मुक्त शब्द
रसरशीत साहित्याने भरलेल्या अंकांची परंपरा लोप होऊ लागण्याच्या काळात सर्वार्थाने दर्जाभान जपणाऱ्या निवडक अंकांच्या पंक्तीमध्ये ‘मुक्त शब्द’चे नाव घ्यावे लागेल.  कसल्याही जाहिरातींचा आधार न घेता भरगच्च समाधानकारक मजकुराच्या खैरातीचा शिरस्ता यंदाही जपण्यात आला आहे. ‘विचारतुला’ हा विभाग जरी स्वतंत्रपणे दिला असला, तरी त्या भागाचे काम कथा-कवितांखेरीज इतर सर्वच भागांनीही सारख्याच ताकदीने केल्याचे दिसते. जात, वर्ग, साहित्य या विभागांमध्ये ‘डॉ. विलास सारंग यांचे ‘जाती- आकलन वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर राहुल कोसम्बी यांचा लेखाजोखा, हरिश्चंद्र थोरात यांचा ‘जातिव्यवस्था आणि साहित्याभ्यास’ हा  लेख उत्तम अभ्यासाचा आनंद देऊ शकेल.  
अरविंद सुरवाडे, सचिन गारुड यांनीही विषयाचा खोलात परामर्श घेतला आहे. विचारतुला हा विभाग हेमंत देसाई, आसाराम लोमटे यांनी सजविला आहे. कथांमध्ये नितीन रिंढे यांची वास्तव साहित्य संदर्भाना रचून आलेली तिकडम कथा या वर्षीच्या उत्तम दहा कथांमध्ये सहज बसविता येईल.  
पंकज कुरुलकर यांची कथाही विलक्षण अनुभव देणारी ठरू शकेल. सिनेमा हा विभाग ताज्या दमाचे चित्रपट समीक्षक निखिलेश चित्रे आणि गणेश मतकरी यांनी सजविला आहे. थोडक्यात पण चपखलपणे हॉलीवूड आणि बॉलीवूडच्या सिनेमातील फरक दाखविणारा आणि सिनेमा पाहणाऱ्या सर्वाची दृष्टी बदलवणारा मतकरी यांचा लेख सिनेमाप्रेमींना मेजवानी आहे. इतर शब्द पक्वान्नांतील अनुवादित कथांचे आणि लेखांचे स्वरूप मुक्त शब्दच्या नावाला जपणारे आहेत.
संपादक – येशू पाटील
पृष्ठे-२९२, किंमत – १४० रुपये

श्री दीपलक्ष्मी
चित्रपट, ललित लेख आणि कथांच्या नेहमीच्या परंपरेला जागणारा अंक श्री दीपलक्ष्मीने यंदाही दिला आहे. दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयुष्याची सुपर शोकांतिका संजीव पाध्ये यांनी मांडली आहे. जेम्स बॉण्डच्या पन्नाशीनिमित्ताने यंदा अनेक दिवाळी अंकांमध्ये बॉण्डची दखल अनिवार्य बनली आहे. आत्तापर्यंतच्या सर्व बॉण्डपटांची रिव्हिजन घेणारा लेख बॉण्डवेडय़ांना उत्तम ऐवज ठरणार आहे. अरुण पुराणिक यांचा नॉस्टॅल्जिया भारतीय चित्रपटप्रेमींना आठवणींच्या सुरेल जगात नेईल.  चंद्रकांत भोंजाळ, पुरुषोत्तम रामदासी, चंद्रशेखर चिंगरे यांनी कथाविभाग सजविला आहे. पंकज कुरुलकर यांची दीर्घकथा, गिरीश दाबके यांचे कादंबरी प्रकरण, रविप्रकाश कुलकर्णी, राणी दुर्वे यांचे ललित लेखन, हास्यचित्रे, मुलाखती आणि अनुभव यांचा भरपूर शब्दमेवा या अंकामध्ये आहे.
संपादक – हेमंत रायकर
पृष्ठे -२४८, किंमत – १२० रुपये.

ऋतुगंध
उत्साह आणि हौसेने काढलेल्या अंकांची भाऊगर्दी दरवर्षी ठरलेली असते. या गर्दीत उठून दिसणाऱ्या अंकामध्ये ऋतुगंधचा समावेश करता येईल.  छोटा मोठा पडदा व्यापणारे कलाकार आणि वृत्तपत्रांमध्ये कायम दिसणाऱ्या ओळखीच्या नावांची मांदियाळी येथे जमली आहे. सुचिता बांदेकर, आदेश बांदेकर, राणी गुणाजी, मिलिंद गुणाजी यांचा अनुभवगुच्छ अंकाचे आकर्षण ठरावे. राजकारण, चित्रपट, टीव्हीजगत आणि स्मृतिरंजन या विषयांनी हा अंक भरगच्च झाला आहे. अपर्णा पाटील, गुरुनाथ राणे, सुनील पाटोळे, सचिन दानाई यांचे नॉस्टॅल्जिक लेख,  समीरा गुजर, मंगेश बोरगावकर, प्रशांत असलेकर, मुकेश माचकर आदींच्या वाचनीय लेखांचा समावेश या अंकामध्ये आहे. या अंकाने वेगळेपण सिद्ध  करत समाजासाठी वेगळे काहीतरी करून दाखविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा परिचय कायम दिला आहे. याही अंकात तो पाहायला मिळेल.
संपादक – विवेक तेंडुलकर
पृष्ठे -९६,
किंमत – २० रुपये.