विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉग बेंचर्स या स्पध्रेत चौथ्या आठवडय़ात ‘हुतात्मा मारुती कांबळे’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली होती. यावर शेकडो विद्यार्थ्यांनी आपली मते नोंदविली. यापैकी शीव येथील एसआयईएस महाविद्यालयातील शालिनी शिरसाट या प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले विचार.
स्वप्नपूर्ती करताना जरी ९९.९% जणांची दमछाक होत असली तरी ‘रोहित वेमुला’ हा त्यातला नक्कीच नव्हता. नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवून ‘यूजीसी’ आणि ‘सीएसआयआर’सारख्या दोन्ही प्रकारच्या शिष्यवृत्त्या मिळवून रोहितने स्वत:ची हुशारी व क्षमता दाखवून दिली होती. मग अशा या विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ का यावी? आणि ती येईपर्यंत आपण सर्वानी ‘बघ्याची’ भूमिका घेणे हे कितपत योग्य? स्वत:चे वेगळे मत नोंदवणे हा गुन्हा की दलित असणे हा गुन्हा? यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे.
याकूब मेमनच्या फाशीबद्दल स्वत:चे वेगळे मत मांडणे हा देशद्रोहीपणा असेल तर कित्येक जणांनी हा देशद्रोहीपणा केला होता; परंतु त्यांच्या वाटेला नाही आले रोहितइतके सोसणे. यानंतर रोहितची स्कॉलरशिप देताना जाणीवपूर्वक करण्यात आलेली दिरंगाई आणि त्याच्या समवेत त्याच्या सहकाऱ्यांचे करण्यात आलेले निलंबन हे विद्यापीठ आणि प्रशासनाची जातीयवादी मानसिकताच दर्शवते. यानंतर प्रश्न केले गेले ते त्याच्या दलित असण्यावर वा नसण्यावर. त्याने मृत्युपत्रात कोणवरही दोषारोपण न करता, लिहिलेल्या भावनिक आशयावरून तर एका प्रख्यात इंग्रजी दैनिकाच्या अग्रलेखामध्ये तो मानसिक रुग्ण असण्याची शंका व्यक्त केली आहे. काही जणांनी तर चक्क त्याच्या आत्महत्येवरच प्रश्न उठवले. त्यांच्या मते रोहित हा त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी होता, ज्यांनी त्यांच्या खडतर जीवनात न डगमगता वाट शोधली, ज्यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा मूलमंत्र सांगितला. त्यामुळे रोहितची आत्महत्या ही आत्महत्या नसून ‘खून’ असण्याचा दावा काही लोक करत आहेत. रोहितची ही घटना जणू दलितांना चेतावणीच आहे की त्यांनी स्वत:ची हद्द सोडून वागू नये अन्यथा त्यांना देशद्रोही ठरवून दुसरा ‘रोहित वेमुला’ तयार करण्यात येईल. भारतात केवळ जातीयतेलाच कंटाळून कित्येक विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. व्यवस्थेला अजून किती बळी हवे आहेत? ज्या देशातील काळाचे व सरकारचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले असतात त्या देशाचे भवितव्य हे अंधकारमय असते आणि अशी परिस्थिती सरकारला हादरावून टाकणाऱ्या उद्रेकासाठी कारणीभूत असते. माझा ‘अभविप’सारख्या संघटनांना विरोध नाही कारण त्यामध्येसुद्धा विद्यार्थीच आहेत, त्यांच्या विचारांना खतपाणी घालणाऱ्या सरकारला व विद्यापीठांना माझा विरोध आहे. सर्वात दुर्दैवी बाब तर ही होती की, सरकारच रोहितसोबत होत असणाऱ्या अन्यायाबाबत सोयीस्कररीत्या कानाडोळा करत होतं आणि कुठे तरी त्यांच्याच प्रभावाखाली रोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आलं. हे कितपत न्याय्य आहे? एकीकडे सबका साथ सबका विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे सामाजिक बहिष्कृततेच्या प्रथा शिक्षण क्षेत्रात राबवायच्या. आरक्षणाला विरोध नाही म्हणायचे आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचा आग्रह धरायचा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस कात्री लावायची आणि शिक्षणक्षेत्रात गुंड संघटना वाढवून विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करायची. आपणच म्हणतो की विद्यार्थ्यांनी चौकस बुद्धीने विचार करावा, त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातही रस घ्यावा आणि असे केल्यावर मात्र फळ काय मिळते? एखाद्यास आत्महत्येस प्रवृत्त करेल इतका छळ? हा किती विरोधाभास आहे की ज्या वर्षी जवखेड येथे एका प्रेम करणाऱ्या युवकाचा केवळ तो ‘दलित’ आहे म्हणून खून केला जातो त्याच वर्षी ‘फॅन्ड्री’सारख्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होतो. आज कुठे तरी परेश रावलचे ‘ओह माय गॉड’ चित्रपटातील ‘धर्म एक तो इन्सान को लाचार बना देता है या फिर आतंकवादी!!’ हे वाक्य सत्यात उतरताना दिसते. चंद्रशेखर आजाद इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या कचाटय़ात सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून ते शहीद झाले. आजाद यांची ती आत्महत्या नव्हे तर बलिदान होते. रोहितनेही तेच केले. ‘रोहित वेमुलानेही बलिदानच दिले.’ खेदाची बाब तर ही आहे की, आजसुद्धा आपल्याला जाग येण्यासाठी कोणाच्या तरी बलिदानाची गरज लागते. यातूनदेखील व्यवस्थेला जाग आली नाही तर ते नक्कीच लज्जास्पद असेल. आधीही कित्येक रोहित होऊन गेले आणि पुढे ही व्यवस्था किती बनवेल याचा अंदाज नाही; परंतु रोहितचे बलिदान व्यर्थ जाणार नाही हे सध्याच्या वातावरणातून वाटते, कारण आम्हासही आता कळून चुकले आहे की ‘राख ही केवळ शरीराची होते. विचारांची, आदर्शाची, इच्छांची राख करणारा अग्नी अजून जन्मला नाही.’ माझ्या विद्यार्थी मित्रांना माझे हेच सांगणे आहे की, त्यांचा आदर्श हा कोणताही महापुरुष असण्यापेक्षा त्या महापुरुषाचे विचार व वागणे असावे. सर्व महापुरुषांनी स्वत:ला संपवण्यापेक्षा वाटेतील अडचणींना संपवण्यात श्रेष्ठत्व मानले. आपणसुद्धा जर याच गोष्टीला श्रेष्ठत्व देऊ तर नक्कीच तरुणांच्या ताकदीने बनलेला एक समर्थ भारत बनवू शकू.




शालिनी शिरसाट