‘आपलं घर’ केवळ नावापुरतंच नाही, तर ते प्रत्येकाला खरोखरच ‘आपलं’ वाटेल असा प्रयत्न इथे सदोदित असतो. निसर्गरम्य परिसर, कमालीची स्वच्छता, आपलेपणा, साधेपणातील सौंदर्य, पर्यावरणपूरक प्रकल्प, पाण्याचा पुनर्वापर, पर्जन्यजलसंधारण प्रकल्प, फळा-फुलांची सुंदर बाग, ओल्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करणारा प्रकल्प.. अशी वैशिष्टय़ं असलेलं हे ‘आपलं घर’ आहे..

पाण्यात असलेलं ‘आपलं घर’ हे सेवाभावी काम म्हणजे सेवेच्या अनेक कार्याची मालिकाच आहे. या मालिकेचा एक भाग सुरू झाला की, दुसरा भाग समोर येतो, त्यातून तिसऱ्या भागाचा जन्म झालेला असतो.. त्यातून चौथा.. पाचवा.. आणि हे भाग पुढे कितीही वाढू शकतील असं हे ‘आपलं घर. विजय आणि साधना फळणीकर हे दाम्पत्य खरं तर मूल दत्तक घेण्यासाठी पुण्यातील एका संस्थेमध्ये गेलं होतं. त्याची गोष्ट फळणीकरांच्याच तोंडून ऐकावी. मूल दत्तक घ्यायचं म्हणजे संस्थेत जायचं, तिथली सगळी मुलं पाहायची, आवडेल ते निवडायचं, पैसे भरायचे आणि मूल घेऊन घरी यायचं.. दोघेही अशा समजुतीत होते. प्रत्यक्षात संस्थेत गेल्यानंतर लक्षात आलं की, एकूण प्रक्रिया दोन वर्षांची तरी आहे. ती पूर्ण केल्यानंतर मग मूल दत्तक मिळू शकेल.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…

साडेतीन दशकांची संगीत साधना

दोघेही घरी आले. मुळात मूल दत्तक घ्यायचं फळणीकरांनी का ठरवलं हा त्या आधीचा भाग अतिशय हृदयस्पर्शी आणि कोणालाही हेलावून सोडेल असाच. विजय आणि साधना यांचा वैभव हा एकुलता एक मुलगा. रक्ताच्या कर्करोगाने अवघ्या चौदाव्या वर्षीच वैभवने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याचा दिवस ऐन दिवाळीचा. बाहेर दिवाळी साजरी होत होती आणि फळणीकरांना या पोटच्या गोळ्याला अंतिम निरोपही त्याच दिवशी द्यावा लागत होता.. सन २००१ मधील ही घटना. या आघातानं फळणीकर दाम्पत्य उन्मळून पडलं.. पण या दु:खद प्रसंगातूनच एका सेवाकार्याचा जन्म झाला. वैभवचे अंतिम संस्कार लवकर उरका, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्या वेळी फळणीकर वारजे येथे राहात होते. तो भाग तेव्हा पुण्याच्या बाहेरचा. रुग्णवाहिकेसाठी खूप धावाधाव करावी लागली. दीड तास झाला तरी रुग्णवाहिका मिळेना. मनात ते दु:ख होतं. कालांतरानं वैभवच्या विम्याचे पैसे आले. वैभवची आठवण चिरंतन जपावी म्हणून मग फळणीकरांनी निर्णय घेतला, आपणच रुग्णवाहिका सुरू करू या. नुसत्या विचारावर ते थांबले नाहीत. त्यांनी काही मित्रांच्या मदतीनं एप्रिल २००२ मध्ये ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ची स्थापनाही केली. तरीही आलेल्या पैशांतून रुग्णवाहिका घेणं जमणारं नव्हतं. इथे मित्र आणि गायक सुरेश वाडकर धावून आले. त्यांनी एकही पैसा न घेता ‘सूरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात केला आणि त्याच्या तिकीट विक्रीतून रुग्णवाहिकेसाठी निधी जमा झाला. फळणीकरांच्या सेवाकार्य मालिकेचा हा पाहिला भाग.

रुग्णवाहिका चालवण्यापासून ते रुग्णवाहिकेची इतरही सर्व कामं फळणीकर स्वत:च करत होते. एकीकडे वैभवच्या जाण्याचं दु:ख मनात होतंच. म्हणून मग मूल दत्तक घ्यायचा निर्णय दोघांनी घेतला होता. मात्र त्यासाठी दोन वर्ष थांबावं लागणार हे समजल्यानंतर आपल्यावर एवढय़ा अज्ञातांचे उपकार आहेत, मग एखादं मूल दत्तक घेण्यापेक्षा आपणच अनाथ मुलांसाठी काही तरी काम का करू नये, असा विचार दोघांनी केला. फळणीकरांच्या जीवनातील आणखी एक नवं सेवाकार्य इथे सुरू होतं.. दोघांनी मिळून मग अनाथ मुलांना आधाराचं घर देणारी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नाही अशी निराधार मुलं संस्थेत पाठवावीत, असं निवेदन सुरुवातीला फळणीकरांनी वृत्तपत्रांमधून दिलं. त्याला लगेच प्रतिसादही आला.. आणि सुरू झालं ‘आपलं घर.’ वैभवच्या जाण्यामुळे एक मूल दत्तक घ्यायला निघालेले फळणीकर आता अठ्ठावन्न मुला-मुलींचे पालक आहेत. चौदा मुलांनिशी वारजे येथे फेब्रुवारी २००३ मध्ये ‘आपलं घर’ सुरू झालं. अर्थात ‘आपलं घर’ काही सहजासहजी उभं राहिलेलं नाही. त्यासाठी जवळची सर्व शिल्लक आणि स्थावर मालमत्ता विकून फळणीकरांना वास्तू उभी करावी लागली. अनाथ पाखरांना आसरा देताना केवळ वसतिगृह चालवणं एवढीच कल्पना न ठेवता ही मुलं जशी घरी राहिली असती तशीच ती ‘आपलं घर’ मध्ये राहिली पाहिजेत, असा प्रयत्न फळणीकर आवर्जून करतात. हे ‘आपलं घर’ विस्तारू लागल्यावर फळणीकरांच्या मनात आलं की, मुलांवर संस्कारांसाठी आजी-आजोबाही हवेत. त्यातून सन २००६ मध्ये ‘वृद्धाश्रम’ हे तिसरं सेवाकार्य सुरू झालं. पुढे जागेची कमतरता भासू लागली. म्हणून जागेचा शोध सुरू झाला. या शोधात पुण्याजवळ सिंहगडाच्या परिसरात डोणजे येथे दोन एकर जमीन संस्थेनी विकत घेतली आणि तिथे टुमदार ‘आपलं घर’ उभं आहे. आजी-आजोबांच्या संगतीत नातवंडं रमली.. त्यातून हे नवं सेवाकार्य मार्गी लागलं. हे काम सुरू असताना फळणीकरांना जाणवलं की, ग्रामीण भागातील जी मुलं दहावी-बारावीत अनुत्तीर्ण होतात त्यांच्यासमोर शिक्षणाचा आणि भवितव्याचा मोठाच प्रश्न उभा राहतो. मग दहावी-बारावी अनुत्तीर्णासाठी ‘आपलं घर’तर्फे ‘औद्योगिक प्रशिक्षण केंद्र’ सुरू झालं. हे आणखी एक आगळं सेवाकार्य. सुतारकाम, छपाईकला, शिवणकाम, वायरमन, बेकरी उत्पादनं, कागदी पिशव्यांची निर्मिती, फाइल बनवणं असे सोळा अभ्यासक्रम या केंद्रात सुरू करण्यात आले आहेत आणि चारशेच्यावर मुला-मुलींनी आजवर इथे शिक्षण घेतलं आहे. त्यातील अनेकजण स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत तर अनेकांना चांगल्या नोकऱ्याही मिळाल्या आहेत.

हे ‘उद्योग केंद्र’ सुरू असतानाच फळणीकरांना डोणजे आणि परिसरातील अतिदुर्गम भागातील आरोग्यसेवेची उणीवही अस्वस्थ करत होती. त्यातून सुरू झालं ‘ग्रामीण रुग्णालय.’ हे आणखी एक सेवाकार्य. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा नि:शुल्क उपलब्ध आहेत आणि आजवर तीस हजारांहून अधिक रुग्णांनी तेथे उपचार घेतले आहेत. हे रुग्णालय सुरू करूनही सुरुवातीला रुग्ण येत नव्हते. त्याचा अभ्यास केल्यानंतर फळणीकरांच्या लक्षात आलं की, दुर्गम भागातील लोकांना रुग्णालयापर्यंत येण्याचं साधनच उपलब्ध नाही. त्यातून सुरू झाला ‘फिरता दवाखाना.’ रुग्ण येऊ शकत नसतील तर आपण रुग्णापर्यंत गेलं पाहिजे, या भावनेतून हा दवाखाना आता घेरा सिंहगड आणि मुळशी तालुक्यात अतिदुर्गम भागातील खेडय़ांमध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसार रोज जातो आणि रोज किमान शंभर रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात. जिथे धड रस्ता नाही, वीज नाही, आरोग्यसेवा तर दूरच अशी ही गावं आहेत.

निराधार मुलाचं वसतिगृह असो, वृद्धाश्रम असो की व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असो, रुग्णालयातील उपचार असोत की फिरता दवाखाना असो, यातील कोणत्याही सेवेसाठी ‘आपलं घर’तर्फे कोणाकडून एक रुपयाचही शुल्क आकारलं जात नाही. संस्थेचं सर्व काम समाजाकडून येणाऱ्या देणग्यांवरचं चालतं. तुम्ही आधी संस्था बघा. संस्थेचं काम बघा, मग देणगी द्या.. असं फळणीकर सर्वाना सांगत असतात. ‘समाज पाठीशी उभा राहात असल्यामुळे इथे सर्व सेवा नि:शुल्क देणं शक्य होतं. कोणत्याही प्रकल्पासाठी सरकारी मदत घेतली जात नाही..’ असं फळणीकर जेव्हा आपल्याला नम्रपणानं सांगतात, तेव्हा या कामाचं मोल अनमोल असल्याची आपली खूणगाठ पक्की होते.. निरलस सेवेची खात्री पटते. पुण्यातील संस्था पाहण्यासाठी कर्वे रस्त्याने आधी वारजे मुख्य चौकात जावे. तेथून अतुलनगर आणि अतुलनगर ओलांडून त्याच्या मागे गेले की, ‘आपलं घर’ येथे पोहोचता येईल.

ग्रामीण आरोग्यसेवेच्या विस्ताराचे उद्दिष्ट

 

नागपूर ते डोंगरी बालसुधारगृह

विजय फळणीकर मूळचे नागपूरचे.  तिसरीत शिकत असतानाच वडिलांचं निधन झालं. विजयनं मग घरातून पळून जाऊन थेट मुंबई गाठली. मुंबईत पोहोचताच जगण्याचा संघर्ष सुरू झाला. विजयला एका गृहस्थानं तिथून उचलून माटुंगा पोलिसांकडे सोपवलं. तिथून त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात झाली. विजयची रवानगी करणारे ते गृहस्थ म्हणजे यशवंत काळे. ते सुधारगृहाचे प्रमुख होते.

आपलं घर, पुणे

‘आपलं घर’च्या वारजे आणि डोणजे प्रकल्पात मिळून आता ५८ मुलं-मुली आणि दहा आजी-आजोबा आहेत. २९ सेवक आहेत. एक अद्ययावत रुग्णालय चालवलं जात आहे, एक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू आहे आणि फिरता दवाखाना रोज खेडय़ापाडय़ांमध्ये उपचारांसाठी जात आहे..

हल्ली आपण माणसाचं अधिकाधिक आत्मकेंद्रित होणं पाहतो. विचित्र व्यवहार, मूल्यांचा ऱ्हास, बेपर्वाई, भ्रष्ट कारभार पाहून मन उद्विग्न होतं. अशा वेळी फळणीकर पती-पत्नीसारखी माणसं निराधारांसाठी काम करताना दिसतात. त्यामुळे मग माणुसकीवर विश्वास ठेवावासा वाटतो. दिलासा वाटतो.

दिलीप प्रभावळकर

 

संस्थेपर्यंत कसे जाल?

‘आपलं घर’ संस्थेचा डोणजे प्रकल्प पाहण्यासाठी (सिंहगड रस्त्यावरून) पुणे-खडकवासला-डोणजे-गोळेवाडी या मार्गाने गेल्यानंतर सिद्धनाथ आश्रमाजवळ असलेल्या डोणजे प्रकल्पात पोहोचता येईल.

धनादेश या नावाने पाठवा..

स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन

(Late Vaibhav Phalnikar Memorial Foundation)

(कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्ता प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०५३६

  • महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

  • ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३८५१३२

  • पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

  • नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

  • नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

  • औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

  • नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

  • दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००