डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी साहित्यात अभ्यासपूर्ण समीक्षेने स्वत:चा दबदबा निर्माण करणाऱ्या आणि ती अधिक समृद्ध करणाऱ्या डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षांला (२३ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या विद्यार्थिनीने घेतलेला आपल्या गुरूच्या व्यासंगी जीवनाचा वेध..

मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे जन्मशताब्दी वर्ष २३ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ते माझे गुरू होते. ते केवळ माहिती प्रदान करणारे शिक्षक नव्हते; तर विश्वाचं अंगण मोकळं करून अवकाशाचा निकोप गाभा, समुद्राची रुद्रभीषण गहनता, पृथ्वीवरील डोंगरदऱ्यांची उंची आणि खोली यांचे मनोज्ञ दर्शन घडवून; आपला विवेक जागृत करण्याची विलक्षण हातोटी असलेले स्थिरप्रज्ञ आणि स्थितप्रज्ञ अशी संत प्रवृत्ती घेऊन जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व होते. साहित्यकृतीचे विविध पदर अलवारपणे उलगडून दाखविण्याचे  कसब त्यांच्याकडे होते!  

वदिंचा जीवनप्रवास सुरू झाला तो निजामांच्या राजवटीतील पखरुडपासून आणि स्थिरावला पुण्यात. इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे, विज्ञानाचे विद्यार्थी आणि नंतर विज्ञानाचे शिक्षक येथपासून मराठी साहित्याचे प्राध्यापक आणि आस्वादक ते मराठी साहित्याचे विमर्शक म्हणून आणि पुढे मुंबई विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखापर्यंत असा त्यांचा पट नजरेसमोर येतो.

कौटुंबिक जबाबदारी म्हणून व. दि. कुलकर्णीना नानाविध कामं करावी लागली. विद्यार्थीदशेत असताना शाळेतील इंग्रजी नाटय़प्रवेशात तोंडाला रंग लावून त्यांनी भूमिका वठवली होती. दिवाकरांच्या नाटय़प्रवेशातून त्यांना खूप काही शिकता आलं. त्यांनी रुपककथा लिहिल्या. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘स्ट्रे बर्डस’, वि. स. खांडेकरांच्या कथा- कादंबऱ्यांनी ते प्रभावित झाले होते. मराठी – इंग्रजी गद्य – भावकाव्यात त्यांचं मन रमलं. शास्त्र, काव्य, अध्यात्म यात त्यांचं मन सापडलं होतं. मराठी आणि इंग्रजीतून त्यांनी आपल्या संवेदनशीलतेच्या नोंदी केल्या. त्यांच्या ललित रम्यतेचा थेट प्रत्यय पुढे त्यांच्या ‘सुमित्रा संवाद’ आणि अन्य आत्मपर लेखनात येतो. मनाची कोवळिक तर त्यांनी आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत जपली होती. त्यांची मितभाषी परंतु साहित्यविषयक निश्चित दृष्टी त्यांच्या लेखनात प्रकटलेली आहे.

विद्यार्जन आणि विद्यादान याबाबत विदची दृष्टी विशिष्ट होती. ते म्हणत, ‘आभाळ कितीही भरलं, तरी भरूनही ते पुन्हा रिकामंच राहतं. तसंच ज्ञानाच्या बाबतीत असतं. घेतल्याने ते भरूनही उरतं आणि दिल्याने ते भरलेलंच राहतं.’ वदि स्वत:ला सतत रितं करीत राहिल्यामुळे नवनवीन ज्ञान ते आपल्यात भरत राहिले. आस्वाद घेता घेता स्वत:ला रिक्त करीत राहिले आणि तरीही ते भरभरून देतच राहिले.

फग्र्युसन कॉलेजच्या आवारात वावरताना आणि तेथील शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरणात विहार करताना समीक्षेची अनेकविध रूपं त्यांना बघायला मिळाली. चिंतनशीलता हा त्यांच्या बुद्धीचा अविभाज्य घटक होता. संशोधन ही एक निष्ठा आहे याची त्यांना जाणीव होती. परंतु त्यांचा जीव रमला तो साहित्य कलानंदात, त्याच्या रससौंदर्यदर्शनात. वाङ्मयकृतीचं आकलन, आस्वाद, मूल्यमापन, पुनर्मूल्यांकन यात त्यांना अधिक रुची होती. वाङ्मकृतीच्या आस्वादनासाठी आवश्यक अशी ‘संशुद्ध’ रसिकता त्यांच्याकडे होती. अभ्यासाने, प्रमाणाने मनाला जे निश्चित वाटतं, ते त्यांनी विधायक रीतीने नेमकेपणे आणि त्यातील रसवत्ता राखत मांडलं. खंडन-मंडनाचे पवित्रे घेण्याची त्यांची वृत्ती नव्हती. मोकळय़ा मनानं खुल्या रसिकतेनं कोणतीही कलाकृती अनुभवता यायला हवी. समीक्षा ही त्यातच अंतर्निहित असते. त्यात लपवण्यासारखं असं काही नसतंच. बौद्धिक चिकित्सा आणि भावनिक आस्वाद्यता यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.

कलाकृतीचा अनुभव स्वत: घेतल्याशिवाय तीवरील इतरांची समीक्षा वाचू नये असं त्यांना वाटे. याबाबत एम. ए.च्या वर्गातला किस्सा आठवतोय. संशोधन पद्धती या पत्रिकेसाठी शोधनिबंध लिहावयाचा असल्याने एक विद्यार्थी त्याने निवडलेल्या विषयावर शंभरेक पानांचे आपले वजनदार हस्तलिखित घेऊन सरांकडे गेला. सरांनी तो निबंध टेबलवर ठेवायला सांगितला, म्हणाले, ‘‘संशोधनाच्या बाबतीत कर्णाचं उदाहरण लक्षात ठेव. कर्णापुढे दोन पर्याय होते- जन्मदात्रीला आई म्हणून मानायचं की, जी आपल्याला आईसारखं वागवते तिला आई म्हणायचं. तुझी ती पानं ठेवून दे आणि आता मी सांगतो तसे कर.’’ आपल्या नेहमीच्या शांत, संयत स्वरात ते उद्गारले. विद्यार्थी काय समजायचे ते समजला. संशोधन असो वा समीक्षा ते मूलगामी असलं पाहिजे. समतोल असलं पाहिजे, हे त्यांनी सूचित केले.

एम. ए.च्या वर्गाना ते ना. ग. गोरे, यांचा ‘डाली’ हा लेखसंग्रह शिकवत असत. ‘डाली’तील एकेका लेखाचा आस्वाद त्यांनी एकेका ओळीतून, विधानातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांच्या या अशा आस्वादन पद्धतीमुळे संपूर्ण लेख वाचण्याशिवाय, संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय पर्यायच उरत नसे. तथापि आपल्याला नवचक्षू प्राप्त झाल्याची जाणीव तिथल्या तिथे येत असे. ‘डाली’विषयी ते म्हणत, ‘‘ना. ग. गोरेंच्या राजकीय जीवनाविषयी मला काही म्हणायचं नाही, परंतु साहित्यिक म्हणून त्यांच्या संवेदनशीलतेची थरथर जाणवून देण्यास, त्यांची ओळख करून देण्यास ‘डाली’ हा लेखसंग्रह पुरेसा आहे. त्यातील ‘उसासा’ या लेखात ना. ग. गोरेंनी पत्नीची मनोवस्था शब्दांकित केलेली आहे. त्याविषयी वदिंची. एका ओळीची समीक्षा अशी- ‘‘ज्याने तिला सर्वस्वून टाकलं होतं, तिचा तो सर्वस्व होता.’’ ‘स्वप्नभाषण’ हा साने गुरुजींवरील लेख. त्यावरील सरांची टिप्पणी अशी, ‘‘मला हवा तसा महाराष्ट्र घडत नाही म्हणून साने गुरुजींनी नैराश्यातून केलेली आत्महत्या, म्हणून त्यांची आत्महत्या हा अपवाद. अन्यथा आत्महत्येचे समर्थन करता येत नाही.’’ ‘आठवण’ हा युसुफ मेहेर अलींवरील मृत्युलेख त्या विषयावर भाष्य असे- ‘‘चष्म्याआडून कोणाचेही डोळे पाणीदार दिसत नाहीत. अपवाद फक्त युसुफ मेहेरअली!’’ सरांच्या अशा शब्दांमुळे ‘डाली’तील पारदर्शी व्यक्तित्त्वे आणि एकूणच सारे वातावरण नजरेसमोर उभे राहत असे. हे सारे वदिंच्या पारदर्शी बुद्धिमत्तेचेच प्रत्यंतर होते!

डॉ. व. दि. कुलकर्णीची ज्ञानेश्वरीवरील व्याख्यानं म्हणजे पैसाच्या खांबाजवळ बसल्याचा पुन:प्रत्यय होता. आम्हा विद्यार्थ्यांच्या मनाचाच पैस रुंदावत जात असल्याचा भास होत असे. वर्गातून बाहेर पडताना, मंदिरातून बाहेर पडत असल्याचा आणि विलक्षण आत्मशांतीचा अनुभव आम्ही घेत असू. थोर समीक्षक वि. स. वाळिंबे म्हणत, ‘‘वदिंच्या एकेका लेखात एकेका ग्रंथाचा मजकूर आहे.’’ ते किती खरं होतं हे वदिंच्या अध्यापन कौशल्यातून आणि त्यांच्या अल्पाक्षर रमणीय उच्चारातून आम्हाला कळत असे.

नोकरीनिमित्त ज्या ज्या शाळा महाविद्यालयात वदि रुजू झाले, तेथे तेथे त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाच्या कार्याला हातभार लावला. काही ठिकाणी नव्याने कार्य सुरू केले. १९७१ ते १९८३ या कालावधीत डॉ. व. दि. कुलकर्णी मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात कार्यरत होते.

मुंबईत दूरदर्शन आल्यावर (१९७२) त्यावर साहित्यिक कार्यक्रम कसे असावेत यावर अनौपचारिक बोलणं निघाल्यावर साहित्यिकांच्या मुलाखतींना अग्रक्रम मिळावा असे वदिंनी सुचविले होते. त्यानुसार त्यांनी गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्याशी अंतरंग संवाद साधला होता. बालभारती ते विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम आखणे, अध्ययन – अध्यापनासंबंधीची चर्चासत्रे आयोजित करणे, मराठी साहित्य संमेलने, पुरस्कार समित्यांवरील कार्य, मराठी भाषा साहित्य संबंधित मंडळ व्यवस्थापन करणे यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ‘साहित्य चिंतन’ नावाचं वार्षिक त्यांनी मराठी विभागप्रमुख असताना सुरू केलं. वाङ्मयाचा इतिहास, समीक्षा, संशोधन या विषयांना त्यात प्राधान्य दिलं.

आपल्या गुरुजनांच्या अध्यापन पद्धतीचा जाणीवपूर्वक अभ्यास ते करीत असत. अभ्यासक्रम अध्यापनाच्या मर्यादेबाहेर गुरुजनांचा ज्ञानसागर पसरलेला असतो, याचा प्रत्यय गुरुसान्निध राहून त्यांनी घेतला. आपल्या वडिलांबरोबरच रँग्लर प्राचार्य ग. स. महाजनी, रा. श्री. जोग, श्री. के. क्षीरसागर, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, डॉ. के. ना. वाटवे, गं. बा. सरदार इत्यादींसारख्या विलक्षण समीक्षक संशोधक यांच्याविषयीची कृतज्ञता आणि आदर ते नेहमीच व्यक्त करीत असत. त्याचबरोबर नवीनांच्या समीक्षादृष्टीबाबत त्यांची वृत्ती स्वागतशील होती. पाश्चात्त्य साहित्यसिद्धांत आपण प्रा. गंगाधर पाटील यांच्याकडून समजून घेऊ शकलो, याबद्दलही ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. उपयुक्त साहित्य विमर्शकांबरोबरच ग. त्र्यं. देशपांडे, दि. के. बेडेकर, पु. शि. रेगे, या समीक्षकांचादेखील आपल्यावर थोडाफार प्रभाव असल्याचे ते मान्य करीत. वदिंचा मनोधर्म केवळ आल्हादवादी कलामूल्यवाद्याचा होता. आपल्या मनाचे अंगण त्यांनी किती मोकळे ठेवले होते त्याचेच हे प्रत्यंतर! पूर्वसुरींच्या श्रमांची जाणीव ठेवत, वाट पुसत त्यांनी आपली अशी स्वतंत्र वेगळी वाट चोखाळली होती.

समीक्षा लेखनाबरोबर ललितरम्य असे आत्मपर लेखनही वदिंनी केले. ‘सुमित्रा संवाद’, ‘धुळाक्षरातून मूलाक्षराकडे’आणि ‘माझे गुरुकुल’ या ग्रंथात व्यक्तिगत भावबंध व्यक्त करणारी संस्मरणे आहेत. ‘सुमित्रा संवाद’मध्ये आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीचे वर्णन करताना ते लिहितात, ‘तुझ्या जीवननाटय़ाचा हा अन्त्यप्रवेश. अग्निप्रवेश आलेल्यांनी करायचा होता आणि भरतवाक्य म्हणायचं होतं. वैकुंठातील विद्युत दाहिनीनं आपलं ज्वालामुख उघडलं.. निमिषार्धात ज्वालांच्या पाकळय़ांत तू कायमची ज्योतिर्मयी झालीस आणि मी मात्र जागच्या जागी आतल्या आत भस्मसात झालो.’’ तिच्याशिवाय आपलं जगणं म्हणजे निर्माल्यावर पाणी शिंपडून ओलावा आणणं,असं ते लिहितात तेव्हा साहित्यविमर्शक प्रसंगी किती भावविभोर होऊ शकतो याचा प्रत्यय येतो. तथापि तो त्यांच्या लेखणीचाही गुण आहे.

वाङ्मयाचा वाङ्मयीन भूमिकेतून अभ्यास व्हावा असे वदिंना वाटत असे. ज्ञानेश्वरीचं आकलन व्हावं म्हणून त्यातील तत्त्वज्ञान समजून घेणं आवश्यकच; पण आपण तत्त्वज्ञानाचे अधिकृत अभ्यासक नसतो, तरी ज्ञानेश्वरांच्या परतत्त्वसृष्ट करण्याचा सौंदर्यवेध आपल्याला घेता यायला हवा आणि त्यासाठी साहित्याभिज्ञ, डोळस असण्याची आवश्यकता ते व्यक्त करीत.

पु. शि. रेगे म्हणत, ‘‘कविताच काही सांगत असते, कवी काही सांगत नाही. कविता ही एक प्रकारची जुळवणूक आहे.’’ यावर वदिंचा आग्रह असा की, ‘‘ही जुळवणूक कशी केली जाते, हे कवीला सांगता आलं पाहिजे. कवीने आत्मशोध घ्यायलाच हवा असतो. परंतु रसिक त्याचा आस्वाद घेताना, तो कवीची मानसशास्त्रीय बैठक जाणून घेऊ  इच्छित असतो.’’ हा संदर्भ घेऊनच मग ‘उत्तम’ नावाच्या मासिकात वदिंनी ‘कविता फुलते अशी’ या लेखमालेत निवडक बारा कवींकडून कवितेची निर्मिती प्रक्रिया विशद करणारे लेख प्रसिद्ध केले. कवितेचे वा कोणत्याही साहित्यकृतीचे ‘आकलन’ होण्यासाठी कविता/ कलाकृती अशा पद्धतीनेही ‘आकलून’ घेण्याची आवश्यकता असते, अशी वदिंची भूमिका होती.

मराठी समीक्षा ही निर्मितीक्षम लेखनाबरोबरच जगली, वाढली आहे. तिला फार मोठी परंपरा आहे. बदलत्या काळानुसार ती चैतन्यशील आणि समाधानकारक झालेली आहे. बरेचसे समीक्षक हे लेखकही होते म्हणूनच कदाचित असे घडले असेल. सौंदर्यशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनीही त्यांच्या समीक्षालेखनाने मराठीला योगदान दिलेले आहे. त्यासाठी सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक स्वरुपाचे मानसशास्त्री त्यांच्याच मदतीस आले आहे. प्रभाकर पाध्येंचा कोणत्याही बारीकशा गोष्टीतील ताणाचा अनुभव निश्चिततेकडे नेणारा असतो, हा विचार आणि दिलीप चित्रेंचा शब्द- वाक्य या संदर्भातील दृष्टीकोन, हे कलेच्या सैद्धांतिकतेसाठी मोठे योगदान आहे असे वदिंना वाटत असे. मराठी समीक्षेची वाटचाल क्षितिजे रुंदावण्याकडे चाललेली आहे असा आशीर्वाद ते प्रकट करतात.

वदिंच्या आस्वादनपर लेखनाला विज्ञानाचीही जोड होती. विज्ञानाकडून ते कलाशाखेकडे वळले. त्यांच्या एकूणच लेखनात विज्ञान – साहित्य, अध्यात्म यांचा सुरम्य संगम साधला गेला आहे असे दिसते. मात्र संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा आस्वाद घेताना त्यांची तत्त्वनिष्ठा गळून पडत असे. ‘चांगदेव पासष्टी आणि विज्ञान’ यावर दिलेल्या व्याख्यानाचा त्यांनी लेख तयार केला होता. वदिंचे पहिले पुस्तक (पुस्तिका) तर गॅलिलिओचे छोटेखानी चरित्रच आहे. (१९४८) अगदी १६ पानांचे. विज्ञान लेखक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास ललितलेखन, साहित्यकृतीचे आस्वादन वाङ्मयीन समीक्षा वाङ्मयेतिहासाचे संशोधन संत सारस्वताचे अभ्यासक, साहित्यविमर्शक व्याख्याने असा साहित्याच्या अवकाशात निर्वेधपणे सुरूच होता. गॅलिलिओने ज्याप्रमाणे दुबिर्णीतून आकाशातील ग्रहगोल न्याहाळले.. अवकाशाच्या गाभ्याचा शोध घेतला. तसेच वदिंनीही साहित्याच्या विराट अवकाशात, आस्वादनाला मनमोकळा पैस देत शांत संथ संयतपणे विमर्शकाच्या समतोल ज्ञानचक्षूंनी साहित्यकृतीचा मूलकंद न्याहाळला. त्याचीच तर आभा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विलसत राहिली होती! 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literary critic scholarly criticism marathi literature student dr kulkarni
First published on: 21-08-2022 at 00:02 IST