देशाच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहे. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. नौदलातले अधिकारी आणि जवान सतर्कपणे सीमांचे रक्षण करत आहेत. प्रसंगी जीव धोक्यात घालून सीमांचे रक्षण करणारे हे नौ-वीर देशाची शान आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. सागरी लाटांनाही परतावून लावण्याची क्षमता असलेले आपले जवान पाहिले की शत्रूलाही धडकी भरते. आपल्या हद्दीत प्रवेश करायचा विचारही ते करू शकत नाहीत. भारतीय नौसेनेचा दबदबा जगभर आहे. मग तो सोमालीयन सागरी चाच्यांना पळवून लावणे असो किंवा अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि इटली यांच्यासमवेतचा लष्करी सराव असो, प्रत्येक गोष्टीत भारतीय नौदलाने नवा अध्याय निर्माण केला आहे. त्यामुळे जगभरात भारतीय नौदलाची वेगळी ओळख आहे. नौदलाच्या या गौरवशाली परंपरेबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासली जात आहे. नौ-वीरांगना म्हणजेच नेव्हल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुरू आहेत. या संस्थेच्या माध्यमातून नौदलातील कुटुंबीयांच्या गतिमंद आणि अपंग मुलांच्या विकासासाठी कार्य केले जाते. वेल्फेअर असोसिएशनतर्फे नवी दिल्ली, मुंबई, विशाखापट्टणम आणि कोचीमध्ये ‘संकल्प’ शाळा सुरू आहेत.
गतिमंद मुले समाजाची घटक आहेत. त्यांना आपुलकी, जिव्हाळा या शाळांमधून मिळतो. या संकल्प शाळांचे संचालन असोसिएशनच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या नौ-वीरांगना करतात. याशिवाय नौदलातले अधिकारी त्यांच्या पत्नी स्वयंसेवकाचे काम किंवा विशेष शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतात. मुंबईत कुलाब्यात नेव्ही नगरमध्ये सुरूअसलेल्या संकल्प शाळेत सध्या ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे शिक्षण या शाळांमधून दिले जाते. येथील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश मिळून रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात असे प्रयत्न केले जातात. येथे शिकणारी मुले नेहमी आनंदी राहावीत आणि आपण समाजावर भार नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण केली जाते. दुसऱ्याच्या जीवनात ते प्रकाश आणतात, त्यांचे जीवनही आपोआप उजळते. संकल्प शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्याला शिक्षण दिल्याने त्याचा विकास होतो. काळानुसार सुसंगत बदलही यामध्ये केले जातात. असा हा अभ्यासक्रम बनवण्याचे श्रेय संकल्पच्या प्रतिभाशाली चमूला जाते. या कार्यक्रमात समन्वयक, प्राचार्य, विशेष शिक्षक, साहाय्यक शिक्षक,स्पीच थेरपिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. संकल्पच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास तर येतोच, पण त्यांच्या पालकांनाही परिस्थितीचा सामना करण्याचे बळ येते. या मुलांना वेगळे वाटू नये यासाठी नौदल शाळेच्या मुलांचा आणि संकल्पचा गणवेश एकच आहे. केवळ खिशावर वेगळा लोगो आहे.मुले कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असली की आनंदी राहतात, असे संकल्पच्या सदस्यांचे मत आहे. त्यामुळेच अनेक उपक्रम येथे राबवले जातात.
(अ)शारीरिक आणि मानसिक आकलन-संकल्पमध्ये विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्यावर संस्थेकडून नियुक्त केलेल्या मानसोपचारतज्ज्ञांच्या माध्यमातून मुलाचा अभ्यास करून त्याची माहिती ठेवली जाते. त्या आधारे त्याची प्रगती आणि आकलन क्षमता याचा अंदाज बांधता येतो.
(ब) घरीच कसे व्यवस्थापन करावे- यामध्ये अशी मुले शोधली जातात की,
जी वयाने खूप कमी किंवा जादा असल्याने ती शाळेत जाऊ शकत नाहीत. अशा
वेळी त्यांच्या पालकांना या मुलांच्या गरजा आणि त्यांच्याशी कसे वागावे हे सांगितले
जाते. त्यामुळे घरी या मुलांची देखभाल करणे शक्य होते.
(क) चिकित्सा-संकल्पमध्ये मुलांना शारीरिक व्यवस्थापन, मौखिक चिकित्सा (स्पीच थेरपी) अशा बाबी शिकवल्या जातात, ज्याचा वापर नृत्य, संगीत, योग खेळ यामध्ये केला जातो.
(ड) औषधोपचार- शाळेत मुलांना मानसोपचारतज्ज्ञांबरोबरच बालरोगतज्ज्ञ मेंदूविकास तज्ज्ञ उपलब्ध असतात.
(इ) शाळेची बस- या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन रचना करण्यात आलेली विशेष स्कूल बस घरापर्यंत ने-आण करते.
(फ) पालकांना मार्गदर्शन- पालकांना आधार मिळावा म्हणून तज्ज्ञांचा सल्ला दिला जातो.
 (ग) प्रशिक्षण- संकल्पमध्ये दोन प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. विशेष शिक्षणाच्या माध्यमातून पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण मिळते. त्यातून स्वावलंबी होण्याची प्रेरणा त्यांना मिळते. देशाच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी नौदल समर्थपणे सांभाळत आहे. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्य करत आहे. एका सशक्त देशाची ओळख जागरूक लष्करामुळे असते. ही ओळख कायम ठेवण्याची ताकद स्वावलंबी सामाजिक रचनेवर आहे. नेव्हल वाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेले हे सामाजिक कार्य सक्षम नौदलाचा आधारस्तंभ आहे.
नौदलातील जवानांना देशासाठी अधिकाधिक योगदान देता यावे यासाठी त्यांचे कौटुंबिक प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. सुखी-समाधानी समाज देशासाठी गरजेचा आहे. असाच समृद्ध देश आपले संरक्षण करण्यात समर्थ असतो.
संकल्पच्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना अचूक मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मागणी आहे. शुभेच्छापत्र, उदबत्ती, मेणबत्ती, दिवा, राखी, भेट देण्याची बॅग, ग्लास कव्हर, चित्रे अशा कलाकृती या विद्यार्थ्यांनी साकारल्यात. वेळोवेळी होणारे दिवाळी आणि नौदल मेळ्यांमध्ये या वस्तूंना खूप मागणी आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणही या वस्तू खरेदी करू शकता. या विशेष गुणवंतांच्या आयुष्यात आनंद यावा म्हणून तुम्ही त्यांना मदत करू शकता. त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करा, त्यांना तुम्हाला येणारी एखादी कला शिकवा, त्यांना काम द्या, आपल्या मित्रांना या कार्याची माहिती द्या आणि उपक्रमाला आर्थिक मदत करा.
संकल्पच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कलागुण दडलेले आहेत. समाजाकडून त्यांना प्रेम, जिव्हाळा मिळायला हवा. तेव्हा आपण सारे कटिबद्ध होऊया आणि नौदलाच्या या सामाजिक कार्यात योगदान देऊया.
(लेखिका संकल्पमध्ये शिक्षिका असून
कमांडर योगेश कुमार यांच्या पत्नी आहेत.)