|| पंकज भोसले

गुरुनाथ नाईक यांच्या कादंबऱ्यांची १२०८ ही संख्या विक्रमीच! ‘यशस्वी लेखक’ म्हणून ते कसे घडले? त्यांच्या लिखाणात असे काय होते की जे वाचकांना भिडले? नाईक यांच्या निधनानंतरही ‘आम्ही खूप वाचायचो’ असे केवळ स्मरणरंजनच होण्याचे कारण काय? या प्रश्नांचा हा मागोवा… 

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

बाबूराव अर्नाळकरांची रहस्यकथा उतरंडीला लागली असताना आणि एस. एम. काशीकर, चंद्रकांत काकोडकर यांची अल्पशृंगारिक तरी रसभरीत रहस्यमाला ऐन बहरात असताना कथालेखनाची हौस असलेला एक ३३ वर्षांचा सर्वसाधारण पत्रकार नव्या धाटणीची रहस्यकथा लिहिण्याचा विडा उचलतो. पुण्यातील अलका टॉकीजमध्ये लागलेला चित्रपट पाहतो. रात्री जागून कादंबरीचे एकटाकी लिखाण पूर्ण करून प्रकाशकाच्या हातात सोपवितो. कादंबरी बाजारात येते आणि प्रकाशकाच्या आर्थिक भरभराटीसह लेखकाचा बोलबाला होतो. रहस्यकथांच्या विक्री व्यवहाराची सारी गणिते बदलून प्रकाशनाचे विक्रम मराठी वाचकांपुढे घडतात. समकालीन रहस्यलेखकांना बाजारनूर दाखवणारा ‘कथा फॉम्र्युला’ गवसतो. त्या काळातील प्रस्थापित लोकप्रिय लेखकांना आणि रहस्यरंजनाच्या प्रांतात कामगिरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना या कथांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आणण्यात हा एकटा लेखक जबाबदार ठरतो. अन् या सगळ्याचा आरंभ होतो, तो ‘किस द गर्ल अ‍ॅण्ड मेक देम डाय’ या चित्रपटाच्या दर्शनानंतर!

आपले सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे १२०८ रहस्य कादंबऱ्या लिहूनही गुरुनाथ नाईक यांच्या लेखनाची तब्बल चाळीस-पंचेचाळीस वर्षांत चिकित्सा करणारी समीक्षा झाली नाही. साऱ्याच रहस्यकथा लेखकांबाबत तेच झाले. पण लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेले यातील कित्येक लेखक रहस्यकथांचा बहर ओसरल्यानंतर पूर्णपणे अदृश्य झाले. गुरुनाथ नाईक मात्र सातत्याने लिहून तळपत राहिले. टीव्ही- केबल- इंटरनेट यांतून हरवत चाललेल्या वाचकस्थितीतही रहस्यकथांना पुन्हा नव्याने उभारी मिळावी, यासाठी प्रयत्नरत राहिले. तरीही (अगदी गेल्या काही दिवसांतील मृत्युलेखांतूनही) या लेखकाच्या एकूण लेखनाविषयी बोलताना फक्त त्यांच्या कादंबरीसंख्येच्या उच्चांकाचे कुतूहलच वेगवेगळ्या मार्गाने प्रगटत राहते.

त्यांच्यावर त्यांच्या जिवंतपणी जे काही थोडेथोडके लिहिले गेले ते एका काळातल्या भारावलेपणाच्या आठवणींचे कढ. लहानपणी नाईक यांच्या कादंबऱ्यांची अभ्यासासारखी पारायणे करणारी एक पिढी पुढे गुरुनाथ नाईक वाचायचे सोडून दिलेल्या काळात त्यांच्याविषयी बोलली किंवा लिहिती झाली, तीदेखील त्रोटक संदर्भ आणि तपशिलांचा ऐवज घेऊन. आपल्याला ‘कुण्या एका काळात’ गुरुनाथ नाईक किती आवडत होते, याचे एकसुरी पोवाडे अनेकांनी गायले. पण त्यातून ना या लेखकाची कर्तुकी स्पष्ट झाली. ना त्याच्या लेखनाचा आवाका पकडणे कुणाला जमले.

कथा नव्हे, वेगवान घटनापट!

गुरुनाथ नाईकांची ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ ही कादंबरी मार्च १९७० मध्ये प्रकाशित झाली. अन् पुढली चार ते पाच वर्षे त्यांनी सहा-सात नायकांची निर्मिती करीत रहस्यकथा या साहित्य प्रकाराला विलक्षण उभारी दिली. दिवाकर नेमाडे, अनिल टी. कुलकर्णी, शरश्चंद्र वाळिंबे ही त्यांनी निर्माण केलेल्या रहस्यकथांच्या नव्या बाजारातील लेखकांची फळी आपल्या वकुबानुसार नाईक यांच्या तोडीची रहस्यकथा निर्माण करण्यासाठी झटू लागली. नाईक यांच्या आधीपासून रहस्यकथा लिहिणाऱ्या सुभाष शहा, एस.एम. काशीकर आदी लेखकांना आपल्या पारंपरिक शैलीत बदल करून तुफानी वेगाचा कथामसाला वापरणे भाग पडले. परिणामी एकाच काळात रहस्यकथांचे अमाप पीक आले. वाचकांसमोर पर्यायांचे ढीग तयार झाले.

‘ललित’ मासिकाच्या १९७० सालातील वार्षिक खंडाचे उत्खनन केले, तर एकुणातच त्या काळात मराठी साहित्यात आलेल्या मरगळीवर चर्चा झडल्याचे खूप तपशील सापडतील!  ‘१९७० सालची मराठी कादंबरी’ या ‘ललित’मधील लेखात (मार्च १९७१) बाळ सामंत यांनी म्हटले आहे की, ‘माझ्यासमोर या क्षणी सत्तर सालात प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांचा जो संग्रह आहे, त्यात उद्धव शेळके आणि चंद्रकांत काकोडकर यांच्याच कादंबऱ्यांची संख्या साठावर तरी जावी. सर्वसामान्य वाचकांच्या जगात हे दोन्ही लेखक फार लोकप्रिय आहेत, आणि दोन्ही लेखकांच्या निर्मितीचा झपाटा लोकविलक्षण आणि हेवा करण्यासारखा आहे. पण त्यांच्या अमाप लोकप्रियतेवरून आजच्या सर्वसामान्य वाचकांच्या उथळ अभिरुचीची मात्र कल्पना येते. या दोन्ही लेखकांच्या कादंबरीचे तंत्र ठरीव ठशाचे आहे. भडक शृंगार, साहस, गुंतागुंतीची हिंदी चित्रपटाचा मालमसाला असणारी कथा या मापावर बेतलेल्या या कादंबऱ्या वाचणे म्हणजे एक शिक्षाच आहे. महाराष्ट्रात या कादंबऱ्या आवडीने वाचणारे वाचक आहेत याचे आश्चर्य आणि खेद वाटतो.’ याच लेखात त्यांनी १९७० सालच्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांची यादी दिली आहे. ज्यात गो.नी. दांडेकरांच्या ‘माचीवरला बुधा’, खानोलकरांची ‘गणुराया आणि चानी’ तसेच चंद्रकांत खोतांच्या ‘उभयान्वयी अव्यय’ या कादंबऱ्यांचा उल्लेख आला आहे.

तेव्हाच्या साहित्यात जी (कथित) मरगळ होती, तीच या काळातील समाजजीवनातही उतरली होती. शिक्षण घेऊन नोकरी न मिळवू शकणारा बेरोजगारांचा जथा या काळात तयार झाला होता. भारत-चीन युद्ध झाले होते आणि पाकिस्तानशी काही प्रमाणात युद्धाआधीची धुसफुस ठळक होत होती. तळागाळापर्यंत सर्वांनाच कवेत घेणाऱ्या अमिताभ बच्चन या अभिनेत्याची देमार कामगिरी चित्रपटांतून साकारली जायची होती. अन् यातील कुठल्याही घटकाशी सुतराम संबंध नसलेल्या गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथेने लोकांना १९७० साली वेड लावले. ‘सत्यकथा-मौजे’च्या कित्येकपट वाचक अभिरुची, उच्च दर्जाचे साहित्य याकडे पाठ फिरवत रहस्यकथा खरेदी करू लागला. अन् याला ‘किस द गर्ल अ‍ॅण्ड मेक देम डाय’ हा चित्रपट कसा कारणीभूत ठरला, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

गुरुनाथ नाईक यांच्या आधीच्या रहस्यकथाकारांची गंगोत्री ही ब्रिटिश-अमेरिकी छापील रहस्यकथा होती. शेरलॉक होम्स- वॉटसन आणि सेक्स्टन ब्लेक-टिंकर या पाश्चात्त्य जगतात गाजलेल्या जोड्या मराठीत धनंजय-छोटू, रामराव-भालेराव रूपात येऊन स्थिरावल्या. अर्नाळकरांआधी डझनावारी लेखकांनी त्या बाळबोध शैलीतूनही लोकप्रिय केल्या. अर्नाळकरांचे नि:सीम भक्त असलेल्या गुरुनाथ नाईकांना रहस्यकथेतील पूर्वसूरींची परंपरा लाभलीच; पण आधीच्यांकडे नव्हता तो जेम्स बॉण्डही त्यांना गवसला. मिश्कील, विनोदबुद्धी असलेला, पण प्रसंगी क्रूरपणे नराधम आणि खळांची व्यंकटी सांडण्याची क्षमता असलेल्या शॉन कॉनरी यांच्या पहिल्या सहा बॉण्डपटाचे गारूड संपूर्ण साठच्या दशकावर होते. बॉण्ड काही हाणामारी-मारधाडींसाठी लोकप्रिय नव्हता. स्टंटबाजी असूनही त्याची चलाखी, कर्तव्यकठोरता आणि हेरगिरीची आपली मोहीम फत्ते करण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी ही खास वैशिष्ट्ये होती. खल-ललनांनाही भुरळ पाडून त्यांना आपलेसे करण्याची नरोत्तमता त्यात होती. या त्याच्या गुणांवर सर्वच खंडांतील प्रेक्षक लुब्ध होते. १९६६-६७ साली आलेला (भारतात ७० साली प्रदर्शित झालेला) ‘किस द गर्ल अ‍ॅण्ड मेक देम डाय’ हा बॉण्डपट नव्हता. मात्र बॉण्डपटाचे विडंबन म्हणून त्याची रचना करण्यात आली होती. हा चित्रपट तिकीटबारीवर दणकून आपटलेला असला, तरी मराठी वाचकांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व हे की, गुरुनाथ नाईक यांनी या चित्रपटाचे शीर्षक अत्यंत चपखलपणे आपल्या कथानकाला वापरले. पण त्यातला ‘कॅप्टन दीप’ हा नररत्न बॉण्डसारखाच घडविला.

‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’च्या पहिल्याच पानांत कर्नल श्रीकांत, मेजर शेलार, कॅप्टन श्रीनिवास यांची ओळख होते. यातला शेलार हा बर्फात पुरलेले बॉम्ब शोधून काढण्यात तसेच कोणताही धोका ताडण्यात सक्षम म्हणून चितारण्यात आला आहे. जालंधर सिव्हिल लाइन्स, बंगला नंबर चौतीस येथील कर्नल श्रीकांत यांच्या कार्यालयातून एक गोपनीय फाइल गायब होते. शत्रुराष्ट्रांच्या (म्हणजे अर्थात चिनी हस्तक) हाती त्या फाइलमधील माहिती जाणे हिताचे नसल्याने ब्रिगेडिअर चोप्रा कॅप्टन दीपला त्याची सुट्टी रद्द करून पाचारण करतात. या चोप्रांच्या ऑफिसातील अधिकारी मिस मारिआ लोबो म्हणजे दीपची प्रणयचेष्टासुंदरी. अंबाला रिपोर्टच्या गुप्त फाइल प्रकरणातील पाच अधिकाऱ्यांचा एकाच प्रकारे खून झाला असल्याने या अवघड प्रकरणाचा गुंता सोडविण्याचे काम दीपकडे येते. दीपच्या विद्युतवेगी कारवाया आणि एका खलसौंदर्यवतीची कट-कारस्थाने यांच्या उत्कंठावर्धक लढ्याचे चित्रण ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’मध्ये होते.

‘किस द गर्ल अ‍ॅण्ड मेक देम डाय’ या चित्रपटात एक अनपेक्षित बॉम्बस्फोट नायकाच्या सतर्कतेमुळे किंवा चाणाक्षपणाच्या कळसामुळे टळतो. नायक-नायिका आणि तिचा रक्षक यांना खलनायक बंधक बनवून ठेवतो, तेव्हा बुटात असलेल्या विशिष्ट धारदार पात्यांनी ते सुटका करून घेतात. ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ या कादंबरीत या चमत्कारिक घटनांशी साधम्र्य सांगणाऱ्या दोन प्रसंगांखेरीज ती कादंबरी ही पूर्णपणे गुरुनाथ नाईक यांच्या कथनकौशल्याची साक्ष देणारी होती. कॅप्टन दीपची ही कथा आणि दुसऱ्या दिवशी लिहिलेली ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ या गरुडकथेने प्रकाशनानंतर धुमाकूळ घातला. या कादंबऱ्यांची ना वृत्तपत्रात परीक्षणे आली ना साहित्य व्यवहारात काकोडकर-शेळके यांच्याइतकीही (हिणवण्याइतपत) दखल घेतली गेली. पण सर्वसामान्य वाचकांनी या पुस्तकांवर खऱ्या अर्थाने उड्या टाकल्या!

यशापासून यशाकडे….

हे यश इतक्या मोठ्या प्रमाणावर होते, की कादंबऱ्या छापणाऱ्या सदानंद प्रकाशनच्या स. म. खाडिलकरांनी रहस्यकथांचा धबधबा बाजारात ओतण्याची तयारी चालवली. डझनावरी लेखकांना करारबद्ध करून उच्चभ्रू, प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुख्य धारेतील ग्रंथविश्वाला एक प्रकारे त्यांनी शह दिला. न्यूज प्रिंटच्या पिवळ्या कागदावर, लगदा कागदावर छापले जाणारे आणि हातगाडी किंवा रेल्वे-बसस्थानकांतील ठेल्यांना ग्रंथदालनांत परावर्तित करणारे रहस्यकथांचे गठ्ठे दर महिन्याला वाचक फस्त करू लागले. कॅप्टन दीपच्या शिलेदारकथा, उदयसिंह चौहानच्या गोलंदाजकथा, धनुर्धारी सूरजच्या शब्दवेधीकथा, जीवन सावरकरच्या सागरकथा, मेजर अविनाश भोसले यांच्या गरुडकथा, रजनी काटकरच्या रातराणी कथा, हवाई मार्गाने होणारी तस्करी मोडणाऱ्या धुरंदर लिमये याच्या धुरंदरकथा शिवकाळातील हेर सरदार बहिर्जी नाईक यांच्यावरच्या बहिर्जीकथा या त्यांनी गाजविल्याच. त्याशिवाय इंटरपोलकथा, भूतकथा, विज्ञानकथा यांचाही धडाका लावला. ऐतिहासिक, सामाजिक कादंबऱ्या, माहिती-ज्ञान आणि मनोरंजन करणारे बालसाहित्य अशा लेखनाच्या कित्येक प्रांतांत त्यांनी आपला हात लिहिता ठेवला. अगदी या दशकाच्या सुुरुवातीपर्यंत त्यांच्या कादंबऱ्या छापून आलेल्या दिसतात.

हे पहिले लिखाण घेऊन गुरुनाथ तेव्हा मुंबईत धनंजय मासिक काढणाऱ्या शंकरराव कुलकर्णी यांच्याकडे गेले होते, असे आनंद साने यांच्याकडून समजले. साने हेही पूर्वीचे रहस्यकथा लेखक आणि पत्रकार. ‘मनोहर’साठी लेखन करणारे, पुढे ‘सर्वज्ञानी’ नावाचे मासिकही चालवणारे साने, हे सदानंद खाडिलकर (नाईकांचे पहिले प्रकाशक) यांचे जावई. त्यांनी सांगितले की, शंकराव कुलकर्णी यांनी बाद केलेल्या लेखकावर सदानंद खाडिलकर यांनी विश्वास दाखविला. (परंतु पुढे, शंकरराव कुलकर्णी यांचे मुंबईतून निघणारे ‘धनंजय’ मासिक तेव्हा त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे बंद करण्याऐवजी सदानंद प्रकाशनकडे काही वर्षांसाठी चालवण्यास दिले गेले! मार्च १९७० पासून ऑगस्ट १९७२पर्यंत सदानंद प्रकाशनच्या ताफ्यातील अग्रणी लेखक म्हणून ओळख असलेल्या गुरुनाथ नाईक यांनी सदानंद प्रकाशनशी फारकत घेतली.)

रहस्यकथेचे मराठीतील सर्वात मोठे अभ्यासक म्हणून निरंजन घाटे यांचा उल्लेख करता येईल. १९७०नंतरच्या रहस्यकथांची बहरती आणि ओसरती लाट त्यांनी अनुभवली. त्यांनी रहस्यकथेचा इतिहास मांडताना, गुरुनाथ नाईकांच्या रहस्य कादंबऱ्यांचा ढोबळ आराखडा कसा असतो, ते स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते , ‘‘गुरुनाथ नाईक यांच्या कादंबऱ्यांत घटना इतक्या झटपट घडत, की वाचलेल्या बाबींबाबत विचार करायला वाचकाला वेळच मिळत नसे.’’ नाईकांच्या कथांमधील वेगवान घटना, मारधाडी, नायक-खलनायकांमधील कुरघोड्या या वाचून झाल्यानंतर ताबडतोब विस्मृतिबद्ध होण्याची प्रक्रिया वाचकांमध्ये सुरू होत असावी. पलायनवादी साहित्यातून औटघटकेचे मनोरंजन करून झाल्यानंतर वाचकाच्या मनाचे त्या पुस्तकापासून पलायन होत असावे. ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ या साहसकथेपासून ते ‘अनिरुद्ध उषा’ या ऐतिहासिक कादंबरीपर्यंतचा साधारण १२०८ कादंबऱ्यांचा लेखनप्रवास असंख्य आवाहनांना, खडतर वाटांना पार करीत सुरू राहिला होता.

गुरुनाथ नाईक यांचा कॅप्टन दीप आणि उदयसिंह चौहानच्या गोलंदाजकथा दर महिन्याला २१ तारखेला प्रसिद्ध होऊ लागल्या आणि ग्रंथालये, खासगी लायब्रऱ्या, एसटी-रेल्वे स्थानके येथे या कथांची तडाखेबंद विक्री होऊ लागली. पाच हजार दोनशेच्या प्रतींमध्ये गुरुनाथ नाईक आणि दिवाकर नेमाडे या दोन्ही लेखकांच्या रहस्यकथा आठवड्याभरात संपू लागल्या. पुढे तर गुरुनाथ नाईकांची प्रसिद्ध होणारी पुस्तके मुंबईतील वितरकांकडेच फक्त पाच हजारांच्या संख्येने जाऊ लागली. राज्यभरात चालणाऱ्या सक्र्युलेटिंग लायब्रऱ्यांमध्ये एकेका पुस्तकाच्या आठाठ प्रती कमी पडू लागल्या. इतके गुरुनाथ नाईक वाचकांच्या गळ्यातील ताईत ठरले. आकर्षक चित्र, विचित्र शीर्षक, शहात्तर ते शंभर पानांची दीड-दोन तासांची खिळवून ठेवणारी करमणूक एक ते दीड रुपयांत वाचकाला मिळत होती. यातल्या कोणत्याही कादंबरीचे मूल्यमापन वृत्तपत्रे, मासिके किंवा साहित्य व्यवहारात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या यंत्रणेने केले नाही. पण नाईकांना रहस्यकथांच्या शिखरावर पोहोचण्यासाठी किंवा त्यांच्या लेखनाला चांगले म्हणणाऱ्या माध्यम प्रशस्तीपत्रकाची गरज उरली नव्हती. इतका त्यांच्या नावाचा या क्षेत्रात दबदबा झाला होता.

नंतरचे, विविधांगी लेखन…

कादंबऱ्यांची संख्या वाढत असली तरी त्यांची लिहिण्याची ठरीव बांधेसूद शैली एकसाची राहिली. या काळात अनेकदा थांबून नव्याने लिहिण्याचे, लेखनप्रवाह बदलण्याचे संकल्प त्यांनी सोडले. पण त्यातून फक्त विषय बदलले. लेखनाचे तंत्र मात्र जुन्याच शैलीशी प्रामाणिक राहिले. ज्या कादंबऱ्या लिहिण्यासाठी त्यांनी वृृत्तपत्र व्यवसायातील नोकरी सोडली, त्या कादंबऱ्या लेखनातील तोट्यामुळे पुढे पुन्हा त्यांना वृत्त व्यवसायात यावे लागले. काही काळ वसईहून ‘लोकसत्ता’साठी देखील त्यांनी बातमीदारी केली होती.

 जग बदलत होते. वाचनाऐवजी टीव्हीवरून दिसणारे मनोरंजन हाच भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. इंटरनेटच्या अतिवेगवान माऱ्याच्या काळात रहस्यकथाच काय, तर कुठल्याही प्रकारच्या साहित्याचे मूल्य शून्यासम होण्याच्या मार्गावर होते. तरीही नाईक सर्व प्रकारच्या साहित्य प्रकाराला कादंबरीतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय योद्ध्यावरचे कथानक, भविष्यात जलदुर्भिक्षामुळे परग्रहावरून पाणी आणणाऱ्या कल्पनेवरची विज्ञानिका, महाभारतातल्या कर्णाच्या व्यक्तिरेखेला अनुसरून आजच्या युगात घडविलेली कादंबरी. मत्स्यमानव, मत्स्यकन्या यांच्यावर आधारलेल्या अद्भूतिका, जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक संकल्पनांवर चिंतन करणाऱ्या वैचारिक कथा, आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा परामर्श घेणाऱ्या चित्तवेधक माहितीसाठी असलेल्या लघुकादंबऱ्या, संगणक, यंत्रमानवाबाबतच्या गोष्टीही त्यांनी अजमावून पाहिल्या, ओसामा बिन लादेनवरही त्यांनी कादंबरी लिहिल्याचे दिसते आणि शिरवळकरी वळणाची ‘आसमाँ महल’ नावाची प्रेमकथाही लिहिलेली सापडते. अगदी धारपांसारख्या भयचकित करणाऱ्या भूतकादंबऱ्याही त्यांनी हाताळल्याचे पाहायला मिळते.

‘भोपाळ वायुगळती’ची माहिती बालवाचकांना व्हावी यासाठी त्यांनी पुस्तकाचा श्रम केल्याचे आढळते. त्यांच्या रहस्यकथांमधून ईशान्येतील राजकारण, नागांचे बंड, चीन-पाकिस्तानशी झालेले युद्ध, खलिस्तान चळवळ यांच्या संदर्भांचा उत्कृष्ट वापर मुक्तहस्ते झालेला दिसतो. ‘मस्तानचे साम्राज्य’ या कादंबरीत हाजी मस्तान या व्यक्तिरेखेला काजी मस्तान करून रचलेली एक उत्कंठावर्धक गुन्हे-घटनांची मालिका वाचायला मिळते. लिहिण्याच्या उतराईला त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांना कॉल सेंटर वगैरेची पाश्र्वभूमीही दिसते. त्या सर्वांत कथानकात पकड घेणारी शैली हरवली नसल्याचे जाणवते. पण वाचनाचे सोयरसुतक न राहिलेल्या नव्या काळाला आपल्या बाजूला वळविण्याचे सामथ्र्य त्यात दिसून येत नाही.

त्यांच्या विविधांगी लेखनाचा आकार पाहून वाचक दडपून जातो. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर समग्र मते मांडण्याचा विचार अवघड आणि प्रचंड वेळेची मागणी करणारा आहे. त्यांच्या लेखनावर आजतागायत भारावून लिहिण्यापलीकडे का आले नाही, याचे कारणच या बाबींत दडले आहे.

त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचा संख्यात्मक विक्रम भविष्यात कधीच मोडला जाण्याची शक्यता नाही, तसेच इतका वाचकस्नेही लेखक  पुन्हा निर्माण होण्याचीही शक्यता नाही. आज उरल्यासुरल्या मराठी वाचकांतील रहस्यकथा रिचविलेली पिढी नाईकांच्या कर्तृत्वाची साक्षीदार आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे-पुण्यासह राज्यभरात कुठल्याही महत्त्वाच्या शहरांत जुनी पुस्तके ठेवणाऱ्या रद्दीच्या दुकानांत त्यांची पुस्तके सापडली नाहीत, असे कधी झाले नाही. ती आणखी जितकी वर्षे तशी तेथे दिसत राहतील, तोवर नाईकांच्या लेखणीतील गारुडीपणाचा अस्त न झाल्याची पावती मिळत राहील.

नाईक आणि सुहास शिरवळकर! 

गुरुनाथ नाईक यांनी याच काळात लेखनकार्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्राला दिली. आज त्या तपशिलाला दंतकथा म्हणूनही कुणी चघळत नसले, तरी काही प्रत्यक्षदर्शींच्या आठवणींतून ती माहिती हाती लागली. कुठल्याही क्षेत्रात अग्रभागी टिकून राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक-व्यवहारी राजकारणासारखे त्याचे समर्थनही करता येऊ शकेल. शिवाय नाईकांमुळे हा चमत्कार घडल्याबद्दल त्यांचे आभारही मानता येतील. गुरुनाथ नाईक हे नावच प्रचंड ‘ब्रँड’ असताना रहस्यकथा क्षेत्रात सुहास शिरवळकर यांचा प्रवेश झाला तो केवळ आणि केवळ नाईकांमुळे. शिरवळकरांच्या आप्तांकडून आणि त्यांच्या अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९७० ते ७२ या कालावधीत सुहास शिरवळकर हौशी आणि तुरळक लेखन करीत होते. गुरुनाथ नाईक या गाजावाजा होत असलेल्या लेखकाशी त्यांचा परिचय होता. एका भेटीत नाईकांनी होतकरू लेखक म्हणून समोर असलेल्या सुहास शिरवळकरांना उद्देशून ‘रहस्यकथा काही कुणीही लिहू शकत नाही’ अशा आशयाचे उद्गार काढले. शिरवळकरांनी ‘रहस्यकथा कुणीही लिहू शकतो’ अशी ठाम भूमिका घेऊन ‘मी लिहून दाखवितो,’ असे सांगितले. लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार असलेल्या नाईकांनी शिरवळकरांचे म्हणणे थट्टेवारी नेले. पण शिरवळकरांनी नाईकांच्या थट्टेला गांभीर्याने घेत ‘गोल्डहेवनचे गूढ’ ही रहस्यकादंबरी लिहिली! फेब्रुवारी १९७३ च्या महिन्यात ‘जत्रा’ मासिकात ती छापून आणली. पुढे शिरवळकरांनी रहस्यकथा लेखनात स्वत:चा खास प्रांत तयार केला. मंदार, बुलंद, फिरोज या त्यांच्या व्यक्तिरेखांनीही खळबळ माजविली. पण त्यांचा आरंभ झाला तो नाईकांनी केलेल्या छोट्या अपमानामुळे.

शिरवळकर यांनी पुढे मुख्य धारेतील उत्तम साहित्य दिले. पण तरीही त्यांच्यावर रहस्यकथा लेखक हा शिक्का पुसला न गेल्याचा पश्चात्ताप आयुष्यभर राहिला. नाईकांनी अमाप रहस्यकथा लिहिल्यानंतर सुहास शिरवळकर यांच्यासारख्या सामाजिक कादंबऱ्या लिहिण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात शिरवळकर यांच्याइतकी गती लाभली नाही.

हेमचंद्र साखळकर यांचे लिखाण

गुुरुनाथ नाईक हेच हेमचंद्र साखळकर या टोपणनावाने ते १९५७ सालापासून लिहीत असल्याची माहिती मिळते. त्या नावाने प्रकाशित झालेले एक पुस्तकही सापडले. पण हेमचंद्र साखळकर या टोपणनावाने ते कोणत्या मासिकात लिहीत होते याबाबतचा तपशील सापडत नाही. काही जुन्या वाचकांच्या मते हेमचंद्र साखळकर या नावाने ते सुभाष शहांच्या राणी/ प्यारी/ मस्ती या बेळगावी शृंगार मासिकांत लिहीत होते. पण त्याचा पडताळा करण्यासाठी आज सुभाष शहांची ही एके काळी प्रचंड गाजणारी मासिके उपलब्ध नाहीत. गुरुनाथ नाईक यांचा पिंड शृंगार लेखनाचा नसल्याने त्यांनी या मासिकांत लिहिले असेल, याबाबत शंका आहे. पण नावाने लिहिण्याआधी त्यांचे बेळगावमधील वास्तव्य असल्यामुळे सुभाष शहांनी आपल्या मासिकांसाठी त्यांना लिहिते केले असण्याची किंचित शक्यता आहे. हेमचंद्र साखळकर या टोपणनावाने त्यांनी शहांच्या मासिकांत लिहिलेला मजकूर सापडला, तर तो त्यांच्या वाचकांसाठी फार मोठा ऐवज असेल.

नाईकांनी ‘सागर’ या नायकाद्वारे समुद्रातील रहस्य-साहसकथा लिहिल्या, तर विजय खेर या आपल्या हीरोद्वारे काही भूतकथा लिहिल्या. आज या भूतकथा बाजारात अजिबातच सापडत नाहीत. एका विजयकथेचे हे दुर्मीळ मुखपृष्ठ. नाईकांच्या ८०च्या दशकातील कादंबरीचे मुखपृष्ठ. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे युग सुरू झाले असतानाचे. काही मुखपृष्ठ कलाकारांचे बच्चनप्रेम सातत्याने व्यक्त व्हायचे. कादंबरी स्टॉलवर तातडीने खपेल हा कयास त्यामागे होता.