दुचाकी वाहनांच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य राहून बजाज उद्योगसमूहाला उच्च पदापर्यंत पोहोचवत ’हमारा बजाज’ ही संकल्पना घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचविण्यात यशस्वी झालेले राहुलकुमार बजाज हे द्रष्टे उद्योगपती होते. प्रत्येक मध्यमवर्गीय नोकरदाराच्या दरवाजात बजाजची दुचाकी हे भूषण मानले गेले, त्यामागे राहुलकुमार बजाज यांचे अथक परिश्रम आणि कल्पक नियोजनाचे फलित होते.

 दुचाकी वाहनांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या बजाज उद्योगसमूहाचे  मूळ स्वातंत्र्यलढय़ाशी जोडलेले आहे. राहुलकुमार बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज (१८८९-१९४२) हे त्यांच्या काळातील एक यशस्वी उद्योगपती होते. त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यलढय़ात ते महात्मा गांधींचे ‘भामाशाह’ होते. व्यापार करण्यासाठी त्यांनी १९२६ मध्ये त्यांना दत्तक घेणाऱ्या सेठ बच्छराज यांच्या नावाने ‘बच्छराज अँड कंपनी’ची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुले कमलनयन व रामकृष्ण बजाज यांनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली.

swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Farmers in Navi Mumbai Airport Notified Impact Area oppose amended DCPR
नैनातील शेतकऱ्यांचा सूधारित युडीसीपीआरला विरोध

बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने आयात केलेल्या घटकांपासून एकत्रित केलेल्या दुचाकी आणि तीन चाकी वाहने १९४८ मध्ये बाजारात आणली. पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती. त्यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने कुर्ला येथे उत्पादन कारखाना उभारला. कालांतराने तो आकुर्डी येथे हलविण्यात आला. येथे बजाज कुटुंबाने फिरोदिया यांच्यासोबत भागीदारी करून दुचाकीॠ़ळ आणि तीनचाकी वाहने तयार करण्यासाठी स्वतंत्र संयंत्रे उभारली. १९६० मध्ये कंपनीचे नाव बदलून ‘बजाज ऑटो’ असे करणात आले होते.

पुरस्कार, सन्मान

उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल राहुलकुमार बजार यांना २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. २००६ ते २०१० या कालखंडात ते राज्यसभेचे सदस्य होते. त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे २०१३ मध्ये राहुलकुमार बजाज यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बजाज यांनी १९७९-१९८० आणि १९९९-२००० मध्ये ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’चे (सीआयआय) अध्यक्षपद भूषविले होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा २०१७  मध्ये ‘सीआयआय जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

  उद्योगाची भरारी राहुलकुमार बजाज यांनी १९६५ मध्ये बजाज उद्योगसमूहाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटी रुपयांवरून १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली. २००५ मध्ये त्यांनी बजाज ऑटोचा राजीनामा देऊन कंपनीची जबाबदारी मुलगा राजीव बजाज यांच्याकडे सोपवण्यास सुरुवात केली. त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक केले.

सरकारच्या पुढे पुढे करणाऱ्या उद्योगपतींच्या गटात न बसणारा, वेळ प्रसंगी कोणालाही न दुखावता, मात्र परखडपणे सरकारलाही सत्याची जाणीव करून देणारे कटू बोल सुनावण्याची हिंमत बाळगणारा मोठा उद्योगपती राहुलकुमार बजाज यांच्या निधनाने आपण गमावला आहे. वाहन उद्योगात आजही भारताची निर्यात मर्यादित आहे. पण आपण गुणवत्ता निर्माण केली तर भारतीय उद्योगही निर्यात करू शकतात हा विश्वास राहुल बजाज यांनी भारतीय उद्योगक्षेत्राला दिला.  – अरूण फिरोदिया, अध्यक्ष, कायनेटिक समूह

भारतीय उत्पादनांची उत्पादकता आणि गुणवत्ता जागतिक दर्जाची आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राहुलजी सर्व उद्योजक, विशेषत: पुण्यातील उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहेत. उदारीकरणाचे ते खंबीर समर्थक होते म्हणून त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. उद्योग क्षेत्रात भक्कम पाया रोवण्याबरोबर त्यांनी आर्थिक क्षेत्र आणि वाहन उद्योगात सक्षम संस्था आपल्याला दिल्या आहेत. – प्रमोद चौधरी, अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज

१९८० ते ८२ या कालावधीत एमसीसीआयएचे अध्यक्ष असताना त्यांनी संस्थेच्या विकासासाठी खूप मोठा आर्थिक आणि वैचारिक हातभार लावला. करोना काळात एमसीसीआयएच्या पीपीसीआर या व्यासपीठाद्वारे त्यांनी भरीव योगदान दिले. ते देशातील उद्योग क्षेत्राचे प्रेरणास्थान होतेच, त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. वाहन किंवा गृहोपयोगी असलेल्या कोणत्या ना कोणत्या उत्पादनाद्वारे बजाज हे नाव घराघरात पोहोचलेले आहे. – प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर

राहुलकुमारजींच्या आयुष्याची चार प्रमुख क्षेत्रे होती. उद्योग हे त्यातील एक क्षेत्र होते. राहुलजींचा राष्ट्रउभारणीत फार मोठा वाटा आहे. त्यांनी केवळ आपल्या उद्योगावरच नाही, तर देशाकडे नेहमीच लक्ष दिले. उद्योग, वेगवेगळय़ा कंपन्या निर्माण करतानाच त्यांनी समाजसेवेसाठी मोठे काम केले. त्यांनी मिळवलेले यश, उभे केलेले उद्योग पुढील पिढय़ांसाठी नक्कीच आदर्श आहे. आज देशात आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे. पण राहुलजींनी गेल्या साठ वर्षांत आत्मनिर्भरतेसाठी खूप प्रयत्न केले.  – सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर

राहुलकुमार बजाज अध्यक्ष असलेल्या जमनालाल बजाज फाऊंडेशनतर्फे गांधी विचारांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. पुरस्कारप्राप्त व्यक्तींची निवड करण्यासाठीच्या समितीचे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी अध्यक्ष होते. धर्माधिकारी यांच्या निधनानंतर बजाज यांनी या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली. हाच माझ्यासाठी मोठा सन्मान होता. गेल्यावर्षीच्या पुरस्कार कार्यक्रमानंतर राहुलकुमार बजाज आजारी असल्याने त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही ही रूखरूख आहे. समाजाच्या कल्याणासाठी दूरदृष्टी असलेले उद्योगपती असेच मी त्यांचे वर्णन करीन. सरकार कोणाचेही असले, तरी परखडपणे बोलणारे  उद्योगपती ही त्यांची ख्याती  होती. – डॉ. रघुनाथ माशेलकर,  ज्येष्ठ शास्त्रज्ञ

गांधीवादी विचारांचे खरे पाईक म्हणजे राहुलकुमार बजाज. वाहन उद्योगात देशाचे नाव जगाच्या नकाशावर ठेवण्यात बजाज यांचे योगदान मोठे होते. देशाला दुचाकी गाडय़ा, रिक्षा यांबाबत त्यांनी स्वयंपूर्ण बनवले, तसेच परदेशातही त्यांची निर्यात केली. गांधीवादी विचारांचे पाईक असल्याने गरिबांसाठी शांतपणे काम करत राहणे, त्याची फार वाच्यता न करणे हे त्यांनी अखेपर्यंत सुरू ठेवले. वर्धा, अमरावती या भागातही त्यांनी मोठे काम केले. – लीला पूनावाला,  ज्येष्ठ उद्योजिका

उद्योग क्षेत्रातील उत्तम नेतृत्व, मार्गदर्शक आणि पितामह हरवला आहे. भारतीय वाहन उद्योगाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय होते. उद्योगासह सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान सर्वासाठीच प्रेरणादायी आहे. – रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

आपली मते स्पष्टपणे मांडताना कोणाला काय वाटेल याची पर्वा त्यांनी केली नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर चर्चा घडत. भविष्यात त्यांची उणीव जाणवेलच. केवळ उद्योजक म्हणून नाही, तर मराठवाडय़ातील जल क्षेत्रात जानकीदेवी बजाज ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले काम लक्षणीय आहे. बजाज रुग्णालय, नाथ व्हॅलीसारखी दर्जेदार शाळा मराठवाडय़ात उभी करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे होते.

 – राम भोगले, उद्योजक, औरंगाबाद

राहुल बजाज यांचा औरंगाबाद येथे उद्योग स्थापण्याचा निर्णय शहराचे नशीब व भविष्य उज्ज्वल करणारा ठरला. तेव्हापासून प्रगतीचा आलेख उंचावतच आहे. औरंगाबादला आशियातील सर्वात वेगाने वाढणारे शहर ही उपाधी लाभली त्याचे श्रेय राहुल बजाज यांनाच जाते.  – मुकुंद कुलकर्णी,  माजी अध्यक्ष, सीएमआयए, सीआयआय.

राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही, तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवरदेखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनालादेखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

          – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे</strong>

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगारनिर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीतदेखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषत: महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे. – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल यांनी समाजात विशेषत: गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात त्यांच्या बजाज दुचाकी तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडवून आणले. परवडणाऱ्या वाहनामुळे गतिशीलता वाढली, उपजीविकेचे साधन मिळविण्यासाठीचा संघर्ष कमी झाला आणि सामाजिक-आर्थिक बदलाचे साधन बनले. उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आम्ही भारतीय त्यांचे ऋणी आहोत. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राच्या निधनाने मी दु:खी आहे.  – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला वाहन उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले.  – उपमुख्यमंत्री अजित पवार</strong>

राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाचा जास्तीत जास्त विस्तार महाराष्ट्रात केला याबद्दल खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.  – उद्योगमंत्री सुभाष देसाई

हमारा बजाज

लहान कुटुंबांसाठी आणि लहान व्यापाऱ्यांसाठी योग्य, कमी किमतीच्या आणि कमी देखभालीसह बजाज ब्रँडच्या व्हेस्पा स्कूटर अल्पावधीत अफाट लोकप्रिय झाल्या. १९७० आणि ८० च्या दशकात लोकांना बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. त्या काळात अनेकांनी बजाज स्कूटरचे आगाऊ नोंदणी क्रमांक विकून लाखो रुपये कमवले आणि आपले घर बांधण्याचे स्वप्न साकार केले, असे सांगितले जाते.

राहुल बजाज यांनी उद्योगविश्वात उल्लेखनीय योगदान दिले. व्यवसायापलीकडे, त्यांना समाजसेवेचीही आवड होती. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान