‘शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय’.. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार काही धडपडणाऱ्या तरुणांना लागू होतात़  अशाच प्रेरणादायी, ध्येयवेडय़ा तरुणांचा अल्पपरिचय..

आदर्श क्रीडापटू :
मानसी जोशीपॅरा बॅडिमटनपटू

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

मानसी जोशी ही पॅरा बॅडिमटन क्षेत्रातील जागतिक चॅम्पियन आहे. स्वित्र्झलडमध्ये २०१९ मध्ये झालेल्या ‘बीडब्ल्यूएफ पॅरा बॅडिमटन जागतिक चॅम्पियनशिप’ स्पर्धेत तिने महिलांच्या एकेरी एसएल ३ प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. एसएल ३ प्रकारात त्या जागतिक

स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर, मिश्र द्वयी (मिक्स डबल्स) प्रकारात १३व्या क्रमांकावर आणि महिला द्वयी (वुमेन डबल्स) प्रकारात १८व्या क्रमांकावर आहेत.

२०१५ सालापासून मानसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये इंडोनेशिया येथे झालेली ‘आशियाई पॅरागेम्स स्पर्धा’ असो नाहीतर, ‘पॅरा बॅडिमटन जागितक चॅम्पियनशिप’ किंवा ‘आशियाई चॅम्पियनशिप’; प्रत्येक स्पर्धेत तिने देशाला पदक मिळवून दिले आहे.

खेळाडू बनण्याआधी मानसी अभियंता आहे. २०११मध्ये एका रस्ते अपघातामुळे तिला अपंगत्व आले. त्यावेळी ती ४५दिवस रुग्णालयात होती. तिच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या धक्कय़ातून सावरण्यासाठी तिने बॅडमिंटनचा आधार घेतला. बॅडमिंटन खेळायला सुरुवात केल्याने तिचा  आत्मविश्वास वाढला.

आजपर्यंत मानसीने देशासाठी ३० पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत. यात २०१९ मध्ये झालेल्या महिला एकेरी एसएल ३ प्रकारातील सुवर्णपदक, २०१७ मध्ये झालेल्या महिला एकेरी एसएल ३ प्रकारांतील कांस्यपदक, २०१५ मध्ये झालेल्या मिश्र द्वयी स्पर्धेतील रौप्यपदक यांचा समावेश आहे. आपल्या कौतुकास्पद कामगिरीच्या माध्यमातून मानसीने समाजाचा अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतातील अपंगांच्या हक्कांची समर्थक म्हणून ‘टाइम’ या नियतकालिकानेही तिची दखल घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘बार्बी’ या खेळण्यांच्या अमेरिकी कंपनीने मानसीसारखी दिसणारी एक बार्बी बाहुली तयार केली आहे. २०२० मध्ये सर्वात प्रभावी आणि प्रेरणादायी अशा १०० महिलांमध्ये बीबीसीने तिची दखल घेतली होती. त्याच वर्षी ‘फोब्र्ज’ नियतकालिकानेही तिची दखल घेतली होती.

प्रेरणादायी खेळाडू

अल्फिया खान पठाण (मुष्टीयोद्धा)

बॉक्सिंगच्या क्षेत्रात मुलींची संख्या कमी असताना नागपूरच्या मानकापूर भागात राहणारी अल्फिया खान पठाण ही तरुणी बॅडिमटन सोडून मोठय़ा भावापासून प्रेरणा घेत बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराकडे वळली. या क्षेत्रात तिने मेहनत करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपले स्थान निर्माण केले. तिचा मोठा भाऊ साकिब पठाण राज्यस्तरीय बॉक्सर प्रशिक्षक गणेश पुरोहित यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता. दोघेही क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत असताना तिने पोलीस विभागात असलेल्या वडिलांकडे बॉक्सिंगची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी अल्फियाला प्रोत्साहन दिले. पोलंड येथे झालेल्या २०२१ एआयबीए युथ वल्र्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने महिला बॉक्सिंगमध्ये मोठे यश मिळवले. ८१ किलो वजनीगटात तिने विजेतेपद जिंकले. त्यापूर्वी २०१७ मध्ये गुवाहाटी येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली, तेव्हा तिला सात सुवर्णपदके मिळाली होती. कोविडचा धोका असूनही पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्या ठिकाणी ५२ देशांतील ४१४ मुष्ठीयोद्धे सहभागी झाले होते.

बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्तरावर अल्फियाचा प्रवेश खेलो इंडिया गेम्समध्ये झाला, जिथे तिने ८० किलो गटात सुवर्ण जिंकले. पोलंडमधील २०२१ एआयबीए युवा जागतिक बॉक्सिंग स्पध्रेत तिला सुवर्ण पदक मिळाले. आल्फिया आगामी ऑलम्पिक स्पध्रेची तयार करणार असून या स्पध्रेत पदक मिळवण्याची तिची इच्छा आहेत.

सर्विया येथे २०१८ मध्ये झालेल्या नेशन चषक या आंतरराष्ट्रीय मुष्ठियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक, खेलो इंडिया खेलो स्पर्धेसह विविध राष्ट्रीय मुष्ठियुद्ध स्पर्धेत सहा सुवर्णपदकास एकूण नऊ पदकांची कमाई करणाऱ्या  अल्फिया पठाणला विविध क्रीडा संस्थांकडून सन्मानित करण्यात आले. आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, राज्यस्तरीय विविध स्पर्धामध्ये तिला पदके मिळाली आहेत.

अल्फिया पठानचे वडील अक्रम खान पोलीस उपनिरीक्षक आहेत. तिला दोन भाऊ असून दोन्ही क्रीडापटू आहेत. मोठा भाऊ थ्रो बॉल तर मधला भाऊ सादिक बॉक्सर असून त्याने राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवले आहे.

प्रयोगशील चित्रकार

शिशिर शिंदे(चित्रकार)

प्रवास तर भरपूर जण करतात. परंतु, प्रवासाचा उपयोग चित्रकलेसाठी वेगवेगळे विषय शोधण्यात करणारे फारच कमी. नाशिकचा शिशिर िशदे हा युवा चित्रकार त्यापैकीच एक. चित्रकला क्षेत्रातही अनेक वाटा आहेत. त्यापैकी पारंपरिक शैली आणि मापदंड यांना दूर सारत स्वत:ची अशी शैली शिशिरने निर्माण केली आहे. समकालीन कलेतील त्याचा हाच मुक्तपणा त्याच्या चित्रांना थेट युनेस्को, इस्रो तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनापर्यंत घेऊन गेला आहे.

शिशिरला लहानपणापासूनच चित्रकलेची विशेष आवड निर्माण झाली. त्यात तो कौशल्यही दाखवू लागला. किशोरवयीन वयात पुण्यामध्ये काही वर्षे काढल्यावर तेथेच समकालीन कलेत स्वत:ची अशी वेगळी शैली त्याने निर्माण केली. यादरम्यानच त्याची आंतरराष्ट्रीय चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्याशी ओळख झाली. काही भेटींमधून त्यांचे अनुभव आणि आधुनिक कलेचे विविध पैलू शिशिरच्या लक्षात आले. याच काळात पाश्चिमात्य जगातील कलाक्षेत्राशी परिचय झाला. जे. डी. आर्ट पूर्ण केल्यानंतर व्यवसाय म्हणून कला क्षेत्रच निवडण्याचा निर्णय घेतला. आर्थिक शाश्वती नसलेले क्षेत्र म्हणून मनाची थोडी चलबिचल झाली. अशा वेळी आईने दिलेला भक्कम आधार कामी आला, असे शिशिर सांगतो.  

आईने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, पाठबळ आणि केलेले मार्गदर्शन यांमुळे कलेकडे केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून न पाहता स्वच्छंदी कलानिर्मितीचा आनंद घेता आला. कोणत्याही प्रकारचे कलेचे शिक्षण न घेतलेली आपली आई हीच खरी मार्गदर्शक आहे, असे शिशिर अभिमानाने सांगतो.

शिशिरच्या चित्रांचा मूळ गाभा रेषा आहे. रेषा जर सशक्त असतील तर ते चित्र कौतुकास पात्र ठरते, असा त्याचा अनुभव आहे. चित्रकलेसाठी भरपूर प्रवास, निरीक्षण आणि अभ्यास यास तो महत्त्व देतो. त्यामुळेच लंडनमध्ये चित्र प्रदर्शनावेळी त्याच्या चित्रांमधील भारतीयत्व तेथील चित्रप्रेमींना भावले. त्याने युनेस्कोसाठी प्रकाश या विषयावर चित्र काढले आहे. त्यासाठी सापुताऱ्याजवळील आदिवासी पाडय़ांवरही तो फिरला आहे. या भागातील लोकांशी संवाद साधण्यासाठी त्याला चित्रांचा उपयोग झाला आहे.

अष्टपैलू कलावंत

सारंग साठय़े संस्थापक, ‘भाडिपा

डिजिटल युगात जेव्हा राष्ट्रीय पातळीवर मनोरंजनाचा विस्तार होत होता, तेव्हा २०१६ मध्ये सारंग साठय़े या तरुणाने ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजेच भाडिपा हे यूटय़ूब चॅनेल सुरू केले. अनेक नाटय़स्पर्धा, एकांकिका, नाटक आणि चित्रपटांमधून काम केल्यानंतर आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी इंटरनेट हे आपल्या कलानुरूप शैलीला अधिक समृद्ध करण्यासाठी नवमाध्यमांच्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर करत सारंगने अनेक विषयांवर मनोरंजक शैलीत भाष्य केले आहे.

१६ कॉमिक्स आणि आठ लेखक हाताळणारा टॅलेंट मॅनेजमेंट ब्रँड आणि ओटीटी बाजारपेठेतील मानाचे स्थान सारंग्च्या भाडिपाने निर्माण केले आहे. स्टॅण्ड-अप कॉमेडीचा बाज भाडिपाने खऱ्या अर्थाने रुजवला आणि लाखो प्रेक्षकांसाठी या स्टॅण्ड-अप कॉमेडीचे दौरे आणि कार्यक्रमही केले.

मराठी ही एकमेव भाषा होती, ज्यासाठी कोणतीही कंपनी, निर्मिती संस्था किंवा अगदी मोठय़ा नामांकित वाहिन्यांनीही डिजिटल माध्यमावर या भाषेतील आशयनिर्मितीसाठी लक्षपूर्वक प्रयत्न केले नाहीत, हे लक्षात आल्यानंतर सारंगने त्याच्या सह-संस्थापकांसह हक्काचा मराठी डिजिटल मनोरंजन ब्रँड विकसित करण्यासाठी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. डिजिटल माध्यमावर मराठी आशयनिर्मिती करत प्रेक्षकांना खेचून आणण्याचा सारंगचा प्रयत्न सफल झाला. आज ‘भाडिपा’ मराठीतील सर्वात यशस्वी डिजिटल ब्रँड आहे. केवळ सहा वर्षांच्या छोटय़ा कालावधीत सारंगने डिजिटल मनोरंजनला एक वेगळी ओळख आणि एक अग्रगण्य स्थान मिळवून दिले आहे. यूटय़ूबवर १ दशलक्षाहून अधिक सदस्यांसह, ‘भाटूपा’ आणि ‘विषय खोल’ या आणखी दोन डिजिटल मनोरंजन वाहिन्या त्याने विकसित केल्या. सामाजिक, राजकीय, विनोदी, शैक्षणिक- सामाजिक मुद्दय़ांवर खुमासदार शैलीत भाष्य करणारा आशय या वाहिन्यांवरही सारंगने दिला. डिजिटल वाहिन्यांवरून तरुण लेखक, कलाकारांना संधी देत रोजगारनिर्मिती करणे हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़. तरुण पदवीधरांना आपल्या चमूत सामाविष्ट करून घेत त्यांच्याही कौशल्यविकासाला तो चालना देतोय.

मनोरंजनातून प्रबोधन

मनवा नाईक (अभिनेत्री, दिग्दर्शिका)

अभिनय क्षेत्रातील अनुभव गाठीशी घेऊन एक पाऊल पुढे जात दिग्दर्शन आणि निर्मितीची सूत्रे यशस्वीपणे हाताळणारी तरुण अभिनेत्री म्हणून मनवा नाईककडे पाहिले जाते. मनोरंजन माध्यमाचा आजघडीचा विस्तार पाहता जगभरातील प्रेक्षक टीव्ही मालिका चित्रपटांशी जोडला जातो. मनोरंजन माध्यमाची पकड लक्षात घेत लोकांना करमणुकीच्या मात्रेतून प्रबोधनाची गोळी देण्याचे काम मनवाने निर्माती दिग्दर्शिका म्हणून सातत्याने केले आहे.

१९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आभाळमाया’ मालिकेपासून झालेली मनवाची घोडदौड पुढे हिंदी मालिका, मराठी चित्रपट ते ‘जोधा अकबर’सारख्या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केल्यानंतर दिग्दर्शनाकडे तिने मोर्चा वळवला. २०१४ मध्ये मनवाने ‘पोर बाजार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. पहिल्याच चित्रपटात तिने चाईल्ड ट्रॅफिकिंगचा विषय हाताळला होता. या चित्रपटाचा उपयोग अनेक सामाजिक संस्था प्रबोधनासाठी करतात. ‘एक सवेरा’ आणि ‘दोपेहरी’ या तिच्या लघुपट – चित्रपटातूनही तिने बालशिक्षण हक्क आणि तृतीयपंथीयांच्या अडचणींवर भाष्य केले होते. ‘दोपेहरी’साठी तिला दिग्दर्शक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

मालिका निर्मितीच्या क्षेत्रात करोना काळातील सगळी आव्हाने सांभाळून यशस्वी मालिका देणे हे आव्हान मनवाने पेलले आहे. तिची निर्मिती असलेल्या सुंदरा मनामध्ये भरलीया मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कारही मिळाला आहे. मनवाने केलेली  प्रबोधनात्मक आशयनिर्मिती इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

मालिका निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकतानाही तिने आपले ध्येय कायम ठेवले, त्यामुळे ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या पहिल्याच मालिकेत तिने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या हलक्याफुलक्या पद्धतीने मांडल्या. करोना काळात खऱ्या अर्थाने मनवाने मालिका निर्मितीत वेगाने विस्तार केला. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘तू सौभाग्यवती हो’,  ‘तुमची मुलगी काय करते?’ ‘बॉस माझी लाडाची’ या मनवाच्या स्ट्रॉबेरी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या प्रत्येक मालिकेतून वेगवेगळे सामाजिक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पथदर्शी दिग्दर्शक

चैतन्य ताम्हाणे चित्रपट दिग्दर्शक

अगदी कमी वयात जगभरात उत्तम दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवणारा तरुण म्हणजे चैतन्य ताम्हाणे. अत्यंत अभ्यासू पद्धतीने कथा पडद्यावर रंगवणाऱ्या चैतन्यचा ‘सिक्स स्ट्राण्ड्स’ हा पहिलाच लघुपट रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, एडिनबर्ग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अशा नानाविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.

चैतन्य ताम्हाणेने दिग्दर्शित केलेला ‘कोर्ट’ हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा सन्मानही प्राप्त झाला. २०१६च्या ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत चित्रपट म्हणून ‘कोर्ट’ची निवड करण्यात आली होती. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून या चित्रपटाने तीसहून अधिक पुरस्कार मिळवले आहेत.

सिनेमाची वैश्विक भाषा समजून घेऊन आपला आशय जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सहज आणि प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या चैतन्यचे नाव फोर्ब्सच्या ‘थर्टी अंडर थर्टी एशिया’ यादीतही समाविष्ट करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चेतन्यचे नाव कानोकानी झाले. तरुण वयात व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचा परीक्षक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधीही त्याला मिळाली.

वास्तवदर्शी विषय, मांडणी यावर भर देणारा हा दिग्दर्शक चित्रपटाच्या पटकथा लेखनावरही मेहनत घेतो. मी पटकथा दोन महिन्यांत लिहू शकतो, मात्र त्यासाठीची तयारी करायला दीड- दोन वर्षे लागतात, असे सांगणाऱ्या चैतन्य ताम्हाणेने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘कोर्ट’नंतर चैतन्य काय करणार? या उत्सूकतेलाही त्याने ‘द डिसायपल’सारखे दमदार उत्तर दिले.  गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला ७७व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ आणि ‘बेस्ट स्क्रीनप्ले’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तब्बल २० वर्षांनी मराठी चित्रपटाला हा बहुमान प्राप्त झाला.

प्रशासनातील धडाडी

अभिजीत बांगर (आयुक्त, नवी मुंबई महापालिका)

सध्या नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेल्या अभिजीत बांगरने  सप्टेंबर २००८ मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, सातारा याबरोबरच पालघर या नव्या जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी, तसेच नागपूर महापालिकेचे आयुक्त तसेच अतिरिक्त विभागीय आयुक्त आणि करोनाकाळात नवी मुंबईमध्ये आपल्या धडाडीच्या व नियोजनबद्ध कार्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार १४ जुलै २०२० रोजी स्वीकारला तेव्हा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला जलद प्रतिबंध आणि मृत्युदर कमी करणे ही सर्वात मोठी आव्हाने होती. सलग तीन महिने शासकीय निवासस्थानाची सुविधा नसताना मुंबईत नातेवाईकाकडे राहून एकही दिवस सुट्टी न घेता कार्यालयात मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत काम करण्याच्या झपाटय़ाने संपूर्ण प्रशासनही कामाला लागले होते.

दुसऱ्या लाटेतील आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटरची जाणवलेली आत्यंतिक गरज लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेपूर्वी वेगळी व्यवस्था न करता पालिकेच्याच नेरुळ व ऐरोली रुग्णालयात प्रत्येकी २०० आयसीयू खाटांची सुविधा निर्माण करून महानगरपालिकेची रुग्णालये कायमस्वरूपी स्वयंपूर्ण करण्यात आली.

करोना रुग्णवाढ रोखण्यासाठी बांगर यांनी जलद रुग्णशोधावर विशेष भर देत ट्रेस, टेस्ट, ट्रीट ही त्रिसूत्री अंगीकारत मिशन ब्रेक द चेनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष दिले. याकरिता दोनच दिवसांत प्रतिजन चाचणी केंद्र सुरू करून केंद्रांच्या संख्यावाढीवर भर दिला. गृहसंस्थांमध्ये जाऊन चाचण्यांसाठी ३४ मोबाइल वाहने कार्यान्वित केली. करोनाचे नवी मुंबईतील प्रसाराचे सर्वात जोखमीचे क्षेत्र असणाऱ्या पाचही एपीएमसी बाजारपेठांमध्ये चाचणी केंद्रे सुरू केली. यासोबतच एमआयडीसी क्षेत्र, रेल्वे स्थानके या ठिकाणीही चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. करोनाकाळातील कामगिरीबरोबरच शहर स्वच्छतेवरही बांगरने भर दिला. नवी मुंबई महापालिकेचे धडाडीचे आयुक्त म्हणून त्याचे कार्य उल्लेखनीय आहे.

लोकसेवेचा वसा

निधी चौधरी (जिल्हाधिकारी, रायगड)

नैसर्गिक आपत्तींना रोखणे मानवाच्या हातात नाही, मात्र अशा आपत्तीमुळे होणारी जीवितहानी नक्कीच रोखता येऊ शकते. हे रायगडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरीने दाखवून दिले. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ, महाड, इमारत दुर्घटना, महाड महापूर आणि तळीये दरड दुर्घटना आणि करोना परिस्थिती अशा आपत्तीच्या काळात निधी चौधरीने रायगडची जबाबदारी समर्थपणे पेलली.

करोनाकाळात रायगड जिल्ह्याला प्राणवायू पुरवठा निरंतर आणि सुरळीत सुरू राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनआभावी एकही मृत्यू होणार नाही यासाठी यशस्वी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांत सर्वात प्रभावीपणे काम करणाऱ्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

संकटे चहूबाजूने येतात मात्र अशा परिस्थितीत डगमगून न जाता परिस्थितीला धैर्याने सामोरे जायचे असते. निधी चौधरीने आपल्या कृतीतून हे सिद्ध करून दाखवले. पावणे दोन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. निसर्ग वादळ, तारीक गार्डन इमारत दुर्घटना आणि तौक्ते वादळ यासारख्या आपत्ती काळात त्यांनी प्रशासनाचे नेतृत्व केले. महाड महापूर आणि दरड दुर्घटनेनंतर मदत व बचाव कार्याचे अवघड शिवधनुष्यही पेलले. शासनाच्या मदतीचे वाटप जलदगतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले.करोनामुळे निराधार झालेल्या मुलांना आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला विविध योजनांची सांगड घालून या मुलांचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. तळीये आणि साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प राबविला, कार्यालयाची  वीजदेयके कमी केली. महाड येथे एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ व्हावा यासाठी प्रयत्न केले.

वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्र, तालुका क्रीडा संकुले यांच्यासाठी शासकीय जागा त्यांच्याच कार्यकाळात मोठय़ा प्रमाणात हस्तांतरित करण्यात आल्या.