पुन्हा पेरते व्हा!

राज्यात सर्वदूर सुरू झालेल्या या पावसाने जून, जुलै महिन्यांची सरासरी केवळ आठ दिवसांत भरून काढली.

पुन्हा पेरते व्हा!
(संग्रहित छायाचित्र)

दत्ता जाधव

यंदा पाऊस चांगला पडेल, असा अंदाज वर्तवला. मात्र त्याने सुरुवातीला जून महिन्यात ताण दिला तर जुलैच्या पहिल्याच पंधरवडय़ात तो कमी कालावधीत जास्त झाल्याने हा पाऊस शेतीसाठी फायद्याऐवजी अडचणीचा ठरला. खरीप हंगामाला या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे. ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांचे पीक वाया गेले आहे. ज्यांनी केल्या नव्हत्या त्यांनाही आता जमिनीला वाफसा येण्याची वाट पाहावी लागणार आहे. या संकटातून मार्ग कसा काढावा..

पाठीवर हात ठेवून लढ म्हणयालाही कुणी येणार नाही. पण, म्हणून का खचून जाणार आहात. जीवाला घोर लावून मान गुडघ्यात घालून बसणार आहात. सरकारी मदतीकडे डोळे लावून बसून का चालणार आहे. तू बळीराजा आहेस. तू तर संकटाशी निधडय़ा छातीने चार हात करून मात करणारा अन् उभ्या जगाची भूक भागविणारा पोशिंदा आहेस. मग अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरिपाची चिंता कसली करतोयस. हजारो मार्ग आहेत, संकटावर मात करण्याचे अन् पुन्हा नव्या जोमाने उभारी घेण्याचे. मग उठ अन् पुढ चालं.. मागं न बघता.

यंदा मोसमी पाऊस चांगला पडेल, पेरण्या वेळेत होतील आणि शेती, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी शक्यता हवामान विभाग, पंचांग पाहणारे आणि निसर्गाच्या ठोकताळय़ांचे अभ्यास करणाऱ्या बहुतेकांनी वर्तवले होते. राज्यात मोसमी पाऊस वेळेत दाखलही झाला, पण त्यानंतर तब्बल महिन्याभराचा खंड पडला आणि या खंडानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मोसमी पाऊस सुरू झाला. राज्यात सर्वदूर सुरू झालेल्या या पावसाने जून, जुलै महिन्यांची सरासरी केवळ आठ दिवसांत भरून काढली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि धरणे, तलाव भरून वाहू लागले. नद्या, ओढय़ांना पूर आले. या पुरात हजारो हेक्टर शेतजमिनी खरवडून गेल्या. शेतजमिनीतून पुराचे पाणी भरून गेल्यामुळे पीक पाण्याबरोबर वाहून गेले. नुकतीच पेरणी केलेले आणि कोवळे कोंब आलेली पिके पाण्याखाली राहिल्याने पिवळी पडून वाळून गेली. संत्रा, मोसंबी बागांना मोठा फटका बसला. हळदीचे पीक पाण्याखाली बुडून राहिल्याने नुकसान झाले. डािळबाच्या भागांवर तेल्या आणि फळकुजीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. एकूणच उशिरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही. मिळाले ते फक्त नुकसान.

पाऊस उशिरा आल्यामुळे पेरण्या उशिराने झाल्या. एक जुलैपर्यंत सरासरी पंचवीस टक्क्यांवर झालेल्या पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवडय़ात साठ टक्क्यांवर गेल्या. या पेरण्यांची उगवण सुरू असतानाच अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पेरणी वाया गेली आहे. सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनी पुरातील पाण्यात खरवडून गेल्या आहेत. या प्रचंड अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात कोणतीच आर्थिक साधने नाहीत. कोणत्याच ठोस उपाययोजना नाहीत. पण या अडचणीतून बाहेर तर पडलेच पाहिजे. अडचणीवर मार्ग काढलाच पाहिजे. अडचणीने, संकटांनी गर्भगळीत होऊन बसणारा तो बळीराजा कसला. बळीराजाला या संकटातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी धडपड करावीच लागेल.

मुळात आता जुलैचा मध्य उलटून गेला आहे. पावसामुळे शेतजमिनीत चिखल झाला आहे. या जमिनीत वाफसा येण्यासाठी किमान आठ दिवस तरी लागतील. हे आठ दिवस गृहीत धरले तर जुलैअखेर पेरणी करता येईल. आता सोयाबीन, कडधान्य, कापूस पिकाच्या पेरण्या फायदेशीर ठरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या पिकांच्या दुबार पेरण्या होण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय आता पेरण्या केल्यातर रब्बी हंगामासाठी शेत मोकळे होणार नाही. त्यामुळे आता किमान आपल्या दारात असलेल्या जनावरांच्या चाऱ्याची पहिल्यांदा सोय करावी लागेल.

खरिपातील ज्वारी, बाजरीचा कडबा आणि कडधान्यांच्या भुस्कटावर शेतकऱ्यांच्या दावणीतील जनावरे तग धरत होते. खरीप वाया गेल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उग्र होणार आहे. खरिपात पेरणी झाली नाही, पेरलेले सर्व वाहून गेल्यामुळे जनावरांच्या खाण्या-पिण्याची पहिल्यांदा सोय बळीराजाला करावी लागेल. त्यासाठी हंगाम नसला तरी सुद्धा मका, कडवळासह अन्य चारा पिकांची शेतकऱ्याला लागवड करावी लागेल. या चारा पिकातून फार काही पदरात पडणार नाही, फार काही आर्थिक फायदा होणार नाही. पण दावणीला असणाऱ्या जनावरांची पोट भरायची तरी व्यवस्था होईल. चारा पिके दोन अडीच महिन्यात काढून पुन्हा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करई, रब्बी ज्वारी सारख्या पिकांसाठी शेतजमिनी तयार करता येतील. संकरित, हायब्रीड बियाणांची पेरणी करून, खते टाकून शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती. आता पुन्हा इतका आर्थिक खर्च करण्याची शेतकऱ्यांची ऐपत असणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे पेरून किमान चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.

काळय़ा मातीची, चिकन मातीच्या रानातील पाण्याचा निचरा करून करण्यासाठी पाणी काढून दिले पाहिजे. जमिनीला लवकरात लवकर वाफसा येऊन काहीतरी पेरता येईल, अशी स्थिती निर्माण केले पाहिजे. माळरानावरील तांबडतोंडी, हलक्या रानात कमी काळात निघणारे पीक घेता येईल का, याचा अंदाज घेतला पाहिजे. पालेभाज्यांचे दर आता कडाडण्याची शक्यता आहे. या बहुतेक पालेभाज्या अडीच तीन महिन्यांत निघतात या अडीच तीन महिन्याचे नियोजन करून पालेभाज्यांची लागवड करता येईल. काकडी, दोडका, टोमॅटो, वांगी यासारख्या दैनंदिन गरजेतील फळभाज्यांची गरज वाढलेली आहे. पावसामुळे नुकसान होऊन या पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. मुंबई पुण्यासारख्या मोठय़ा शहरात या पालेभाज्यांचे दर चढे आहेत. या चढय़ा दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पालेभाज्यांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. कमी काळात ही पिके निघत असल्यामुळे चार पैसे हाताशी येतील आणि याच पैशावर पुन्हा रब्बी हंगामाची तयारी करता येईल, असे नियोजन शेतकऱ्यांना करणे शक्य आहे. कमी काळातील फुल शेतीचा एक चांगला पर्याय आहे.

ज्या जमिनीत लवकर वाफसा येणारच नाही ,अशा जमिनीत थेट रब्बी हंगामातील आगाप ज्वारीची पेरणी शेतकरी करू शकतील. राज्याच्या अनेक भागांत गणपतीच्या काळात अगाप रब्बी ज्वारी पेरली जाते.  हा मुहूर्त आता साधणे शक्य आहे. रब्बी ज्वारीची अगाप पेरणी केल्यास उन्हाळय़ाचा चटका किंवा पाणीटंचाई न भासता ज्वारीची काढणी वेळेत होईल आणि ज्वारी उत्पादन बऱ्यापैकी चांगले होईल, असे नियोजन करता येऊ शकेल. संत्रा, मोसंबी, डािळबासारख्या ज्या रोगांवर तेल्या फळकुेजेचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्या शेतकऱ्याने उघडीप मिळताच औषध फवारणी केली पाहिजे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. वेळेत औषध फवारणी करून या संकटातून बाहेर पडता येईल.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सांगली, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांत द्राक्ष बागांच्या अगाप फळ छाटण्या सुरू होतात. या फळ छाटण्यांसाठी तयारी आतापासूनच करता येईल. बागांमधील साचलेले पाणी द्राक्ष पिकाला नुकसानकारक असते. त्यामुळे द्राक्ष बागांमध्ये साठलेले पाणी काढून देऊन वाफसा लवकरात लवकर आणता येईल. शेणखत घालून द्राक्ष बागांमधील जमिनी हाताखाली आणता

येतील. जेणेकरून ऑगस्टच्या मुहूर्तावर द्राक्ष बागांच्या अगाप फळ छाटण्या घेता येतील. नैसर्गिक आपत्ती, संकटांची मालिका तर सुरू राहणारच आहे. पण, त्यातून मार्ग तर काढलाच पाहिजे.

पावसामुळे शेतजमिनीत चिखल झाला आहे. या जमिनीत वापसा येण्यासाठी किमान आठ दिवस तरी लागतील. हे आठ दिवस गृहीत धरले तर जुलैअखेर पेरणी करता येईल. आता सोयाबीन, कडधान्य, कापूस पिकाच्या पेरण्या फायदेशीर ठरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या पिकांच्या दुबार पेरण्या होण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय आता पेरण्या केल्यातर रब्बी हंगामासाठी शेत मोकळे होणार नाही. त्यामुळे आता किमान आपल्या दारात असलेल्या जनावरांच्या चाऱ्याची पहिल्यांदा सोय करावी. चारा पिके दोन अडीच महिन्यात काढून पुन्हा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करई, रब्बी ज्वारी सारख्या पिकांसाठी शेतजमिनी तयार करता येतील. – विकास पाटील, संचालक, राज्य कृषी विस्तार आणि नियोजन विभाग

dattatay,jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
श्रीलंकेतील संघर्ष आणि शेतीचे धोरण!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी