गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया.. चौसष्ट कलांचा अधिपती अशी ख्याती असलेला गणपती कलाकारांच्या घरी विराजमान झाला आहे. करोनाचे सावट गणेशोत्सवावर असले तरीही गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. यानिमित्ताने मुंबईच्या चाळसंस्कृतीतील गणेशोत्सवाचे वातावरण, बालपणीचे किस्से याविषयी सांगत आहे अभिनेत्री प्रिया बापट..

* गणेशोत्सवाशी तुझे नाते काय?

गणेशोत्सवातील स्पर्धामध्ये सादरीकरण केल्याने माझ्यातील अभिनय गुण वाढीस लागले. तेथील स्पर्धामध्ये मी सर्वप्रथम बक्षीस पटकावले होते. याचबरोबर सभाधीटपणा, खिलाडूवृत्ती यामुळे माझा सर्वागीण विकास होण्यास मदत झाली. बापटांचा गणपती कोकणात असल्याने मी चाळीतील सार्वजनिक गणपतीची आतुरतेने वाट पाहात असे.

* गणेशोत्सवाची काय आठवण सांगशील?

आमची दादरची चाळ हे एक कुटुंबच होते. तेथे प्रत्येकाच्या घरी गणपती बसायचे. महाआरती झाल्यावर सर्वाना पोटभर प्रसाद मिळायचा. त्यामुळे माझे रात्रीचे जेवण तिकडेच होत असे. गणेशोत्सवात तालासुरात आरती म्हणणे हा एक सोहळाच होता. आरतीला चाळीतील पन्नास ते साठ लोक यासाठी एकत्र जमत असे.

* करोना काळातील गणेशोत्सवाबद्दल काय सांगशील?

करोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध आले आहेत. यंदा सुरक्षेचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करणे सर्वाच्या हिताचे आहे. यंदा गणेशभक्तांनी जबाबदारी आणि सामंजस्याने वागल्यास पुढील वर्षी गणोशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेले निर्णय स्तुत्यच आहेत.

* येत्या काळात तुझ्या कोणत्या कलाकृती येणार आहेत का ?

टाळेबंदीच्या काळात मी घरातूनच अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले आहे. सध्या तरी माझ्या कलाकृती येणार नाहीत.