महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावर चार दशकांहून अधिक काळ दीपस्तंभाप्रमाणे उभी असलेली संस्था म्हणजेच इचलकरंजीची ‘समाजवादी प्रबोधिनी’. आज ही संस्था सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. तिचे कार्य ही केवळ उपक्रमांची यादी नसून महाराष्ट्राच्या प्रगल्भ लोकशाहीचा आणि मानवतावादी मूल्यांचा जिवंत इतिहास आहे. शाखांचे सशक्त जाळे विणून संस्थेने अनेकांच्या जीवनात ज्ञान-विवेकाचा प्रकाश पसरवला. नवी वैचारिक क्षितिजे खुली केली.

वस्त्रोद्योजक आणि श्रमिक असे दोन ठळक वर्ग असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीत वैचारिक कार्य रुजवणे सोपे नव्हते. संस्थेने प्रबोधनात्मक उपक्रम अव्याहत राबवून सक्षम समाजमन घडवण्यात हातभार लावला. संस्थेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त नानाविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

प्रबोधन समताधिष्ठित समाज निर्माण करणारे असले पाहिजे या उद्देशाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन खंदे नेते व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांताराम गरूड यांनी विचारपूर्वक पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारून समाजप्रबोधनाच्या कार्याला वाहून घेतले. आणीबाणीत दोन वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी १९७७ साली समविचारी मित्रमंडळींशी, विचारवंतांशी पुढील वाटचालीबद्दल चर्चा केली. त्यातून ११ मे १९७७ रोजी ‘शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ’ हे ब्रीद असलेली ‘समाजवादी प्रबोधिनी’ ही संस्था स्थापन झाली. वि. स. पागे, प्राचार्य म. द. देशपांडे, प्रा. एन. डी. पाटील, ज्ञा. सं. नार्वेकर, पी. बी. साळूंखे, प्रा. ए. ए. पाटील, ॲड. गोविंद पानसरे, गं. बा. सरदार, डॉ. वि. म. दांडेकर, प्रा. नलिनी पंडित, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींनी संस्थेच्या उभारणीला साथ दिली.

भारतीय संविधान, समाजवाद, गांधीवाद, भारतीय संस्कृती, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद या कळीच्या मुद्द्यांवर प्रबोधन चळवळ संघटित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रबोधनाचे कार्य स्वयंसेवी संघटनेने मुख्यत: लोकांची वैचारिक भागीदारी, लोकांचाच प्रत्यक्ष श्रमिक सहभाग आणि लोकपातळीवरील अर्थसाहाय्य यांच्या आधाराने करावे अशी भूमिका घेऊन या कार्याला आरंभ करण्यात आला. या प्रवासात समाजवादी प्रबोधिनीने केवळ मूक प्रेक्षक न राहता कृतीशीलतेचा वसा घेतला. व्याख्याने, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे, प्रबोधनात्मक परिसंवाद आणि विचारशील मेळावे अशा लोकप्रबोधनाच्या हजारो कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

‘प्रबोधन महिला मंचा’च्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर, ‘वृत्तपत्र पत्रलेखक संघा’च्या माध्यमातून लेखणीला धार देणे, व्यसनमुक्तीच्या अंधार्‍या वाटेवरून जाणार्‍यांना ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून प्रकाशाकडे नेणे, तसेच ‘रंग यात्रा’ आणि विविध नाट्यसंस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीला बळ देणे, अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची भक्कम जोड या कार्याला सातत्याने लाभली.

प्रबोधिनीला ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आजवर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आचार्य शांताराम गरुड, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी काम पहिले असून सध्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर हे अध्यक्ष आहेत. लेखक, गझलकार, कवी प्रसाद कुलकर्णी हे सरचिटणीस आहेत.

वाचनामुळे व्यक्ती विचारांनी समृद्ध होते, हे लक्षात घेऊन समाजवादी प्रबोधिनीने आपल्या वाटचालीत एक महत्वाचे पाऊल टाकले ते म्हणजे ‘प्रबोधन वाचनालया’ची स्थापना. १ एप्रिल १९८४ रोजी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. शासनमान्य ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या या ग्रंथालयात सर्व साहित्य प्रकारांची ३२ हजार पुस्तके, समृद्ध संदर्भ विभाग आणि तीन हजारांवर पुस्तकांचा बाल विभागही आहे. दररोज १७ दैनिके वाचनालयात येतात. शंभरावर नियतकालिकेही येतात. या मोफत वाचन विभागाचा आणि ग्रंथ विभागाचा लाभ दररोज दोनशेवर वाचक घेतात. प्रबोधन वाचनालयाच्या वतीनेही साहित्य, कला, सांस्कृतीविषयक उपक्रम सातत्याने राबवले जातात. जानेवारी १९९० पासून ‘आयएसएसएन’प्राप्त ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ हे मासिक वर्षभरात ९०० पृष्ठांचा सकस वैचारिक मजकूर घरपोच देते. आजवर ४६६ अंकाच्या माध्यमातून ३० हजारांवर छापील पृष्ठांचा मजकूर लोकप्रबोधनार्थ प्रकाशित करण्यात आला आहे. ‘पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना’ हे या मासिकाचे वैशिष्ट्य आहे. आचार्य शांताराम गरुड, एन. डी .पाटील, गोविंद पानसरे, प्रा. डॉ. फक्रुद्दीन बेन्नूर, प्रा. नलिनी पंडित, डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. डॉ. भारती पाटील, प्रसाद कुलकर्णी आदींची पुस्तके या वाचनालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

सुवर्णमहोत्सवापर्यंतचा हा प्रवास लोकवर्गणीच्या जोरावर झाला आहे. प्रबोधिनीच्या स्वतंत्र वास्तूत कार्यालय, सुसज्ज सभागृह, वाचनालय आणि एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी समृद्ध अभ्यासिका आहे. आजच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात इचलकरंजी व परिसरातील तब्बल दीडशे होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्याचा मनोदय प्रबोधिनीने बाळगला असून दालनाचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरीही विद्यार्थ्यांना आवश्यक इतर पूरक सोयी-सुविधा उभारण्यासाठी भरीव निधीची नितांत आवश्यकता आहे. सभागृहाला नव्या खुर्च्यांची, आधुनिक ध्वनी व्यवस्थेची गरज आहे. वाचनालयात वाढत्या ग्रंथसंपदेच्या सुरक्षेसाठी आणि सुयोग्य व्यवस्थापनासाठी वाढीव बांधकाम करणे, कमी जागेत हजारो पुस्तके सुरक्षितपणे सामावून घेता यावीत यासाठी आधुनिक कॉम्पॅक्टर बसवणे अपरिहार्य आहे.

इमारतीची किरकोळ दुरुस्ती आणि आकर्षक रंगरंगोटी करून तिला नवे रूप देणेही गरजेचे आहे. महागाईच्या या काळात संस्थेच्या नित्य व नैमित्तिक दैनंदिन खर्चांत सातत्याने मोठी वाढ होत असून, त्या खर्चाची यशस्वी तोंडमिळवणी करणे आता संस्थेसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. अडचणींवर मात करण्यासाठी विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रबोधिनीने एक कोटी रुपयांचा ‘स्थायी निधी’ उभारण्याचा संकल्प सोडला आहे. विचारांची ही मशाल अशीच तेवत ठेवण्यासाठी राज्यभरातील हितचिंतकांनी आणि वाचकांनी या सुवर्णमहोत्सवी पर्वात सढळहस्ते भरीव आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिक्षण-प्रशिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे…

प्रबोधिनीने समाजातील विविध घटकांना त्यांच्या पायांवर उभे राहण्यासाठीही सहाय्य केले आहे. विविध भाषांचे व्यवहारोपयोगी शिक्षण, बांधकाम सुपरवायझर प्रशिक्षणवर्ग, बांधकाम कामगार प्रशिक्षणवर्ग, सुतारकाम प्रशिक्षण, कामगार प्रशिक्षण, स्त्री आरोग्य शिक्षण, ग्रंथालय व्यवस्थापन, ग्रामीण पत्रकार कार्यशाळा इत्यादी अनेक उपक्रम राबविले जातात. श्रमिकांना स्वावलंबी करणारे हे कृतिशील प्रयोग अनेक संस्थांसाठी अनुकरणीय ठरले. महाराष्ट्र शासनाच्या ‘सामाजिक राष्ट्रीय एकात्मता समिती’ने १९९३-९४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील या कार्यासाठी ‘समाजवादी प्रबोधिनी’ची निवड केती होती. प्रबोधिनीच्या सर्व शाखांवरून १९९४ पासूनच्या बहुतेक निवडणुकांमध्ये ‘मतदार जागृती मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रबोधिनीने समविचारी संघटनांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

समाजवादी प्रबोधिनीत जाण्यासाठी कोल्हापूरपासून २८ किलोमीटर अंतरावर हातकणंगले तालुक्यातील इंड्ट्रिरयल इस्टेटमध्ये (५३६/१८) जावे.

समाजवादी प्रबोधिनी SAMAJWADI PRABODHINI – या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे. ऑनलाइन देणगीसाठी तपशील बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा- इचलकरंजी; चालू खाते क्रमांक : ११४१००१०६२९३; आयएफएससी : सीओएसबी००००११४

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००