गंभीर आजारी रुग्णांची ने-आण करणेही जिथे ताणाचे असेल तेथे छिन्नभिन्न मृतदेहांना उचलून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम किती जिकिरीचे असेल? जीवनसंघर्षामुळे रुग्णवाहिका चालक अनिता यांना या कामाकडे वळावे लागले खरे, परंतु करोना साथीने त्यांना पोहोचवले ते सेवाव्रताकडे. गेल्या सहा-सात वर्षांत अशा शेकडो बेवारस आणि विच्छिन्न मृतदेहांची विटंबना टाळून त्यांच्यावर अंतिम संस्कार करणार्‍या अनिता गोसावी आहेत, यंदाच्या लोकसत्ता दुर्गा.

रुग्णवाहिकेचा सायरन कानावर पडला की ऐकणार्‍याच्या हृदयात नकळत एक काळजीची हलकीशी कळ उठते आणि त्या रुग्णासाठी प्रार्थनाही! मात्र रुग्णवाहिका चालक अनिता गोसावी यांच्यासाठी हा अनुभव नित्याचा. रुग्णवाहिका चालवणारे पुरुष आपल्याला माहीत असतात, परंतु एक स्त्री जेव्हा रुग्णवाहिका चालवते, आजारी रुग्णांची काळजी वाहाते, प्रसंगी जेव्हा तिला मृतदेहांची ने-आण करावी लागते, पोलिसांना मदत म्हणून रेल्वे रुळांवर अपघाती मरण पावलेल्या बेवारस, छिन्नविछिन्न मृतदेहांना उचलून त्यांच्यावर अग्निसंस्कारही करावे लागतात, तेव्हा ते काम जीवनसंघर्षातून स्वीकारलेले, केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहात नाही तर ते सेवाभावी होऊन जाते.

चौदाव्या वर्षी लग्न झालेली अनिता लग्नानंतर पंधरा वर्षांनी माहेरी पुण्यातील चिंचवडला परतली, ती दोन मुलं आणि अपंग नवर्‍याच्या जबाबदारीचे ओझे अंगावर घेऊनच! मात्र स्वाभिमानी अनिताला भावाच्या जीवावर जगणे पटेना. बरीच खटपट करून, आधी एका शाळेत साफसफाई करण्याचे काम त्यांना मिळाले. नंतर दोन वर्षांनी नामवंत शाळेच्या बसमध्ये मदतनीस म्हणून नोकरी लागली. स्कूल बस चालवणार्‍या काकांचे कौशल्य बघून, अनिता यांना ‘ड्रायव्हिंग’ शिकण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झाली. ते शिकल्यावर त्यांनी एक जुना टेम्पो खरेदी केला आणि पहाटे पुण्याच्या मार्केटयार्डमधून भाजी आणून, दुपारी एक वाजेपर्यंत आईबरोबर भाजीविक्री आणि नंतर स्कूल बसची नोकरी असा दिनक्रम सुरू झाला.

आयुष्य जरा स्थिरस्थावर होत असतानाच करोनाची साथ सुरू झाल्याने शाळा बंद झाल्या आणि त्यांची नोकरी सुटली, मात्र त्याच वेळी दुसरे दार खुले झाले. त्यांचा भाऊ करोनाग्रस्त झाल्यानंतर, तो चालवत असलेल्या खासगी रुग्णवाहिकेची चालक होण्याचे आव्हान अनिता यांनी स्वीकारले. आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाला ऑक्सिजन लावणे, त्याचे हृदय चालू राहावे म्हणून ‘पंपिंग’ करणे हेदेखील त्यांनी डॉक्टरांकडून शिकून घेतले आणि  रुग्णांना आधार देण्याचा, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा आणि मृतदेहांची विटंबना थांबवण्याचा त्यांचा कर्मयोग सुरू झाला.

स्ट्रेचर आणि ऑक्सिजन सिलेंडर असणे या दोन आयुधांच्या बळावर त्यांनी करोना काळात कित्येकांचे प्राण तर वाचवलेच, परंतु त्यांना ३००च्या वर देहांवर अंत्यसंस्कारही करावे लागले. अखेर २०२० मध्ये त्यांनी आपले दागिने गहाण टाकून, ‘सेकंडहॅन्ड’ रुग्णवाहिका खरेदी केली. त्याला आईचे नाव दिले, ‘सावित्री ॲम्बुलन्स!’

जगणे आणि जगवणे यांच्या सीमेवरची ही लढाई अर्थातच सोपी नव्हती…नाही. सरळ मार्गाने, झोकून देऊन काम करूनही त्यांना अनेकदा प्रतिस्पर्धी पुरुषी अहंकाराला सामोरे जावे लागले. बेवारस मृतदेह उचलताना रुग्णवाहिकेचे भाडे मिळण्याची शक्यताही धूसर! अपघाताने छिन्न-विछिन्न झालेला देह उचलताना काळजावर दगड ठेवूनच पाऊल पुढे टाकायचे.

वृद्धाश्रमातील निराधार आजी-आजोबांपैकी एक जण गेल्यावर, तो देह उचलताना, राहिलेल्याचे दु:ख बघून डोळ्यातील पाणी प्रयत्नपूर्वक थोपवायचे. आत्महत्या केलेल्या तरुण मुला-मुलींची मान फासातून सोडवून, त्यांचा टांगलेला मृतदेह खाली आणताना, मनावर संयम ठेवणे तर महाकठीण! परीक्षा पाहणार्‍या अशा विविध क्षणी त्यांनी दाखवलेल्या धैर्याने, पिंपरी चिंचवड भागातील पोलिसांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले. त्यामुळे अनेकदा आणीबाणीच्या वेळी त्यांनाच बोलावले जाते.

४६ वर्षीय अनिता यांच्या सावित्री रुग्णवाहिकेचा रथ आज महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरही सेवा देत आहे. या पुण्याईचे फळ म्हणजे मुलगा मेकॅनिकल इंजिनीयर (डिप्लोमा) असून, मुलगी वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. करत आहे. आपल्या बहिणीलाही रुग्णवाहिका चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याने त्याही आता या क्षेत्रात आहेच.

नुसते मृतदेहच नाहीत तर अक्षरश: छिन्न-विछिन्न मृतदेह उचलणार्‍या, प्रसंगी झालेल्या खर्चावरही पाणी सोडावे लागणार्‍या तरीही आपली सेवा अखंड ठेवणार्‍या बहुदा पहिल्या स्त्री रुग्णवाहिका चालक सेवाव्रती अनिता गोसावी यांना ‘लोकसत्ता’चा सलाम.

waglesampada@gmail.com