कबड्डी प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय मजल!

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली असून आजही त्या अनेक खेळाडू घडवत आहेत.

चारुशीला कुलकर्णी

कबड्डीतील पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देत शैलजा यांनी एक उत्तम कबड्डी प्रशिक्षक म्हणून आपला ठसा उमटवला. आजवर त्यांनी प्रशिक्षित केलेल्या ३०० हून अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व केले आहेच, पण त्यांनी आंतरराष्ट्रीय संघांसाठीही प्रशिक्षक म्हणून काम के ले आहे. २०१७ मध्ये इराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत शैलजा यांच्या मार्गदर्शनाखाली इराणच्या संघाने कांस्यपदक पटकावले, तर ऑगस्ट २०१८ मध्ये इराण संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०१९ मध्ये मात्र नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने सुवर्णपदक मिळवले. शैलजा यांच्या कामाचा गौरव करत राज्य शासनाने २००८-२००९ मध्ये त्यांना ‘जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे. मराठमोळ्या कबड्डी खेळात आंतरराष्ट्रीय भरारी घेणाऱ्या प्रशिक्षक शैलजा जैन म्हणूनच आहेत ‘लोकसत्ता दुर्गा’. 

क्रीडा क्षेत्रातही दीर्घकालीन कारकीर्द करता येते, याबाबत अजूनही बहुतेकांच्या मनात अनिश्चितता असताना स्त्रियांनी त्यात करिअर करण्याचे मोठे स्वप्न पाहणे आणि ते वास्तवात उतरवणे ही दुर्लभच बाब. नाशिकच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन यांनी ते के ले, त्यामुळेच त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. त्यांनी खेळाडू म्हणूनच नव्हे तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली असून आजही त्या अनेक खेळाडू घडवत आहेत.

चारचौघांसारखे आयुष्य असलेल्या शैलजा यांना सुरुवातीपासून खेळाची आवड होती. नागपूर त्यांचे माहेर. लहानपणापासून आईकडून त्यांना खेळाचे बाळकडूच मिळाले. घरातून पाठिंबा मिळत असल्याने खो खो, कबड्डी, बॅडमिंटन, योगासने, जलतरण अशी कुठलीही स्पर्धा असो, ‘कमी तिथे आम्ही’ यानुसार शैलजा अनेक खेळ खेळत राहिल्या. त्या वेळी खेळात जिंकणे किंवा हरणे,यापेक्षा खेळाची मजा लुटणे, हे त्यांच्या मनात पक्के होते. या आवडीला कलाटणी मिळाली ती क्रीडा मार्गदर्शक राजाभाऊ समदूरकर यांच्या मार्गदर्शनाने. त्यांच्यामुळे शैलजा यांनी कबड्डीमध्येच करिअर करायचे नक्की केले. शिक्षण आणि खेळ यात रममाण असतानाच शैलजा लग्नाच्या बोहल्यावर चढल्या. नाशिकला  येथे आल्यावर सासरच्या मंडळींनीही शैलजा यांच्या खेळाच्या आवडीला मुरड घातली नाही. क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करायचे निश्चित असले, तरी त्यात नेमके  काय करायचे, हा प्रश्न अजून अनुत्तरित होता. त्या वेळी शैलजा यांना ‘राष्ट्रीय क्रीडा संस्थे’तून (एनआयएस) प्रशिक्षण घेतलेल्या  देवीदास जाधव यांनी याच संस्थेत प्रशिक्षक म्हणून धडे घेण्याचा सल्ला दिला. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयात शैलजा रुजू झाल्या. १९८३ पासून प्रशिक्षक म्हणून त्या सक्रिय झाल्या आणि आजही प्रशिक्षकाच्या भूमिकेत कायम आहेत.

प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत असताना शहर परिसरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी शैलजा यांनी प्रयत्न केले. ‘रचना विद्यालया’ची त्यांना साथ मिळाली. कबड्डीच्या खेळासाठी पोषक वातावरण त्यांनी निर्माण केले. ‘रचना क्लब’ आणि ‘जिल्हा प्रशिक्षण केंद्र’ यांच्या सहकार्याने कबड्डीत मुलींचा एक असा संघ तयार झाला, की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. स्पर्धा कुठल्याही विभागातील असो, अंतिम फेरीत ‘रचना क्लब संघ’ धडक देणार हे ठरलेले होते. खेळाडूंची शैली, देहबोली आणि समोरच्याला खेळात गारद करण्यासाठी आवश्यक असलेली चपळाई अचूक हेरत शैलजा यांनी खेळाडूंच्या भविष्याला वेगळा आयाम देण्यास सुरुवात केली. त्यातून भक्ती कुलकर्णी, निर्मला भोई यांसारख्या ‘शिवछत्रपती पुरस्कार’प्राप्त खेळाडू तयार झाल्या. संघ राष्ट्रीय पातळीवर नाव गाजवत असताना विभागस्तरावर निवड समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. मुलींच्या संघाबरोबर महाराष्ट्र पोलीस, भोसला मुलांचा संघ, यांनाही त्यांनी प्रशिक्षित केले.

२००६ मध्ये नेपाळ येथे कबड्डी रुजावी यासाठी ‘अखिल भारतीय कबड्डी संघटने’च्या वतीने तत्कालीन पदाधिकारी जया शेट्टी यांनी शैलजा यांच्या नावाची शिफारस केली. त्यांनी दीड महिने नेपाळच्या मुलींच्या संघाला प्रशिक्षण दिले. २००८ मध्ये भारतीय कनिष्ठ कबड्डी संघासाठी आयोजित दोन शिबिरांना त्यांनी प्रशिक्षण दिले. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या या संघाच्या प्रशिक्षक म्हणून शैलजा यांचे नाव आघाडीवर असताना अचानक त्यांना ही संधी नाकारण्यात आली, मात्र त्याच वेळी इराण कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदासाठी दिल्ली येथे मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीत शैलजा यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली, परंतु नोकरी आणि कामाच्या व्यापामुळे त्यांनी ती संधी घेतली नाही. २०१४ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांच्यासाठी मैदान मोकळे झाले.

शैलजा यांची कबड्डी आणि मैदान याच्याशी नाळ जुळलेली असल्याने सेवानिवृत्तीनंतरचा काळ खेळासाठी आणि ‘ऑलिम्पिक’ मध्ये कबड्डीचा समावेश व्हावा, या दृष्टीने अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी द्यायचा असे त्यांनी ठरवले. त्याच वेळी त्यांच्या स्नेह्य़ांनी त्यांना इराणच्या संघाला प्रशिक्षण देण्यास सुचवले. ही संधी स्वीकारून २०१७ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत शैलजा यांच्या मार्गदर्शनाखाली इराण संघाने कांस्यपदक मिळवण्याची किमया केली. ऑगस्ट २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. या वेळी भारतीय संघाचा पराभव करत शैलजा यांनी घडवलेल्या इराणच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. इराणसारख्या देशात खेळाडूंशी नाते जोडणे, संवाद साधणे, तेथील सामाजिक वातावरणात मुलींकडून सराव करून घेणे त्यांच्यासाठी कठीण होते. मात्र इराणच्या क्रीडा विभागाच्या मदतीने हे आव्हान लीलया पेलले. त्या देशाच्या क्रीडा विभागाने खेळाडूंच्या निवड चाचणीपासून त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते.

 याउलट भारतात असे स्वातंत्र्य मिळणे दिवास्वप्न असल्याचे शैलजा सांगतात. इराणच्या संघाची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या मनात संभ्रम होता. आपण चुकतोय का?  कोण काय म्हणेल?  इत्यादी प्रश्न त्यांनाही पडले; पण ही संधी आंतरराष्ट्रीय स्तरावरची होती आणि त्यातून खूप शिकायला मिळणार होते. मुख्य म्हणजे एका वेगळ्या देशात कबड्डी शिकवण्याचे आव्हान होते. कुटुंबाच्या साथीने आपण ही नवी संधी स्वीकारल्याचे शैलजा सांगतात. खेळाडूंना शिकवताना विरोधी संघ कसा खेळतो, त्यांच्या वेगवेगळ्या खेळी, खेळाडूंची ताकद, बलस्थाने, आक्रमकता यांचा अभ्यास त्यांनी खेळाडूंकडून करून घेतला. या मेहनतीचे फळ सुवर्णपदकाच्या रूपात मिळाले. या यशाने त्यांचे आजवरचे काम ठळकपणे समोर आले. या कामाची दखल घेत डिसेंबर २०१९ मध्ये नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आणि भारतीय संघाने सुवर्णपदक मिळवले. शैलजा यांच्या कामाचा गौरव करत राज्य शासनाने २००८-२००९ मध्ये ‘जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित केले.

त्यांनी हाती घेतलेले एक आणखी महत्त्वाचे काम म्हणजे आदिवासी भागातील खेळाडू शोधणे. सध्या करोनाच्या परिस्थितीमुळे या कामात काही अडथळे आले असले, तरी त्यांना हे काम सातत्याने करायची इच्छा आहे.

इतर अनेक खेळांप्रमाणे कबड्डी हा खेळ पुरुषप्रधानच समजला जातो. अशा क्षेत्रात शैलजा यांनी प्रशिक्षक म्हणून जी उंची गाठली, ती निश्चितच प्रशंसनीय. त्यांचे हे यश अनेक कबड्डीपटू मुलींना आणि प्रशिक्षक होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांना प्रेरणादायी असेच आहे.

मुख्य प्रायोजक   :      ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

सह प्रायोजक    :महाराष्ट्र औद्योगिक

विकास महामंडळ,

व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड

सन्स प्रा. लि.

सनटेक रिअल्टी लि. पॉवर्ड बाय  

:प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे,

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

संपर्क  शैलजा जैन

पत्ता- फ्लॅट नं. १, नीलमणी अपार्टमेंट, भावसार भवनजवळ, गोविंद नगर, नाशिक- ४२२००९

संपर्क  क्रमांक- ८२७५०१४१८० ईमेल-  shailajajjain@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta durga kabaddi coach shailja jain zws

ताज्या बातम्या