केबीसीच्या भूलथापांना बळी पडलेल्या गुंतवणूकदारांमध्ये शेतकरी, हातावर पोट भरणारे मजूर व महिला, कामगार जसे आहेत, तसेच शिक्षक, पदवीधर, शासकीय नोकरदारांचाही समावेश आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापायी अनेक जण रस्त्यावर आले,  काही वयोवृद्धांवर संपूर्ण पुंजी गमाविल्याने अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली  तर काहींच्या जिवावरही बेतले. यापुढे तरी खोटय़ा भूलथापांना बळी पडण्याच्या घटना थांबतील का?
एखाद्याला एकदा मूर्ख बनविता येते. परंतु, वारंवार मूर्ख बनविता येत नाही असे नेहमी म्हटले जाते. असे असले तरी झटपट श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांना हे लागू होत नाही. अलीकडेच उघडकीस आलेला ‘केबीसी’ घोटाळा हे त्याचे ठळक उदाहरण. अर्थात अशा प्रकारचा हा काही पहिलाच घोटाळा नाही. मागील काही वर्षांत असे अनेक घोटाळे झाले. तरीही झटपट श्रीमंतीच्या प्रलोभनांना बळी पडण्याची मालिका सुरूच आहे. नवी योजना आली की, कोणतीही शहानिशा न करता मूर्ख बनण्यासाठी असा घटक नव्या दमाने पुढे येत असल्याचे लक्षात येते. केबीसीच्या संचालकांनी नेमक्या याच मानसिकतेचा फायदा घेतला. अडीच वर्षांत, तिप्पट परतावा देण्याचे या कंपनीने असे गारूड केले की, या मोहजालात राज्यातील हजारो शिक्षित आणि निरक्षर गुंतवणूकदार पुन्हा एकदा फसले. केबीसीची कार्यपद्धती चक्रावून टाकणारी आहेच, पण त्याहून चक्रावणारी आहे ती गुंतवणूकदारांची मानसिकता.
दूरचित्रवाहिनीवरील गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाचा संदर्भ घेत पदवीधर असलेल्या भाऊसाहेब चव्हाणने चार वर्षांपूर्वी ‘केबीसी’ कंपनीची स्थापना केली. या घोटाळ्याचा तोच मुख्य सूत्रधार. पत्नी आरती, भाऊ बापूसाहेब, शालक संजय जगताप (निलंबित पोलीस कर्मचारी) अशा निकटच्या नातेवाइकांच्या मदतीने त्याने विविध भ्रामक साखळी योजनांद्वारे गुंतवणूकदारांना करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखविले. मूळचा चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भाऊसाहेबने सर्वसामान्यांवर भुरळ पाडण्यासाठी प्रथम परभणी जिल्ह्य़ातील सेलूची जागा निवडली. वर्षभरात मराठवाडय़ात बस्तान बसविल्यानंतर तो नाशिकला आला. आडगाव पोलीस ठाण्यापासून जवळच केबीसीचे भव्य कार्यालय थाटले. गरिबापासून श्रीमंत वर्गाला आकर्षित करू शकतील, अशा अनेक योजना कंपनीने बाजारात आणल्या. त्यांचा सूत्रबद्ध पद्धतीने प्रचार केला. वक्तृत्व कौशल्याच्या बळावर भाऊसाहेबने सर्वाना स्वप्न दाखविण्यास सुरुवात केली. एका मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम गुंतविल्यास कंपनीमार्फत तुमच्या दोन्ही मुलींचे लग्न लावून देण्यात येईल. सदनिकेसाठी पैसे गुंतविल्यास अडीच वर्षांत दोन सदनिका दिल्या जातील असे कधी वास्तवात येऊ न शकणारे स्वप्न त्याने दाखविले. त्यात पत्नी व इतर नातेवाइकांचे त्याला सक्रिय पाठबळ मिळाले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडनेर भैरव शाखेत रोखपाल म्हणून काम करणारा त्याचा भाऊ बापूसाहेबने स्थानिकांना विश्वासात घेऊन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले. शालक जगताप तर केबीसी कार्यालयातील सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असे. पोलिसी गणवेशात तो कामकाज करत असल्याने योजनेची माहिती व पैसे भरण्यासाठी येणाऱ्यांना कंपनीविषयी चिंता करण्याचे कारण राहिले नाही.
ठिकठिकाणी दलाल नेमून आणि भव्यदिव्य मेळाव्यांचे आयोजन करत केबीसीने आपल्या योजनांच्या जाळ्यात सर्वसामान्यांना ओढण्याचे काम सुरू केले. दलालांना आकर्षक टक्केवारी, लॅपटॉप, एक लाखाचे दागिने, परदेश प्रवास, ७५६ ग्राहक मिळविल्यास ५० हजार रुपये महिना वेतन, अडीच हजार ग्राहक केल्यास आलिशान मोटार आदी आमिषे दाखविण्यात आली. सुरुवातीला काहींना तसे परतावे मिळाल्याने दलाल वर्ग श्रीमंत बनण्याच्या लाटेवर स्वार झाला. यामुळे कंपनीचे काम अधिक सोपे झाले. केबीसी कंपनी परकीय चलनात गुंतवणूक करते. त्यातून होणाऱ्या व्यवहारातून छोटय़ा-मोठय़ा चढ-उतारात नफा कमावला जातो. त्यामुळे अडीच ते तीन वर्षांत कंपनी गुंतवणुकीवर तिप्पट रक्कम देऊ शकते, असा प्रचार सर्वत्र सुरू झाला. परदेशवारी केलेले आणि किमती भेटवस्तू पदरात पडलेले दलाल तर केबीसीचे ‘स्टार प्रचारक’ बनले. इतरांचे ते लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न होता. स्थानिक पातळीवर नित्य संपर्कातील दलाल आणि कंपनीचा बडेजाव पाहून सर्वाचे भान हरपले आणि गुंतवणुकीची आकडेवारी दिवसागणिक वाढत गेली.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केबीसीचे दुसरे आयुध होते, ते म्हणजे झगमगीत मेळावे. मराठवाडा व नाशिक जिल्ह्य़ाात असे काही मेळावे पार पडले. त्यात हजारोंच्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घेतले गेले. राज्यभरातील दलाल आपापल्या भागातून नागरिकांना स्व खर्चाने वाहनांद्वारे मेळाव्यास आणत. गतवर्षी तसाच एक मेळावा नाशिकच्या चांदवड तालुक्यात झाला. एखाद्या राजकीय पक्षाच्या सभा वा मेळाव्यांना लाजवेल, असे त्याचे स्वरूप होते. भारनियमन असणाऱ्या परिसरात जनरेटरद्वारे भव्य शामियान्यात लखलखाट करण्यात आला. नाच-गाण्यांसोबत भोजनाची खास व्यवस्था होती.
केबीसीच्या योजनांमधून अल्पावधीत श्रीमंत कसे होता येईल, याची महती दलाल सांगायचे. भाऊसाहेबचे आलिशान मोटारीतून मेळावास्थळी आगमन व्हायचे. प्रखर प्रकाशझोत त्याच्यावर टाकला जायचा. कंपनीच्या बडेजावाची उपस्थितांवर भुरळ पाडण्यात कंपनीने कोणतीही कसर सोडली नाही. चांदवडच्या मेळाव्यात वाहनांची संख्या इतकी प्रचंड होती की, पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होता. ठिकठिकाणी होणाऱ्या मेळाव्यांनी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढण्यास हातभार लावला. या गुंतवणूकदारांनी पुढे आपले मित्र व नातेवाइकांनाही त्यात सहभागी करून घेतले.
अवघ्या दोन ते तीन वर्षांत रक्कम तिप्पट होणार असल्याने गुंतवणूकदारांनी जमीन विक्री, बँकेतून कर्ज, मुलीच्या लग्नासाठी वा वृद्धापकाळासाठी जमविलेली पुंजी, निवृत्तिवेतनाची रक्कम, खासगी सावकारी या पद्धतीने पैसे उभारण्यास मागे पुढे पाहिले नाही. सुरुवातीच्या काळात केबीसीने परताव्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे धनादेश दिले. परंतु, योजनांचा विस्तार होऊ लागला, तसे ‘केबीसी मल्ट्रीट्रेड क्लब अ‍ॅण्ड रिसॉर्ट’च्या नावाने प्रमाणपत्र वितरण सुरू केले. या प्रमाणपत्राचे बारकाईने निरीक्षण केल्यास कंपनीच्या रिसॉर्टमध्ये वास्तव्य करण्यासाठीचे हे प्रमाणपत्र असल्याचे दिसते. पण एकाही गुंतवणूकदाराला त्याबाबत साशंकता वाटली नाही. उलट जेव्हा मोठय़ा संख्येने गुंतवणुकीची मुदत संपुष्टात येत असे, तेव्हा केबीसीने ती रक्कम त्यांच्या हाती पडू दिली नाही. त्यावेळी नवीन अधिक प्रलोभनाची योजना सादर करून संबंधितांची रक्कम पुन्हा कंपनीकडे वळती करून घेतली जात असे. पुढे पुढे कंपनीने ग्राहकांच्या नावाने नवीन टोकन देऊन परताव्याची रक्कम देण्यासाठी परस्पर मुदतवाढ करून घेतली. त्या बाबतच्या प्रमाणपत्रावर पैसे दिले नसतानाही ‘पेड’ असे शिक्के मारले. प्रत्यक्षात कुठलीही रक्कम गुंतवणूकदारांच्या हाती पडली नाही.
केबीसीच्या भूलथापांना बळी पडलेल्या गुंतवणूकदारांमध्ये शेतकरी, हातावर पोट भरणारे मजूर व महिला, कामगार जसे आहेत, तसेच शिक्षक, पदवीधर, शासकीय नोकरदारांचाही समावेश आहे. केबीसीमुळे अनेक जण रस्त्यावर आले. तर, काही वयोवृद्धांवर संपूर्ण पुंजी गमाविल्याने अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली आहे. कमी कालावधीत घसघशीत नफा मिळवून देण्याचे आमिष काहींच्या जिवावर बेतले. केबीसीच्या योजनांची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागातील बँकांनाही बसली असून काही बँकांना ठेवींचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करताना दमछाक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. केबीसीत गुंतवणूक करण्यासाठी ठेवीदारांनी मोठय़ा रकमा बँकांमधून काढून घेतल्या. त्याचाही फटका बँकांना सहन करावा लागला.
या स्वरुपाच्या योजनांमध्ये आधीच हजारो नागरिकांचे हात पोळले गेल्याचा इतिहास आहे. एकटय़ा नाशिकचा विचार केल्यास चार वर्षांत या स्वरुपाच्या योजनांमध्ये फसवणुकीचे १३ गुन्हे दाखल आहेत. सहजपणे झटपट श्रीमंत बनण्याची मानसिकता या भ्रामक योजनांना पोषक वातावरण निर्माण करून देते. त्यामुळे तसे आमिष दाखवून सर्वसामान्यांना किती सहजपणे कोटय़वधी रुपयांना वारंवार गंडविले जाऊ शकते हे केबीसीने दाखवून दिले आहे. किमान या घटनेचा धडा घेऊन शहाणे होण्याची गरज आहे.
चार वर्षांत नाशिकमध्ये दाखल झालेले फसवणुकीचे गुन्हे
*आयएमएस इन्व्हेस्टमेंट्स (इमूची संलग्न कंपनी)
पक्षी पालनाच्या गुंतवणुकीवर २०० टक्के परतावा देण्याचे आमिष. ११ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी.
*टायकॉन्स इम्पायर इंटरनॅशनल लिमिटेड (केरळस्थित कंपनी)
गुंतवणुकीवर २०० ते ३०० टक्के नफ्याचे आमिष. १५ कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी.
*इमू पालन योजना
इमू पालनाद्वारे भरघोस नफा देण्याचे आमिष. २० कोटीहून अधिकची फसवणूक झाल्याच्या तक्रारी.
*स्टार कन्सल्टंट सी सव्‍‌र्हिसेस
शेअर बाजार व स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीद्वारे लक्षणीय नफ्याचे आमिष. अडीच लाखाची फसवणूक झाल्याच्या तक्रारी.
*गणराज सेल्स प्रा. लिमिटेड
२४ महिन्यात रक्कम दामदुप्पट करण्याचे प्रलोभन. अंदाजे १२ ते १३ कोटी रुपयांची फसवणूक.
*गोल्डसुख योजना
सोन्यातील गुंतवणुकीद्वारे जादा रक्कम देण्याचे प्रलोभन. १४ लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी.
*विकल्प (दोन गुन्हे)
कमी काळात तिप्पट रक्कम देण्याचे आमिष. दोन्ही गुन्’ाातील मिळून सुमारे साडे सात कोटीहून अधिकची फसवणूक.
*रॅबिट इंट्राबिट कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर व मोर ग्रुप (दोन गुन्हे)
एका गुन्’ाात ससा पालन तर दुसऱ्या गुन्’ाात ‘रिटेल चेन मार्केटिंग’चे प्रलोभन. पहिल्या गुन्’ाात अंदाजे १८ कोटीहून अधिक तर दुसऱ्या गुन्ह्य़ात सुमारे साडे सात कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारी.
*समृद्धी वेल्थ योजना
हप्त्याने गुंतवणुकीच्या योजनेद्वारे झटपट उत्कर्ष साधण्याचे प्रलोभन. २० कोटीहून अधिकच्या फसवणुकीचा अंदाज.
*केबीसी प्राईड फंड
भरघोस परताव्याचे प्रलोभन. तक्रारदार नसल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
*केबीसी क्लब अ‍ॅण्ड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड
अडीच वर्षांत तिप्पट रक्कम देण्याचे आमिष. आतापर्यंत सुमारे ७० कोटीहून अधिकच्या फसवणुकीच्या तक्रारी. तक्रारींचा ओघ सुरूच.

foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?