scorecardresearch

सूक्ष्मजीवशास्त्र-कृषी क्षेत्राची अनोखी सांगड

आजच्या घडीला ‘कॅन बायोसिस’ ही संदीपा यांनी स्थापन केलेली कंपनी भारतातील सात राज्यांमध्ये काम करते आहे

सूक्ष्मजीवशास्त्र-कृषी क्षेत्राची अनोखी सांगड
(संग्रहित छायाचित्र)

सिद्धी महाजन

जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवू पाहणाऱ्या संशोधक-उद्योजक संदीपा कानिटकर. त्यासाठी त्यांनी २००५ मध्ये ‘कॅन बायोसिस’ कंपनीची स्थापना केली असून पहिल्या सूक्ष्मजीवाधारित कोरडय़ा बीजन प्रक्रियेला जन्म देण्याचे श्रेय त्यांच्या कंपनीला जाते. ही कंपनी भारतातील सात राज्यांमध्ये काम करत दोन दशलक्ष लिटर /किलो एवढय़ा प्रमाणात तेवीस प्रकारच्या सूक्ष्मजीवाधारित उत्पादनांची निर्मिती करत असून पाच देशांतील शेतकऱ्यांपर्यंत त्यांची उत्पादने निर्यात केली जात आहेत. देशातल्या पहिल्या सूक्ष्मजीवाधारित, द्रव स्वरूपातल्या सेंद्रिय खतासाठीचे पेटंट मिळवणाऱ्या, तसेच प्रदूषण टाळणाऱ्या संशोधनाचा पहिला राष्ट्रीय ‘एमएसएमई’ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या  संदीपा कानिटकर आहेत आजच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

ती एक नवोन्मेषशालिनी दुर्गा. हिच्या नाना भुजा संशोधन क्षेत्रातील नवनवी आव्हाने पेलत आहेत. उद्योजकवृत्ती अंगी जोपासून अभिनव शास्त्रीय मार्गाने त्या लोककल्याणाचे उद्दिष्ट साध्य करत आहेत. सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाची आवड, अन् त्या संशोधनाचा वापर करून सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठीची कळकळ, यांचा योग्य ताळमेळ साधल्यावर तयार झालेल्या या अद्वितीय रसायनाचं नाव आहे संदीपा कानिटकर!

वर्षोनुवर्ष शेतीत रासायनिक पदार्थाचा वापर केल्यानंतरचे हानीकारक परिणाम आपल्याला नवीन नाहीत. शेतकऱ्यांचा ओढा शाश्वत शेतीकडे वळतो आहे. शाश्वत शेतीच्या व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक तंत्रांमध्ये मृदा व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते, अन् या मृदेला तिची वैशिष्टय़पूर्ण गुणवत्ता प्रदान करतात ते सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवांचे कोडे सोडवण्यास भाग पाडणारी कुतूहलवृत्ती आणि विज्ञानातील सर्जनशीलता इथे नवे आविष्कार घडवते. सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाची कृषी क्षेत्राशी अनोखी सांगड घालण्यासाठीच जणू जन्म झाला असावा, असे आहे संदीपा यांचे कर्तृत्व!

 लहानपणापासूनच उद्योजिका बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या संदीपा यांनी मोठय़ा सर्जनशील पद्धतीने आपले ध्येय आणि शिक्षण यांची सांगड घातली, आणि २००५ मध्ये ‘कॅन बायोसिस’ (kanbiosys) या आस्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. सूक्ष्मजीवांच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवता येतो. पिके घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीजांची अंकुरणक्षमता आणि कार्यक्षमता वाढवता येते. या प्रकारे निर्माण केल्या गेलेल्या पहिल्या सूक्ष्मजीवाधारित कोरडय़ा बीजन प्रक्रियेला जन्म देण्याचे श्रेय ‘कॅन बायोसिस’ या कंपनीला जाते. सेंद्रिय खते, जिवाणू खते आणि जैविक कीटकनाशके (organic fertilizers,biofertilizers and biopesticides) यांचा नियोजित वापर करून पर्यावरणस्नेही शेती करता येते, याला संदीपा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाने दुजोरा दिला. पिकावरील रोग, मातीचा ढासळत गेलेला कस यांच्यासारख्या समस्यांशी लढणाऱ्या, हाताशी किमान एक ते दोन एकर जमीन असणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांसाठी त्या संकटमोचक ठरल्या आहेत. संदीपा आणि त्यांच्या टीमने देशातल्या पहिल्या सूक्ष्मजीवाधारित, द्रव स्वरूपातल्या सेंद्रिय खतासाठीचे पेटंट मिळवले आहे. पिकांचा उरलेला भाग जाळून टाकण्यापेक्षा त्याला तिथल्या मातीतच कमीतकमी काळात सामावून घेता येईल आणि प्रदूषणही होणार नाही, अशा प्रकारचे संशोधन ‘कॅन बायोसिस’ मध्ये झाले, आणि त्याला गेल्या वर्षीचा पंधरा लाख रुपयांचा पहिला राष्ट्रीय एमएसएमई

(MSME) पुरस्कार प्राप्त झाला. जे पिकांच्या पेंढय़ांबरोबर एकजीव होऊन त्याच मातीत कमीतकमी काळात एकरूप होईल, असे सूक्ष्मजीवांचे मिश्रण तयार करण्यात त्यांना यश आले आहे. यामुळे मृदेची सकसतासुद्धा वाढेल आणि त्याबरोबर मृदा तसंच वायुप्रदूषण होणार नाही. शेतांमध्ये अधिक जलसंधारण होईल, आणि पाण्याचा होणारा अनावश्यक निचरा कमी होईल. हवामान बदलाचा समर्थपणे सामना करण्यासाठी सूक्ष्मजीवाधारित उपाय अमलात आणले जावेत आणि कृषीक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या साधनसुविधांचा शतप्रतिशत विनियोग व्हावा यासाठी मातीतल्या कार्बनची टक्केवारी वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. याबरोबरच अन्न सुरक्षा आणि विषमुक्त अन्न उत्पादन त्यांचे ध्येय आहे.

आजच्या घडीला ‘कॅन बायोसिस’ ही संदीपा यांनी स्थापन केलेली कंपनी भारतातील सात राज्यांमध्ये काम करते आहे. कंपनी दोन दशलक्ष लिटर /किलो एवढय़ा प्रमाणात तेवीस प्रकारच्या सूक्ष्मजीवाधारित उत्पादनांची निर्मिती करते. जगभरातील पाच देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. आजच्या घडीला काही लाख शेतकरी त्यांची उत्पादने वापरत आहेत. द्राक्षे, डाळिंबे, तांदूळ आणि भाज्या उत्पादन व निर्यात करणारे शेतकरी त्यांचे मुख्य ग्राहक आहेत. हे सर्व संदीपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि तंत्रज्ञानाच्या मिळालेल्या सहयोगामुळे शक्य झाले आहे. आता बहुराष्ट्रीय कंपन्या ‘कॅन बायोसिस’शी करार करत आहेत. कंपनीमध्ये ३० वर्षे गोठवलेली हजारो सूक्ष्मजीवांची बँक आहे. त्यांचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे, आणि अनेक नवीन क्षितिजे त्यांना पादाक्रांत करायची आहेत.

विविध कार्यक्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने आगळीवेगळी मोहर उमटविणाऱ्या स्त्रियांचा सन्मान ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’ने केला जातो. या वर्षी हा सन्मान प्राप्त झालेल्या स्त्रियांमधून संदीपा कानिटकर यांचाही सन्मान केला जातोय. त्यांच्या संशोधकवृत्तीचा हा सन्मान आहे, तसेच त्यांच्यामधील समाजभान राखणाऱ्या सृजनशील वृत्तीचा हा बहुमान आहे. प्रयोगशाळेतल्या विज्ञानाची भागीरथी सामान्य माणसाच्या अंगणात आणून पोचवणाऱ्या भगीरथवृत्तीचा हा जागर!

आपल्या नवोन्मेषशाली प्रतिभेचा आविष्कार घडवत वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या संदीपा या आधुनिक दुर्गेला पुढील कार्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुभेच्छा!

संपर्क –

संदीपा कानिटकर

‘कॅन बायोसिस, गणेशवाडी,

फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११००४

 ०२०-२५६५०१९६

 www.kanbiosys.com

 snmhjn33 @gmail.com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या