मालेगाव येथील अंधश्रद्धा, धार्मिक पगडा असलेल्या अल्पसंख्याकबहुल शहरातल्या वस्त्यावस्त्यांमध्ये जात कुटुंब नियोजन, लसीकरण, निरोगी माता-सुदृढ बाळ यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी घरोघरी जाऊन संवाद साधण्याचे आव्हान पेलले ते डॉक्टर अलका यांनी. रुग्णसेवेबरोबरच गेली ३० वर्षं मालेगावमध्ये समुपदेशनातून आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून माता-बालमृत्यू रोखण्याबरोबरच, स्वत: यशस्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्या आणि लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यात मोलाचे योगदान देणार्या आरोग्यदूत डॉ. अलका भावसार आहेत, यंदाच्या लोकसत्ता दुर्गा.
मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ‘माता आणि बाल संगोपन’ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अलका भावसार सुरुवातीच्या काळात ‘नॅशनल इंटिग्रेड मेडिकल असोसिएशन’ (निमा)च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत होत्या. बकाल वस्त्या, दोन समाजांतील तेढ, अंधश्रद्धेचा पगडा आणि हातावर पोट असलेली बहुसंख्य लोकसंख्या अशा वातावरणात माता-बाल संगोपन अधिकारी म्हणून काम करताना लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वी करणे हे डॉ. भावसार यांच्यासमोर आव्हान होते. मात्र गेल्या ३० वर्षांत त्यांनी ‘ईडीडी’ नोंदवही, ‘पापा की पहेल’, ‘टिका तयार परिवार’,‘जुम्मा मिटींग’,‘मेहफुज मिशन’ आदी उपक्रम राबवून तेथील लोकांच्या आयुष्यात आरोग्याची पहाट आणली.
या मुस्लीमबहुल परिसरात काम करताना सर्वात मोठा अडथळा म्हणजे येथील लोक वैद्यकीय सेवांवर सहजासहजी विश्वास ठेवत नसत. धार्मिक पगडा प्रचंड. डॉ. भावसार यांच्या म्हणण्यानुसार २०१० मध्ये मालेगावात पोलिओबाधित बालकांचे सर्वात जास्त प्रमाण होते. ते बदलण्यासाठी संवाद महत्त्वाचा होता. परंतु, याविषयी कोणाशी बोलायचा प्रयत्न केला की तोंडावर दार आपटले जायचे.
नकारात्मकता ठासून भरलेल्या वातावरणात आशासेविका आणि अन्य कर्मचार्यांच्या मदतीने डॉ. अलका कामाला सुरुवात केली. आपल्या कार्यक्षेत्रातील जोखमीच्या परिसरातील गरोदर ्त्रिरयांना हेरत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिथल्याच सेविकेच्या घरात आठवड्यातला एक दिवस दवाखाना सुरू केला. गरोदर ्त्रिरयांचे प्रसूतीमधील धोके टळून सुदृढ बालक जन्माला यावे यासाठी त्यांनी संवाद सातत्य वाढवत ‘टिका तयार परिवार’, ‘माता आरोग्य’सारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले.
स्त्रियांना बोलते केल्यावर काहींनी आपली व्यथा डॉक्टरांकडे मांडली. त्यांच्या व्यथेतून समस्यांची उत्तरे सापडत गेली. गरोदर स्त्री त्यांच्याकडे आल्यानंतर तिच्यासाठी खास ‘ईडीडी’ (एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी) ही अनोखी नोंदवही तयार केली. गरोदर स्त्री, त्यांचे लसीकरण, त्यांची प्रसूती कधी होणार?, बाळ झाले तर मुलगा की मुलगी?, घरी की दवाखान्यात? याचे सर्व तपशील या नोंदवहीत आशासेविकांकडून नोंदवला जाऊ लागला. आशासेविका घरी गेल्यावर कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतील त्या अनुषंगाने कशा पद्धतीने उत्तरे द्यायची, काय प्रश्न विचारायचे यासाठी पुस्तिका तयार करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यायची, तसेच स्तन्यपान, लसीकरण का आवश्यक आहे हे सातत्याने सांगण्यावर त्यांनी भर दिलाच परंतु आत्तापर्यंत त्यांनी स्वत: ३५००पेक्षा अधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. हा प्रवास सोपा नव्हता. पण कामावरची निष्ठा आणि पती डॉ. दिलीप यांच्यासह कुटुंबीयांची भक्कम साथ यातून अडथळे दूर होण्यास मदत झाली.
बाळ जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी केवळ आईची नाही तर वडिलांची आहे हे समजावून सांगण्यासाठी ‘पापा की पहेल’ उपक्रम त्यांनी सुरू केला. यामध्ये ‘गावी’ आणि ‘युनिसेफ’ या सामाजिक संस्थांची मदत झाली. वडिलांना मुलांच्या संगोपनात गुंतवताना बाळाच्या जन्मापासून लसीकरण, त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीत तितकाच सहभाग घेणे ही वडिलांचीही जबाबदारी आहे, हा विचार रुजविण्यासाठी जुम्मा मिटींग, मदरशामध्ये जाऊन मौलवींशी चर्चा करून पुरुष पालकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने डॉ. अलका यांनी जनजागृती केली. याचा परिणाम म्हणजे लसीकरणाचे प्रमाण आता ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या सर्व उपक्रमांची परिणामकारता वाढविण्यासाठी मालेगावमध्ये त्यांनी ‘मेहफुज मिशन’ सुरू केले.
या सर्व कामाचा आलेख उंचावतानाच माता-बाल मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी व्हायला हवे, त्यासाठी अजून सजगतेने काम करायला हवे असे डॉ. भावसार यांना वाटते. वैद्यकीय सेवेसह ‘कळी उमलताना’, विवाहपूर्व समुपदेशन आदी सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. मालेगाव परिसरात आरोग्यविषयक कार्यक्रम यशस्वीपणे राबवून आपला वैद्यकीय पेशा खर्या अर्थाने सार्थ ठरवणार्या डॉ.अलका भावसार यांना लोकसत्ताचा सलाम.
charu.kulkarni85@gmail.com
