प्रसन्नतेची ९८ वर्षे

कॅनव्हास, कागद, डिजिटल.. चित्रं काढण्याची माध्यमं बदलली. पण बदलत्या प्रवासातही काही गोष्टी चिरंतन असतात.

प्रसन्नतेची ९८ वर्षे

संजय मिस्त्री

कॅनव्हास, कागद, डिजिटल.. चित्रं काढण्याची माध्यमं बदलली. पण बदलत्या प्रवासातही काही गोष्टी चिरंतन असतात. त्यांची जागा कुणी घेऊ शकत नाही. अशीच एक अढळपदी पोहोचलेली गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध, लोकप्रिय हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांची शब्दविरहित हास्यचित्रं! गेली जवळपास सत्तरहून अधिक वर्ष त्यांनी रसिकांना आपल्या बहारदार व्यंगचित्रांनी, हास्यचित्रांनी आनंद दिला आहे.

 शि. द. फडणीस हे कलाकार म्हणून ग्रेट आहेतच, पण त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे आहेत. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांना याचा अनुभव आहे. त्यांच्यातला चांगला माणूस त्यांच्या चित्रासारखा सुंदर आहे. कलाकारांची कलाकृती हे त्या कलाकाराच्या मनाचं प्रतिबिंब असतं. तुमच्या मनात काय चाललंय ते कवितेतून, चित्रातून उमटत असतं. शि. द. फडणीस यांची चित्रं सुबक, देखणी, बहारदार, प्रसन्न असतात. त्याचं रहस्य तेच आहे. शि. द. फडणीस यांचं व्यक्तिमत्त्वच बहारदार, प्रसन्न असं आहे. ‘लपवण्यासारखं काही नसलं की माणूस आनंदी राहतो,’ हे त्यांनीच आमच्या विद्यार्थ्यांपुढे सांगितलेलं, त्यांच्या प्रसन्नतेचं गमक! म्हणूनच बहुधा, गेली जवळपास सत्तर वर्ष महाराष्ट्रातले संपादक, प्रकाशक व्यंगचित्रकार, चाहते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. फडणीस यांची निरीक्षणशक्ती कल्पनेपलीकडे आहे. छोटे छोटे प्रसंग घेऊन त्यांनी बोलकी शब्दविरहित व्यंगचित्रं रेखाटली आहेत. त्यांच्या हास्यचित्रांचे विषय रोजच्या जीवनातीलच असतात. त्यामुळे त्यांची हास्यचित्रं बघताना आपल्याला पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो.

१९८३ साली कोल्हापूरला, रंकाळा तलावाजवळ पहिला व्यंगचित्रकार मेळावा झाला. त्या वेळच्या मोजक्याच व्यंगचित्रकारांमध्ये बाळासाहेब ठाकरे, शि. द. फडणीस, ज्ञानेश सोनार, विजय पराडकर असे त्या वेळचे आघाडीचे व्यंगचित्रकार होते. तेव्हापासून आजतागायत कार्टूनिस्ट कंबाईन या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे मार्गदर्शन शि. द. फडणीस करत आहेत. प्रचंड अनुभव, मनमोकळा स्वभाव, प्रत्येक व्यंगचित्रकाराबद्दल प्रेम, नेतृत्वगुण, समोरच्याचा सन्मान राखणं हे गुण त्यांच्याकडे आहेतच, पण या संस्थेतल्या अनेकांना त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं आहे. विकास सबनीस नेहमी म्हणायचे, ‘मी राजकीय व्यंगचित्रकार झालो ते शि. द. फडणीस यांच्यामुळे.’ विकास सबनीस दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शिकत. तिथे शि. द. फडणीस यांचं ‘हसरी गॅलरी’ हे प्रदर्शन लागलं होतं. सबनीस आपली व्यंगचित्रं त्यांना दाखवायला घेऊन गेले. त्या वेळी शि. द. फडणीस यांनी त्यांना सांगितलं, ‘तुझ्या ब्रशच्या रेषा राजकीय व्यंगचित्राला साजेशा आहेत. तू त्या क्षेत्रात मेहनत घे.’ त्याप्रमाणे आज्ञाधारकपणे त्यांनी शि. द. फडणीस यांचा सल्ला मानला. आणि राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ठसा उमटविला.

‘या वर्षी २९ जुलै रोजी शि. द. फडणीस ९८ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. आपण शि. द. फडणीस यांचा वाढदिवस वेगळय़ा पद्धतीने साजरा करू.’ ही पुण्यात ‘सृजन आर्ट गॅलरी’ चालवणारे ‘चिंटू’ फेम चित्रकार चारुहास पंडित यांची कल्पना कार्टूनिस्ट कंबाईनने उचलून धरली आणि त्यातून येत्या २९, ३० व ३१ जुलै रोजी पुण्यात तमाम व्यंगचित्रकार फडणीसांना त्यांच्याच भाषेत – म्हणजे शब्दविरहित हास्यचित्रातून सलाम करणार आहेत! ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या तीन दिवसांच्या कार्यक्रमात जुन्या, नव्या व्यंगचित्रकारांसोबत व्यंगचित्र कलेतील बारकावेही जाणून घेता येतील.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नंदा खरे : दु:खकसले करायचे?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी