स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवातीला लोकमान्य टिळकांचे आणि नंतर गांधीजींचे विचार अनुसरत वाटचाल करणार्‍या टिळक राष्ट्रीय विद्यालय या अमरावतीमधल्या शिक्षण संस्थेने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. स्वातंत्र्यचळवळीचा वारसा सांगणार्‍या टिळक राष्ट्रीय विद्यालयाने आजवरची वाटचाल स्वबळावर केली, पण आता नव्या काळाशी जोडून घेत पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी संस्थेला समाजाची साथ हवी आहे.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशभक्तीची ज्योत तेवत ठेवणारी खामगावची टिळक राष्ट्रीय शाळा आज स्वत:च अस्तित्वाच्या संघर्षातून जात आहे. लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या विचारांतून उभ्या राहिलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालय या संस्थेने स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी घडविण्याचे काम केले. मात्र, शासनाचे मर्यादित पाठबळ, उत्पन्नाचे अपुरे स्रोत आणि वाढता खर्च यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे आता आव्हानात्मक ठरत आहे. संस्थेला नव्या सुविधा उभारण्यासाठी, ऐतिहासिक वास्तू आणि कला वारसा जपण्यासाठी तसेच गरीब विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

खामगाव येथे २४ जानेवारी १९२१ रोजी लालचंद पुरवार, पुरुषोत्तम एकबोटे यांच्यासारख्या स्वातंत्र्यप्रेमींनी टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना केली. लौकरच ती स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनली. १९२४ मध्ये कलाचार्य मुकुंद श्रीकृष्ण पंधे गुरुजी यांनी संस्थेचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात संस्थेला ‘पंधे गुरुजींची शाळा’असा लौकिक मिळाला. टिळक राष्ट्रीय विद्यालयाची शिक्षणपद्धती सुरुवातीपासूनच वेगळी होती. पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक, कलात्मक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जात असे. तलवारबाजी, दंड-बैठका, कुस्ती, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक शिक्षणाचा त्यात समावेश होता. महात्मा गांधींच्या विचारांनुसार गीताई, सफाई, कताई, बुनाई यांसारख्या मूलोद्योगांच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचे धडे दिले जात. एकेकाळी शाळेत दरवर्षी ५०० ते ६०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेचे खादी भांडार, तेलाचा घाणा आणि सेंद्रिय शेती असे उपक्रम होते. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालणारी ही परंपरा संस्थेच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती.

काळानुसार या पद्धतीवरही मर्यादा आल्या. शासकीय निकष, शिक्षकांची कमतरता आणि बदललेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे मूलोद्योग जीवन शिक्षणाची पूर्वीची व्याप्ती राहिलेली नाही. २०१५ पासून सर्वोदय विचाराचे स्वतंत्र शिक्षणही शासनाच्या आदेशानुसार बंद झाले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या राज्यातील चार राष्ट्रीय शाळांना पूर्वी असलेला ‘विशेष’ दर्जाही पंधे गुरुजींच्या निधनानंतर काढून घेण्यात आला. आज शाळेतील विद्यार्थीसंख्या सुमारे ३०० आहे. मराठी प्राथमिक शाळेत सुमारे २०० विद्यार्थी मूलोद्योग जीवन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गायन, वादन आणि नृत्याचे शिक्षण देण्याची परंपरा मात्र कायम आहे.

टिळक राष्ट्रीय विद्यालयाची नक्षीकाम आणि वास्तुकलेचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडविणारी इमारत पंधे गुरुजींनी उभारली. याच परिसरात चित्रशिल्पकला महाविद्यालय सुरू करण्यात आले. देशभरातून विद्यार्थी येथे शिल्पकलेचे शिक्षण घेण्यासाठी येत असत. या संस्थेतून शिकलेले अनेक विद्यार्थी पुढे नावारूपाला आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूर्तिकार कांतिभाई पटेल यांचा पद्मश्रीने सन्मान झाला. पंधे गुरुजींनी स्वत: साकारलेले अनेक पुतळे आजही आहेत. त्यांच्या चित्रांनीही विद्यालयाच्या भिंतींची शोभा वाढवली आहे. मात्र, हा कलावारसाही आता आर्थिक अडचणींच्या सावटाखाली आहे. १९९५ पासून चित्रशिल्पकला महाविद्यालयाला शासनाचे अनुदान मिळत नाही. विनाअनुदानित तत्त्वावर महाविद्यालय सुरू असून ३० विद्यार्थ्यांची क्षमता असतानाही दरवर्षी केवळ पाच ते सात विद्यार्थी प्रवेश घेतात. केवळ दोन शिक्षकांच्या आधारावर महाविद्यालयाचा गाडा सुरू आहे. पूर्वी पुतळे साकारण्याची मोठी कामे मिळत असत; आता तीही अत्यल्प झाली आहेत. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून महाविद्यालयाचा खर्च भागवणे कठीण झाले आहे.

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी संस्थेने वसतिगृहाची व्यवस्थाही उभी केली. शासन अनुदानित पंधे गुरुजी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाची क्षमता २४ विद्यार्थ्यांची आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही ७५ क्षमतेचे वसतिगृह आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महिन्याला नाममात्र एक हजार रुपये शुल्क घेतले जाते. मात्र, प्रतिविद्यार्थी होणारा खर्च यापेक्षा कितीतरी अधिक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे नाममात्र शुल्कही भरू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना विनाशुल्क सुविधा दिली जाते. त्यामुळे वसतिगृहाचा अतिरिक्त आर्थिक भारही संस्थेलाच उचलावा लागतो.

पंधे गुरुजींच्या निधनानंतर संस्थेचे अध्यक्ष झालेल्या मधुकरराव चौधरी यांनी उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण व्हावा म्हणून शाळेला शंभर एकर शेती मिळवून दिली. त्यातून मिळणार्‍या अन्नधान्याचा वापर शाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी केला जातो. मात्र, शेती करणे दिवसेंदिवस खर्चिक आणि आव्हानात्मक होत आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न संस्थेच्या सर्व गरजा भागविण्यास पुरेसे नाही. शेतीतील तुटपुंज्या उत्पन्नासोबत वर्गणी आणि देणग्यांच्या आधारावर काम सुरू ठेवावे लागत आहे.

आज संस्थेपुढे प्रश्न केवळ दैनंदिन खर्चाचा नाही. विद्यार्थ्यांसाठी नव्या सुविधा उभारायच्या आहेत. स्वयंअर्थशासित कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. सुसज्ज क्रीडांगणाची गरज आहे. मोडकळीस आलेले कलेचे दालन आणि व्यासपीठाचे नूतनीकरण करायचे आहे. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी यंत्रसामग्री आणि स्वतंत्र इमारत उभारण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या शेतीमध्ये सध्या २५ ते ३० जनावरे आहेत. भविष्यात गोरक्षण आणि कृषी संशोधनावर आधारित उपक्रम उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर अजबे यांच्या मते, विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यापासून नव्या इमारतीपर्यंत अनेक कामांसाठी देणगीवर अवलंबून राहावे लागते. संस्थेचे सचिव संजय पातुर्डे यांनीही स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी यंत्रसामग्री आणि इमारतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. ज्या संस्थेने देश घडविण्याचे स्वप्न पाहणारी पिढी घडवली, त्या संस्थेला आज पुढील पिढीसाठी उभे राहण्यासाठी समाजाच्या हाताची गरज आहे. देणगीची गरज केवळ एखादी इमारत दुरुस्त करण्यासाठी नाही; ती एका ऐतिहासिक परंपरेला नव्या काळाशी जोडण्यासाठी आहे. या योगदानातून एखाद्या गरजू विद्याथ्र्याला शिक्षणाची संधी मिळू शकते, एखाद्या कलाविभागाला नवे बळ मिळू शकते, एखादी ऐतिहासिक वास्तू वाचू शकते आणि स्वावलंबनासाठी नवा उपक्रम उभा राहू शकतो. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या विचारांतून उभ्या राहिलेल्या या संस्थेला समाजाचा मदतीचा हात हवा आहे.

गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवण्याचे आव्हान

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी संस्थेने वसतिगृह उभे केले. शासन अनुदानित पंधे गुरुजी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाची क्षमता २४ विद्यार्थ्यांची आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही ७५ क्षमतेचे वसतिगृह आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महिन्याला नाममात्र एक हजार रुपये शुल्क घेतले जाते. मात्र, प्रतिविद्यार्थी होणारा खर्च यापेक्षा कितीतरी अधिक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे नाममात्र शुल्कही भरू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना विनाशुल्क सुविधा दिली जाते. त्यामुळे वसतिगृहाचा अतिरिक्त आर्थिक भारही संस्थेलाच उचलावा लागतो. शाळेकडे असलेल्या शंभर एकर शेतीतून मिळणार्‍या अन्नधान्याचा वापर शाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी केला जातो. मात्र, शेती करणे दिवसेंदिवस खर्चिक आणि आव्हानात्मक होत आहे. ते उत्पन्न संस्थेच्या सर्व गरजा भागविण्यास पुरेसे नाही. शेतीतील तुटपुंज्या उत्पन्नासोबत वर्गणी आणि देणग्यांच्या आधारावर काम सुरू ठेवावे लागत आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये चिखली मार्गावर टिळक राष्ट्रीय विद्यालयाची इमारत आहे. टिळक राष्ट्रीय विद्यालय Tilak Rashtriya Vidyalaya या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बॅंक, बडनेरा रोड राजापेठ, अमरावती</p>

चालू खाते क्रमांक : १०५१००१०३८७२

आयएफएससी : सीओएसबी ००००१०५

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०\

महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००