‘त्यांची’ भारतविद्या : वाट पुसता ‘गीर्वाणा’ची…

पण काही भाषा अशा अवस्थेला असतात की त्यांचा जिभेवरचा आढळ ओसरून विरलेला असतो.

संस्कृत- लॅटिन- अन्य युरोपीय भाषा व हिंदी यांतील काही साम्यस्थळे

|| प्रदीप आपटे
सतराव्या शतकात भारतात येऊन हाईनरिख रॉथ हा जर्मन येशुपंथी संस्कृत कसा शिकला असेल? पुढे तर, लॅटिनशी संस्कृतची सांगडही त्याने घातली…

भाषा अवगत होणे मोठी अजब प्रक्रिया आहे. कानावर पडणाऱ्या आवाजांना अर्थाची त्वचा आणि कपडे धिमेधिमे लपेटत जातात. त्यातल्या कित्येक टप्प्यांवर आपण अजाण असतो. अजाणता संकेत शिकणे आणि भाषा अवगत होणे यासाठी आसपासचा परिसर, माणसे, प्राणी, पक्षी वस्तू सगळे इकडूनतिकडून सामील असतात. वस्तूंना नावे येतात. घडामोडींची क्रियापदे होतात. आज्ञार्थ कळतो. विध्यर्थ जमला नाहीतरी उमगतो. लालूच आणि शिक्षेच्या शब्दखुणा उमगतात. लिंग-वचन भेदांनुसार क्रियापद विभक्तींची मुरड बदलणे आपसुखे जमते. सभोवतालाने रुजवलेले ध्वन्यर्थ आणि त्यांची उच्चारणातील, वापरातील शिस्त हाड नसलेल्या जिभेत नकळत खिळते! ऐकता ऐकता माणूस अमृताते राहू द्या पण निदान ‘अमूर्ताते’ पैजा जिंकतो! भले अशिक्षित असो पण व्याकरणाच्या चुका कधी करीत नाही. लहानपणी येणारे हे अकल्पित वाणी वरदान! आपण नकळत काय अद्भुत कमाई केली हे समजायला दुसरी- परिसरात नसलेली- भाषाच शिकावी लागते! लहान पोर कानावर येणाऱ्या तीन चार भाषा सहजी आत्मसात करते. मोठेपणी मात्र हे वरदान सहसा ओसरते. पुरेसे सतत कानी पडणे आणि व्यवहारी उपयोगाशी असणारी जवळीक शाबूत असेल तरच नवी भाषा जिभेवर सहजी नांदू लागते. त्याचे लिपीरूप अवगत नसले तरी जिभेचे चलनवलन अडखळत नाही.

पण काही भाषा अशा अवस्थेला असतात की त्यांचा जिभेवरचा आढळ ओसरून विरलेला असतो. पण त्याचे लेखी लिपीरूप मुबलक मिळते. वापर प्रचारात क्षीण असतो. तरी त्याची उपयुक्तता तगून असते. त्यांचा मानमरातब बलवत्तर असतो! कॅथॉलिक चर्चच्या दबदब्यामुळे एकेकाळी लोकभाषा असलेली लॅटिन नावाची भाषा धर्मज्ञानाची मिरास घेऊन बसली. व्हल्गर म्हणजे लोकप्रिय लोकाचारी. त्यातले रोमनछत्राखालचे बायबलचे रूप ते व्हल्गेट. त्या भाषेशी गोत्रप्रवर असणाऱ्या भाषा होत्याच की! पण राजसत्ता आणि धर्मसत्तेने लॅटिनला अभिजातपणाचा मुकुट चढविला. एकोणिसाव्या शतकापर्यंत त्या भाषेतच वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ते लिहायचे. असेच काहीसे प्राक्तन निरनिराळ्या अभिजात भाषांना लाभले. उदा.- संस्कृत.

युरोप किंवा अन्य भूभागांतले प्रवासी, राजदूत, धर्म प्रसारणाचे दूत हिन्दुस्तानात यायचे. कानी पडणारी भाषा वेगळी असायची. पण जरा अधिक खोलवर चौकस प्रश्न आले की जे सामोरे यावे ते संस्कृत, प्राकृत, पाली यांपैकी असे. भवतालीचे बोली भाषारूप त्याच्याशी साम्य ठेवून असे, पण निराळे असे! जसे मध्ययुगीन ‘विद्वत्’ लॅटिन फक्त चर्चमध्ये ऐकू यायचे. ते एरवी कुठे कानी यायला? तसेच संस्कृताचे! मोजके मठ, पाठशाला आणि धार्मिक प्रसंग वगळल्यास ते सहज सुभग कानी येणे नाही. अशी ठेवण असलेल्या भाषा शिकणे मोठे कष्टप्रद. पण या ना त्या कारणाने अशी भाषा अवगत होणे फार मोलाचे होते. असा दुर्गम कडा चढणारे जीव असायचेच. आजही असे अनेक विद्वान भेटतात. ज्यांनी भाषा डोळ्यांनी शिकलेली असते. त्यांना ती वाचता येते पण त्यांच्या ‘वाचे’वर नसते! त्यात त्यांना सहजी बोलता येत नाही पण त्यांना लिहून दाखवा- त्यांचे डोळे ‘मनांतली तान ऐकतील’ असे तल्लख असतात.

संस्कृत शिकण्यातली जिकीर आणि सायास याची थोडीतरी तोंडओळख बऱ्याच ‘शाळकरी’ जणांना आता असते. पूर्वी तीदेखील भलती तुरळक असे. ज्यांनी हा शाळकरी ‘महत् सायास’ अनुभवला आहे त्यांना आठवेल ते शब्दरूपावलीचे पाठांतर आणि द्विगु तत्पुरुष अशा दहशती नावांचे समास आणि भाषांतर नांवाचा सौम्य दिलासा! निदान अशांनी तरी कल्पना करून बघावी की आपण कुणा इटालीच्या बेटावरून आलेले धर्मप्रचारक आहोत. आणि आता ‘नेटिव्ह’ लोकांच्या धर्मधारणेतला गाभा उमगायला संस्कृत शिकणे निकडीचे आहे! मग कसे शिकले असतील ते? तसे म्हटले तर उत्तर उघड आहे. सोपेदेखील आहे. पाठशाळेतल्या कोणा गुरुजीची मेहरबानी सशुल्क आणि स्पृश्यत्वाचे संकेत पाळून! कधी राजाज्ञेचा धाक असे तर कधी लालूच. संस्कृत शिकविणारे मोजके असायचे पण दुर्मीळ बिलकुल नसायचे.

तरी ते कशा रीतीने शिकले? ‘मोक्ष’मुल्लरने हिन्दुस्तानाबाहेरच्या लोकांनी संस्कृत भाषा आणि त्यातील वाङ्मय कसे जाणून घेतले याचा एक छोटा आढावा ‘लेक्चर्स ऑन दि सायन्स ऑफ लँग्वेज’ या व्याख्यानांमध्ये लिहिला आहे. त्यात ग्रीक, अरबी, ख्रिस्तप्रचारक यांनी केलेले भाषांतराचे उद्योग आणि खटाटोप याचा थोडक्यात आढावा आहे. स्थानिक पंडितांच्या मदतीने शिकणे, भाषांतर करणे हे उघड आणि सुलभ मार्ग होते. काही बाबतीत राजाश्रय आणि राजाज्ञाही उपलब्ध होत्या. डि नोबिलीने तर तमिळ आणि संस्कृत शिकून घेतले होते. ब्राह्मणासारखा वेश आणि केशभूषा करून तो रस्तोरस्ती प्रवचन करीत असे. त्यामुळे संतापून चर्चने त्याची कानउघाडणी आणि चौकशी केली होती. त्याला आपल्या सोंगामागचा पवित्र हेतू समजावून सांगावा लागला होता. परंतु अशा वर्णनांमधून संस्कृत शिक्षणाची धाटणी, त्यातल्या अडचणी आणि व्याकरण समजून घेणे आणि इतर भाषिक खाचाखोचा उमजण्याचे पडणारे सायास याचा अंदाज येत नाही. अरबी आणि युरोपियांना संस्कृतसह सगळ्या भारतीय भाषांमधली अनेक व्यंजने अपरिचित तर होतीच! पण उच्चारणास त्यांच्या जिभेला ती कठीण आणि क्लेशकारक वाटत असत. कानाला आणि जिभेला त्याचे उच्चारण सहजी जमत नसे. त्यांचे लिखाण करायचे तर नवे अक्षर लिपीरूप घडवावे लागे. किंवा परिचित अक्षराच्या वर किंवा खाली काहीतरी खूण कोरायची युक्ती वापरावी लागे. अरबीमध्ये ‘ब’ आहे पण ‘प’ हे अक्षरच नाही! हिंदी लोकांचे बोल आणि उच्चार त्यांना कानांत निराळे भासत. आणि जिभेवर अवतरताना आणखी घसरण होई. अनेक जण ‘नर्मदा’ रोमन लिपित ‘नोरबुदा’ लिहीत. इंग्रजीत ‘जगर्नॉट’ हा शब्द थोराड अवाढव्य वाहनासाठी वापरला जातो. तो ‘जगन्नाथ’चा अपभ्रंश! थोराड बळाच्या वाहनांना जगन्नाथाचा ओढला जाणारा रथ ‘जगर्नॉट’ होऊन चिकटला.

समुद्र ओलांडून इथे येऊन संरकृत शिकताना, त्या शिकण्याला कुणा ग्रंथांचा आधार असे का? व्याकरण शिकले तर त्याची पठडी कुठली होती? पाणिनी वळणाची की मध्ययुगीन वोपदेव धाटणीची? कॅथॉलिक चर्चच्या अनेक दफ्तरांमध्ये त्यांच्या देशोदेशी धाडलेल्या धर्मप्रचारकांचे अहवाल, पत्रव्यवहार आहेत. त्यामध्ये काही शिष्यांचा असा हठयोगी सायास लिखित पुराव्यांसह उपलब्ध आहे. तोदेखील तुलनेने अलीकडे साद्यंत मिळाला. अर्थातच ते बव्हंशी हस्तलिखित कागद आहेत. त्याचा पहिला नमुना म्हणजे एक जर्मन येशुपंथी धर्मप्रचारक हाईनरिख रॉथ.

या येशुपंथीयाचा जन्म १८ डिसेंबर १६२०ला डॅन्यूब काठीच्या श्वाबिश प्रदेशात झाला. शिक्षण मूळ गावी आणि इन्सब्रूकमध्ये झाले. १६४९ मध्ये त्याची चर्चचा उपाध्याय म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीला गोव्यात आणि नंतर गढवाल, श्रीनगर आणि त्यानंतर आग्रा येथे धर्मप्रसार कार्य करू लागला. अगोदर प्रचारक मुगल मुसलमानांवर लक्ष केंद्रित करत होते. रॉथने बहुसंख्य हिंदूंवर अधिक प्रयत्न केले पाहिजेत असे मनाने घेतले. १६५४ ते १६६० या सहा वर्षांत त्याने संस्कृतचे पारंपरिक मौखिक पद्धतीने घोकंपट्टीसकट अध्ययन केले. पण विशेष म्हणजे त्याचबरोबरीने व्यंजन आणि स्वरांचे लॅटिनमध्ये स्वरीकरण आणि स्वरलेखन सुचविणारी पद्धत अवलंबली. त्याचे व्याकरणाचे अध्ययन बहुधा वोपदेवाचे मुग्धबोध आणि अनुभूती स्वरूपाचार्यांचे ‘सारस्वत व्याकरण’ या दोहोंच्या आधाराने झाले असावे. त्या शिक्षणातून त्याने संस्कृत शिकण्यासाठीचा एक पाठलेख लॅटिनमध्ये लिहिला. त्याचा प्रथमभाग स्वर आणि व्यंजन ओळख त्यानंतर संधी नियम यावर आहे. दुसरा भाग नामांचे सर्वनामांचे अंतिम स्वर किंवा व्यंजन अक्षरानुसार होणारे प्रकार, स्त्रीलिंग/ पुल्लिंग/ नपुंसकलिंग आणि त्यांची विभक्तीनुसार होणारी रूपे या विषयाला वाहिलेला आहे. तिसरा भाग क्रियापदांचे गण आणि त्यांचे कालानुरूप अर्थानुरूप होणारी रूपे, भाव, कर्म इत्यादी विषयांना वाहिलेला आहे. चौथा भाग कृदन्त, पाचवा भाग वाक्यविचार यावर लिहिलेला आहे. लॅटिनमध्ये संबोधन धरून पाचच विभक्ती असतात. वर/ खाली/ कडे इत्यादी अव्ययरूपांवर विभक्ती अर्थ भागतो. संस्कृतमध्ये त्या अव्ययाबरोबरीने नामांची विभक्ती आणि प्रत्यय बदलतात. त्यासाठी तृतीया पंचमीची सप्तमीशी सांगड घालणारे असे ‘एब्लेटिव्ह’चे त्याने पोटभेद केले आणि स्पष्टीकरणासाठी वापरले. या पुस्तकातला भाषेचा आकलनक्रम एकीकडे पारंपरिक रीतीशी साम्य राखणारा होता. पण त्याचेच पुढे क्रमाक्रमाने पचणारे धडे बनत गेले. तेसुद्धा स्वाभाविकत: लॅटिनशी तुलनात्मक संबंध राखून. युरोपियांना लॅटिनशी नाते ठेवत संस्कृत व्याकरण शिकविणारे हे पहिले ‘क्रमिक’ पुस्तक!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heinrich roth came to india german jesuit sanskrit sanskrit is also associated with latin akp

ताज्या बातम्या