सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीचे नाव घेतल्यावर भल्याभल्या राजकारण्यांच्या काळजात धस्स होते. चौकशीसाठी आता याला पाचारण करणार, त्याच्यावर बालंट कोसळणार, असे भाजपचे काही उत्साही नेते जाहीर करतात आणि बहुतेक वेळा तसे होतेही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ईडीच्या नव्या धमकीमुळे सारेच अचंबित झाले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होऊ लागली आहे. निवडणूक म्हटले की मतदारांना आकर्षित करण्याचे ‘नामी प्रयोग’ केले जातात. त्यात ‘ लक्ष्मीदर्शन ’ हा प्रामुख्याने नजरेत भरणारा प्रकार. या निवडणुकीत डिजिटल पेमेंट द्वारा ‘ लक्ष्मीदर्शन ’ होईल असे भाजपला वाटत आहे. त्यातूनच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ पैसे कोणी वाटले, त्याने ते कुठून आणले याची तर चौकशी होईलच, पण पैसे घेणाऱ्या मतदारांचीही ईडीकडून चौकशी होईल; तेव्हा सावध राहा, असा सावधानतेचा इशारा जाहीरपणे दिला आहे. थोडक्यात काय भाजपच्या मनासारखा निकाल लागला नाही तर निवडणुकीनंतर सक्तवसुली संचालनालयाला सामान्य नागरिकांचीही चौकशी करणार तर. चंद्रकांतदादांच्या या धमकीचा मतदारांवर उलट परिणाम तर होणार नाही ना, ही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटणारी भीतीही रास्तच आहे. राष्ट्रवादीचा ‘अलार्म’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती जिल्ह्यात चांगली कामगिरी करण्यासाठी धडपडतोय. पण, सूर गवसलेला नाही. किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी सन्मानजनक संख्या हवी, हे सर्वावर दडपण. त्यातच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी गावभेट, प्रभाग भेटीचे कार्यक्रम आखले जावेत. त्याची छायाचित्रे जिल्हाध्यक्षामार्फत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहचावेत, हे आदेश. इथे कडक उन्हाळा. लोकांना गोळा करणे महाकठीण काम. जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकाही लांबणीवर पडलेल्या. अशा स्थितीत तालुकाध्यक्षांवर किती ताण आलेला, याचा अंदाज बांधता येऊ शकेल. आता तर पक्षाचे प्रमुख शरद पवार हे संवाद बैठकीसाठी अमरावतीत येताहेत म्हटल्यावर प्रत्यक्ष काम करावे लागणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पश्चिम विदर्भात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न चालवलले असताना पक्षाचे चिन्ह घडाळय़ाचा अलार्मह्ण किती कार्यकर्त्यांना जागे करणार, याची उत्सुकता मात्र ताणली गेलीय. फोटोचा अनुशेष दूर .करोनामुळे दोन वर्षांहून अधिक काळाच्या अनिश्चिततेच्या वातावरणातून बाहेर पडताना यंदाच्या गुढीपाडव्याने मनाला पुन्हा उभारी दिली. सार्वजनिक कार्यक्रमांची रेलचेल पुन्हा सुरू झाली. सार्वत्रिक कार्यक्रम म्हटले की फोटोजीवी मंडळींना अच्छे दिन आले म्हणायचे. सोलापुरात अशाच एका फोटोजीवीने आपल्या लौकिकाप्रमाणे गेल्या दोन वर्षांचा अनुशेष भरून काढायचा होता. झाले असे की, पुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार िशदे, भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी आदी नेते मंडळी एकत्र आली होती. त्यात मूळचा भाजपच्या आणि नंतर राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा भाजपमध्ये परतलेल्या एका माजी आमदाराला कॅमेऱ्यात स्वत:ची छबी दिसण्यात आनंद वाटतो. या महाशयांनी प्रमुख पाहुण्यांच्या पुढे येऊन स्वत:ची छबी कैद होईल अशी व्यवस्था केली. छायाचित्रांचा दोन वर्षांचा अनुशेष अशा पद्धतीने भरून काढला. त्रासदायक ठरणारी जोडपी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात दोन जोडपी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहेत. यातील एक जोडपे म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा. दुसरे जोडपे अमरावतीच्या काँग्रेस पक्षाच्याच आमदार सुलभा खोडके आणि त्यांचे पती व राष्ट्रवादीचे विभागीय संघटक संजय खोडके. राणा कुटुंबीय किमान भाजपच्या जवळ गेलेले. पण खोडके कुटुंबीय हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे. खासदार आणि आमदार सातत्याने पालकमंत्र्यांना लक्ष्य करीत असतात. त्यातून यांना उत्तरे देण्यातच पालकमंत्र्यांचा अधिक वेळ जातो. (सहभाग : दयानंद लिपारे, मोहन अटाळकर, एजाज हुसेन मुजावर)