कोल्हापूर : साखर उद्योगाचे भवितव्य हे उसाच्या उत्पादनावर अवलंबून असते. राज्यभरात उसाचे उत्पादन एकरी उसाचे उत्पादन घटत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. उसाचे एकरी सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख असली तरी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यंदाच्या वार्षिक सभेत कोल्हापूर जिल्ह्याचे एकरी उसाचे उत्पादन सरासरी २४ टन असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर याच कोल्हापूर जिल्ह्यातील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी हिताचे उपक्रम हाती घेतले आहेत. गेली ३५ वर्ष याकडे तंत्रशुद्ध पद्धतीने लक्ष देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य कारखाना व्यवस्थापनाने हाती घेतले आहे.
यासाठी अनेक पातळ्यांवर व्यापक पद्धतीने काम केले जात आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परिणामी इतक्या वर्षानंतर जवाहर कारखान्याची ऊस उत्पादकता वाढली आहे. परिणामी यातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासही मदत झाली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा हा ऊस उत्पादनाचा पॅटर्न शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरला आहे.
देशात साखर उद्योग हा एक महत्त्वाचा उद्योग बनला आहे. या उद्योगाचा मुख्य कच्चामाल ऊस आहे. उसाच्या उत्पादनावरच या उद्योगाची भिस्त मुख्यत्वेकरून अवलंबून असते. ऊस हे जास्त पाणी लागणारे पीक आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी एकरी उत्पादकता वाढवणे आवश्यक ठरत आहे.
मधल्या काही काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादनाच्या हव्यासातून अधिक पाणी, अधिक रासायनिक खतांचा वापर झाल्याने एकूणच जमिनीचा पोत बिघडत गेला. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत गेले. अशा अडचणींवर मात करीत जवाहर कारखान्याने उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले; ते अगदी कारखाना सुरू होण्याच्या आधीपासूनच, हे विशेष. हुपरी ( ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना जानेवारी १९९० मध्ये नोंदणीकृत झाला. कारखान्याचा पहिला गाळप हंगाम १९९३ आली सुरू झाला. पण त्याच्या आधीपासूनच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे यावे यासाठी नियोजनाला हात घातला होता. त्यासाठी व्हरायटी उसावर ( उसाची विशिष्ट जात किंवा वाण) भर दिला होता.
वेगवेगळ्या संशोधन केंद्रांनी उसाचे जास्तीत जास्त उत्पादन, साखरेचे प्रमाण, रोगप्रतिकारशक्ती आणि कमी-जास्त पाणी किंवा हवामानानुसार उसाच्या नव्या जाती तयार केल्या आहेत. या वाणांना शेतकऱ्यांनी स्वीकारावे यासाठी कारखाना व्यवस्थापन आग्रही राहिले. त्यासाठी ७५२७,७२१९,७१२५,८०८४ अशा एकरी अधिक उत्पादन देणाऱ्या उसाच्या वाणांना प्राधान्य दिले. त्यातून पायाभूत ( फाउंडेशन), प्रमाणित आणि जनरल फाउंडेशन अशी क्रमाक्रमाने ऊस वाणांची वाढ करण्यात आली. त्याचा पुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत राहिला.
त्या काळामध्ये ऊसाला बेसल डोस याची फारशी कोणाला कल्पना नव्हती. पण जवाहर कारखान्याने याबाबत जाणीवपूर्वक काम केले. ३०,६०,९०,१२० दिवसाच्या कालबद्ध अंतराने खतांचा पुरवठा करण्यावर भर दिला. सुपर फास्फेट, युरिया आणि पोटॅश हे अनुक्रमे चार पोती, एक पोती – एक पोती या प्रमाणात ऊस पिकांना देण्यास सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये १६:२६:२६ याप्रमाणे खताचा पुरवठा केला. उसाचे एकरी भरघोस उत्पादन वाढावे यासाठी योग्य प्रमाणामध्ये खते देण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचा कारखान्याने एक आराखडा तयार केला.
जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारावा याकडेही कारखान्याने विशेष पातळीवर काम सुरू केले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ताग, धैंचा (धाईंच्या) यांसारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड करण्यासाठी त्याचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा सुरू केला. खतांच्या जोडीलाच आवश्यक त्या प्रमाणात तणनाशक आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला. लावण, खोडवा यासाठी किती खत वापरावे याचे एक कोष्टक शेतकऱ्यांना तयार करून दिले गेले. त्यानुसार त्याचा नित्यनेमाने पुरवठा करण्यात आला. सन २०१० पासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. जवाहर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या भागात क्षारपड जमिनीची समस्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी गेल्या दहा वर्षा बारा वर्षापासून विशेष करून लक्ष पुरवलेले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र उमगले पाहिजे यासाठी जवाहर कारखाना जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या वतीने दरवर्षी दरवर्षी शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने ‘ऊस-शेती ज्ञानयाग’ (पुरुषांसाठी) आणि ऊस-शेती ज्ञानलक्ष्मी’ (महिला शेतकऱ्यांसाठी) हे अत्यंत लोकप्रिय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाते. यामध्ये पाच दिवस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते सुलभ भाषेतील या माहितीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे यामुळे या उपक्रमात दरवर्षी जवाहर कारखान्याकडून लक्षणीय प्रमाणात शेतकरी सहभागी होत असतात. किंबहुना या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणाऱ्या साखर कारखान्यांच्या एकूण शेतकऱ्यांमध्ये जवाहर कारखान्याचे शेतकरी संख्येने अधिकतर असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर चांगल्या पद्धतीचे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर इतर शेतकऱ्यांना नेऊन संवाद घडवण्याचे काम केले जाते. यातून प्रत्यक्ष कृतिशील आदान प्रदान घडून येते. याचा परिणाम जवाहर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची ऊस उत्पादकता वाढण्यामध्ये झाली आहे.
दरवर्षी ऊस विकास योजना उपक्रम कारखान्याकडून राबवला जातो. या उपक्रमावर दरवर्षी सुमारे २५ ते ३ कोटी रुपये खर्च केले जातात. आतापर्यंत त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. परिसरातील काही कारखाने अशा प्रकारचा उपक्रम राबवतात. परंतु तेथे दिलेल्या खत वगैरे साहित्यांना व्याज आकारणी केली जाते. परंतु जवाहर कारखाना वर्षानुवर्षे विनाव्याज हे साहित्य पुरवत आला आहे. कारखान्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुमारे १० हजार ऊस उत्पादक शेतकरी होते आता ही संख्या २५ हजाराहून अधिक झाली आहे. तरीही जे शेतकरी ऊस उत्पादक विकास योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असतात, त्या सर्वांना वरील सर्व प्रकारचे साहित्य, पुरवतानाच शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जाते. यासाठी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विशेष लक्ष पुरवलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक, प्रगत ज्ञान मिळावे यासाठी त्यांची विशेष तळमळ दिसून येते. त्यासाठी कारखान्याच्यावतीने सातत्याने शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन व्हावे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. अलीकडच्या काळात जवाहर कारखान्याच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे (एआय प्रणाली) आणि स्वयंचलित ठिबक पाण्याचा वापर करणाऱ्या सिंचन योजना या माध्यमातून ऊस उत्पादन वाढावे याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष पुरवलेले आहे. त्याचा ऊस उत्पादन शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे दिसून आले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी किरण कांबळे आणि त्यांचे पथक ऊस उत्पादकता वाढावी यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करीत असतात. या सामूहिक प्रयत्नाचे गोड फळ जवाहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिवारात फुलल्याचे पाहायला मिळते. या कामाचा गौरव म्हणून की काय… संस्थेच्यावतीने या कारखान्यांना ऊस विकास कार्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.
असा आहे उपक्रम
शेतकऱ्यांना कमीत कमी लागवड खर्चात उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता मोफत शास्त्रीय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येते. ताग आणि धैंचा बियाणे व तणनाशकांचा पुरवठा ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करण्यात येते. ऊस उत्पादक सदस्यांना पायाभूत आणि तीन-स्तरीय उसाच्या बियाण्यांचा अनुदानित दरात पुरवठा. साडेचार फूट रुंदीच्या सऱ्यांपेक्षा जास्त उंचीच्या सऱ्यांखालील लागवडीसाठी स्वयंचलित ठिबक सिंचनाकरिता प्रति एकर १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. पायाभूत मात्रा, दुसरी मात्रा, द्रव फवारणी खते, टॉनिक आणि गांडूळ खत निर्मितीच्या जागा यांची उपलब्धता करण्यात येते. बहु-खोड प्रोत्साहनार्थ कचरा खत बनवण्यासाठी अनुदान दिले जाते. फॉस्फो-कंपोस्ट तसेच संवर्धित कंपोस्ट प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात येत आहे
