केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची गेल्या आठवडय़ात सांगलीमध्ये गाडगीळ सराफी पेढीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेला किस्सा अनेकांच्या डोळय़ांत अंजन घालणारा ठरला. मंत्री झाल्यानंतर अनेक जण ओळख काढीत जवळ येतात, कामासाठी आले तर त्यात वावगे वाटायचे काहीच कारण नाही. मात्र, मंत्र्याला अडचणीत आणणारे तिघे जण असतात हे त्यांनी आवर्जून सांगितले. यामध्ये पहिला क्रमांक अर्धागिनीचा म्हणजेच बायकोचा, दुसरा बायकोचा भाऊ म्हणजेच मेव्हणा आणि तिसरा क्रमांक पीए म्हणजेच स्वीय साहाय्यकाचा. या तिघांमुळे मंत्री अडचणीत येतात. हा किस्सा सांगलीत चांगलाच लागू पडत असल्याने उपस्थित नेतेमंडळींच्या भुवया उंचावल्या. एका ज्येष्ठ नेत्याच्या मेव्हण्याला पहिल्यांदा जिल्हा नियोजन मंडळावर संधी मिळाली. कार्यकर्त्यांनी समजून घेतले. जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक निवडीची वेळ आली तेव्हा पुन्हा मेव्हण्याची वर्णी लागली. तर एका नेत्याच्या स्वीय सहायकांचे निवासस्थान म्हणजे कोटय़वधीचा आलिशान राजवाडाच आहे. त्यांचे उत्पन्न किती, कोटय़वधी खर्चाचा आलिशान बंगला कसा उभारला, असे प्रश्न भाबडय़ा मनाला पडायलाच नकोत. सत्तेच्या पंगतीला पहिला मान पाव्हण्या-मेव्हण्यांचाच. मी नारायण राणे बोलतोय.. ‘नारायण राणे’ या नावाचा कोकणात किती दबदबा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्या हे नाव काळय़ा यादीतील. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावच्या माजी पंचायत समिती सदस्याचेही नाव योगायोगाने नारायण राणे असून ते शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नुसतं नाव सांगितलं तर अनेकांचा गोंधळ उडतो. यावरून या राणे यांना डिवचण्यात येते. यावर मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो, असे सांगताना ते आपल्या मनगटावर दस्तुरखुद्द ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधनही अभिमानाने दाखवतात. चला, या नाही तर त्या फडात! ‘उदंड जहाला ऊस. तो काही आवरेना. त्याचा भार सावरेना. चिंता करुनी उसाची, टाहो जरी फोडला तरी , कोणी काही ऐकेना. रोज फडात जायचे, उसाचे तुरे पहायचे, वेदना सोसली नाही तर काय करायचे? ’ लातूरकरांना विचारा, सारी उत्तरे अमित देशमुखांकडे असतात. उसाच्या फडातील समस्या लवकर मिटेल की नाही माहीत नाही. मग त्यांनी फडच बदलला. आता उसाच्या फडाऐवजी लावणीचा फड लावण्याचे ठरविले. गोडीचे गणित तसे साखर कारखानदारांपेक्षा अधिक कोणाला कळणार? उसाला तुरा लागलेला असताना लावणी महोत्सव आयोजित केला. आता लातूरकर म्हणू लागले आहेत, ‘चला या फडात नाही तर त्या फडात!’ मग कोणती ऐकायची लावणी, असं विचारलं गेलं आणि उत्तर आलं - ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’ श्रेयाच्या लढाईत सारे माफ महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजप यांच्यात विविध मुद्दय़ांवरून वादाचा कलगीतुरा रंगत असतो. याचा प्रत्यय नुकताच वाशीम येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात आला. वाशीम-अमरावती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे भाजपच्या मंडळींनी परस्पर लोकार्पण आटोपून घेतले. पुलावरून वाहतूकही सुरू झाली. त्यानंतर काही तासांतच जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पुलाचे बांधकाम शिल्लक असल्याचे कारण सांगून पुलावरील वाहतूक थांबवण्याचे पोलिसांना पत्र दिले. तीनच दिवसांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी त्याच पुलाचे ई-लोकार्पण केले. एकाच पुलाचे सत्ताधारी आणि विरोधकांनी दोन वेळा वेगवेगळे लोकार्पण केले. विशेष म्हणजे ज्या अपूर्ण कामावरून पुलावरून वाहतूक रोखण्यात आली, ती कामे बाकी असताना मंत्र्यांनी कसे लोकार्पण केले, असा सवाल केला जात आहे. औरंगाबाद ते मालेगाव.. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत एमआयएमला सामील करून घेण्याचा प्रस्ताव या पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुकताच दिला होता. मालेगावात त्याची प्रतिक्रिया उमटली नसती तरच नवल. येऊ का घरात, या एमआयएमच्या प्रस्तावास काँग्रेस आणि शिवसेनेने लाल झेंडा दाखविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही हिरवा कंदील दर्शविण्यास नकार दिला. त्यानंतर राज्य पातळीवरून या विषयाची चर्चा मागे पडली तरी मालेगावात मात्र त्याचे कवित्व सुरूच आहे. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल आणि माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख आसिफ शेख हे दोघे परस्परांचे कट्टर विरोधक. या प्रस्तावावरून उभयतांनी जुने हिशेब चुकते करून घेतले. वाढदिवस काँग्रेस मंत्र्याचा, प्रचार राष्ट्रवादीचा काँग्रेस-राष्ट्रवादीची मैत्री तशी कमालीची ‘घट्ट’. निवडणुकीत काय काय होते हे साऱ्यांनाच ठाऊक. तरीही सारं कसं मैत्रीपूर्ण. आता हा वारसा लातूरकरांनी जपला. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसादिवशी लातूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शक्कल लढवली. २१०० घडय़ाळय़ांचे वाटप करण्याचे ठरले. घडय़ाळ ही राष्ट्रवादीची निशाणी. लातूरमध्य राष्ट्रवादीची ताकद मर्यादित. देशमुखांच्या घडय़ाळवाटपातून राष्ट्रवादीचा प्रसार झाला याचेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अप्रूप. कोकणची ‘झोंबी’! रेडय़ांची झुंज कोकणात झोंबी म्हणून प्रसिद्ध आहे. या ‘बेकायदा’ कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. किरीट सोमय्यांच्या ‘हातोडा’ रथाच्या वेळीदेखील अशीच गर्दी झाली होती. एकीकडे भाजपचे अतिआक्रमक नेते नीलेश राणे, तर त्यांच्यापासून दोनशे मीटर अंतरावर होते राष्ट्रवादीचे आक्रमक नेते संजय कदम. बघ्यांची चोहीकडे तोबा गर्दी. तेव्हा संजय कदम पुढे उभ्या एका ‘बघ्या’ला म्हणाले, ‘‘ए इकडे मागे येऊन उभा राहा. काय झोंबी पाहायला आलायस काय?’’ तसा तेथे हशा पिकला. खरंच राजकीय ‘झोंबी’चाच कार्यक्रम होता जणू! एक नेता सोमय्यांना दापोलीतून पळवायला आलेला, तर दुसरा नेता त्यांना दापोलीत घेऊन आलेला! (सहभाग : सतीश कामत, प्रबोध देशपांडे, दिगंबर शिंदे, प्रदीण नणंदकर, राजगोपाल मयेकर , प्रल्हाद बोरसे)