय काम वगैरे चौकशी झाल्यावर जिन्यावरून वर जायला मिळते आणि एक साध्या पण कलात्मकरीत्या सजवलेल्या मध्यमवर्गीय घराचा दरवाजा उघडतो. ही एवढी झेड सुरक्षा आता निवृत्तीनंतरही का, तर सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांना २०१२ मध्ये त्यांनी जन्मठेप सुनावली म्हणून त्यांना अजूनही धमक्या येताहेत.

‘धमक्यांचीही सवय झाली आहे या. अशा सुरक्षा व्यवस्थेत (पहाऱ्यात?) जगायचीही सवय झालीय.. माझ्याबरोबर माझ्या कुटुंबालाही,’ ज्योत्स्नाबेन सांगतात. चेहऱ्यावर पुसटशी स्मितरेषाही असते तेव्हा. गुजरात दंगलींमधील सर्वात मोठे प्रकरण – नरोडा पटिया  हत्याकांड. ९७ जणांची हत्या आणि शेकडो जखमी झाले या दंगलीत. या हत्याकांडाची सुनावणी ज्योत्स्ना याज्ञिकांच्या न्यायालयात झाली होती. आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. दंगलखोर जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप असणाऱ्या दोन आमदारांविरोधातील ही केस म्हणून विशेष गाजलेली. त्यातली एक – माया कोदनानी तर गुजरातची तत्कालीन कॅबिनेट मंत्री. सुरुवातीला राज्याच्या पोलिसांनी प्रकरण फार गंभीरपणे हाताळले नसल्याचा आरोप होता. मग विशेष तपास पथकाकडे (एसआयटी)प्रकरण गेले. एसआयटीने या दंगलींना कारणीभूत ठरलेल्या ६२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ज्योत्स्ना याज्ञिक त्या सुनावणीची आठवण सांगतात. ‘हाय प्रोफाइल केस होती. असेलही. पण माझ्यासाठी ती प्रचंड मोठी होती, कारण या केसची व्याप्ती आणि गुंतागुंत. कायद्याच्या परिभाषेत हायप्रोफाइलपेक्षा आम्ही व्हॉल्युमनस असण्याला महत्त्व देतो. एक लाख २० हजार पानांचे रेकॉर्ड्स मी तपासले. ३०० साक्षीदार तपासले. या केसच्या अशा प्रचंड स्वरूपामुळेच वेगाने सुनावणी व्हावी या उद्देशाने केस माझ्या विशेष न्यायालयात आली होती. मंत्र्याला शिक्षा, त्यातून एखाद्या स्त्रीला- असा मुद्दा नव्हताच. सुनावणीच्या वेळी स्त्री-पुरुष भेदभाव नसतो. असतो तो केवळ आरोपी. आमचं काम आरोपांमधील सत्यता तपासणं आणि पडताळून शिक्षा सुनावणं.’

लागोपाठ तिसऱ्यांदा सत्तेवर आलेले सरकार, त्याच पक्षाचे आरोपी याचा दबाव किती मोठा असू शकतो? ‘ताण आणि दबाव तर असणारच. सत्यशोधनाचं हेच तर काम प्रामाणिमकपणं, न डगमगता काम करण्याची प्रेरणा देत असतं. व्यक्तीकडे न बघता केवळ पुरावे प्रमाण मानण्याचं आमचं काम आहे. पण आपल्याकडे लेबल फार पटकन लावलं जातं.’ ज्योत्स्नाबेन यांनी २०१२ मध्ये माया कोदनानी आणि बाबू बजरंगी यांना जन्मठेप सुनावल्यावर काही गटांत असंतोष पसरला. मग न्यायाधीश कशा हिंदूविरोधी आणि कशा दुसऱ्या पक्षाला विकल्या गेलेल्या याची चर्चा झाली आणि धमक्यांचे सत्र सुरू झाले.

‘तुमचा उपास नाही ना आज.. चहा चालेल ना?’ संवादाच्या मध्येच त्या विचारतात आणि उत्तर ऐकल्यानंतर पुढे बोलू लागतात, ‘आपल्याकडे धर्म सार्वजनिक जीवनात आणला जातो आणि तिथेच खरी समस्या निर्माण होते. खरं तर धर्म किती खासगी गोष्ट. न्यायालयात तर कुठलेच इझम नसतात. तिथे केस चालते केवळ मेरिट्सवर.’ नरोडा-पाटियाचा  निकाल जाहीर केल्यानंतर केवळ धमक्याच नाही, तर समाजमाध्यमांवरही ज्योत्स्नाबेनना हिंदूविरोधी म्हणून लक्ष्य केलं गेलं. ‘धमक्यांना मी घाबरत नाही, कारण त्या देणाऱ्यांची ती हार असते. सार्वजनिक कार्यक्रमांतूनदेखील मला लक्ष्य केलं जायचं. माझ्यावर आरोप व्हायचे. पण मी ही संधी समजायचे. माझं मत मांडायला दिलेली संधी. नाहीतर एकतर्फी सत्यच आपल्यासमोर येत राहतं. या दंगलीच्या प्रकरणात ६२ जणांवर आरोप होते, त्यातील एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. उरलेल्या ६१ पैकी २९ जणांविरोधात पुरेसा पुरावा दिसत नसल्याने मी बेनिफिट ऑफ डाउट म्हणून दोषमुक्त केले. हे कुठे लोकांपुढे मांडलं जातं? एकतर्फी निकालच द्यायचा झाला तर २९ आरोपी सुटलेच नसते. सत्याची ही बाजूही पाहिली पाहिजे ना?’

एक दिवस अहमदाबादला आहात, तर खरेदी करून जा. गाठियाँ, कपडा, बांधणी आणि अर्थातच खादी- अगदी ‘एक्सपोर्ट क्वालिटी खादी’ मिळते अमुक दुकानात, असे सल्ले गुजरातमधील परिचितांनी दिले होते. पण स्वच्छ झालेली साबरमती बघायचे मनात होते आणि प्रत्येक अहमदाबाद भेटीत राहून गेलेला गांधी आश्रमदेखील बघायचा ठरवला. त्यामुळे राहिलेल्या वेळेत साबरमती किनारी धाव घेतली. नदीकाठचा गांधी आश्रम तसा शहराच्या एका बाजूला. निवांत जागेत. तिथल्या चिरपरिचित चरखा, खादी, काठी, कुटीर या प्रतीकांमध्ये एका कुटीराबाहेर खादीच्या झब्बा-लेंग्यात बसलेला एक तरुण तेवढा जास्त लक्षात राहिला. ‘तुमचे स्केच काढून देतो,’ असे म्हणणारा एका हाताने अधू असणारा अनंत मागेच लागला. ‘१५ मिनिटांत अगदी हुबेहूब चित्र काढतो तुमचे.. अगदी खरेखुरे चित्र’, तो म्हणाला. स्वतची चित्रे काढून घ्यायला आवडत नाहीत, असे सांगितल्यावर ‘असे खूप कमी लोक असतात’, म्हणाला.  बरणीतील एक खट्टीमीठी चिंचेची गोळी काढून दिली त्याने लगेच. काय करतो, कुठे राहतो विचारल्यावर फार बोलला नाही. ‘इथेच शिक्षण झालं, चरखा चालवायला शिकलो तसा हातात कुंचलाही इथेच मिळाला.’ काय काय चितारलेस आत्तापर्यंत असे विचारताच तो म्हणाला, ‘वेगवेगळ्या चेहऱ्यांची माणसेच काढतोय. कित्येक काढली. त्यातली आता खरी माणसे शोधतोय.’