scorecardresearch

सत्ताधीशांची छाया कलावंतावर पडता नये

भरभरून प्रेम करणारा प्रेक्षकरूपी ‘समाज’ त्याच्या पाठीशी आहे.

सत्ताधीशांची छाया कलावंतावर पडता नये

‘कलावंत की कवडे?’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले मत.

कलावंत नेहमीच्या प्रापंचिक व्यवहारापेक्षा वेगळे असे जे काही करत असतात, ती कला असे आपण मानतो. खरेतर आपल्यातील प्रत्येक जण दैनंदिन व्यवहारातसुद्धा अनेकदा कलावंताप्रमाणे वागत असतो. हे स्पष्ट करताना प्रसिद्ध कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ इरविन गौफमैन आपल्या लोकपद्धतीशास्त्रज्ञ सांगतो की, प्रत्येक व्यक्ती स्वत:मध्ये एक कलावंत असतो. ‘आपण सर्व कलावंत आहोत.’ परंतु तरीसुद्धा सच्च्या कलावंताकडे मात्र आपल्या नजरा खिळलेल्या असतात. कारण एकूण आपण त्यांचेच काय ते अनुकरण करत असतो. हा सच्चा कलावंत पडद्यावर आपली भूमिका निभावताना आपली विशिष्ट-सकारात्मक प्रतिमा प्रेक्षकांवर पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपली प्रत्येक भूमिका निभावताना तो चेतन असतो. हाच जागृत कलावंत आज प्रेक्षकांना आपल्या भिडस्त भूमिकेने बेसावध भासणे साहजिक आहे. तेव्हा या कलावंतास याची जाणीव असायला हवी की, त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा प्रेक्षकरूपी ‘समाज’ त्याच्या पाठीशी आहे. तेव्हा कलावंताने आपल्या मनातील भीतीच्या दालनाला खाली पाडावे..आणि आता तरी हिमतीच्या बाल्कनीतील पडदा उघडावा..प्रेक्षक ‘समाज’ म्हणून त्याच्या भूमिकेत विलीन होईल. कारण कलावंत भीतीस पात्र नाही. अन्यथा त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारा, आधीच लोकशाहीत कधी कधी हिटलरशाहीची चुणूक अनुभवणारा समाज भीतीपोटी शांत/अबोल होईल. पहिलेच आज समाजातील बोलणाऱ्यांची संख्या रोडावलेली आहे. त्यात १०० टक्क्यांतील फक्त एक टक्का असलेला निडर सामाजिक वर्ग जो या ९९ टक्के समाजाचे प्रतिनिधित्व करतो, तो कोसळून पडेल.म्हणून कलावंताने प्रेक्षकांच्या प्रेमापोटी तरी निर्भयपणे बोलायला हवे. घाबरलेल्या समाजाला भीतीच्या भ्याड अंधारातून, निर्भयतेच्या प्रकाशाकडे आणण्याचा निदान प्रयत्न तरी कलावंताने करायला हवा. याआधी कुणी असा प्रयत्न केला आहे का, याचा मागोवा घ्यायचा असल्यास बघावे ते, ‘केरळ चित्रपट महोत्सवा’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज यांनी कलावंतांच्या बौद्धिक अंधारावर टाकलेला प्रकाश. ही त्यांची भूमिका स्वागतार्थच. तसे दक्षिण भारतीय प्रकाश राज हे पडद्यावरील उत्तम खलनायक. कधी जयकांत शिकरे (सिंघम)म्हणून नकारात्मक भूमिका केली, तर कधी गनीभाई(वाँटेड)म्हणून. परंतु चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावतात, म्हणून वास्तवातही खलनायकच असतील असे नाही. प्रत्येक कलावंत हा मंचावर भासतो, तसा बॅक स्टेजवरही असेलच असे नाही. राज पडद्यावरील खलनायक म्हणून भूमिका निभावणारे, वास्तव जीवनात मात्र एक जाणीवपूर्वक सहृदय व्यक्तिमत्त्व. ते यासाठी कारण पत्रकार यांची हत्या असो, वा या चित्रपटाबाबत आपली भूमिका मांडणे असो. सांस्कृतिक दहशतवाद, चित्रपटबंदी यांवर आजतागायत ते सरकारशी, व्यवस्थेशी संघर्ष करू पाहत आपली भूमिका जाणीवपूर्वक, निर्भीडपणे मांडत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकांची तशी कमतरता नाही. आदित्य पांचोली, अमरीश पुरी, अनुपम खेर ते सोनू सूदपर्यंत अनेक खलनायकांचा वारसा हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेला. परंतु आपल्या चित्रपटसृष्टीसोबत समाजसृष्टी, व्यवहारसृष्टीला जागे करण्याचे कार्य आज कुणी केले, तर ते प्रकाश राज यांनी, हे विशेष कौतुकास्पद. जमिनीवर उगवून आकाशापर्यंत पोहोचलेले आणि तरीही मुळाशी घट्ट बांधून राहिलेले नायक, खलनायक, नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना (नाना पाटेकर) ही यातच मोडतात. मराठी चित्रपटसृष्टीतही असे अनेक नकारात्मक भूमिका करणारे खलनायक आहेत. अगदी निळू फुले, सदाशिव अमरापूरकर ते जितेंद्र जोशी, मिलिंद गुणाजी, सुबोध भावेपर्यंत. परंतु सद्य:स्थिती पाहता मराठी कलावंत कदाचित सुन्न अवस्थेत आपल्याच भावविश्वात रममाण आहेत, असे वाटते. अन्यथा गोव्यातील ४८व्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’(इफ्फीत) पैनोरमा विभागात रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा चित्रपट वगळण्यात येतो. तरीही मराठी कलावंत मात्र वैयक्तिक नाही, तर निदान सामूहिक एल्गार पुकारणेही शक्य नाही. ही शरमेची बाब. मराठी संस्कृतीचा गवगवा करणारे मराठी कलावंत आपल्या विचार आणि अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या मुस्कटदाबीचे त्यांचे हे वर्तन मराठी संस्कृतीला काळिमा फासणारे. या बुद्धिजीवी कलावंतांना (मराठी, हिंदी, मल्याळम,बंगाली आणि अन्य सर्वभाषिक) जाणीवपूर्वक आपली परखड मते, विचार, चर्चा, योग्य दृष्टिकोन समाजासमोर ठेवून आपली स्वत:ची स्वतंत्र सामाजिक भूमिका जपायला हवी. यास सध्या विदारक, लाजिरवाणे आणि सत्त्वाची चाड नसलेले, भासणारे, मराठी कलावंतही अपवाद नाहीत. याच इफ्फीत सनलकुमार शशिधरन यांचा मल्याळी भाषेतील ‘एस दुर्गा’ हा चित्रपटसुद्धा वगळण्यात आलेला होता. परंतु शशिधरन यांनी सरकारविरोधात केरळ हायकोर्टात घेतलेली धाव आणि त्यांच्या अविरत संघर्षांने, अंतत: केरळ उच्च न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित करावा, असा स्पष्ट आदेश दिला. हा फक्त त्या चित्रपटाचा विजय नाही, तर कन्नड, मल्याळम, तेलुगू भाषा कलावंतांचा, आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावणाऱ्या भाषिक कलावंतांचा तो विजय. तेव्हा मराठी भाषिक कलावंत मागे का पडतो? हा प्रश्न उभा राहतो. एस दुर्गा, पद्मावती, देशभक्त नथुराम गोडसे या चित्रपटावरून सुरू असलेले वाद हे काही आपल्या चित्रपटसृष्टीला नवीन नाही. याआधीही असल्या वादग्रस्त स्थितीला आपण सामोरे गेलेलो आहोत.

ऑस्करसारख्या पुरस्कारांना आपण मुकतो, याचे कारण हीच सद्य:परिस्थिती आहे. हे इथपर्यंत तर ठीकच. पण कलाकारांना, दिग्दर्शकांना जिवे मारण्याची धमकी देणे ही अगदी किळसवाणी व खंताची बाब म्हणावी लागेल. मग कुठलाही भांडवलदारवर्ग (मार्क्‍सच्या भाषेत)असो-करनीसेना, शिवसेना, बजरंग दल किंवा अन्य कुणीही. असले दडपशाहीचे वर्तन पुढे हिटलरच्या फॅसिझमवादाला जन्म देते आणि मग ही लोकशाही, की हिटलरशाही हे पुन्हा एक प्रश्नचिन्ह!कदाचित चित्रपट हे कलेचे आणि मनोरंजनाचे एक साधन आहे हे आपण विसरून गेलो, असे दिसून येते. परिणामी, चित्रपटामध्ये रस असणारे, दिग्दर्शनाकडे किंवा अभिनयाकडे वळणारे तरुण या अशा वादामुळे यांत करिअर करण्यास धजावेल की धास्तावेल हे पुन्हा एक प्रश्नचिन्ह! म्हणून कलावंताने आपल्या पुढील पिढीचा आदर्श बनण्यासाठी तरी निर्भयपणे तोंडउघड करावी. त्यासाठी त्याला कुणाच्या मदतीची वा सहकार्याची गरज नाही, कारण भारतीय संविधानाच्या कलम १९(क) ‘भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा’ मूलभूत हक्क संविधानाने आपल्याला देऊन आपली पाठराखण केलेली आहे हे कलावंताने लक्षात घ्यावे. कोणत्याही सत्ताधीशाचे उसने आपल्यावर न ठेवता आपल्या विचारी दृष्टिकोनातून निर्भीड भूमिका निभावावी. आणि या व्यवस्थेस आपल्यापरीने वैचारिकदृष्टय़ा प्रगत करून पाहावे. तेव्हाच कलावंत हा परावर्तित होईल, कवडय़ात न मोजता सच्च्या कलावंतांच्या गिनतीत गणला जाईल. सरतेशेवटी, वैचारिक मुस्कटदाबीच्या विरोधात बुद्धिजीवी कलावंत म्हणून एल्गार पुकारेल. आपल्या मनातील भिंतीच्या दालनाला कोसळवून हिमतीच्या बाल्कनीत येईल.

(जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा)

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या