अवलिया लेखणी विसावली

प्रसन्न, पारदर्शक पण प्रसंगानुरूप बोचऱ्या शैलीत ओघवते लेखन करणारे विख्यात साहित्यिक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांचे गुरुवारी निधन झाले.

प्रसन्न, पारदर्शक पण प्रसंगानुरूप बोचऱ्या शैलीत ओघवते लेखन करणारे विख्यात साहित्यिक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पुत्र राहुल आणि कन्या माला आहेत. गुरुवारी संध्याकाळी दयानंदन मुक्तिधाम विद्युतदाहिनीत खुशवंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, जया जेटली तसेच अनेक पत्रकार, आप्त आणि मित्र उपस्थित होते.
आजारपणामुळे सार्वजनिक जीवनातून जवळपास निवृत्तच झालेले सिंग यांना अत्यंत शांतपणे मृत्यू आला, असे त्यांचे पत्रकार पुत्र राहुल सिंग यांनी सांगितले. शेवटच्या दिवसांत त्यांना श्वसनाचा त्रास होत होता, मात्र त्यांची स्मरणशक्ती तल्लखच होती, असेही सिंग म्हणाले.
राहुल यांनी सांगितले की, बुधवारी रात्री खुशवंत यांनी रोजच्या रिवाजाप्रमाणे एक पेग मद्य घेतले. नंतर एका पुस्तकाचे थोडा वेळ वाचन केले. सकाळी शब्दकोडी सोडवली. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांची प्राणज्योत मालवली. एकच दु:ख आहे की अवघ्या ११ महिन्यांत त्यांची शताब्दी आम्हाला साजरी करता येणार होती.
आता पाकिस्तानात असलेल्या हदली येथे १९१५ मध्ये त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण दिल्लीत तर महाविद्यालयीन व उच्च शिक्षण लाहोर आणि केम्ब्रिज विद्यापीठातील किंग्ज कॉलेजमध्ये पार पडले. वकिली, परराष्ट्र मंत्रालयातील नोकरी आणि नंतर पत्रकारिता अशा प्रवासामुळे तसेच जन्म आणि नंतर कारकिर्दीच्या निमित्ताने विविध देशांशी जुळलेल्या भावबंधामुळे त्यांचे विचारविश्व विस्तारले आणि अनुभवविश्व अधिक समृद्ध झाले. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले. उर्दू आणि इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते आणि नास्तिक असूनही शीख पंथाचा त्यांचा अभ्यास इतका सखोल होत गेला की शीख इतिहासाचे दोन खंड लिहिण्याचे मोठे काम त्यांनी पार पाडले. फाळणीच्या अनुभवांवर लिहिलेली ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही त्यांची कादंबरी विश्वविख्यात ठरली. त्यानंतर त्यांच्या लेखणीने आपल्या लालित्य आणि वैविध्याचा प्रत्यय वारंवार दिला. राजकीय लेखन असो की उर्दू शायरीचा मागोवा असो, ओघवत्या इंग्रजी कादंबऱ्या असोत की आपल्याच शीख समाजावर केलेले प्रसन्न विनोद असोत, खुशवंत सिंगांची लेखणी तळपत राहिली. वयाच्या ९५व्या वर्षी लिहिलेली ‘द सनसेट क्लब’ ही त्यांची अखेरची कादंबरी ठरली. ‘ट्रथ, लव्ह अ‍ॅण्ड अ लिटिल मॅलिस’ हे त्यांचे आत्मचरित्र २००२मध्ये प्रसिद्ध झाले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप नेते नरेंद्र मोदी व अन्य राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी खुशवंत सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुजान सिंग पार्क येथील निवासस्थानी खुशवंत सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले.
स्मृतिलेख!
अनेक वर्षांपूर्वी खुशवंत सिंग यांनी स्वत:च्याच मृत्युशिलेसाठी स्मृतिलेख लिहून ठेवला होता. ‘इथे असा एक चिरनिद्रा घेत आहे, ज्यानं माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं,’ अशीच त्याची सुरुवात आहे. २०१२च्या स्वातंत्र्य दिनी वयाची ९८ वर्षे पूर्ण केल्यावर खुशवंत सिंग यांनी लिहिले होते की, मी आता आणखी पुस्तके लिहू शकणार नाही, हे मला उमगलं आहे. खरे सांगायचे तर मला मृत्यूची इच्छा आहे. मी खूप जगलो आहे. लोकांच्या ओठांवर मी हसू फुलविले, हीच ओळख कायम राहावी, अशी माझी इच्छा आहे.
अल्पचरित्र
बहुरंगी अन् समृद्ध शब्दकळेचा आनंदयोगी..
कधी डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या तर कधी खळाळत्या हास्यानं मन प्रसन्न करून टाकणाऱ्या शब्दांचा उपासक असलेले खुशवंत सिंग हे भारतातील इंग्रजी साहित्यिकांच्या मांदियाळीतले अग्रणी होते. राजकारणावरील मर्मभेदी भाष्य, लैंगिक संबंधांचा मोकळेपणानंघेतलेला लेखाजोखा, आपल्याच शीख समाजावरील विनोदांची अखंड मालिका, कथा, कादंबऱ्या अशा अनेक अंगांनी त्यांची लेखणी नेहमीच बहरत राहिली. लेखक, पत्रकार आणि राजकीय भाष्यकार अशा तीनही भूमिका त्यांनी समर्थपणे आणि सहजतेने पार पाडल्या.
फाळणीपूर्व पंजाब प्रांतात हदली येथे २ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सर सोभा सिंग हे विख्यात वास्तुरचनाकार होते. ब्रिटिशांच्या राजवटीत नवी दिल्लीला आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण केम्ब्रिजमधील किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. १९३९मध्ये त्यांचा कँवल मलिक यांच्याशी विवाह झाला. राहुल आणि मुलगी माला यांच्या जन्मानंतर कुटुंबाला पूर्णता आली. १९४८ ते १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून त्यांनी टोरोंटो, कॅनडा तसेच ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले. नंतर नियोजन आयोगाच्या ‘योजना’ या मासिकाची मुहूर्तमेढही त्यांनी रोवली आणि त्याच्या संपादनाची धुराही वाहिली. नॅशनल हेरॉल्ड, हिंदुस्तान टाइम्स आणि इलस्ट्रेटेड वीकलीचे संपादक म्हणून पत्रकारितेत त्यांनी भरीव कामगिरी केली. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या वृत्तसाप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने देशव्यापी प्रसिद्धी लाभली. या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले. १९८० ते १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. १९७४मध्ये पद्म भूषण किताबाने त्यांना गौरविले गेले. मात्र सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविल्याच्या निषेधात १९८४मध्ये त्यांनी हा किताब परत केला.
२००१मध्ये पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या लिखाणात अधिक अंतर्मुखता आली. २००७मध्ये सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविले. विविध संस्थांनीही त्यांचा गौरव केला होता तसेच अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली होती.
फाळणीपूर्व आणि फाळणीनंतरच्या भारतातील सर्व प्रमुख घटनांचे ते महत्त्वाचे साक्षीदार होते. या घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यकर्त्यांशीही त्यांचे निकटचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय लिखाणात वास्तवाचे अधिक स्पष्ट प्रतिबिंब उमटत असे. कथा असोत, कादंबरी असो, वृत्तपत्रीय स्तंभलेखन असो, राजकीय भाष्य असो की आटोपशीर विनोद असोत प्रत्येक जातकुळीच्या लिखाणात त्यांच्या प्रवाही शैलीचा प्रत्यय येत असे.
पुरस्कार, मानसन्मान
*१९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
*१९७४ : पद्मभूषण
*२००० : ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर, सुलभ इंटरनॅशनल
*२००६ : पंजाब रत्न अ‍ॅवार्ड
*२००७ : पद्मविभूषण
*२०१० : साहित्य अकादमी ’फेलोशिप अ‍ॅवार्ड
*२०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अ‍ॅन्यअल फेलोशिप अ‍ॅवार्ड
*२०१३ : जीवनगौरव पुरस्कार, टाटा लिटरेचर लाइव्ह, मुंबई
‘शब्दां’जली
“खुशवंत सिंग निर्भय विचारवंत होते. घटनेच्या अंतरंगात खोलवर शिरणारी तल्लख बुद्धी, शब्दांना असलेली आगळी धार आणि विनोदाची उत्तम समज त्यांना लाभली होती.”
 राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

“ते जन्मजात साहित्यिक होते आणि राजकारणाचे सहृदय भाष्यकार तसेच माझे अत्यंत जिवलग मित्र होते. ते खऱ्या अर्थानं सर्जनशील आयुष्य जगले.”
पंतप्रधान मनमोहन सिंग

“लाहोर विधि महाविद्यालयात ते आमचे प्राध्यापक होते. मी नेहमीच त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहात आलो. शीख पंथाबद्दलचं त्यांचं लिखाण हा या विषयावरचा सर्वात विश्वासार्ह दस्तावेज आहे.”
कुलदीप नय्यर

“शब्द राखून त्यांनी कधीच काही लिहिलं नाही. ते खऱ्या अर्थानं धाडसी लेखक होते. उर्दू काव्याचा त्यांचा व्यासंगही उदंड होता.”
मार्क टुली  

“वयाच्या विशीत मी वृत्तपत्रसृष्टीत आलो. आम्ही कुणीही नव्हतो, पण आम्हाला खुशवंत सिंग यांनीच हेरलं. त्यांनी इतक्या संधी दिल्या की त्यांची स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. एखाद्याला त्यांनी हेरलं आणि  एम. जे. अकबर

“लेखक आणि निर्भय व्यक्ती म्हणून ते मोठे होतेच पण त्यांची खरी अलौकिकता लोकांना घडविण्यात होती. नवनव्या लेखकांची ते मुक्तकंठानं स्तुती करीत, त्यांना भेटण्यासाठी वेळ देत आणि निकोप मते मांडून मार्गदर्शनही करीत.”
राजमोहन गांधी

“आमच्या वयात खूप अंतर होतं तरी ते नेहमीच अत्यंत जवळीकीने वागले.
त्यांना जसा हवा होता तसा मृत्यू लाभला. हा मृत्यू खरं तर साजरा केला पाहिजे. त्याचा शोक करता कामा नये.”
बिशन सिंग बेदी
खुशवंत सिंग यांची ग्रंथसंपदा
संदर्भ : द हिस्ट्री ऑफ शिख्स, १९५३,  द शिख्स टुडे, १९५९, द फॉल ऑफ द किंगडम ऑफ द पंजाब, १९६२,  द रणजित सिंग – द महाराजा ऑफ द पंजाब, १९६३,  गदर १९१५ – इंडियाज फर्स्ट आम्र्ड रिव्हॉल्यूशन, १९६६ , ट्रजेडी ऑफ पंजाब, १९८४,  सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप – सिलेक्टेड रायटिंग्ज, १९९२ ,  नॉट अ नाइस मॅन टु नो – द बेस्ट ऑफ खुशवंत सिंग, १९९३  वुई इंडियन्स, १९९३  वुमन अँड मेन इन माय लाइफ, १९९५ ,अनसर्टेन लेसन्स, सेक्स, स्ट्रीफ अँड टुगेदरनेस इन अर्बन इंडिया, १९९५ ,  डिक्लेरिंग लव्ह इन फोर लँग्वेज, १९९७ , वुईथ मॅलिस टुवर्डस वन अँड ऑल द एन्ड ऑफ इंडिया, २००३ ,  डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप, २००५ , द इलस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ द शिख्स, २००६, व्हाय आय सपोर्टेड द इमर्जन्सी – एसेज अँड प्रोपाइल्स, २००९,  अग्नॉस्टिक खुशवंत सिंग, देअर इज नो गॉड, २०१२, खुशवंतनामा – द लेसन्स ऑफ माय लाइफ, २०१३ द गुड, द बॅड अँड द रिडिक्युलस, २०१३
*आत्मचरित्र : ट्रथ, लव्ह अँड अ लिटल मॅलिस, २००२
*कथासंग्रह : द मार्क ऑफ विष्णू अँड अदर स्टोरीज, १९५०, द व्हाईस ऑफ गॉड अँड अदर स्टोरीज, १९५७, अ ब्रिगेड फॉर द साहिब अँड अदर स्टोरीज, १९६७,  ब्लॅक जस्मिन, १९७१, द कलेक्टेड स्टोरी, १९८९,  द पोट्र्रेट ऑफ अ लेडी, २००९,  द स्ट्रेन, सक्सेस मंत्रा,  अ लव्ह अफेअर इन लंडन,  पॅराडाइज अँड अदर स्टोरीज, २००४
*टीव्ही लघुपट : द थर्ड वर्ल्ड – फ्री प्रेस, १९८२
कादंबऱ्या
ट्रेन टू पाकिस्तान, १९५६, आय श्ॉल नॉट हिअर द नाइटिंगेल, १९५९ , दिल्ली – अ नॉव्हेल, १९९०, द कंपनी ऑफ वुमेन, १९९९, बुरिअल अ‍ॅट द सी, २००४  द सनसेट क्लब २०१०,
मन मौजी
खुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक बाजू त्यांच्या सहकारी विमला पाटील यांनी ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये अधोरेखित केल्या होत्या. विविध भूमिकांमधील ‘खुशवंत छटां’ना हा पुनर्उजाळा..
पत्रकार म्हणून..
खुशवंत यांनी त्यांच्या जमान्यातल्या संपादकांपेक्षा निराळय़ा दोन गोष्टी केल्या. त्याआधी संपादकाविषयी अशी आदरयुक्त भीती लोकांच्या मनात असे की, ते कुणाला भेटत नाहीत, कामात असतात, त्यांची मर्जी असेल तरच भेटतात. त्यामुळे लोकही त्यांना वचकून असत. ही प्रतिमा खुशवंत सिंग यांनी खरवडून काढली. त्यांना कुणीही भेटू शकत असे. कुणाची मुलाखत घ्यायची तर ताजमध्ये न जाता इराण्याकडे जाऊन तिथे ते त्याच्याशी बोलत. थोडक्यात, संपादकीय खुर्चीविषयीचा घुमेपणा आणि गवगवा त्यांनी घालवला. तुम्हाला त्यांच्याशी सहजपणे बोलता, हसता यायचं. विनोदही करता यायचे. तुम्हाला हवं ते त्यांच्यासोबत ‘शेअर’ करता यायचं. खुशवंत उत्तम संपादक होते. त्यांनी केवळ लोकांसाठी आपलं व्यक्तिमत्त्व तयार केलेलं नव्हतं. ते अनेकांतले पत्रकार होते. ते कुणाशीही बोलू शकायचे. त्यांच्या काही नियम-अटी नव्हत्या. ‘भारताचं काय होणार?’ यावर एखाद्या मान्यवर व्यक्तीची मुलाखत घेऊन बाहेर पडल्यावर ते रस्त्यावरच्या पेपरविक्रेत्यालाही विचारत की, ‘तुला काय वाटतं? पुढे काय होणार आहे?’ ..अशा प्रकारची पत्रकारिता खुशवंत यांनीच पहिल्यांदा सुरू केली.
संपादक म्हणून.
‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चं आधीचं रूप हे फक्त उच्चभ्रू लोकांचं नियतकालिक असं होतं. खुशवंत यांना ते मान्य नव्हतं. नियतकालिक जनसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे, तरच ते यशस्वी होऊ शकतं. त्या दृष्टीने त्यांनी ‘वीकली’मध्ये अनेक बदल केले. परिणामी, हे साप्ताहिक जनसामान्यांचं होऊन त्याचा खप ६५ हजारांवरून चार लाखांपर्यंत गेला. ‘वीकली’ हे साप्ताहिक होतं आणि केवळ स्त्री वा पुरुषांपुरतंच ते मर्यादित नव्हतं. त्यांनी त्याचा मोठय़ा प्रमाणावर लाभ उठवला. त्यांनी ‘वीकली’ला भारतीय नियतकालिक बनवलं. पॉप्युलर पत्रकारिता म्हणजे काय, हे खुशवंत यांना खूप चांगलं माहीत होतं. त्या काळचं कुठलंही नियतकालिक उघडून त्याच्या संपादकीय पानावरील भाषा आणि इतर पानांवरील भाषा पाहावी. त्या वेळचं संपादकीय पान हे बुद्धिजीवींसाठीच असायचं. संपादक सामान्य माणसांबद्दल बोलत नसत. खुशवंत यांनी संपादकीयाची ही रूढ प्रतिमा मोडून काढली. त्यातला उच्चभ्रूपणा घालवला. संपादक नावाच्या कुणालाही न भेटणाऱ्या, जनसामान्यांशी फटकून राहणाऱ्या पत्रकाराची प्रतिमा बदलवण्याचं काम त्यांनी केलं. आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारूनही यशस्वी संपादक होता येतं, हे त्यांनी सिद्धही केलं.
व्यक्ती म्हणून..
त्यांना काही लोक ‘विचित्र’ म्हणत, पण मला तसं वाटत नाही. ते श्रीमंत आणि गरीब यांत फरक करत नसत. त्यांची मैत्री निखळ होती. ते कुणालाही आपल्याकडे चहाला वा गप्पा मारायला बोलवीत. पण एक होतं- त्यांचं वागणं आणि त्यांचं संपादनाचं काम हे पूर्णपणे प्रामाणिक होतं.. ‘आय अ‍ॅम व्हॉट आय अ‍ॅम’ पद्धतीचं. त्यांच्याविषयी कुणी काहीही बोला, त्यांना काहीच फरक पडत नसे. त्यांना आपलं काम आणि आपण भले, एवढंच माहीत होतं. थोडक्यात काय, तर खुशवंत यांचं व्यक्तिमत्त्व भेळीसारखंच संमिश्र आणि चटपटीत होतं.
मृत्यूचं चिंतन केलं, चिंता नव्हे..
पेंग्विन प्रकाशनाच्या ‘अ‍ॅब्सोल्यूट खुशवंत : द लो-डाऊन ऑन लाइफ, डेथ अ‍ॅण्ड मोस्ट थिंग्ज इनबिट््विन’ या पुस्तकातील संपादित अंश..
घरात आपण कित्येक विषयांवर तावातावानं चर्चा करतो, पण मृत्यूची चर्चा मात्र टाळतो. असं का व्हावं, याचं मला आश्चर्य वाटतं. विशेषत: मृत्यू येणारच आहे, तो अटळ आहे, हे माहीत असूनही आपण त्याची चर्चा टाळत असतो. मिर्झा यास यागान चंगेझी यांचं वाक्य किती चपखल आहे? खुदा में शक़ हो न हो, मौत में नहीं कोई शक़! खुदा आहे की नाही, यावर संशय असू शकतो, पण मृत्यू आहेच, यात संशय नाही. आणि प्रत्येकालाच त्याला सामोरं जावं लागतं.
वयाच्या ९५व्या वर्षी माझ्याही मनात मृत्यूचे विचार येतात. मी अनेकदा मृत्यूचा विचार करतो, पण त्यामुळे माझी झोप काही मी गमावलेली नाही. मृत्यूमुळे जे आयुष्यातून गेले ते आता कुठे असतील, असा उत्सुक विचारही मनात चमकून जातो. ते कुठे गेले असतील, आता कुठे असतील.. मला उत्तरं माहीत नाहीत. तुम्ही कुठे जाता आणि नंतर काय घडतं?
मृत्यूला तोंड कसं देता येईल, असा प्रश्न मी एकदा दलाई लामांना विचारला होता. त्यांचं उत्तर होतं, साधनेनंच ते शक्य आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही. मृत्यू अटळ आहे. मी मृत्यूचं चिंतन खूप केलं आहे, पण चिंता केलेली नाही. मी मरणासाठी तयार आहे. असदउल्ला खाँ गालिबम् यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘रौं में है रक्श-ए-उमर, कहाँ देखिये, थामे, नहीं हाथ बाग पर है, न पा है रकबम् में’’ आयुष्य अगदी वेगानं सरत असतं आणि ते कुठे थांबेल, कुणाला कळत नाही. आपल्या हातात ना लगाम आहेत ना पाय रकिबीत आहे!
माझे सर्वच समकालीन, मग ते इथले असोत, इंग्लंडमधले असोत की पाकिस्तानातले असोत, आज हयात नाहीत. येत्या एक-दोन वर्षांत मी तरी असेन की नाही, सांगता येत नाही. मला मृत्यूची भीती वाटत नाही, पण वृद्धावस्थेमुळे दिसेनासं झालं तर किंवा मी अगदी अशक्त झालो तर, याचीच मला भीती वाटते. तसं जगण्यापेक्षा मरायलाच मला आवडेल. मला एकच आशा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो अगदी अलगद यावा, कमी त्रासाचा असावा, डुलकी लागताच जग जसं हळूच ओसरावं, तसा यावा. तोवर मी काम करीत राहीन आणि आला दिवस आनंदानं जगत राहीन. खरं तर किती तरी गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. इक्बालच्या शब्दांत मी स्वर मिसळतो आणि म्हणतो, ‘‘बाग-ए-बहिश्त से मुझे हुक्म-ए-सफर दिया था क्यूं? कार-ए-जहाँ दराज़्‍ा है, अब मेरा इंतिज़ार कर’’ या आनंदवनातून मला बाहेर काढण्याचा आदेश तू दिलासच कसा? मला किती तरी गोष्टी करायच्या आहेत, आता तूच माझी थोडी प्रतीक्षा कर! त्या ईश्वराला मी बडेम् मियाँच म्हणतो. मग मी त्या बडे मियाँला वेळोवेळी सांगत असतो की माझी बरीच कामं बाकी आहेत आणि त्याला वाट पाहावी लागणार आहे.
मरण हा सोहळा आहे, हे जैन तत्त्वज्ञानाचं सांगणं मला भावतं. पूर्वी मी जेव्हा जेव्हा निराश व्हायचो किंवा मनानं खचायचो तेव्हा दफनभूमीत जायचो. ही स्मशानयात्रा म्हणजे जणू उपचारच असायचा. मनातली निराशेची सगळी जळमटं झटकली जायची.
पत्नीचं निधन झालं तेव्हा खरं तर मृत्यूचं उग्र रूप मी आयुष्यात प्रथम अनुभवलं होतं. नास्तिक असल्यामुळे कोणत्याही धार्मिक विधींनी माझं मन शांत झालं नाही. मुळातच एकांतप्रिय असल्यामुळे सांत्वनेसाठी घरी येण्यापासून मीच मित्रांना आणि आप्तांना रोखलं. तिच्याशिवायची पहिली रात्र मी अंधाऱ्या खोलीत माझ्या नित्याच्या खुर्चीवर बसूनच काढली. कित्येकदा मला रडूही आलं, पण अखेर मीच मला सावरलं. कित्येक दिवसांनी माझा दिनक्रम पूर्ववत झाला.  दहनापेक्षा दफन मला अधिक आवडतं. कारण जे तुम्ही मातीतून मिळवलं असतं, ते पुन्हा मातीला परत करत असता. बाकी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक क्रिया मला मंजूर नाहीत. आजही माझी प्रकृती चांगली आहे, तरी फार दिवस उरलेले नाहीत, हे मलाही जाणवतं. सध्या माझ्या मृत्यूशी वाटाघाटी सुरू आहेत. माझी स्वत:ची तयारी सुरू आहे. देवावरच श्रद्धा नसल्यामुळे ना माझा कयामतच्या दिवसावर विश्वास आहे, ना पुनर्जन्मावर विश्वास आहे. मला केवळ पूर्णविरामच हवा आहे. दिवंगत बुजुर्गही माझ्या लेखणीच्या फटकाऱ्यातून सुटले नाहीत, याबद्दल काही जण माझ्यावर टीका करतात. पण मृत्यू काही कुणाला संतत्व बहाल करीत नाही. मग एखादा गेलेला माणूस भ्रष्ट असल्याचं समजलं तरी मी त्याबद्दल लिहितोच. मी पुरेसं आणि पूर्णपणानं जगलो आहे. जेव्हा जाण्याचा क्षण येतो, तेव्हा कुणाहीविरुद्ध कोणतंही किल्मिष न बाळगता, अढी न बाळगता माणसाला शोभेल असं जावं. इक्बालही म्हणतो, श्रद्धावंताची खूण कोणती, असं मला विचाराल तर मी सांगेन की मृत्यू आल्यावरही त्याच्या ओठांवर प्रसन्न हसूच असतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta pay homage to khushwant singh

फोटो गॅलरी