लेखक – प्रा. राजा दीक्षित: अभ्यासू वृत्ती, कष्टाळू स्वभाव, अस्सल साधनांचा शोध, पूर्वग्रहदूषित व संकुचित विचारांना विरोध, पुरोगामी, समतोल व विधायक दृष्टी, संस्थात्मक कार्याची व समाजहिताची कळकळ या गुणांमुळे डॉ. जयसिंगराव पवार यांना महाराष्ट्राच्या इतिहासविश्वात आदराचे स्थान प्राप्त झाले. असे विद्वान दुर्मीळ असतात.
कोल्हापूर येथे मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधकांची मोठी परंपरा आहे. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार (५ मे १९०६ – ३० डिसेंबर १९८१) आणि त्यांचे एक शिष्य व शिवाजी विद्यापीठाच्या ‘शाहू संशोधन केंद्रा’चे माजी संचालक डॉ. जयसिंगराव पवार हे या परंपरेतील दोन मोठे इतिहासकार.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी काल सकाळी कानावर आली, ती अत्यंत दु:खद होती. त्यांच्या-माझ्या नात्यासंबंधी आधी थोडे लिहितो; मग त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयीचे विवेचन करतो. सुमारे ४३ वर्षांपूर्वी मी पंढरपूरच्या महाराष्ट्र इतिहास परिषदेत माझे पहिले शोधनिबंधवाचन केले, त्या सत्राचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार होते. तेव्हा ते मला ओळखत नव्हते.
मीही त्यांना प्रथमच पाहिले. त्यांनी लिहिलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमुळे मी त्यांना ओळखत होतो. पण, त्यानंतर थोड्याच कालावधीत जो ऋणानुबंध निर्माण झाला, तो कायमचा. किंबहुना माझ्या आयुष्यातील तो एक मोलाचा ठेवा आहे. माझ्यापेक्षा ते सुमारे १३-१४ वर्षांनी मोठे असल्याने माझ्या बाजूने आदरभाव आणि त्यांच्या बाजूने कौतुक यांची देवाणघेवाण सदैव होत राहिली.
मी मराठी विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष झालो, तेव्हाच्या एका गौरवांकात त्यांनी या नियुक्तीबद्दल केवळ माझे नव्हे, तर महाराष्ट्र शासनाचेसुद्धा कौतुक केले. डॉ. पवार यांनी एकदा कोल्हापूर येथे ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाले’त ‘राजर्षी शाहू यांचा धर्मविचार’ या विषयावर माझे व्याख्यान आयोजित केले आणि ‘आजवर अनेकांनी टाळलेल्या या विषयावर दीक्षितांनी मात्र अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले,’ असे कौतुकही अध्यक्षीय समारोपात केले.
त्यांच्या पंचखंडीय ‘राजर्षी शाहू स्मारकग्रंथा’त ‘राजर्षी शाहू महाराज आणि समतेचा लढा’ या विषयावर लेख लिहिणे ही माझ्यासाठी अतिशय समाधानाची बाब होती. अलीकडे ‘सक्षम समीक्षा’च्या माझ्या साहित्यावरील विशेषांकातील माझी मुलाखत वाचून त्यांचा फोन आला आणि अभ्यासाची शिस्त, काटेकोरपणा यांसारखे काही गुणधर्म आम्हा दोघांमध्ये समान असल्याबाबत ते भरभरून बोलले.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पावलावर पाऊल टाकून इतिहास संशोधनाची परंपरा पुढे चालवणारी त्यांची कन्या डॉ. मंजुश्री पवार हिचा विषय आमच्या गप्पांमध्ये हमखास निघत असे. एकंदरीतच आमच्यात एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झालेला होता. पवार सरांमध्ये असणारी गुणग्राहकता आणि सहृदयता विलक्षण होती.
डॉ. अरुणा मोरे यांना महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद सरांमुळेच मिळाल्याचे त्या कृतज्ञापूर्वक नमूद करतात, ते यामुळेच. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सर्व लेखनाचा परामर्श घेणे, या छोट्या लेखाच्या मर्यादेत शक्य नाही. त्यामुळे मला जाणवलेल्या काही ठळक गोष्टी थोडक्यात नमूद करतो. सुमारे ४० संशोधनात्मक ग्रंथ, ४५ शोधनिबंध, २० पुरस्कार आणि १५ भारतीय व १० परदेशी भाषांमध्ये झालेली वा होत
असलेली त्यांच्या राजर्षी शाहू चरित्राची भाषांतरे एवढा निर्देशसुद्धा त्यांच्या लेखनकर्तृत्त्वाची कल्पना येण्यास पुरेसा आहे. त्यांचे आत्मचरित्र त्यांनी लिहून हातावेगळे केल्याचे ऐकिवात आहे. ती अत्यंत मोलाची भर असेल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्याविषयीचे चरित्रात्मक लेखन, ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ हा ग्रंथ आणि मराठेशाहीवरील अन्य काही ग्रंथ यांद्वारे त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे दालन समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावलेला आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांची ही कामगिरी कायम स्मरणात राहील. त्या जोडीला राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरील लेखनामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासालासुद्धा त्यांनी मोलाचे योगदान केलेले आहे. ‘कोल्हापूर : ऐतिहासिक व प्राकृतिक’ यासारखा संपादित खंडसुद्धा उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रात सामाजिक चळवळी चालवणारे काही कार्यकर्ते व विचारवंत बहुजनांच्या उद्धाराचा विचार मांडत असताना फक्त फुले-आंबेडकर यांच्या कार्याचा निर्देश करतात. पण, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरणीय वाटणाऱ्या राजर्षी शाहूंचा मात्र निर्देश राहून जातो, अशी खंत मनी असल्याने राजर्षींची उपेक्षा थांबवली पाहिजे आणि त्यांना इतिहासात उचित न्याय दिला पाहिजे, या भावनेतून डॉ. पवार राजर्षी शाहूविषयक लेखन-संपादनाकडे वळले.
तसेच, राजर्षींचे चारित्र्यहनन करणाऱ्या दंतकथा दूर सारून त्यांची खरीखुरी प्रतिमा समाजासमोर ठेवणे, डॉ. पवार यांना अभिप्रेत होते. ते कार्य त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.अभ्यासू वृत्ती, कष्टाळू स्वभाव, अस्सल साधनांचा शोध, पूर्वग्रहदूषित व संकुचित विचारांना विरोध, पुरोगामी, समतोल व विधायक दृष्टी, संस्थात्मक कार्याची व समाजहिताची कळकळ या गुणांमुळे डॉ. पवार यांना महाराष्ट्राच्या इतिहासविश्वात आदराचे स्थान प्राप्त झाले.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांच्या मनात त्यांची प्रतिमा यामुळेच उजळून निघाली. ते जितके सहृदय होते, तितकेच ते प्रसंगी परखड होते. त्यांची शिस्त व त्यांचा स्पष्टवक्तेपणा यांमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक आदरयुक्त दरारा होता. असे विद्वान दुर्मीळ असतात. त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे, ते त्यामुळेच.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी शालेय स्तरावरसुद्धा जे इतिहासविषयक काम केले, ते उल्लेखनीय आहे. ‘बालभारती’सारख्या संस्थेला त्यांच्या विद्वत्तेचा लाभ मिळाला. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीवर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू छत्रपती स्मृतिग्रंथ’ प्रकाशित केला.
त्यासाठी डॉ. पवार यांच्यासह आम्हा सात जणांची एक तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने जो ग्रंथ संपादित केला, त्याला डॉ. जयसिंगराव पवार सरांनी विवेचक प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना मुळातून वाचण्याजोगी आहे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने ४ जानेवारी २०२६ या दिवशी डॉ. जयसिंगराव पवार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा जाहीर सन्मान केला. हा एक काव्यगत न्याय होता, असे मला वाटते.
smrajadixit@gmail.com
