आजारी असतानाही अजयकाकांनी काही जुनी कागदं  मला दिली. त्यावर आधारित लेख लिही व माझा उल्लेख त्यात कर असे त्याचे म्हणणे होते. आता विचार केला की वाटतं, मी थांबायला नको होतं..

१ डिसेंबर २०१४ला दुपारी एक वाजायच्या सुमारास माझ्या फेसबुक अकाउंटवर त्याचा मेसेज आला, ’तुला काही कागद द्यायचेत’, असा.
मी थोडा चक्रावलो. कसले कागद? मला कशाला द्यायचेत? पण मी त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्याची आणि माझी फार जुनी ओळख होती. अगदी माझ्या जन्मापासूनची.
‘ठीकय’, मी रिप्लाय केला. ‘तू घरी आलास का?’
मध्यंतरी तो हॉस्पिटलमध्ये होता, हे मला माहीत होतं. त्याची ट्रीटमेन्ट चालू होती. कॅन्सरची.
तो म्हणाला, ‘हो, पण सेवन हिल्सला काही ट्रीटमेन्टसाठी जावं लागतं. उद्या जाणार आहे. तू येशील का?’
मी लगेच मान्य केलं. सेवन हिल्स हॉस्पिटल माझ्या घराहून फार लांब नाही. ट्रॅफिक नसेल तर रिक्षाने दहा मिनिटं, पण त्याने काही फार फरक पडत नव्हता. त्याने कुठेही बोलावलं असतं तरी मी काही नाही म्हणालो नसतो.
तो काही माझ्या नेहमीच्या संपर्कात होता असं नाही. मधली बरीच र्वष मी त्याला भेटलोही नव्हतो. पण काही नाती असतात. ती टिकण्यासाठी काही प्रयत्न वगरे करावे लागत नाहीत.
अजयकाका मला आठवतो तो आमच्या बालनाटय़ आणि सूत्रधार या नाटय़संस्था जोरात होत्या त्या काळातला. माझ्या मानाने तो बराच मोठा होता, पण दिसण्यात अन् वागण्यातही काही तरी लहान मुलांसारखं असल्याने त्याचं मुलांबरोबर छान जमायचं आणि पुढे नेहमीच ते जमत राहिलं असेल याविषयी मला शंका नाही. दिलीप (प्रभावळकर) काका, रवीकाका (पटवर्धन) अशा बालनाटय़च्या अनेक सीनिअर काकांसारखंच आम्ही त्यालाही काका म्हणायचो, पण प्रत्यक्षात हा आपल्यातलाच आहे असं वाटायचं. टिंगल करणं, जोक्स सांगणं (रिकामटेकडय़ा सुताराने ‘काम आहे पण करवत नाही’ म्हटल्याचा पीजे मी त्याच्याकडून शिवाजी मंदिरच्या मेकअप रूमला लागून असलेल्या गच्चीत ऐकल्याचं स्पष्ट आठवतं), नाटकातलं काम थोडय़ा टिवल्याबावल्या करत पण गंमत वाटून करणं ही त्याची वैशिष्टय़ं. बालनाटय़बरोबर तो अनेक र्वष होता आणि पुढे, अगदी ‘नुक्कड’मधल्या गणपत हवालदाराच्या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळाल्यावरही बालनाटय़चं, त्यात गुंतलेल्या लोकांचं काही काम असलं, की तो हक्काने हजेरी लावायचा. पंचवीसेक वर्षांपूर्वी आम्ही बालनाटय़ची २५ र्वष साजरी करायला नाटक खजिना म्हणून आमच्या महत्त्वाच्या नाटकातल्या भागांचा एक कार्यक्रम सादर केला होता. त्यात आमच्या मित्रमंडळातल्या सर्व लहानथोरांचा सहभाग होता. त्यातही अजयने एन्ट्रीला कडाडून टाळी घेतलेली आठवते.vv08मला वाटतं ‘नुक्कड’ने त्याचा फायदा निश्चितच करून दिला, अजय वढावकर या नावाला घराघरात ओळख मिळवून दिली. पण त्याचं काही प्रमाणात नुकसानही केलं. त्याच्यात अनेक प्रकारच्या भूमिका करण्याची क्षमता होती, पण तो बराच काळ केवळ त्या एका गमतीदार भूमिकेच्या प्रतिमेत अडकून राहिला. टीव्हीचा परिणाम किती खोल जाणारा आणि डेडली असू शकतो हे नुक्कडच्या अनेक जणांना दिसलं. मला वाटतं, त्यात हरीची भूमिका करणारा पवन मल्होत्रा सोडला तर नुक्कडमधून कोणीच सुटलं नाही.
काही महिन्यांपूर्वी अजयकाकाची फेसबुक रिक्वेस्ट आली आणि पुन्हा एकदा आमच्यात काहीसा नियमित संवाद सुरू झाला. मला त्याच्या आजाराबद्दल माहिती होतीच आणि तो स्वत:ही त्याबद्दल मोकळेपणाने बोलायचा हे त्याने फेसबुकवर जोडलेल्या असंख्य मित्रांपकी कोणीही सांगेल. पण तो कधी त्या एकाच विषयात अडकल्याचं दिसलं नाही. त्याचे हास्यविनोद चालू असायचे. इतरांच्या स्टेट्स/ कमेन्टांना दाद देणं, त्यावर बोलणं, गप्पा मारणं यावरून तो अनेकांना प्रिय झाला. पण आजाराचा विचार त्याच्या डोक्यात होताच, असणारच.
मी त्या दिवशी त्याला सेवन हिल्सला भेटलो तेव्हा रोज भेटत असल्यासारख्या आमच्या गप्पा सुरू झाल्या; आणि एका परीने आम्ही रोज भेटतही होतो, फेसबुकवर. त्याच्याबरोबर त्याची पत्नी, शिवानी होती जिला मी पहिल्यांदाच भेटत होतो. आम्हाला दोघांना बोलायला सोडून ती डॉक्टरांकडे फॉलोअप घेण्याच्या कामाला लागली आणि अजयकाका मुद्दय़ावर आला. पेपर्सच्या.
त्याने एका पाकिटात हे कागद नीट जपून ठेवले होते. अनेक र्वष. घडीवर फाटायला आले होते. त्याने ते हळुवारपणे उलगडले. ते एका लेजरचे कागद होते. पन्नासेक वर्षांपूर्वीचे. घाईघाईत फाडून घेतलेले. शूटिंगच्या दिवशी कलावंत आणि तंत्रज्ञांना उचलून दिलेल्या पशांचे अकाऊंट्स ठेवणारी ती पानं होती. त्यावर पहिलं नाव होतं कमाल अमरोही, तर दुसरं मीना कुमारी. पुढे इतर कॉलम होते आणि शेवटचा अर्थात सहीचा. मी पाहातच राहिलो. हा आपल्या चित्रपटीय इतिहासाचा एक तुकडाच. याच्याकडे हा कुठून आला?
‘मी मागे कमालिस्तानला एक शूटिंग करत होतो’, अजयकाका सांगायला लागला, ‘अशीच कुठली तरी फालतू फिल्म होती, माझा छोटासाच रोल होता. ऑफिस का कसला तरी सेट होता. खूप वेळ रटाळ काही तरी चालू होतं. मी कंटाळलो होतो. जरा ब्रेक झाला आणि मी सहजच प्रॉपर्टी म्हणून सेटवर भरलेलं एक लेजर उचललं. तर त्यात हे.’
त्याला ती नावं बघूनच भरून आलं होतं. हे काही तरी आपल्या पलीकडचं, मोठं, लार्जर दॅन लाइफ आहे आणि या कागदांमार्फत अनपेक्षितपणे आपल्याला या दिव्यत्वाचा क्षणमात्र साक्षीदार बनवलं गेलं अशी त्याची भावना झाली. प्रत्यक्षात स्टुडिओसाठी ती लेजर्स कामाची नव्हतीच. नेपथ्याचा तात्पुरता भाग म्हणून ती वापरली जात होती. त्यांच्याकडे अशी कितीक असतील. त्यांचं कोणाला काही महत्त्व असेलच, तर त्याची खूण अजयकाकाला कुठेही दिसली नव्हती. त्याला स्वत:ला मात्र ते महत्त्वाचं वाटलं होतं.
 मागचा पुढचा विचार न करता अजयकाकाने दिसली ती चार पानं फाडली आणि बरोबर घेऊन आला. त्याने ती नीट जपून ठेवली. अगदी आतापर्यंत. पण आता.. आता ती कोणाला तरी सोपवावी असं त्याला वाटलं होतं..
मला जरा अनकॅरेक्टरीस्टिकली इमोशनल व्हायला झालं. पुढे काय बोलावं सुचेना.
मी ती पानं तशीच जपून घरी आणली आणि ठेवून दिली. पुढले काही दिवस मी त्यांवर काही लिहावं का याचा विचार केला. पण एक अडचण होती. त्यावर महत्त्वाची तीन नावं होती. वर सांगितलेली दोन आणि जे. वìशग (‘महल’/ ‘दिल अपना और प्रीत पराई’/ ‘पाकीजा’), या जर्मन सिनेमॅटोग्राफरचं नाव. ही तीन नावं, कमालिस्तान स्टुडिओ आणि लेजरवरची तारीख पाहिली तर हे कागद ‘पाकीजा’ चित्रपटाच्या शूटिंगसंबंधातले असावेत असं मानायला जागा होती, जरी या पानांवर तसा उल्लेख नव्हता. तरीही एक अडचण होती, ती म्हणजे लेजरवरच्या सह्य़ा मी कन्फर्म करू शकत नव्हतो. कारण लेजर अकाऊंट्सची होती आणि अशा वेळी साहाय्यकांनी सह्य़ा केल्या असल्याची शक्यता होतीच. तशा अमरोही आणि वìशग यांच्या सह्य़ा वाचण्याजोग्या होत्या, पण उरलेल्या सहीचं काय करावं या विचारात मी राहिलो आणि काही लिहिलं नाही!
काही दिवसांनी मला अजयकाकाचा आणखी एक मेसेज आला. त्याने लिहिलं होतं, ‘गणेश, त्या कागदांचा अभ्यास करून त्यावर एखादा लेख लिहिशील.. त्यामध्ये माझा उल्लेख कर प्लीज.’
आता विचार केला की वाटतं, मी थांबायला नको होतं. लगेच काही तरी लिहायला हवं होतं. पण नावडती सत्य आपण जशी विसरायचा प्रयत्न करतो, तशी मी वेळाची मर्यादा नजरेआड करत गेलो. आज ती पानं काढून बसलो आणि लिहिणं आवश्यक वाटलं. त्या पानांची किंमत प्रत्यक्षात काही असो वा नसो, माझ्या लेखी आज त्यांची किंमत फारच मोठी झाली आहे. मूळ इतिहासाला तर किंमत नेहमीच होती. सही असली, नसली तरी एका मोठय़ा चित्रपटाशी संबंधित ते कागद होते यात वादच नाही. पण हा इतिहास तिथे संपला नाही. प्रॉपर्टी म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोणत्याशा बाडातून त्या कागदांची सुटका करणारा, त्या नावांच्या दर्शनाने भारावून गेलेला अजयकाका, आज या इतिहासाला जोडलेली एक संस्मरणीय तळटीप बनून गेला आहे, आणि आज माझ्या लेखी खरं महत्त्व आहे ते या तळटिपेलाच.