‘बनावटांचा बकवाद’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

फुगाते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळे  नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हवा निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली  तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काय काम? अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे संत तुकारामांनी ‘बकवाद’ करणाऱ्या ‘बनावटां’ना दिलेला हा इशारा आजही तितकाच लागू होतो. भारतामधील संशोधनांचा, संशोधन-प्रकाशनांचा सुमार दर्जा उघडा पाडणारा आणि एकंदर भारतीय सामाजिक-शैक्षणिक ‘नेचर’वर प्रकाश टाकणारा ‘बनावटांचा बकवाद’ हा ‘लोकसत्ता’चा अग्रलेखही धक्कादायक म्हणावा असा बिलकूल नाही. कारण ‘नोकरी’-‘छोकरी’साठी ‘डिग्री’ आणि त्यासाठीच ‘शिक्षण’, ‘मूलभूत संशोधनाऐवजी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लठ्ठ पगार घेत ‘प्रोग्रामिंग’मध्ये मेंदू झिजवणारे ‘प्रज्ञावंत’, केवळ संविधानाच्या उद्दिष्टांची शोभा वाढविणारा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’, उदासीन व्यवस्था आणि शिक्षणाचे ‘बात्रानुकरण’ करू पाहणारे सरकार, गणपतीची प्लास्टिक-सर्जरी ते राष्ट्रीय विज्ञान संस्थेत व्याख्यान देणारे शंकराचार्य, मूलनिवासी ते साम्यवादी आणि सनातनी ते इस्लामिक मूलतत्त्ववादी याच ‘वादां’मध्ये अडकलेली ‘युवा’ पिढी हे सगळं चित्र रोजच समोर असताना, शाळेतला पर्यावरणाचा प्रकल्पही ‘कॉपी-पेस्ट ’ करणाऱ्या आम्हा भारतीयांकडून काही मूलभूत सोडाच किमान संशोधन व्हावं ही अपेक्षा करणे म्हणजे रेडय़ाकडे दूध मागण्यासारखे आहे.

कठोर कायदे करून वा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पदोन्नतीसाठी संशोधनाची अट रद्द करून वा पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे शिकविणारे आणि संशोधन करणारे स्वतंत्र प्राध्यापक नेमून संशोधनाचा दर्जा सुधारेल, असा खोटा आशावाद निर्माण करून त्यात रमण्याचेदेखील काहीच प्रयोजन नाही. शालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे इत्यादी आदर्शवादी विचार केवळ आपला ‘बुद्धिजीवी कंडू’ शमविण्यासाठी वैचारिक भाषणे ऐकून स्वत:ला इतरांहून शहाणे समजणाऱ्या आणि आपल्याच रंगाच्या चष्म्यातून जग न्याहाळणाऱ्या विशिष्ट-‘हुच्च’ लोकांच्या चर्चा-संमेलनापुरतेच मर्यादित  ठरतात. कारण आम्ही भारतीय सर्वच उदात्त-उन्नत-उत्तम गोष्टींचे मातेरे करण्यात पटाईत आहोत. प्रत्येक गोष्टीत सोय आणि पळवाट शोधण्याची मानसिकता बदलत नाही, तोवर बाकीचे सर्व उपाय वरवरची मलमपट्टी ठरतात. न्यूटन-आईन्स्टाईन-एडिसनला कोणी शाळेत/महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला होता का? गॅलिलिओ आणि कोपर्निकसला कोणी शिष्यवृत्ती दिली होती? रामानुजम, आर्यभट्ट वगैरे कोणती सेट-नेट उत्तीर्ण झाले होते? हे सारे महान संशोधक तत्कालीन धर्ममरतड, रूढी-परंपरा, आर्थिक-सामाजिक परिस्थिती यांच्याशी झुंजत घडले. कारण त्यांच्या संशोधनामागे ‘जिज्ञासा’ हीच मुख्य प्रेरणा होती. संशोधक घडण्यासाठी जिज्ञासेला ‘बंडखोरी आणि चिकित्से’ची जोड मिळावी लागते. बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात. टाकाऊ  वस्तूंपासून प्रयोगशाळा उभारून जागतिक दर्जाचे संशोधन करणारे ‘काव्‍‌र्हर’सारखे प्राध्यापक निर्माण करणे हे खरे आव्हान आहे. ‘तोत्तोचान’ला घडविणारे ‘कोबायाशी’ आधी निर्माण करावे लागतील. ‘याच’ व्यवस्थेतून शिकलेल्या, घडलेल्या लोकांकडून ‘ही’ व्यवस्था बदलवण्याची अपेक्षा ठेवणे काही गैर नाही, पण बदलांचा मार्ग ‘त्याच’ व्यवस्थेने निर्माण करणे म्हणजे ‘गुटखासम्राटाने कॅन्सरचा दवाखाना चालवण्यासारखे आहे’.

सरकारने सुरू केलेल्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांचे रूपांतर हळूहळू पूर्वीप्रमाणेच कागद रंगविण्यात होण्याचा आजवरचा अनुभव आहे. यासाठी समाजाची मानसिकता घडविणाऱ्या साहित्यिकवर्गाकडे आशेने पाहावे तर साहित्यचौर्याचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. थोडक्यात व्यवस्थेच्या परिणामांतून कोणीही मुक्त नाही. सारेच चोर मग कोतवाल कोण? म्हणूनच सामजिक बदलासाठी व्यवस्था घडविणाऱ्या घटकांचा शोध घेऊन विविध स्तरांवर मुळापासून समांतर सुधारणा करणे आवश्यक असते. कोणत्यातरी एकाच घटकावर सारी जबाबदारी ढकलून आरोप-प्रत्यारोपांचा औपचारिक खेळ करण्यापेक्षा प्रत्येकाने शक्य तितका हातभार लावायला हवा. अंधार दूर करण्यासाठीचा प्रकाश हा अंधारातूनच जन्मतो. जगभरातील नामंकित संशोधक आणि संशोधन संस्था घडण्यामागे राजकीय-सामजिक-आर्थिक अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितींचा अदृश्य हात होता. त्यांच्या प्रेरणा परीक्षेत गुण मिळवण्याहून अधिक श्रेष्ठ होत्या, वस्तुनिष्ठ नव्हत्या. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संशोधन मागे पडण्यामागे संशोधनाला जनाधार नसणे हे सर्वात प्रमुख कारण आहे. ‘सृजनासाठी’ सर्वानाच फार मोठी ‘किंमत’ मोजावी लागते, ती किंमत मोजण्याची तयारी आपल्यात नाही. एखाद्या कलेसाठी अथवा संशोधनासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्यांना सन्मान आणि आधार देण्याकरता केवळ सरकार पुरेसे नसते. अशा संशोधकांच्या ‘वेडेपणा’ला स्वीकारणारा समाज घडवायला हवा, साहित्यिकांनी काही करावयाचे झाल्यास हे करावे. संशोधनाचे यशस्वी-अयशस्वी या दोनच टोकाच्या परिमाणांनी भौतिक द्वंद्ववादी मूल्यमापन करण्याची पद्धत बदलायला हवी. कारण परीक्षेत विद्यार्थी मौज म्हणून नक्कल करत नाही तर यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा त्याला नक्कल करण्यास भाग पाडते. वास्तवादी अस्सल दर्जेदार संशोधनाला आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रेरणा देण्यासाठी, यशस्वी-अयशस्वी या दरम्यानच्या असंख्य शक्यतांचे सहअस्तित्व स्वीकारणारी मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ आजच्या शिक्षण व्यवस्थेने ठामपणे घ्यायला हवी. तरच ‘बनावटांचा बकवाद’ थांबून ‘नव्या युगाचे सृजनगीत’ ऐकायला मिळेल. अर्थातच एका रात्रीत चमत्कार होऊन ही परिस्थिती बदलणार नाही, पण म्हणून निराश होण्याचेदेखील कारण नाही. “Start from where you are, whatever you have, what you know, what you are. Make something of it and never get satisfied until you achieve Excellencyl.”

(डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे)