सतीश धुमाळ

डोळस व्यक्तीला अचानक अंधत्व आल्यावर येणारे भांबावलेपण, पदोपदी संघर्ष करताना दाटून येणारी निराशा जाई खामकर यांनी पुरेपूर अनुभवली. मात्र त्यांनी निश्चय केला निराशेचं मळभ झटकून पुन्हा उभे राहाण्याचा. स्वावलंबी झाल्यावर आपल्यासारख्या इतरांना त्या मदत करू लागल्या आणि अंध-अपंगांनी शिकून आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने त्यांनी शिरूरमधील टाकळी हाजी येथे अंध-अपंगांचे देशातील पहिले निवासी महाविद्यालय सुरू केले. लढण्याची जिद्द बाळगणाऱ्या आणि अंध-अपंगांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या जाई खामकर आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

 ‘रोशनी बुझी तो का हुआ

ऐ खुदा मुझे तो

मेरे लोगो के लिये

आशा और आनंद का दीप बनना था’

या ओळी जाई खामकर यांना समर्पकपणे लागू पडतात. स्वत: अंध असलेल्या जाई यांनी अंध-अपंगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठीचे एक पाऊल म्हणून शिरूरमधील टाकळी हाजी येथे देशातील पहिले अंध व अपंगांचे निवासी महाविद्यालय सुरू केले आहे.

जाई यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षक बनण्याचे त्याचे स्वप्न. मात्र बारावीत असताना आजारपणात मुदत संपलेले इंजेक्शन दिल्याचे निमित्त होऊन त्यांना डोळे कायमचे गमवावे लागले. वडिलांचे दारूचे व्यसन, त्यात आर्थिक परिस्थिती यथातथाच असल्यामुळे शिक्षण आणि उपचार थांबले. अंधत्व आल्यामुळे जगणे ओझे वाटू लागले आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला; पण तो फसला. त्यानंतर मात्र त्यांनी समाजासाठी उभे राहायचे ठरवले. त्यांनी अंध व अपंगांसाठी ‘न्यू व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालय’ सुरू केले असून पारंपरिक पदवीबरोबरच विविध व्यावसायिक कौशल्ये मोफत शिकता यावीत यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे.

आपल्या कामाची व्याप्ती वाढावी यासाठी जाई यांनी २००५ मध्ये ‘मळगंगा अंध अपंग सेवा संस्थे’ची स्थापना केली. अंध-अपंगांना शासकीय योजनांनुसार सवलती मिळाव्यात म्हणून मार्गदर्शन करणे, शासकीय कार्यालयात जाऊन पाठपुरावा करणे, ही कामेही त्या करू लागल्या. त्यापूर्वी त्यांनी स्वत: आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हायचे ठरवून २००० मध्ये टाकळी हाजी येथे टेलिफोन बूथ सुरू केला होता. एक अंध मुलगी एसटीडी बूथ व्यवस्थित चालवू शकते आहे, हे पाहून लोक त्यांना आपल्या ओळखीच्या वा परिसरातील अंध-अपंगांची माहिती देऊ लागले. काही अंध-अपंग जाई यांना भेटू लागले. ‘आमचे जगणे म्हणजे कुटुंबाला ओझे वाटते. आम्हाला रोजगार हवा,’ अशा भावना हे लोक व्यक्त करत. त्यांच्यासाठी जाई यांनी अंध-अपंगांचा गट तयार करून त्यांना अंधत्व व अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शासनाच्या योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.

जाई यांनी बारदान विक्री व वाहतूक व्यवसायही केला. ‘एमआयडीसी’तील कंपन्यांमधून अंध-अपंगांना रोजगाराच्या संधी कशा मिळू शकतील यासाठी प्रयत्न करत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. १०० हून अधिक अंध-अपंगांना त्या रोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकल्या. दुग्ध व्यवसाय, टेलिफोन बूथ, वडापाव स्टा़ॅल, किराणामाल दुकान, भाजीपाला-फळे विक्री, स्टेशनरी विक्री, संगणक प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी अशा रोजगारांचा यात समावेश आहे. अंध-अपंगांचे संघटन करणे आव्हानात्मक असून या व्यक्तींच्या घरी जाऊन जाई यांनी त्यांना आपल्या कार्याशी जोडून घेतले आहे.

एकदा पुण्यात शिकणाऱ्या काही अंध विद्यार्थिनींचा जाई यांना फोन आला, की त्यांचे वसतिगृह बंद होणार आहे. वसतिगृह बंद झाल्यावर कुठे जायचे या विचाराने या मुली रडत होत्या. ते ऐकून त्या अस्वस्थ झाल्या. अंध-अपंगांना शिक्षण देऊन व्यावसायिक कौशल्ये शिकवण्याचे काम आपणच का करू नये, असा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. त्यांनी टाकळी हाजी येथे देशातील पहिले अंध आणि अंपंगांसाठीचे निवासी महाविद्यालय सुरू केले. २०१८ मध्ये या महाविद्यालयास मान्यता मिळाली आणि २०१९ मध्ये ते सुरू झाले.

महाविद्यालय उभे करताना जागा आणि पैशांची अडचण होती, तसेच विविध कागदपत्रे सादर करावी लागणार होती. पण जाई यांची दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द यामुळे महाविद्यालयाचे स्वप्न साकारले. कागदपत्राची पूर्तता करताना ब्रेल लिपीत उच्चशिक्षणाचा अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. परंतु २०१८ मध्ये प्रस्ताव मान्य केला गेला. दृष्टिहीनांसाठी जाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑडिओ स्वरूपात अभ्यासक्रम तयार केला. या महाविद्यालयात संगणकाची मदत घेऊन शिक्षण दिले जाते. दृष्टिहीन विद्यार्थी ऐकून शिकतात, तर अन्य अपंग विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दाखवून शिकवले जाते. सध्या महाविद्यालयात ४८ विद्यार्थी व २२ विद्यार्थिनी आहेत. शासनाने या महाविद्यालयास तीन एकर जमीन २०२० मध्ये दिली आहे. मात्र अशा महाविद्यालयासंदर्भात शासकीय धोरण नसल्याने शासकीय अनुदान त्यांना मिळत नसल्याचे जाई सांगतात. सध्या महाविद्यालयात शिक्षक व अन्य कर्मचारी असे १७ जण काम करतात. सर्व खर्च लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून भागवला जात असून त्यांना अधिक आर्थिक मदतीची गरज आहे. 

जाई यांचा प्रवास व दगदग सतत सुरू असते. त्यातून त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असून नुकतीच मेंदूच्या दोन मोठय़ा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यांचा उत्साह मात्र टिकून आहे. ‘ ‘व्हिजन’चा वटवृक्ष होताना पाहायचा आहे,’ असे त्या सांगतात. अंध-अपंगांसाठी लघुउद्योग व प्रक्रियात्मक उद्योगही त्यांना उभारायचा आहे. अपंगांसाठी कृत्रिम अवयव बनवण्याचा प्रकल्प उभा करण्याची मनीषा असून त्यासाठी टाकळी हाजी येथे शासनाकडून अकरा एकर जमीन त्यांनी मागितली आहे. वेळेवर उपचार न झाल्याने अनेकांवर अपंगत्व लादले जाते. हे होऊ नये म्हणून सुपरस्पेशालिटी व अत्याधुनिक सुविधांचे रुग्णालय सुरू करण्याचेही त्यांचे स्वप्न आहे. जाई यांना अनेक कटू अनुभवही आले. मात्र ‘अपंगत्वावरून कुणी हिणवले तरी खचू नका. स्वत:ला सिद्ध करा,’ असे त्या सांगतात.

अंध व अपंगांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणाऱ्या जाई खामकर यांना अशा अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचता यावे यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुभेच्छा.

संपर्क

जाई खामकर- ९८८११८६०३३

स्वप्निल घुले- ९८६०९५२०९८

 m.aa342007@gmail.com

पत्ता- मळगंगा अंध अपंग सेवा संस्था, टाकळी हाजी व न्यू व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालय टाकळी हाजी मु.पो. टाकळी हाजी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे- ४१२२१८

मुख्य प्रायोजक  :  ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

सहप्रायोजक  :   महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सिडको, व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड सन्स प्रा. लि., तन्वी हर्बल्स ,टीजेएसबी सहकारी बॅँक लि.

पॉवर्ड बाय :  व्ही. एम. मुसळूणकर ज्वेलर्स,  दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड जमीन प्रा. लि.

टेलिव्हिजन पार्टनर :  एबीपी माझा

dhumal1005@gmail.com