लडाखच्या सीमेवर तेरखेडा गावातील अक्षय उकरंडे अग्निवीर म्हणून काम करतो. तो जेव्हा एकटा असतो आणि त्याला त्याच्या आयुष्यातील काही आठवते तेव्हा कसबे तडवळा येथील बालकाश्रम त्याच्या डोळ्यासमोर येतो. वडील वारले तेव्हा तो सहा वर्षांचा होता. त्याच वर्षी तो जीवन विकास बालगृहात आला. पुढे नोकरीत रुजू होईपर्यंत हेच त्याचे घर. तो सांगत होता, ‘माझं आयुष्यच संस्थेशी जोडलेलं आहे.’ त्याच्यासारखी ५३३ मुले जीवन विकास बालगृहात राहून शिकली. पुढे बाहेर पडली. त्यांचे आयुष्य पुढे जात आहे आणि हे बालगृह चालविणार्‍या आत्माराम पवार यांचे कुटुंब दरवर्षी नवीन मुलांनी वाढत आहे.

यातील बहुतांश मुलांचे वडील वारले आहेत. ग्रामीण भागात घरात कर्ता पुरुष नसेल, तर मुलांच्या शिक्षणाची आबाळ ठरलेली असते. काही मुलांना आई- वडील दोघेही नाहीत. आत्माराम पवार तसे निरक्षर. म्हणजे आता त्यांना जुजबी लिहिता वाचता येते, पण तसा गडी रांगडा. अगदी बोलणेही त्याच वळणाचे. आजही ‘आम्हाला- तुम्हाला’ अशा शुद्ध शब्दांच्या भानगडीत न पडणार्‍या, ‘आमाली- तुमाली’, ‘या सालाला’ अशा खास ग्रामीण ढंगात बोलणार्‍या या माणसाच्या मनात अपार करुणा आहे. सामाजिक काम करणार्‍यांमध्ये एक चटपटीतपणा असतो. काम दाखवण्याची धडपड असते, पण यातील काहीच आत्माराम पवार यांच्यात दिसत नाहीत. आपले काम प्रामाणिकपणे करत राहण्याची प्रवृत्ती.

पवार यांचे आई-वडील शेतमजूर. पुढे जगायचे कसे या प्रश्नाचे उत्तर शोधत ते लातूर शहरात पोहोचले. तिथे एक चहा- नाश्त्याचं दुकान टाकलं. शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय यांसारख्या नामांकित महाविद्यालयांबरोबरच त्याकाळी बसवेश्वर महाविद्यालयातही अनेक विद्यार्थी प्रवेश घेत. त्यांची जेवणाची सोय व्हावी म्हणून सुरू केलेल्या व्यवसायातून पवार यांनी पैसे मिळवले. शहरात आठ भूखंड विकत घेतले. हे सारे घडले २००३ पूर्वी.

निरक्षर असल्याची आणि शिक्षण घेता न आल्याची खंत त्यांच्या मनात सतत असे. त्या काळात अभियांत्रिकी शिकणार्‍या मुलांची शिक्षणाची ओढ ते पाहत होते. अनेक गरीब आणि होतकरू मुलांना त्यांनी मदत केली. पण अशी अनेक मुले असल्याचे लक्षात आले. या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावे, ही भावना वाढत गेली आणि गावाकडे म्हणजे कसबे तडवळा येथे त्यांनी बालकाश्रम सुरू केला. खरे तर मुलांना सांभाळणे हे सामाजिक काम वगैरे असते हेही पवार यांना खूप नंतर कळले. आधी अशा मुलांना राहण्यासाठी घर पाहिजे आणि अडचणीत सापडलेली मुले आपल्याबरोबर राहतील असे ठरवून त्यांनी लातूरमधला गाशा गुंडाळला. आपल्या गावीच मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचा उपक्रम सुरू केला. घरची शेती होतीच. त्यामुळे शेतीमध्ये पिकवायचे आणि अडलेल्यांना मदत करायची. पैशांची अडचण वाटली की, लातूरमधील एक प्लॉट विकायचा असे साधे गणित त्यांनी मांडले. असे करता करता तब्बल सात भूखंड त्यांनी विकले, पण मुलांना शिकवण्याची जिद्द काही सोडली नाही.

सर्वकार्येषु सर्वदा: शिक्षणातून ‘जीवन विकास’… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुलांना सांभाळण्यासाठी अनुदान मिळते हे त्यांना त्यांचे मित्र शहाजी चव्हाण यांनी सांगितले. शहाजी शिक्षक. ते धाराशिवमध्ये गतिमंद मुलींसाठी काम करतात. या दोघांच्या मैत्रीतून बालकगृह सुरू झाले. शासकीय सोपस्कारही पूर्ण झाले. मुले वाढत गेली तशी इमारतही विस्तारत गेली. लातूरमधील भूखंड विकावे लागले, ते त्यामुळेच.

हळूहळू आर्थिक समस्या वाढत गेल्या. २०१७ नंतर किराणा दुकानाची उधारी वाढू लागली होती. कोविडकाळानंतर तर या समस्यांनी अधिकच गंभीर रूप धारण केले. शासकीय मदतीची दारे उघडता उघडेनात. याच काळात आत्माराम पवार ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या संपर्कात आले. मदत मिळविण्यासाठी त्यांनी एकत्र प्रयत्नही केले. पण मुलांना सांभाळणे हे मोठे कष्टाचे काम. गणवेश, वार्षिक परीक्षा शुल्क यासाठी अधिक निधीची गरज भासू लागली आणि आत्माराम पवार यांनी एकेक करत आपली सारी संपत्ती या प्रकल्पात पणाला लावली. पत्नी अनिता यांची त्यांच्या या कामात मोठी साथ आहे. मुलांच्या जेवणाची जबाबदारी त्याच पार पाडतात.

जेवण हा झाला कामाचा फक्त एक भाग. इतरही अनेक गोष्टी होत्या. उदा. एवढ्या मुलांचे केस नियमित कोण कापणार? सुरुवातीला आत्माराम पवार यांना हा प्रश्न पडत असे, मग त्यांनी स्वत:च कंगवा आणि कात्री हाती घेऊन हे काम शिकून घेतले. आता त्यांनी बालकाश्रमातील काही मुलांनाही या कामाचे प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या, भाषा वेगळी. एक मूल अगदी लहान असताना बालगृहात आले. बाप व्यसनाधीन आणि आई रोजच्या भांडणाला कंटाळलेली. कोणी तरी या मुलाला जीवन शिक्षणच्या बालगृहात आणून सोडले. त्याला नीट बोलता येत नाही. त्याची भाषा समजते ती फक्त पवार दाम्पत्याला. त्यांनी या मुलाला इंग्रजी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शुल्क गोळा केले. अशीच स्थिती समाधान जमाले या मुलाची. त्याच्या आई वीज पडून गेली. नातेवाईकांनी पाठ फिरवली. आता मुलाला कोण सांभाळणार, असा प्रश्न. आता समाधान रेडिओलॉजीचे शिक्षण घेत आहे. ज्याची परिस्थिती अधिक कठीण त्याला अधिक प्राधान्य, असे संस्थेचे सूत्र आहे.

शाळेत जाण्याआधी आणि आल्यानंतर मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र वेळ असतो. मुलांचा कल पाहून त्यांनी कोणत्या क्षेत्रात जावे, याचे मार्गदर्शन केले जाते. संस्थात्मक पातळीवर आत्माराम पवार केंद्रस्थानी असले, तरी एकट्याच्या आधाराने संस्था उभ्या राहत नाहीत. लहान मुलांसाठी काम करणारे शहाजी चव्हाण, भटके विमुक्त प्रतिष्ठानचे डॉ. अभय शहापूरकर, पत्रकार रवींद्र केसकर, गुरुनाथ थोडसरे यांच्यासह अनेक मंडळी त्यांच्याबरोबर काम करत आहेत.

या वर्षी त्यांच्या बालगृहात तब्बल ३३ मुले आहेत. ‘श्री गुरुदत्त बहुद्देशीय संस्थे’अंतर्गत बालगृह चालवले जाते, मात्र पवार यांचे घर आणि संस्था यात काहीही अंतर राहिलेले नाही. संस्था हाच संसार आणि ती नीटपणे चालू ठेवणे हेच उद्दिष्ट. पवार यांचा मुलगा गणेश आणि सूनही या कामात त्यांना मदत करतात. सर्वांचे उद्दिष्ट एकच, कोणाच्या शिक्षणाचे गाडे अडू नये. निराधार, अनाथ, बालभिक्षेकरी यांच्याबरोबरच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची मुलेही इथे शिकतात. आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढू लागला आहे. पुढील काळात या मुलांना व्यवसाय शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकासाची केंद्रे चालवता यावीत, त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या ‘जीवन विकास बालगृहा’पर्यंत जाण्यासाठी धाराशिवपासून ३० किलोमीटर अंतरावर असणार्‍या कसबे तडवळे या गावी जावे. तेथील बार्शी- लातूर रोडवर, ‘एसपी शुगर’ या कारखान्याजवळ हा बालकाश्रम आहे.

श्री गुरुदत्त बहुद्देशीय संस्था Shri Gurudatta Bahuuddeshiya Sanstha या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.

सर्वकार्येषु सर्वदा: शिक्षणातून ‘जीवन विकास’… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा- लातूर

चालू खाते क्रमांक : १५७१००१०१४८९

आयएफएससी : सीओएसबी००००१५७

मुलांना मायेचा आधार…

आत्माराम पवार यांच्या पत्नी अनिता यांची या कामाला मोठी साथ आहे. मुलांसाठी रोज सकाळी नाश्ता आणि दोन वेळचे जेवण करण्याची जबाबदारी त्या गेल्या ३० वर्षांपासून पार पाडत आहेत. सकाळी भाज्या, वरणाला फोडणी देण्यापासून ते चपात्या लाटण्यापर्यंत अनेक कामे त्यांना करावी लागतात. आपण सामाजिक काम करत आहोत हे त्यांच्या गावीही नसते. कधी एखादे मूल रुसते, कधी भांडणे होतात. आई- वडील नसणार्‍या या मुलांना मायेचा आधार नाही. अशा वेळी अनिताच त्यांची समजूत काढतात. कोणी उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेतात. जीवन शिक्षण बालकाश्रमात येणार्‍या प्रत्येक मुलास व्यायामाची गोडी लागली पाहिजे, हा मात्र नियम. त्यामुळे मुलांचा व्यायाम आणि आहार या दोन्ही बाबतीत पवार कमालीचे काटेकोर असतात. संस्थेकडे मुलांच्या राहण्याची सोय तर आहेच, पण प्रांगणात व्यायामासाठी मोठी जागा आहे. तिथे मुले खेळतात. भाजीपाला लावतात. समोरच्या हिरवळीवर अभ्यास करतात.

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय: लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय: संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय: संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय: संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय: संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय: संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००