सध्या गाजत असलेल्या एपस्टीनकांडाच्या संदर्भात अमेरिकेच्या कुठल्याशा बेटाचे नाव वारंवार यावे, यात नवल काहीच नाही. आधुनिक काळातली आणखी अनेक दु:स्वप्ने बेटांवरच खरी ठरली आहेत. मुली वा तरुणींचा वस्तूसारखा वापर धनिक आणि राजकीय सत्ताधार्‍यांसाठी करू देणारा बडा अमेरिकी अर्थपुरवठादार जेफ्री एपस्टीन हाही एका बेटाचा मालक. त्याचा या प्रकारचा पाहुणचार ओरपणार्‍यांत अमेरिकेतील बहुतेक सारी लब्धप्रतिष्ठित मंडळी आहेत.

बेटांचा विषय निघालाच आहे तर, ‘द ब्ल्यू लगून’ सारखा चित्रपट किंवा ‘काळे बेट, लाल बत्ती’सारखे नाटक आठवून पाहा… आधुनिक काळातही बेट हे आधुनिकतेला गुंगारा देणार्‍या कल्पिताचे निधान मानले जाते की काय अशी शंका येईल. त्याआधीच्या प्रबोधन काळात तर बेटे म्हणजे सर्व नीतीनियम आणि लैंगिक प्रतिबंधही माफ असलेल्या जागा. त्या काळात बेटांनी मुख्य प्रवाहातील समाजाला धोक्यात आणता अमर्याद भोग घेऊ देण्याची भूमिका बजावली होती. आधुनिक काळात तरी निराळे काय सुरू आहे? करमुक्ती असलेले बेटवजा देश हेरून काळा पैसा पांढरा केला जातो. आर्थिक गुन्ह्यांमध्ये ‘ऑफशोअरिंग’चा मार्ग तर सर्रास वापरला जातो. पण ‘बेटावर केलेल्या गैरप्रकारांची झळ मुख्य भूभागाला बसत नाही’ हा भ्रम तुटून पडतो. आर्थिक गुन्हे कुठेही केले, तरी त्यांची झळ तिजोरीलाच बसणार.

हेच एपस्टीनच्या बेटावरील धनिकवणिक आणि सत्ताधारी यांच्या चाळ्यांनाही लागू पडते. कुठेतरी जाऊन आपण काहीतरी केले, कुणाला कळणार आहे, असा विचार त्या वेळी या बड्या लोकांनी केला असेल, पण तो उघडकीला आला तेव्हा अमेरिकी जनमानस तर हादरलेच पण ब्रिटनमध्ये, नेदरलॅण्ड्समध्ये वा अन्य देशांतही ‘एपस्टीन फाइल्स’ची चर्चा सुरू झाली. अवघड वयातली मुले जशी स्वातंत्र्याच्या स्वप्नाळू कल्पनांमागे धावायचे किंवा एकंदर प्रतिबंध /नियमांविरुद्ध बंड करायचे म्हणून नको त्या चुका करून बसतात, तसे या बड्या धेंडांबाबत नाही म्हणता येणार. ते जे करत होते तो खरे तर, आधुनिकता किती भयानक होऊ शकते याचे टोक गाठणारा पैलू ठरतो : कल्पनाशक्तीचे निरर्गल अश्लीलीकरण, शरीराचे वस्तूकरण, सत्तालोलुपांचा नीचपणा हे आधुनिकेतेने दडपून ठेवलेले सारे दुर्गुण एपस्टीनच्या बेटावर उफाळून आलेले दिसतात. सर्वांत भयावह बाब म्हणजे त्या बेटाची हवा लागलेला उच्चभ्रू वर्ग आपल्याला अभय मिळणारच, अशा थाटात भावनिक अपरिपक्वता साजरी करतो.

‘एपस्टीन फाइल्स’बद्दल बर्‍याच दृष्टिकोनांतून विचार करता येतो, तसा तो होतोही आहेच. फायलींमधली सारीच पाने जाहीर झाली आहेत का? कुणाविषयीची माहिती दडवली तर जात नाही ना? या वासनाकांडातल्या पीडितांचे हक्क संरक्षित केले जातील का? अमेरिकी राजकारणापुरतेच पाहायचे तर डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन दोघेही यात अडकले आहेत, त्यामुळे कोणाला फायदा होणार आहे? पण या तातडीच्या प्रश्नाच्या पलीकडे आणखीही काही प्रश्न आहेत. एपस्टीन फाइल्सच्या तपशिलांतून अमेरिकेतील काही उच्चभ्रूंना ‘मला कोणीही शिक्षा करू शकत नाही’ याचा माज कसा होता, ते किती अपरिपक्व, लैंगिकदृष्ट्या भ्रष्ट आणि नीच होते हेही उमगते. याच तपशिलांमधून, विशेषत: जेफ्री एपस्टीन याचे मित्रमंडळ किती विशाल होते यातून- जागतिक राजकारणाबद्दलचे एक गंभीर वास्तवदेखील उघड होते- इथे कुणापुढेच कोणतीही भव्य उद्दिष्टे नाहीत, अगदी राजकीय अर्थव्यवस्थेचीही फिकीर कुणाला नाही. त्याऐवजी इथे दिसतात काही दलाल, काही असुरक्षित व्यक्तिमत्त्वे, अनेकांचे अहंकार. ते हुशार असतील, नामानिराळे कसे राहायचे हे त्यांना माहीत असेल, पण नैतिक अधोगतीचे ते मूर्तरूप ठरतात.

मग रास्त ठरणारा प्रश्न असा की, हे असे इतके अपरिपक्व, इतके स्वकेंद्रित लोक कोणते निर्णय घेण्यास सक्षम असतात? याच प्रश्नाची दुसरी बाजू अशी की, एपस्टीन स्वत:ला भू-राजकारणाच्या केंद्रस्थानी कसे ठेवू शकला; की जागतिक शक्तींचे प्रतिनिधित्व करणार्‍यांनाही त्याच्या बेटावर जावे लागले?

या प्रश्नांची उत्तरे सहज मिळणारी नाहीत. एपस्टीन प्रकरणाचे कवित्वही बराच काळ चालत राहील. यातून कोणते आणि किती सांगाडे बाहेर पडतील कोण जाणे. पण सध्या जी काही प्राथमिक प्रतिक्रिया उमटलेली आहे तीदेखील सत्ताकारणाभोवती फिरणारी आहे. मुळात या एपस्टीन फायलींची अख्खी कथा अमेरिकेतल्या सत्तास्पर्धेमुळे दाबलीच गेली असती, खुद्द जेफ्री एपस्टीन याचे कैदेतच निधन झाले असल्याने ती गुलदस्त्यातच राहिली असती. सुरुवातीला तेथील दोन्ही राजकीय पक्षांमध्ये या प्रकरणाचा सामना करण्यास अनिच्छा होती. मात्र थॉमस मॅसी (रिपब्लिकन) व रो खन्ना (डेमोक्रॅटिक पक्ष) यांनी मांडलेल्या विधेयकामुळे ‘एपस्टीन फाइल्स’ उघड झाल्या आणि उच्चभ्रूंची लोलुपता चव्हाट्यावर आली. पण आमचे लोक यात आहेत की तुमचे लोक आहेत हा काही या प्रकरणाची चर्चा करण्याचा मार्ग नव्हे. उलट तो मध्यवर्ती प्रश्न टाळण्याचाच मार्ग आहे. असा मध्यवर्ती प्रश्न म्हणजे एखाद्या समाजात अशा प्रकारचे एकंदर अभिजन कसे काय निर्माण होतात? जर हेच वासनाकांड कोणत्याही आशियाई/ आफ्रिकी देशातील शासक वर्गाबाबत उघडकीस आले असते तर ‘तो समाजच तसा असतो..’ याच छुप्या सुरात चर्चा झाली असती की नाही?

तसे इथे होणार नाही. कारण हे सारे अमेरिकी धुरीणांबद्दलचे. त्याविषयीची चर्चा अमेरिकेत पक्षीय सत्तास्पर्धेतूनच होताना दिसली, पण त्यामागे राजकारणी लोक ‘असेच’ असतात- असू शकतात, त्यांना (विशेषत: ते जर आपल्या पसंतीच्या पक्षाचे असतील तर) एवढे क्षम्यच असायला हवे, अशी खूणगाठच लोकांनी बांधल्याचेही लपू शकले नाही. आधुनिकपूर्व काळात जसे बेटावर जा आणि वाट्टेल ते करा अशी मूक मुभाच होती, तसे जणू आतादेखील- उच्चभ्रू सत्ताधारी वर्गात जा आणि मग काहीही करा असे ‘अभयारण्य’ आपल्या नीतिकल्पनांनी वसवलेले आहे का? तसे असेल तर सभ्यतेच्याही अपेक्षांपासून आपण कुणालातरी अभय देतो आहोत, हे लक्षात येते का?

दुसरा मुद्दा असा की, आधुनिक जगातल्या राजकीय जीवनालाच लागलेल्या रोगाचे हे लक्षण आहे म्हणावे लागते. हा रोग विचित्रच- सत्तेसाठी ‘गुणवत्ता’ हा निकषच मानायचा नाही आणि ज्याचा प्रचार अधिक, ज्यांच्याबद्दल गूढतेचे वलय अधिक, ज्यांना छक्केपंजे माहीत आहेत व त्यातून सहीसलामत सुटण्यासाठीची भाषासुद्धा अवगत आहे तेच आता आपले नेते मानायचे- असा तो रोग असल्याचे यातून दिसते.

तिसराही मुद्दा एकंदर आधुनिकतेलाही अतिप्राचीन रोमन साम्राज्य- काळाचे सावट कसे ग्रासते आहे, याबद्दलचा आहे. त्या वेळचे महान इतिहासकार मानल्या जाणार्‍या टॅसिटस, सॅलस्ट आणि लिव्ही यांनी, लैंगिक दुराचार आणि हिंसा हे सत्तेच्या केंद्रस्थानी मानले- पण काही वेळा याचा अतिरेक झाल्याने सत्ताभ्रष्ट व्हावे लागते असेही निरीक्षण नोंदवले होते. आपण आधुनिक काळातले लोक- म्हणून तर आपण सार्वजनिक आणि खासगी असा भेद पाळतो. त्यामुळे भ्रष्टाचार हा आपल्यालेखी व्यक्तिगत अनीतीचा भाग मानला जाण्यापेक्षा, संस्थांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न मानला जातो. पण आधुनिक काळातही नीतीगुणांना केंद्रस्थानी मानून इतिहास अभ्यासणारे जे.जी.ए. पोलॉक (१९२४- २०२३) यांच्यासारखे इतिहासकार आपल्यात होते; त्यांनी ‘मॅकियाव्हिलियन क्षण’ म्हणजे काय, याची आधुनिक लोकशाहीच्या काळाला साजेशी चिकित्सा करताना, निव्वळ संस्थात्मकदृष्ट्या विचार करणे धार्जिणे नसून नागरी मानवतावादाची मूल्ये राजकीय जीवनालाही लागू व्हावीत, असा आग्रह मांडला होता, हे आज या संदर्भात आठवावे असे आहे.

अर्थात, एपस्टीन फाइल्समध्ये ज्यांची नावे आहेत ते सारे दुर्गुणांचे पुतळेच असेही मानण्याचे कारण नाही- ज्यांनी कायद्याच्या व्याख्येत बसणारे गुन्हे केेले असे काहीजण असतील, अनेकजण नैतिकदृष्ट्या भ्रष्टतेच्या निरनिराळ्या पायर्‍यांवर असतील. ते सारे दोषी ठरवले जाऊ शकत नसले तरी, सत्ता/ पैसा/ ज्ञान यांच्या उच्च पातळीवर गेलेली माणसे एकमेकांमध्ये कशीही वागू शकतात- निर्लज्जपणाही करू शकतात- हे वास्तव यात कुठे नाव नसणार्‍या इतरांनाही सतत छळत राहील असे आहे. कारण तो सत्तेचा कुरूप चेहरा आहे- सत्ता कोणत्या पक्षाची/ कोणत्या देशातली नव्हे, एकंदर आजच्या काळातले सत्तेचे रूप किती विचित्र, कुरूप आहे हे दाखवणारा हा चेहरा आहे. बड्यांच्या ‘संघटित सत्ते’चा चेहरा! या चेहर्‍याखालचा देह कसा? तो आर्थिक, कायदेशीर, राजकीय, लैंगिक किंवा बौद्धिकसुद्धा गैरव्यवहार करून मोकळा राहू शकतो- नामानिराळा राहू शकतो असा.

हा चेहरा आणि असा देह आपल्या आधुनिकतेला हवा आहे का, याचा विचार करताना पुन्हा रोमन काळातल्या इतिहासकारांची आठवण होते. शासकांनी अतिरेक केला तर सत्तेला धोका असू शकतो हे समजण्याइतपत शहाणपण त्यांच्याकडे होते. ते शहाणपण आपण आजच्या काळात गैरलागू समजू लागलो. पण त्याऐवजी कोणते शहाणपण आपल्याकडे आहे याचा तरी विचार आपण आज करायला हवा.