– अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

क्षमा-साधनेचे काही टप्पे आहेत. ते जाणून घेतले तर प्रत्येकालाच या शक्तीचे दर्शन घेणे शक्य आहे. व्यवहारात, क्षमा मागण्याचे आणि करण्याचे प्रसंग आपल्यावर नेहमी येतात. कोणी अपराध केला तर शिक्षा न करता क्षमा करणे ही क्षमेची अगदी प्राथमिक स्थिती आहे.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?

आपला अपराध करणाऱ्या व्यक्तीला माफ करणे आणि एवढेच नव्हे तर तिने केलेला अपराध विसरून जाणे हा दुसरा टप्पा झाला.

कवी ब्राउिनग म्हणतो त्याप्रमाणे,

‘ Good to forgive.Best to forget !!’

हा ब्राउिनग विनोबांचा आवडता कवी होता. गीता प्रवचनामध्ये तो डोकावून जातो.

अपराध करणाऱ्या व्यक्तीला माफ करणे, तिचा अपराध विसरणे आणि त्या व्यक्तीचे गुण-ग्रहण करणे ही तिसरी पायरी झाली.

चौथ्या टप्प्यावर, अपराध करणाऱ्या व्यक्तीवर उपकार करण्याची भावना राखली जाते.

आणि अंतिम म्हणता येईल अशा टप्प्यावर या कृतींचे चित्तावर ओझे नसावे हे पाहिले जाते.

क्षमेच्या या विविध टप्प्यांमुळे सामाजिक व्यवहार आणि कृती यांच्यासाठी एक मोठे क्षेत्र खुले होईल. विनोबांच्या मते, सूक्ष्म पातळीवर सत्याग्रह कल्पनेचा विचार केला तर तो क्षमेचाच आविष्कार आहे.

क्षमा या शक्तीचे सर्वकाळ आणि कमालीचे साम्य असणारे संदर्भ दिसतात. अपेक्षित परिणाम होत नाही तोवर क्षमा करत रहायची हा भगवान येशूंचा उपदेश होता. इकडे तो सिद्धार्थाच्या मुखातून प्रकटला.

सात वेळा क्षमा करायची आणि त्यानेही कार्यसिद्धी झाली नाही तर सात गुणिले सत्तर वेळा क्षमा करायची. थोडक्यात क्षमा करत रहायचे किंवा क्षमाच करत रहायचे.

क्षात्र धर्माचा विचार करता क्षमेला मर्यादा असू शकते. परंतु क्षमेकडे आपण एक शक्ती म्हणून पाहतो तेव्हा निरंतर केली जाणारी क्षमा ही दुर्बलता नसते. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे ‘क्षमेची तीक्ष्णता तिच्या सौम्यतेत आहे.’ या एका वाक्यात क्षमेचे स्वरूप सिद्ध होते.

शस्त्र निष्प्रभ ठरते त्याच्या जागी आणखी संहारक शस्त्र वापरले जाते. याला उत्तर अधिक खोल अधिक सूक्ष्म पातळीवरील क्षमा हेच असू शकते. व्यवहारही हेच सांगतो. शस्त्रानेच मात करायची हे तत्त्व आज तंतोतंत आचरणात आणायचे ठरवले तर सर्व विनाश अटळ आहे इतकी विज्ञानामुळे आपली ‘प्रगती’ झाली आहे.

सत्य आणि क्षमा यांची जोडणी करताना विनोबांनी प्रेम शक्तीला आमंत्रित केले आहे. ‘सत्य-प्रेम-करुणा’ म्हणा की ‘सत्य-प्रेम-क्षमा’ म्हणा, अर्थ बदलत नाही.

ही मूल्य-त्रयी स्वीकारायची की संहाराला सामोरे जायचे याचा निर्णय आपल्याला करावा लागणार आहे. कारण आजची युद्धखोरी हिंसेकडून संहारापर्यंत पोचली आहे. अशावेळी,

क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जन: किं करिष्यति ।

अतृणे पतितो वन्हि: स्वयमेवोपशाम्यति ।।

(ज्या व्यक्तीच्या हाती क्षमारूपी शस्त्र असते त्याला दुर्जन काय त्रास देणार? गवत नसणाऱ्या भूमीवर अग्नी आला की तो आपोआप शांत होतो).

हा परंपरेचा उपदेश आदर्श म्हणून ठेवायला हवा. विनोबाही तेच सांगतात.