गेल्या काही वर्षांत देशात रस्ते अपघातांची संख्या कमालीची वाढली आहे. साहजिकच त्यात हकनाक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. सरकार वाहतुकीचे नियम बनवते, पण ते मोडण्याकडेच  वाहन चालकांचा कल असतो.. जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाने या बद्दल आगळ्या  वेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेली ही सल..

यम आणि त्याचा रेडा हवा खात बसले होते. अलीकडे असे ‘मोकळे’ क्षण कमीवेळा येऊ लागले होते. रेडय़ाने विचारले, ‘महाराज! मला एक प्रश्न पडलाय. विचारू?’

‘अवश्य! पण मी काही सर्वज्ञ कृष्ण नाही. मला उत्तर माहीत नसले तर स्पष्टपणे तशी कबुली देऊन मोकळा होईन.’ यम उत्तरला. रेडा घसा खाकरून म्हणाला, ‘माझा प्रश्न असा. काही वर्षांपूर्वी आपण नोंदीप्रमाणे पाहिले होते की भारतात मृतांची संख्या कमी होत चालली आहे. ती आता वाढतेय, कशामुळे? आणि यंदा ती जास्त वाढताना का दिसते?’ यम हसला आणि म्हणाला, ‘याची कारणमीमांसा करायचा मी प्रयत्न करतो. जसजशी एका समाजाची वैद्यकक्षेत्रात प्रगती होत जाते तसे मृत्यूचे प्रमाण कमी होत जाते. मला वाटते हे कारण असावे मृतांची संख्या कमी होण्यामागचे.’

‘मग अलीकडे परत वाढ कशामुळे चालली आहे?’ रेडय़ाला केवळ निम्मे उत्तर समाधानकारक वाटले नाही.

‘मलाही या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही! पाहूया नारद मुनींना सापडते का?’ यम म्हणाला. कारण दुरून ‘नारायण-नारायण’ची ललकारी ऐकू येऊ लागली होती. नारद मुनी त्यांच्या झपझप गतीने चालत जवळ आले.

‘अहो यमराज! तुमचे ऑफिस बंद का? काम नाही म्हणून?..’ नारदांनी विचारले.

‘नाही नारदा! पूर्वी असे म्हणता येई की वैद्यकीय प्रगतीचा हा परिणाम असावा. पण अगदी अलीकडे मृत्यूचे प्रमाण परत वाढायला लागलेय. माझ्या रेडय़ाच्या देखील हे लक्षात आले..’ ‘देखील? म्हणजे मी काय कोणी बुद्धू प्राणी आहे का?’ रेडय़ाने विचारले. समतेच्या काळात पण काळजीपूर्वक विधाने करायला हवीत याचे यमाला भान राहिले नाही याचा हा परिणाम!

‘सॉरी, रेडय़ा! वास्तविक माझ्या आधी तूच ही गोष्ट पाहिलीस!’ -यम म्हणाला. रेडा शांत झाल्यावर नारदांनी यावर भाष्य केले. ‘रेडेश्वर आणि यमराज, तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे, ‘अलीकडे वाहतुकीच्या साधनात झपाटय़ाने प्रगती होते. वेगाने जाणाऱ्या गाडय़ा, त्यासाठी आवश्यक रस्ते आणि महामार्गात वाढ.. हे सर्व आपण पाहतो आणि त्यासाठी नियंत्रणादाखल कडक नियम करावे लागतात. पण भारत हा असा देश आहे जेथील निवासी लोकांचे अलिखित ब्रीद आहे- नियम हे मोडण्याकरिता असतात. मृत्यूचे प्रमाण वाढू लागले यामागे हे ब्रीद आहे. उदाहरणार्थ, हे नियम इतरांनी  पाळावेत, मी नाही अशा भावनेने सतत मोडले जातात आणि त्याची किंमत प्राणदानाने वसूल होते.

’एक्स्प्रेस-वेची वेगमर्यादा सर्वाना लागू होते (मला नाही)

’मोठय़ा आणि हळू चालणाऱ्या वाहनांनी फास्ट लेन वापरायची नाही (माझ्या ट्रकचा अपवाद)

’दुचाकी मोटरवाहने वापरताना डोक्याला योग्य शिरस्त्राण पाहिजे (माझ्या डोक्यावर माझा हक्क आहे नियमाचा नाही)

’दुचाकी मोटरचालकाने पाळण्यासाठी आवश्यक नियमावली आहे (ती इतरांनी पाळावी, मी मला हवे तसे जाणार)

’दारू पिऊन कुठलेही वाहन चालवू नये (हा नियम मला लागू नाही, कारण दारूचा माझ्यावर काही परिणाम होत नाही)

’पुढील ५-१० वर्षांत द्रुतगती मार्गाची संख्या वाढेल तशी या नियमांची वाढती गरज भासेल. एखादा वाहतुकीचा नियम मोडून आणि पोलिसाची नजर डावलून आपण फार चातुर्य दाखवले ही फुशारकी मारू नका (पोलीस मठ्ठ असतात, त्यांना फसविणे सोपे आहे.)

समारोप करत नारद म्हणाले, ‘पाहिलंत? आपल्या हिताकरिता केलेले नियम आपण न पाळण्यात मोठेपणा आहे हे अनेक भारतीय मानतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी नवेनवे शोध मानवाला अर्पण केले आहेत, पण ते वापरायला लागणारी मानसिक परिपक्वता त्याच्याकडे अद्याप नाही. म्हणून या अपरिपक्वतेचे परिणाम प्राणदानाच्या रूपाने त्याला भोगावे लागतात.’ ‘थोडक्यात, एखाद्या दुर्घटनेचे वर्णन ऐकून, वाचून, पाहून माणसाने शहाणे व्हावे!’ -रेडा उद्गारला.

‘पाहा आमचा रेडा माणसापेक्षा हुशार आहे’, यम म्हणाला आणि रेडय़ावर स्वार होऊन एका दुचाकी दुर्घटनेकडे रवाना झाला.

 

जयंत नारळीकर