जीवघेणे ५० तास..

गेल्या दहा वर्षांत पडला नव्हता इतका पाऊस या आठवडय़ात चेन्नईत झाला.

निसर्गाच्या या प्रकोपाचा चेन्नईतील एका गृहिणीने घेतलेला अनुभव

गेल्या दहा वर्षांत पडला नव्हता इतका पाऊस या आठवडय़ात चेन्नईत झाला. जीवित आणि वित्तहानीही मोठी झाली. बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. निसर्गाच्या या प्रकोपाचा चेन्नईतील एका गृहिणीने घेतलेला अनुभव..
दोन-तीन दिवसांपासून एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅप फिरतोय. ‘मी चेन्नईमध्ये राहणारा आहे, मला भरपूर पगार आहे, चांगला बँक बॅलन्स आहे, घरात भरपूर सामान आहे, पण आज मला या सर्वाचा काहीही उपयोग नाही. गेले तीन दिवस मी घरात अन्न-पाण्यासाठी तडफडतो आहे आणि कुणी तरी मला खायला अन्न आणि प्यायला पाणी देईल का, याची वाट बघत बाल्कनीमध्ये उभा आहे. नेचर इज अवर बेस्ट टीचर’..
किती खरं आहे हे!.. चेन्नईमध्ये गेले दहा-पंधरा दिवस पावसाचा कहर चालू आहे. हा महिना इथला पावसाळी महिना. पण एरवी चेन्नईमध्ये पाऊस पडतो म्हणजे एखाददुसरा तास सणकून मग लगेच आकाश मोकळं.
यंदा ऑक्टोबरची सुरुवातच पावसानं झाली. कोकणात लहानाची मोठी झाल्यानं मला पावसाळ्याचं एरवी काहीच वाटत नाही. उलट गेली तीन र्वष चेन्नईचा पावसाळा म्हणजे एक विनोद वाटत राहिला आहे. या वर्षी मात्र, दिवाळीभर पाऊस पडतच राहिला. गेल्या दहा वर्षांत पडला नव्हता इतका पाऊस या आठवडय़ामधे पडला आणि चेन्नई पाण्यात बुडाली. चेन्नईमध्ये तुफान पाऊस झाला तो सोमवारी. हा गेल्या दहा वर्षांतला सर्वात जास्त पाऊस. केवळ २४ तासांत जवळपास अडीचशे मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.. घरामध्ये टय़ूबलाइट लावल्याशिवाय गत्यंतर नाही इतका अंधार. बाहेर मुसळधार बदाबदा कोसळतच होता. मंगळवारी पहाटे पाऊस थांबला. सकाळी नऊ वाजता वीज गेली.
कालच्या पावसामुळे घरासमोर रस्ताभर तळं साचलं होतं. इतक्यात शेजारणी बाहेर येऊ लागल्या. ‘क्या कर रहे हो? गंगामया आ गयी देखो.’ समोरच्या मारवाडी भाभींनी मला हाक मारली. बाहेर वाकून पाहिलं तर तळ्यातलं पाणी वाहू लागलं होतं, म्हटलं. ‘गंगामया नव्हे, साचलेलं पाणी उपसत असतील.’ ‘कसचं काय.. बातमी आली, धरण फुटलंय.’ या बातमीनं मात्र धाबं दणाणलं. धरण आमच्या भागापासून विसेक किमी लांब होतं. पाणी इतक्या दूर कसं येईल? एकंदरीत पाण्याचा जोर प्रचंड होता. रस्त्यावरून वाहणारं पाणी आता पसरत अध्र्या तासात आमच्या कंपाऊंडमध्ये आलं होतं. घरात मी आणि सहा वर्षांची मुलगी अशा दोघीच. नवरा सेमिनारसाठी सिटीमध्ये गेलेला. त्याचा फोन सायलेंटवर असणार, तरी त्याला मेसेज टाकला. रत्नागिरीला आई-वडिलांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. एव्हाना अंगणातलं पाणी पहिल्या पायरीपर्यंत टेकलं होतं. त्यातच, ‘धरण फुटल्याच्या’ आणि ‘धरणाचे उघडलेले दरवाजे बंद होत नाहीत’ अशा बातम्या लागोपाठ येत होत्या.
घरात फिरून जमिनीवरचं सामान उचलून वर ठेवायला सुरुवात केली, सर्वात आधी भांडी वगरे उचलून ठेवली. सर्व महत्त्वाची डॉक्युमेंट्स बबलपेपरमध्ये रॅप केली. जीवनावश्यक वस्तूंची बॅग तयार करून घेतली. त्यामध्ये आम्हा दोघींच्या कपडय़ांचे सेट, पाणी, ड्रायफ्रूट्स बिस्किटं आणि क्रेडिट-डेबिट कार्ड्स, पसे असं सर्व घेतलं. लॅपटॉपची वेगळी बॅग करून ती सर्वात आधी शेजारणीकडे नेऊन ठेवली. तिचं घर तीन माळ्याचं असल्यानं पाणी चढलं तरी किमान पहिल्या माळ्यावर राहता येईल असा विचार केला. तोवर पाणी घरात घुसू पाहत होतं. दिवाळीच्या फराळाचे डबे खोलीच्या माळ्यावर ठेवून दिले. संकट ओसरेपर्यंतची व्यवस्था! दुपारी चार वाजताच बाहेर रात्रीचा अंधार पसरला होता. रस्त्यावरचं पाणी कमरेइतकं चढलं होतं. उंबऱ्यावरचं पाणी जोरात िहदकळत होतं.
शेजारणीचं घर एरवी शंभरेक पावलांवर. पण आता रस्ता नव्हे, तर एक अख्खी नदी पार करायची होती. पाण्याला प्रचंड जोर होता, लेकीला उचलून पाठुंगळी घेतलं. पाणी अजून वाढलेलं. पाण्याच्या करंटच्या विरुद्ध दिशेनं जायचं असल्यानं चालताच येईना. एक-एक पाऊल कसंबसं उचलत पोहोचले. हे इतकं करत असताना मेंदूचा एक कोपरा सतत नवऱ्याच्या येण्याची चिंता करत होता. यादरम्यान आई-वडिलांनी रत्नागिरीवरून चेन्नईमधल्या ओळखीच्या लोकांना फोन करायला सुरुवात केली, त्यांपकी एकांनी माझा पत्ता बचाव पथकाला दिला. अध्र्या तासात त्यांची टीम पोचली, आहे तेथून हलवायची गरज नाही असं सांगितलं, पण गल्लीमधल्या अजूनही कित्येक घरांमध्ये पाणी शिरलं होतं, त्यांपकी काही जणांना नातेवाईकांकडे अथवा इतर सुरक्षित ठिकाणी जायचं होतं. हे होईपर्यंत नवरा घरी पोचला होता. आम्ही कसेबसे पुन्हा घरी गेलो.
काळजाचं पाणी पाणी होणं म्हणजे नक्की काय ते त्या क्षणी अनुभवलं. एरवी घरात ओली फरशी असेल तर त्यावर कुणी पाय ठेवला की मला राग येतो. घरात घाण येऊ नये म्हणून दररोज किती काळजी घेतली जाते, आज मात्र रस्त्यावरचं पाणी बिनदिक्कत घरात घुसलं होतं.
घराच्या सामानापेक्षा आम्ही तिघंही सुरक्षित आहोत ही भावना त्या क्षणी फार महत्त्वाची ठरली होती. परत शेजारणीकडे आलो, रात्रभर झोप येणं शक्यच नव्हतं. वीज नव्हती शिवाय मच्छरांचा उपद्रव. रस्त्यावरून खळाळत जाणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. अंधारात बॅटरी मारली तर आमच्या घराचं अंगण दिसत होतं. पहाटे अडीचच्या सुमाराला जाग आल्यावर बॅटरी मारून पाहिलं. पाणी चक्क कमी झालेलं होतं. कसंबसं उजाडेपर्यंत तिथं राहिलो. रस्त्यावर पाणी आता गुडघ्यापर्यंत उतरलं होतं आणि घरामधलं पाणी ओसरलं होतं. मला वाटलं की घरामध्ये पूर्ण चिखल वगरे झालेला असणार. पण तसं काहीच झालं नव्हतं. घरामध्ये ओल होती, पण माती, घाण, चिखल काहीच नव्हतं. खरंच गंगामया आल्यासारखं घर केवळ पाण्यानं धुऊन गेल्यासारखं स्वच्छ दिसत होतं. अद्याप विजेचा पत्ता नव्हता आणि घरात काळोख होता, तरी बॅटरी मारत घर डेटॉल-फिनाईल घालून झाडून-पुसून घेतलं. घरात काही शिजवणं शक्यच नव्हतं. मग डब्यातला दिवाळीचा फराळ, बिस्किटं खाऊन एक दिवस पार पाडला. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक बॅलन्स आणि रोकड.. काहीही अशा वेळी कामाला येत नाही, हे सत्य त्या वेळी उमगलं.
बुधवारी दिवसभर, ‘अजून धरण फुटलेलंच आहे’ बारा वाजता कालच्यासारखंच पाणी सोडतील. आता पाणी दुप्पट वेगानं येणार आहे, त्यात लोक वाहून जातील वगरे अफवा येतच राहिल्या. घर साफ करणं, फ्रिज साफ करणं, पुढची-पाठची अंगणं साफ करणं यामध्ये अख्खा दिवस गेला, सुदैव इतकंच की पूर आलेला असताना पाऊस मात्र विश्रांती मोडमध्ये होता. लाइट आजही आलीच नाही, त्यामुळे वरच्या टाकीमधलं पाणी जपून वापरणं आवश्यक होतं. काही घरांमधल्या टाक्यांचं पाणी संपल्यावर त्यांनी आमच्या घरून पाणी नेलं. गल्लीमध्ये कुणाचं खूप नुकसान झालं नाही, पण बाजारपेठेमध्ये आणि त्याहून दूरच्या भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये मात्र प्रचंड नुकसान झालं होतं. आमच्या कामवालीची पत्र्याची झोपडीच पूर्ण मोडून पडली होती. घरातल्या बऱ्याच सामानाचं नुकसान झालंच. अगदी पिठा-मिठाचेसुद्धा वांधे झाले होते. सुदैवानं काही एनजीओज या भागामध्ये अन्नाची पाकिटं वाटत होती. मंगळवारी सकाळी गायब झालेली वीज तब्बल ५० तासांनंतर गुरुवारी सकाळी परत आली. तोपर्यंत हळूहळू दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती. ५० तासांच्या एका भयानक अनुभवातून चेन्नई बाहेर आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain in chennai

ताज्या बातम्या