बापू म्हणजे अभिनयाचा आदर्श वस्तुपाठच!

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांनी दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा..

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांनी दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा..
मी मूळचा नागपूरचा. लहानपणापासून विनोदी नाटके आणि अभिनय यांचा फार मोठा ओढा मला होता. शाळेपासून मी रंगभूमीवर काम करत आलो. मी भूमिका केलेली नाटके ही प्रामुख्याने विनोदीच होती. महाविद्यालयात गेलो तेव्हा स्वत:चे जग सोडून बाहेरच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी आली. यातून चांगल्या नाटकांची पुस्तके वाचायला सुरुवात केली. यात आमचे बापू अर्थात आत्माराम भेंडे यांची ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या आणि अन्य नाटकांचा समावेश होता. नाटके वाचताना ही नाटके आपल्याला प्रत्यक्ष पाहायला कधी मिळतील, असा विचार सतत मनात असायचा. कारण १९५०च्या सुमारास आमच्या नागपुरात तेवढय़ा प्रमाणात नाटय़विषयक वातावरण नव्हते आणि नाटकेही येत नसत. असे असताना एक घटना घडली. आयुष्यातील एक मोठी संधी मला मिळाली.
मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्समध्ये दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीवर काम करण्याची संधी चालून आली. या निमित्ताने मुंबईत वास्तव्य करण्याची संधी मिळणार होती. जेव्हा ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी धडपड करत होतो, तेव्हा ती मिळविणे हा मुख्य उद्देश होताच. पण त्या बरोबरच आता मोठय़ा कलाकारांची नाटके प्रत्यक्ष पाहायला मिळणार होती. नागपूरला असताना पुष्कळशा गाजलेल्या विनोदी नाटकांत काम करण्याची तसेच दिग्दर्शनाची संधी मिळाली होती. पण आता आपण मुंबईला जाणार, नाटके पाहणार हा आनंद काही वेगळाच होता.
१९६० मध्ये मुंबईला आलो. त्या वेळी बापूंचे ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे प्रयोग धूमधडाक्यात सुरू होते. त्या वेळी नाटकाचे प्रयोग प्रामुख्याने जयहिंदू महाविद्यालयाच्या सभागृहात व्हायचे. एक दिवस मित्राला घेऊन घाबरत घाबरत नाटक पाहायला गेलो. तिकीट काढतानाही हात थरथरत होता. भेंडे यांना आता प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करताना आपल्याला पाहायला मिळणार ही कल्पना उत्तेजित करणारी होती. त्या नाटकातील प्रत्येक क्षण आणि क्षण मी अक्षरश: जगलो. भारावलेल्या मन:स्थितीत घरी आलो. हे नाटक पुन्हा कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता मनात ठेवून झोपी गेलो. नाटक पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होती, पण खिशात दमडीही नव्हती. पण त्याच वेळी ‘टाटा’मधल्या एका सहकाऱ्याची ओळख झाली होती. तो ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकासाठी संगीत ऑपरेट करतो हे कळल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या मित्राला मस्का लावून ‘झोपी गेलेला जागा झाला’चे अनेक प्रयोग मी नाटय़गृहाच्या कोपऱ्यात उभे राहून पाहिले.
१९६८ मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेत आमच्या ‘नटराज’ संस्थेने ‘काका किशाचा’ हा कोरा करकरीत फार्स सादर केला होता. आमच्यात कोणीही नावाजलेला कलाकार नसतानाही या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. त्या यशानंतर अनेक व्यावसायिक नाटकात काम करण्याची, ही नाटके दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. अनेक व्यावसायिक नाटकांमधून काम केले, पण अद्याप आत्माराम भेंडे यांच्याबरोबर काम करायला मिळाले नाही, ही खंत मनात होती. मुंबईला स्थायिक झाल्यानंतर मी सातत्याने त्यांचे प्रत्येक नाटक भक्तिभावाने पाहायचो व मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळू दे, अशी प्रार्थनाही करायचो. बऱ्याच दिवसांनी ती संधी चालून आली. अनिल सोनार लिखित ‘मालकीण मालकीण दार उघड’ या भेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकासाठी मला बोलाविण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर सातत्याने नाटके केली. त्यांच्यासमवेत काम करणे हा माझ्या दृष्टीने अभिनयाचा आदर्श वस्तुपाठ होता. त्यांच्या रंगभूमीवरच्या हालचाली, क्षणोक्षणी बदलणारा त्यांचा मुद्राभिनय व जबरदस्त टायमिंग सेन्स या सगळ्यात त्यांचा हात धरणारा दुसरा रंगकर्मी मी अजून तरी पाहिलेला नाही. त्यांचा अभिनय बघत असताना कळत नकळत मी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत होतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर ‘लागेबांधे’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हॅट खाली डोके असतेच असे नाही’ आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांमधून काम करताना मी घडत गेलो.
बापूंच्या दिग्दर्शनाखाली नाटकाची तालीम करणे हासुद्धा एक आनंददायी अनुभव होता. एखादा प्रसंग ते अभिनेत्याला बारकाव्यासहित नीट समजावून सांगायचे आणि नंतर तू हा कसा करशील असे त्याला सांगून त्याला तो त्याच्या पद्धतीने करायला सांगायचे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना प्रत्येक अभिनेत्याला या नाटकाने आपल्याला काहीतरी वेगळे दिले, अशी भावना मनात असायची. आपल्या हाताखाली काम करणारी व्यक्ती ही अभिनेता आहे, टिपकागद नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि म्हणूनच त्यांच्या हाताखाली केवळ अभिनेत्यांची नव्हे तर दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार झाली.
बापूंनी मला नाटय़कलेचे खूप मोठे दालन उघडून दिले. त्यात मी हरवून गेलो. एके दिवशी त्यांचा दूरध्वनी आला. भरत दाभोळकर हे ‘बॉटम्स अप’ हे इंग्रजी नाटक करत असून यात मी भूमिका करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सुमारे २० वर्षे सातत्याने मराठी रंगभूमीवर काम केल्यानंतर इंग्रजी रंगभूमीवर काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी मोठी संधी होती. नाटकाच्या तालमी सुरू असताना माझ्या लक्षात आले की, संपूर्ण दोन तासांच्या या नाटकात माझे फक्त दोनच प्रवेश आहेत. म्हणजे माझी भूमिका म्हटले तर अगदी नगण्य होती. मराठी रंगभूमीवर प्रमुख भूमिका करणाऱ्या माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी तो मोठा धक्का होता. मी द्विधा मन:स्थितीत बापूंकडे गेलो आणि मी हे नाटक सोडतो, असे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत मला एवढेच सांगितले की, ‘किशोर घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. जरा थांब. आगे आगे देखीये होता है क्या. त्यांच्या या सांगण्यामुळे मी नाटक केले. आणि पुढे बापू म्हणाले तसेच घडले. या नाटकानंतर भरतने त्याच्या प्रत्येक इंग्रजी नाटकात माझ्या अभिनय शैलीनुसार माझ्यासाठी भूमिका लिहिल्या आणि त्या सर्व गाजल्या. उत्तम दिग्दर्शकाला लागणारा महत्त्वाचा गुण त्यांच्यात होता. तो म्हणजे सहनशीलता. कोणत्याही अभिनेत्याने जर मनासारखा अभिनय केला नाही तर ते न कंटाळता अनेक वेळा त्याच्याकडून करवून घेत असत. पण हे करताना त्यांना कधीही चिडलेले, संतापलेले मी पाहिले नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक वादळे आली. सतत सावलीसारखी असणारी त्यांची पत्नी आशाताई, अकाली गेलेला त्यांचा मुलगा नंदू याचे डोंगराएवढे दु:ख त्यांना होते, पण ते त्यांनी कधीही बाहेर झिरपू दिले नाही. मराठी रंगभूमीएवढीच इंग्रजी रंगभूमीवरही मला जबरदस्त लोकप्रियता मिळाली, हा माझ्या दृष्टीने बापूंनी दिलेला आशीर्वाद ठरला..

“त्यांच्या रंगभूमीवरच्या हालचाली, क्षणोक्षणी बदलणारा त्यांचा मुद्राभिनय व जबरदस्त टायमिंग सेन्स या सगळ्यात त्यांचा हात धरणारा दुसरा रंगकर्मी मी अजून तरी पाहिलेला नाही.”

“त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना प्रत्येक अभिनेत्याला या नाटकाने आपल्याला काहीतरी वेगळे दिले, अशी भावना मनात असायची. आपल्या हाताखाली काम करणारी व्यक्ती ही अभिनेता आहे, टिपकागद नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती.”

शब्दांकन – शेखर जोशी
अष्टपैलूत्व आणि सकारात्मक दृष्टिकोन!
दिलीप प्रभावळकर (ज्येष्ठ अभिनेते)
आत्माराम भेंडे यांच्यामुळेच माझ्या अभिनयाची सुरवात झाली असे म्हणायला हरकत नाही. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धेसाठी मुख्य भूमिकेकरता त्यांनी माझी निवड केली आणि मला vv03अभिनयाचे बाळकडू दिले. रंगभूमीवर ‘मॉडर्न फार्स’ त्यांनी आणला. बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांच्या जोडीने रंगभूमीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. बबन प्रभूंनी फार्स लिहायचा आणि भेंडे यांनी दिग्दर्शन, अभिनय करायचे हे ठरलेले होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ ही भेंडेंची नाटके रंगभूमीवर गाजली.
अभिनेत्याला अत्यंत आवश्यक असलेले टायमिंगचे भान आणि सहजता भेंडे यांच्याकडून शिकण्यासारखी होती. त्यांची नाटके प्रेक्षक म्हणून पाहण्याचा योग तर आलाच, पण त्यांच्यातला अभिनेताही सहकलाकार म्हणून अनुभवता आला. ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या पुनरुज्जीवित नाटकात बबन प्रभूंची भूमिका मला साकारायला मिळाली.  भेंडे यांनी व्यावसायिक नाटक करण्यापूर्वी प्रायोगिक नाटकेही केली. याबाबतीत ते काळाच्या पुढे होते. माधव मनोहर यांची ‘सशाची शिंगे’, ‘आई’ ही दोन नाटकेत्यांनी केली. विनोदी अभिनयाबरोबरच गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’मधील डॉ. पटवर्धन, ‘कथा कुणाची व्यथा कुणा’मधील खलनायक, वसंत कानेटकरांच्या ‘प्रेमा तुझा रंग कोणता’मधील प्रा. बल्लाळ या त्यांच्या भूमिका स्मरणात राहतात.
पुलंच्या ‘तुझं आहे तुजपाशी’मध्ये त्यांनी साकारलेली ‘डॉ. सतीश’ ही भूमिका मी पाहिली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर याच नाटकाच्या इंग्रजी रूपांतरात त्यांची ‘आचार्य’ ही भूमिका सहकलाकार म्हणून मला अनुभवता आली. ते मला दाभोळकरांच्या गटात घेऊन गेले आणि तिथून माझी इंग्रजी रंगभूमीशी ओळख झाली.
ते खऱ्या आयुष्यात जसे होते तसे अगदी तशीच भूमिका त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटामध्ये साकारली होती. नव्वदी जवळ आल्यावरही ते सक्रिय होते. त्यांच्यात नकारात्मक भावना कधीच नव्हती. सतत इतरांना मदत करणे, प्रेरणा देत राहणे हा वसा त्यांनी कायम ठेवला होता.
काही महिन्यांपूर्वी त्यांना जीवनगौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला, त्या वेळी मला त्यांची मुलाखत घेण्याची संधीही मिळाली. माझ्यासाठी तो मोठा सन्मान होता. तसेच ‘आत्मरंग’ या आत्मचरित्राची पहिली प्रत मी त्यांच्याकडून स्वाक्षरी करून घेतली होती. पुण्यात वास्तव्याला असल्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना भेटण्याचा योगही आला होता.
(शब्दांकन- मृणाल भगत)

सुसंस्कृत विनोदी अभिनेते
इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेमार्फत अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून आपला ठसा उमटविला होता. अंगविक्षेप किंवा थिल्लरपणा न करताही चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगच्या जोरावर विनोदनिर्मिती करता येते हे भेंडे यांनी दाखवून दिले. केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शक आणि निर्माता या भूमिकाही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात त्यांनी साकारलेला आत्माराम आणि ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटातील त्यांनी आजोबांची रंगवलेली छोटेखानी भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे.
१९६०-७० च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे या जोडगोळीने मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून देत रसिकांना खळखळून हसविले. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘पिलूचं लग्न’ ही त्यांची नाटके तूफान गाजली होती. ‘मन पाखरू पाखरू’, ‘प्रीती परी तुजवरती, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या नाटकांतून भेंडे यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. हिंदूी, इंग्रजी आणि िहग्लिश नाटकांतूनही भेंडे यांनी कामे केली. त्यांनी जाहिरातींमध्ये अभिनय करण्याबरोबरच दूरदर्शन मालिकांसाठी दिग्दर्शनही केले होते. भेंडे यांना नाटय़दर्पण, नाटय़भूषण, शंकर घाणेकर पुरस्कार, चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, नटसम्राट नानासाहेब फाटक पुरस्कार या पुरस्कारांसह राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

रंगभूमीवरील चतुरस्र अभिनेते
आत्माराम भेंडे मराठी रंगभूमीवरचे चतुरस्र अभिनेते होते. रंगभूमीवर ‘स्टार’ म्हणून ओळख मिळविणारेvv04 ते पहिले अभिनेते होते. त्यांनी त्यांची ही ओळख यशस्वी करून दाखवली. त्यांना विनोदाची विलक्षण जाण होती. नाटक फार्सिकल असो किंवा व्यावसायिक, त्यांनी प्रत्येक प्रकारात ‘विशारद’ ही पदवी मिळविली होती. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीने एक मोठा अभिनेता गमावला आहे. मला त्यांच्यासोबत नाटकात काम करण्याचा योग आला नाही, याची खंत आहे.
– अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kishore pradhan on actor atmaram bhende

ताज्या बातम्या