निसर्गाच्या लहरीपणाने यंदा कोकणचा हापूस आंबा अडचणीत सापडला आहे. अवेळी पाऊस, बदलते तापमान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा आंब्याचा मोहर करपून गेला आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, या हंगामात केवळ १० ते १५ टक्केच उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यक्त होत असून आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणातील हापूस आंबा बागांना बंपर मोहर आला होता. त्यामुळे बागायतदार सुखावले होते. बक्कळ उत्पादन येईल अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. निसर्गाची जणू दृष्टच लागली. आंब्याचा मोहर काळा पडला आणि जळून गेला. फळधारणा झालीच नाही. त्यामुळे वर्षभर बागांची निगा राखण्यासाठी केलेली मेहनत धुळीस मिळाली. देखभाल खर्चही भागणार नाही, अशी गत बागायतदारांची झाली.

कोकणातील सर्वच बागांमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. एरवी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आंबा काढणीच्या हंगामाला वेग धरलेला असतो, बागांमध्ये आंबे काढण्याची आणि पॅकिंग करून बाजारात पाठवण्याची लगबग सुरू असते. बाजारात मुबलक प्रमाणात आंब्याची आवक सुरू झालेली असते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ही आवक अजून वाढते आणि आंबा निर्यात सुरू होते. पण यंदा मार्च संपत आला तरी बागांमध्ये काढणीसाठी आंबेच उपलब्ध नाहीत. जिथे आहेत तिथे अतिशय कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे बागायतदार हताश आहेत.

कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १ लाख ८२ हजार हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आली आहे. ज्यातून दरवर्षी साधारणपणे ३ लाख ८ हजार ४८० टन आंबा उत्पादन होते. दरवर्षी मोहर येण्यापासून काढणीपर्यंत पीक नुकसानीचे प्रमाण साधारणपणे ३० ते ४० टक्के असते. पण यावर्षी जवळपास ८० ते ८५ टक्के पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनाच्या १० ते १५ टक्के पीकच बागायतदारांच्या हाती पडणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आंबा नुकसानीची ही पहिलीच वेळ आहे.

हवामानातील बदलांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. थंडीमुळे परागीकरण झाले नाही, त्यातच पडणार्‍या धुक्यामुळे मोहर अक्षरश: करपून गेला. तुडतुडे, फुलकिडे, फळमाशी यांचाही प्रादुर्भाव झाला. धुक्यामुळे करपणार्‍या मोहराचे संरक्षण करण्यासाठी बाजारात बुरशीनाशकच उपलब्ध नाही. त्यामुळे धुक्याचा सर्वाधिक परिणाम आंब्यावर दिसून आल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

सकाळच्या वेळी परागीकरणाची प्रक्रिया वेगाने होत असते, पण धुक्यामुळे परागीकरणासाठी कारणीभूत ठरणार्‍या माश्यांना उडताच आले नाही. त्याचा परिणाम आंब्याच्या फळधारणेवर दिसून आला. कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे कृषी शास्त्रज्ञ सांगतात.

गेल्या काही वर्षांत आंब्यावर हवामानात सतत होणार्‍या बदलांचे घातक परिणाम दिसून येत आहेत. अवकाळी पाऊस, तापमानात सतत होणारे बदल, थंडीचा अभाव, वादळे, कीड रोगप्रादुर्भाव रोखण्यात येणारे अपयश यामुळे आंब्याचे उत्पादन सतत घटत चालले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढावा तरी कसा? या विवंचनेत बागायतदार सापडले आहेत.

घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? आणि कामगारांना पगार कसा द्यायचा? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आंबा नुकसानीसाठी हेक्टरी ५ लाखांची मदत द्या, अशी मागणी पहिल्यांदाच जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे बागायतदारांचे लक्ष्य आहे.

कोकणातील हापूसचे महत्त्व

गुणवत्ता, चव आणि दर्जा यामुळे कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कोकणातील हापूस आंब्याच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. कोकणात इतरही फळांचे उत्पादन होत असले तरी हापूस हे भरघोस उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून ओळखले जात आहे. दरवर्षी हापूस अंब्याच्या विक्रीतून सहा हजार कोटींची उलाढाल होत असते, परदेशातूनही या आंब्याला मोठी मागणी असते.

यावर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्याला मोहर आला पण फळधारणा झाली नाही. नंतर मोठ्या प्रमाणात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला. तो रोखण्यात कीटकनाशके अपयशी ठरली. तापमानात होणारी अचानक वाढदेखील पिकासाठी त्रासदायक ठरली. त्यामुळे उत्पादन घटले. बागांची निगा राखणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. – डॉ. संदेश पाटील, बागायतदार.

meharshad07@gmail. com