दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

शेती हा सर्वाधिक अविश्वासार्ह व्यवसाय मानला जातो. यामध्ये सतत बदलत्या हवामानाचा घटक जास्त परिणामकारक ठरतो. यासाठीच जत तालुक्यातील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात हवामान केंद्राची उभारणी केली आहे. याविषयी..

पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार करायची कोणाकडे, अशी एक म्हण ग्रामीण भागात रूढ आहे. कारण शेती ही उघड्या आकाशाखाली करावी लागते. लाखो रुपयांची गुंतवणूक, अमर्याद शारीरिक श्रम करूनही आलेले पीक पोटात पडेल की नाही हे ठरविण्याचा अधिकार निसर्गाने आपणाकडे ठेवला आहे. मात्र बदलत्या हवामानाचा पिकावर परिणाम होणारच असला तरी यातूनही शाश्वतता कशी आणता येईल यासाठी हवामान केंद्राची उभारणी गरजेची आहे. एका संगणक अभियंता झालेल्या तरुण शेतकऱ्याने हा प्रयोग दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जतमध्ये केला आहे.

जत तालुक्याचा उल्लेख केवळ दुष्काळी प्रश्नासाठी नेहमी येतो. याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब आणि द्राक्ष शेती पिकवली आहे. जत शहरातील शिविलगप्पा संख हे प्रगतशील शेतकरी आहेत. शिविलगप्पा यांनी कऱ्हाड येथील फार्मसी महाविद्यालयात औषध निर्माण शास्त्रातील पदवी १९७० मध्ये घेतली. त्यानंतर जत शहरात मेडिकल सुरू केले. सन १९८० ला शेती विकत घेतली.

तसे पाहिले तर संख यांच्या शिक्षणाचा शेतीशी फारसा संबंध नाही. तरीदेखील त्यांनी डािळबाच्या शेतीस प्रारंभ केला. शेतीचा अभ्यास करून दर्जेदार डाळिंब पिकवू लागले. त्यानंतर  १९९२ साली द्राक्ष शेती करण्यास सुरूवात केली. द्राक्ष आणि डािळबाचा अभ्यास संख यांनी केला. त्यातील तज्ज्ञ झाले. द्राक्षाची निर्यात देखील सुरू केली. एकोणीस वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये पावसाची अनियमितता शेती व्यवसायाच्या मुळावर आली. अवर्षण स्थितीमुळे पिकांना पाण्याचे चटके बसू लागले. पाण्याची चणचण लक्षात येताच शेततळे तयार केले.

मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केलेल्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करीत असल्याचे जाणवल्याने शेतीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पालथा घातला. विदेशातही शेती उत्पन्न शाश्वत करण्यासाठी काय प्रयोग करण्यात येतात हे अभ्यासण्यासाठी विदेशवारीही केली.  

आपल्याकडील शेतकरी सहजासहजी नवीन तंत्र अवगत करण्यासाठी धजावत नाही, कारण यासाठी भांडवली गुंतवणूक मोठी असते. ते अल्प व अत्यल्प भूधारकांच्या आवाक्याबाहेरचे तर आहेच, पण नवीन प्रयोग करून पुन्हा निसर्गाचा फटका बसला तर मुद्दल बाजूलाच, कर्जाचा डोंगर वाढत जातो.  मात्र शेती फायदेशीर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे हे लक्षात आले. वडिलांनी केलेल्या अभ्यासाचा परिणाम म्हणून सचिन संख यांना फायदा झाला.

सचिन संख याने संगणक शास्त्रातील पदवी घेतली आहे. त्यानेही नोकरीचा शोध घेतला. मात्र शिक्षणाच्या मानाने नोकरी मिळेलच याची खात्री देता येत नव्हती. यामुळे त्याने २००५ मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी काही प्रमाणात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरास सुरुवात केली होती. वडिलांच्या सोबत शेतीत राबू लागला.  संगणक शिक्षण घेतले असल्याने शेतीमध्ये कष्ट करण्यास मन धजावत नव्हते. शिवाय पारंपरिक पध्दतीने शेतीचे फारसे ज्ञानही नव्हते. त्या वेळी वडिलांनी वर्षभर प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अभ्यास करण्याचा सल्ला दिला. या दरम्यान,  द्राक्ष आणि डािळबाचा अभ्यास झाला. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली की शेती सोपी होते आणि दर्जेदार उत्पादनही घेऊ शकतो याचा विश्वास निर्माण झाला.

संगणक शिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा शेती व्यवसाय आधुनिक करण्यात वापर करण्याचा निर्णय घेतला. जत तालुका मुळात अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने पाण्याचे कायम दुर्भिक्ष तर आहेच, पण जमीनही काळी कसदार नसली तरी खडकाळ, मुरमाड निचऱ्याची जमीन. या भागात पश्चिमेकडून येणाऱ्या मोसमी पावसापेक्षा परतीच्या पावसावरच भिस्त ठेवावी लागते.  परतीचा पाऊस झाला तरच पुरेसे पाणी उपलब्ध होते. द्राक्ष शेती ढोबळपणे करून चालत नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाची गरज असते. तंत्रज्ञान असेल तर दुष्काळी भाग असो वा, अति पावसाचा भाग असो, त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानापासून शेतीचे काटेकोर नियोजन करणे सोपे जाते. 

द्राक्ष पीक तसे अति संवेदनशील वर्गात मोडणारे. गोड द्राक्षे जशी माणसाला आवडतात, तशीच विविध प्रकाराच्या रोगांना, किटकांनाही आवडतात. तळहातावरील फोडाप्रमाणे जपले तरच चार पैसे मिळतात. अन्यथा थोडे जरी दुर्लक्ष झाले तर होत्याचे नव्हते होण्यासाठी २४ तासांचा अवधी अधिक ठरतो. वातावरणात बदल झाला की, त्याचा परिणाम पिकावर होतो. त्यामुळे पहिल्यांदा स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी साधे हवामान केंद्र होते. त्यातून पावसाच्या अंदाजासह अन्य काही गोष्टी समजल्या जायच्या. पण कालांतराने नव्या तंत्रज्ञानाची गरज भासली. या गरजेतून दोन वर्षांपूर्वी २०१९ च्या दरम्यान नवे स्वयंचलित हवामान केंद्र बसवले.

जत आणि दुष्काळ असं जणू समीकरण बनले आहे. शेतीला जरी ठिबक सिंचन बसवले असले तरी मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणा चालणे गरजेचे आहे. यामुळे संपूर्ण शेतीला २०१५ मध्ये संगणकाच्या माध्यमातून स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली.  हवामान केंद्राच्या माध्यमातून वेदरस्टेशनच्या माध्यमातून शेतीला किती पाणी द्यावे लागते, याची माहिती मिळाल्यानंतर याची माहिती स्वयंचलित यंत्राला आपोआप मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. यामुळे गरज असेल तर आपोआप वेलींना पाणी मिळते. गरजेइतकेच मिळते, गरज पूर्ण होताच आपोआप बंद होते. अडीच एकर द्राक्ष बागेसाठी ही यंत्रणा बसवली आहे. या केंद्रातून पाऊस आणि वातावरण  बदलाची माहिती मिळते.

माती, पाणी आणि रोगाची माहिती अवघ्या अडीच एकरातील व्यवस्थापन या केंद्राच्या माध्यमातून करता येते. भविष्यात द्राक्ष शेतीला ‘सेंन्सर’ बसविण्याचे नियोजन सुरू केले आहे. अर्थात प्रत्येक जमीन ही वेगळी असते. हलकी, भारी आणि मध्यम अशा प्रकारची असते. त्यामुळे जमिनीत सेंसर बसवले की, त्या-त्या जमिनीनुसार खत, औषधे, आणि पाणी व्यवस्थापन करणे सहज शक्य होणार असल्याने खर्चात आणखी बचत होईल.

पिकांना पाण्याची गरज किती आहे याची माहिती होण्यासाठी जमिनीमध्ये दोन सेन्सर बसविण्यात आले आहेत. यापैकी एक सेन्सर जमिनीत आठ इंचावर, तर दुसरा सेन्सर २८ इंचावर बसविण्यात आला आहे. यामुळे आठ इंचावरील सेन्सरवरून पाण्याची गरज आहे का याची माहिती मिळते, तर त्या खालील म्हणजे २८ इंचावरील सेन्सर पाण्याची गरज भागली असल्याचे दर्शवतो. जमिनीमध्ये याच टप्प्यात  पिकांच्या पांढऱ्या मुळ्या असतात, ज्या अन्नद्रव्य घेउन फळधारणेबरोबरच पीक वाढीसाठी सहायभूत ठरत असतात. तसेच पानाजवळ असलेल्या सेन्सरद्बारे पानांवर पडलेले दव मोजले जाते. यातून रोगांचा प्रादुर्भाव किती झाला आहे याची माहिती मिळते. तसेच कोणता रोग बळावला जाणार याची पूर्वसूचना मिळत असल्याने औषध फवारणीचे नियोजन योग्य पध्दतीने करता येते.

हवामान केंद्र उभारणीसाठी सर्वसाधारण ५० हजार रुपयांचा खर्च येतो. या केंद्राद्बारे आपणास तापमान, पावसाचा अंदाज, वाऱ्याची दिशा, हवेतील आर्द्रता आणि पानातील बाष्पीभवनाची तीव्रता किती याची माहिती मिळते. या माहितीनुसार आपणास नियोजन करणे सुलभ होते. जमिनीतील ओलावा समजण्यासाठी आणि पिकांची पाण्याची गरज ओळखण्यासाठी ‘सेन्सर’ची मोठी मदत होते. एका सेन्सरसाठी सुमारे ३० हजाराचा खर्च येतो. पिकाला नत्र, स्फुरद, पालाश याची किती निकड आहे हे ओळखण्यासाठी पिकाचे पान, देठ यांची प्रयोगशाळेत तपासणी करणे गरजेचे आहे. याचबरोबर पिकांना जमिनीत काय उपलब्ध आहे, काय गरजेचे आहे याची तपासणी सलग तीन वर्षे माती व पाण्याची तपासणी प्रयोगशाळेतून केली तर या रासायनिक खतांची किती गरज आहे याची माहिती आपणास मिळू शकते. सलग तीन वर्षे केल्यानंतर आपल्या जमिनीची तब्येत ज्ञात होत असल्याने उणीव असलेली मूलद्रव्ये दिली तर उत्पादन हमी तर मिळतेच पण गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेणे शक्य आहे.