चंद्रशेखर कमळाकर दाभोळकर
नुकताच १६ एप्रिल रोजी ‘रेल्वे दिन’ साजरा झाला. १८४५ मध्ये ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ स्थापन करून ब्रिटिश सरकारकडे रेल्वेसाठी यशस्वी पाठपुरावा करत १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिल्या धावलेल्या रेल्वेचे प्रमुख शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट होते. या पहिल्या ऐतिहासिक प्रवासात सहभाग असलेल्या नानांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ संबोधिले जाते. त्यांच्या या रेल्वे क्षेत्रातील योगदानामुळेच मुंबईचा सर्वांगीण विकास झाला हे विसरून चालणार नाही!
नाना शंकरशेट आणि जमशेटजी जिजीभोय हे रेल्वेच्या भारतीय संचालकांपैकी होते. त्यांनी भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. रेल्वेमुळे मुंबईचे औद्योगिकीकरण होईल, हे ओळखून नानांनी या प्रकल्पासाठी जमीन आणि सहकार्य दिले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे भारतात रेल्वे सुरू झाली म्हणून १६ एप्रिल रेल्वेदिन म्हणून साजरा केला जातो. परंतु रेल्वेदिन साजरा केला जात असताना सर्वत्र अगदी रेल्वे प्रशासनाकडून देखील नामदार नाना शंकरशेट यांच्या भारतात रेल्वे सुरू करण्याचे अनमोल, महत्त्वपूर्ण कार्य दुर्लक्षित केले जाते असे इतिहास सांगतो!
नाना शंकरशेट हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी इतर क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी मुंबईतील पहिली मराठी शाळा, ‘’नेटिव्ह स्कूल’ स्थापन केली , ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन दान केली, अगदी रेल्वेचे पहिले कार्यालय वाड्यातच स्थापले होते. तसेच स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्याच्या उद्देशाने मुलींच्या शाळेसाठीदेखील स्वतःच्या वाड्यातच जागा दिली होती जी आजही टिकून आहे!मुंबई महापालिकेच्या स्थापनेतही त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट टर्मिनस मुंबई टर्मिनस अशा नामकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून केंद्र सरकारला पाठविलेल्या सहा वर्षे पूर्ण होत आली तरी दरवर्षी रेल्वे दिनी ग्रँट रोडजवळ त्यांचा पुतळा असलेल्या ‘नाना चौक’ या ठिकाणी मूक, बॅनर्स दाखवून शांततेत आंदोलने करावी लागतात हे दुर्दैव आहे !
बरं, मागणी करायची ती कुठे याची उमज न आलेल्या नानाप्रेमी कार्यकर्त्यांचा संभ्रम दरवर्षी कायम आहे! रेल्वे प्रशासन,राज्य प्रशासन, केंद्र प्रशासन हे सगळे नानांचे योगदान नाकारत नसले तरी ही मागणी पूर्णत्वास का जात नाही याचे कारण कोण सांगू शकेल? काहीही कारण नसताना इतकी वर्षे भिजत घोंगडे उगाचच घातल्यामुळे राजकीय श्रेयवादात ही नामकरण प्रक्रिया गुरफटून बसली आहे की काय असा दाट संशय आहे !
राजकारण हा आकड्यांचा खेळ आहे, असे म्हटले जाते! लोकशाहीत सत्तेसाठी एखाद्या समाजाच्या किंवा समूहाच्या गणसंख्येवरून ताकद ठरविणे आणि मताधिक्यासाठी किती ती उपयुक्त आहे ,यावर राष्ट्रपुरुषांच्या गौरवतेचे निर्णयदेखील अवलंबून असणे हे विदारक चित्र आहे! मुंबईच्या जडणघडणीत , मुंबईच्या विकासात नानांचे इतके योगदान आहे की, त्यांच्या शिवाय मुंबईचा इतिहास पूर्णच होणार नाही. आधुनिक मुंबईचे शिल्पकार असलेल्या नाना शंकरशेट यांच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील योगदानामुळे मुंबई शहराला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त झाला असावा!
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ असे नामकरण करण्यातील मुख्य अडचण म्हणजे तांत्रिक प्रक्रिया आणि केंद्रीय मंत्रालयांची अंतिम मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याने हे काम रखडल्याचे सांगण्यात येते! हे नाव देण्याबाबत कोणतीही मोठी राजकीय किंवा स्थानिक अडचण नसल्याचेही बोलले जाते!
प्रक्रियेतील लालफितीचा कारभार आणि तांत्रिक पडताळणी यामुळे विलंब होत असेल तर आधुनिक मुंबईच्या उभारणीत आणि भारतीय रेल्वेच्या स्थापनेत असलेल्या नाना शंकरशेट यांच्या योगदानाचा आदर करून त्यांच्या सन्मानार्थ जोर धरत असलेल्या या मागणीची तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून केंद्र सरकारने अधिकृत आदेश लवकरात लवकर काढावा. एक महान दूरदर्शी व्यक्तिमत्व आणि शिक्षणतज्ञ, समाजसुधारक म्हणून आजही ज्यांचे सर्वजण स्मरण करतात अशा देशाला पहिली रेल्वे, मुंबई महापालिका, शाळा, महाविद्यालये विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीत भारतीयांना आदर प्राप्त करून देण्यात तन, मन, धन अर्पून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या सरकारदरबारी राष्ट्रपुरुषाचा दर्जा प्राप्त न झालेल्या द्रष्ट्या समाजसुधारकाला ब्रिटिशांनी जिवंतपणी पुतळा तयार करून सन्मान दिला परंतु आताचे शासनकर्ते आजही त्यांच्या पाऊलखुणा शिल्लक असताना, त्याचा उपभोग घेऊनसुद्धा कृतघ्नपणे वागत आहेत हे चुकीचे आहे! नाना शंकरशेट यांच्या अलौकिक, सर्वसमावेशक आणि भारतीय रेल्वेच्या योगदानाचा यथोचित गौरव म्हणून ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ या नामकरणाला केंद्र सरकारने त्वरित हिरवा कंदील दाखवावा!
कोषाध्यक्ष, ना.जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठान
ckdabholkar@gmail.com
