कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना स्त्रियांना येणारे अडथळे हे बाह्य़ परिस्थितीपेक्षा स्वत:च्या मर्यादा, परंपरा यांचे असतात. कुटुंबाला सर्वोच्च महत्त्व देण्याचे कारण पुढे करत स्वत:चा विकास, आर्थिक स्वावलंबन नाकारण्याची गरज नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन जोडीदाराच्या मदतीने उत्तम केले की करिअरमधील जबाबदाऱ्याही पेलता येतात व स्वत:च्या विकासाचा आनंदही घेता येतो, असे मत वेगळ्या वाटांवरचे काटे या सत्रात व्यक्त करण्यात आले.

धर्मात अधिक दुजाभाव

लग्न झाले आणि गोव्यातून मुंबईत आले. मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. पण त्यात मन रमत नव्हते. एक दिवस कचरावेचक महिलांशी संपर्कात आले. या महिलांशी संवाद साधताना कायद्याची खरी व्याख्या उमजली आणि वकिलीला कायमचा रामराम ठोकला. त्यानंतर आपसूकच ‘कोरो’ या संस्थेकडे वळले. सामाजिक क्षेत्रात घराबाहेर १६ तास काम करताना मुंबईत कमतरता जाणवत होती ती सार्वजनिक शौचालयांची. शहरे महिलांसाठीही पूरक असावीत यासाठी आवश्यक असलेल्या अनेक मुद्दय़ांपैकी एक मुद्दा शौचालयांचा आहे. मोफत, स्वच्छ शौचालये ही केवळ महिलांची गरज नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आवश्यक आहेत. २०११ पासून ‘राइट टू पी’ मोहिमेत समविचारी मैत्रिणींसह मी सहभागी झाले. सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे. पण तिचाच अभाव आहे. गेली तीन वर्षे या अर्थसंकल्पातील निधीचाही वापर करण्यात आलेला नाही. जेंडर बजेटच्या नावाखाली मुख्य अर्थसंकल्पाला गुलाबी, करडय़ा रंगाच्या पुरवण्या जोडल्या जातात. पण मुख्य अर्थसंकल्पातच स्त्रियांचा विचार करायला हवा, हा मूलभूत मुद्दाच लक्षात घेतला जात नाही. पण या आव्हानांमुळेच ही चळवळ अधिक सक्षमतेने पुढे जाईल.

सुप्रिया सोनार, समन्वयक  राइट टू पीआंदोलन

मालिकांऐवजी शेअर बाजाराकडे लक्ष द्या..

कुटुंबाकडे लक्ष द्यायचे होते म्हणून नोकरी करायची नाही, पण महिनाअखेरीस पैसे मिळायला हवे असे काही तरी करायचे ठरवले. शेअर बाजारातील व्यवहाराविषयी माहिती मिळाली आणि मग त्याचा अभ्यास सुरू केला. शेअर बाजार म्हणजे काय, रोख्यांचा व्यवहार कसा करावा, दलालांचे काम कसे चालते आदी बाबींचा बारकाईने अभ्यास केला आणि घरातूनच हा व्यवसाय सुरू केला. माहिती आणि तंत्रज्ञानामुळे घरबसल्या हा व्यवसाय करणे शक्य झाले. त्यानंतर इतर महिलांनाही शेअर बाजाराचे प्रशिक्षण देऊन सबल करण्याचे प्रयत्न ‘झेप उद्योगिनी’ उपक्रमातून सुरू केले. महिलांनी एकत्र येऊन उद्योग कसा करता येईल, उद्योगात होणाऱ्या चुका कशा सुधारता येतील याचा विचार करायला हवा. अनेक गृहिणी दूरचित्रवाहिन्यांवर केवळ मालिका पाहण्यात वेळ वाया घालवतात. त्याऐवजी त्यांनी शेअर बाजारविषयक कार्यक्रम पाहिले तर उत्पन्नाचे नवे साधन त्यांना मिळू शकेल. महिला-पुरुष यांच्या चढाओढीकडे मी फारसे लक्ष देत नाही, कारण त्याचा विचार करून माझे उत्पन्न वाढणार नाही. त्यामुळे महिलांनी काय करायचे ते त्यांनीच ठरवायला हवे.

पूर्णिमा शिरीषकर, विश्लेषक, भांडवली बाजार

जाहिरातीतील महिलांचा वापर खटकतोच..

जाहिरातींमध्ये पूर्वी स्त्रियांना उपभोग्य वस्तू म्हणून दाखवले जात होते. मात्र आता ही स्थिती बदलू लागली आहे. जाहिरातीत महिलांचा असा वापर मलाही खटकतो व वरिष्ठ पदाच्या अधिकारातून मी त्याला सतत विरोध करते. जाहिरात क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे, यामुळे येथे काम करताना महिलांना स्वत:ला सिद्ध करताना वागणुकीत आक्रमकता आणावी लागते. कामाकरिता रात्री उशिरापर्यंत थांबावे लागत असल्याने, तसेच जबाबदाऱ्यांच्या वाढत्या तणावामुळे महिला अनेकदा या क्षेत्रातून माघार घेतात. करिअर की कुटुंब यात त्या बऱ्याचदा कुटुंबाची निवड करतात. सुदैवाने ही संधी महिलांना असते, मात्र अशी संधी पुरुषांना कधीच मिळत नाही. अशा स्वरूपाची आव्हानात्मक नोकरी करत असतानाही, महिला नोकरीपेक्षा कुटुंब आणि मुलांचाच विचार जास्त करतात. हे नक्कीच त्यांच्या प्रगतीला मारक ठरते. सर्वाच्याच भविष्याचा विचार करत आपल्या आयुष्याची आखणी करण्याचा खोल विचार करण्याची वृत्ती पुरुषांमध्ये सहसा आढळत नाही. मात्र कुटुंबासाठी करिअर पणाला लावणे, हे योग्य नसून कुटुंब आणि करिअर या दोन्हींचा समन्वय साधणे गरजेचे आहे. कारण महिलांना त्यांच्या कामातून आत्मविश्वास मिळत असतो, तसेच कुटुंब आणि समाजात त्यांना प्रतिष्ठापण मिळते, घरातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांतही त्या सहभागी होऊ शकतात. कामात नवनव्या संधी उपलब्ध होत असताना, यातून या महिलांचा परीघ विस्तारत जातो.

प्रीती नायर, जाहिरातकर्मी

लहान वयातच महत्त्वाकांक्षा रुजवायला हवी

महिलांनी महत्त्वाकांक्षा बाळगावी, ती महत्त्वाकांक्षा महिलांना पुढे नेत राहते आणि जर महिलांना कोणतीही महत्त्वाकांक्षाच नसेल, तर मग महिला कारणे देत राहतील. मी व्यवसायाने एक संशोधक आणि जीवशास्त्रज्ञ आहे. अशा क्षेत्रांकडे महिला कमी का जातात, हा प्रश्न आहे. माझ्या आई-बाबांनी नेहमीच मला करिअरपासून ते नवरानिवडीपर्यंत स्वातंत्र्य दिले होते. मात्र आपण मुलींना लहानग्या वयातच त्यांच्या महत्त्वाकांक्षेशी तडजोड करायला शिकवतो. मला दोन मुलगे आहेत, त्यांना करिअर करण्यासाठी स्वयंपाकी, फुटबॉलपटू ते व्यवस्थापक अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, त्या मुलींसाठीही असतात का? मुलींच्या लग्नाचा विचार करताना, नेहमीच वयाने, शिक्षणाने, उंचीने मोठय़ा मुलांची निवड केली जाते. त्यामुळे महिलेला नवऱ्याच्या कामाच्या स्वरूपानुसार, ठिकाणानुसार स्वत:च्या कामांमध्ये बदल करावे लागतात.  कार्यक्रमांमध्ये व्यासपीठांवर पारितोषिके किंवा तत्सम वस्तूंची ने-आण करण्यासाठी महिलांनाच पुढे आणले जाते. आपल्या समाजात बहुतांश वेळा महिलांना शोभेची बाहुली म्हणून पाहिले जाते व मुलांवरही नकळत हेच संस्कार होतात. याला मी विरोध केला व आता आमच्या संस्थेत मुलगेही ही कामे करतात.    वरिष्ठ पदावर काम करीत असताना माझे अनेक कनिष्ठ सहकारी माझ्याशी संवाद साधताना अडखळतात. बऱ्याच पुरुषांना एक महिला आपल्याहून वरिष्ठ पदावर काम करते हा विचारच सहन होत नाही. मात्र या वेळी आपण आपले काम अधिक जोमाने करीत राहायला हवे.

शुभा टोळे, संशोधक, टीआयएफआर

महिलेने कर्तबगारीची छाप उमटविणेोाचे महिला आरक्षण आवश्यकच असून

तिने स्वबळावर आपल्या कामगिरीची छाप उमटविली पाहिजे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षीय भेद विसरून महिला लोकप्रतिनिधींना एकत्र आले पाहिजे. महिलांनीही निर्भीडपणे आवाज उठविला पाहिजे. अधिकाधिक महिला राजकारणात पुढे आल्या, तर देश बळकट होईल आणि लोकशाही अधिक सुदृढच होईल.

महिलेने कर्तबगारीची छाप उमटविणे महत्त्वाचे

महिला आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची संख्या वाढली आहे. पण आरक्षणाची सक्ती असल्याने कोणाची तरी पत्नी, मुलगी, बहीण म्हणून तिचे अस्तित्व असू नये. तिला संधी मिळाल्यानंतर तिने आपली कर्तबगारी दाखवून आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे. तिचे स्थान हे तिच्या ताकदीवर असले पाहिजे.

महिलेच्या हाती ‘पाळण्याची दोरी’ असे नेहमी म्हटले जाते. ते गौण मानायचे कारण नाही. तिच्या हाती दोरीबरोबरच संगणकाचा ‘माऊस’ही असला पाहिजे. अगदी सर्व प्रकारची वाहने चालविण्याबरोबरच कोणतेही काम जमले पाहिजे. सर्वच क्षेत्रांत महिलांनी कर्तबगारी व चमकदार कामगिरी करून दाखविली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला कुटुंबाची जबाबदारीही महत्त्वाची असते. पण घरच्या जबाबदारीचा कोणताही बाऊ न करता ती पुरुषांनीही वाटून घेतली पाहिजे. त्यांच्या नात्यामध्ये कृत्रिमपणा नाही, तर सहजता असली पाहिजे.  लहान मुले किंवा महिलांवरील अत्याचार, महिलांचे आरक्षण, महिला पोलीस किंवा अन्य महिलांच्या प्रश्नांवर महिला लोकप्रतिनिधी पक्षीय भेद विसरून एकत्र आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे देशहिताच्या महत्त्वाच्या बाबींवर राजकारण बाजूला ठेवून सर्वानी एकत्र आले पाहिजे.

मेधा कुलकर्णी, आमदार, भाजप

महिला आरक्षण महत्त्वाचे

समाजकारण करीत असताना मी राजकारणात आले. मला समाजकारणच अधिक भावते व तेच मी कायम करीत राहणार आहे. महिलांना सक्षम करणे आवश्यकच असून त्या दृष्टीने आरक्षण हे महत्त्वाचे आहे. महिला अधिकाधिक संख्येने राजकारणात आल्या, तर लोकशाही अधिक सशक्त होण्यास मदत होईल. शेजारच्या अन्य देशाप्रमाणे आपल्या देशाची अवस्था होऊ नये. महिला पुरेशा सक्षम झाल्यावर अनेक वर्षांनी आरक्षणाची गरज न वाटल्यास ते टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यास हरकत नाही. मात्र सध्या तरी त्याचा आधार घेऊन महिला पुढे येत आहेत. महिलांच्या प्रश्नांवर पक्षीय भेद विसरून एकत्र आले पाहिजे. अन्य पक्षातील आमदार-खासदारांशी वैयक्तिक मैत्री आहेच. पण काही वेळा पक्षीय धोरणे आड येतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट लादणे चुकीचे आहे. अनेक महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या निर्णयाचा फटका त्यांना बसू शकतो. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळण्यासाठी सर्वच पातळ्यांवर पावले टाकली गेली पाहिजेत. कुटुंबामध्ये आईवडिलांनी मुलगा व मुलगी यांच्यामध्ये भेद न करता त्यांचे संगोपन केले पाहिजे. मुलींच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, शारीरिक व मानसिक स्वरूपाच्या कौटुंबिक िहसाचाराला तोंड द्यावे लागते. यासह अगदी छेडछाड, टोमणे मारणे, विनयभंग आदी सर्व घटनांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे.

प्रणीती शिंदे, आमदार, काँग्रेस

राजकारण वाईट क्षेत्र नाही

राजकारण हे महिलांसाठी किंवा चांगल्या लोकांसाठी वाईट क्षेत्र असल्याचे समजले जाते. पण ते खरे नाही. आपलं घर अस्वच्छ झालं की स्वच्छ करण्याची जबाबदारी आपल्यावरच असते. राजकारणातही साफसफाई करण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांकरिता भांडता भांडता माझाही राजकारणात प्रवेश झाला. आपल्या लोकप्रतिनिधी असण्याचा ढिम्म प्रशासनाला हलविताना उपयोग होतो. परंतु, लोकप्रतिनिधीला लोकांचे प्रश्न माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातली कामे बाजूला ठेवून काम करण्याची तयारी ठेवावी लागते. घरच्यांचे पाठबळ असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. महिलांनी राजकारणात यावे, यासाठी विविध व्यासपीठांवर आवाहन होत असले तरी ते तेवढे सोपे नाही. कारण, निवडणूक लढविणे कठीण आहे. परंतु, त्याहून अधिक राजकीय पक्षाचे तिकीट मिळविताना दमछाक होते. कोटय़वधी रुपये निवडणूक काळात खर्च केले जातात. चांगले लोक राजकारणात आले तर हे दुष्टचक्र मोडून काढणे शक्य आहे. आरक्षणामुळेही महिलांचा राजकारणातील प्रवेश सोपा झाला आहे. लोकांचे प्रश्न महिलांना चांगले कळतात. त्यासाठी आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या प्रश्नाशी आत्मीयता बाळगणे आवश्यक आहे.

विद्या चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>